मीतालांचे प्रयोग करत असताना विविध प्रकारचं संगीत ऐकत आलोय, संगीताच्या सादरीकरणातील सहजता मला खूप आवडते… आणि त्यामुळेच सादरीकरणातील छोटीशी स्वाभाविकपणे होणारी चूक गाणं बिघडवते, असं मी मानत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, संगीताच्या परिभाषेत ती ‘चूक’ मानली जाते; मला मात्र हीच चूक गाण्याचं सौंदर्यस्थळ वाटते… आणि मला संगीतातील या सौंदर्यस्थळांचंच आकर्षण वाटत आलंय… आपण सारखाच ‘परफेक्शन’चा किंवा अचूकतेचा आग्रह का धरतो? तो धरताना एखाद्या गाण्यातील छोटीशी चूक हीच अनेकदा त्या गाण्याचं सौंदर्यस्थळ असतं हे अनेकदा आपण लक्षातच घेत नाही. ही चूकच त्या सादरीकरणातील जिवंतपणाची खूण आहे ना! आपण जेव्हा सारं अचूक असायलाच हवं असं ठामपणे म्हणतो; तेव्हा मग अशा सौंदर्याला- जे खरं तर गायकाकडून सहजतेनं त्या गाण्यात उमटलेलं असतं- आपण मुकतो. मला तर कायमच अशा लोभस वाटाव्या अशा चुकांचं सौंदर्य, त्यातील मौज मनाला भिडत आलीय. अचूकतेच्या या आग्रहापायी गाण्यातील सौंदर्यसुखाला आपण मुकतो.

मी १९८६ पासून ऱ्हिदम प्रोग्रामिंगने रेकॉर्डिंगला सुरुवात केली. त्या काळातही सगळे वाद्यावृंद मेहबूब स्टुडिओमध्ये एकत्र बसून तालीम करायचे. त्यात गायकही असायचे. गाणं वाद्यासंगीतासोबत कसं वाटतंय हे पाहिलं जायचं. मग जे काही बदल सुचतील ते करून झाले की त्या वेळच्या पद्धतीनुसार रेकॉर्डिंग व्हायचं. कधी कधी गाण्यात छोटीशी चूक व्हायची, पण मला वाटतं, काही मानवी चुकांमध्ये एक प्रकारचं सौंदर्य असतं. आपण जेव्हा मुकेशजींना ऐकतो तेव्हा अनेकदा आपल्याला असं वाटतं की, इथे गाताना सुरावट पट्टीत राहूनही बदलली म्हणजे संगीताच्या परिभाषेत ती ‘चूक’ आहे. मात्र इथे तो स्वरबदल होताना गाण्यात जो भाव उमटतो तो थेट हृदयाला भिडतो. आणि तेव्हाच त्याची खरी जादू लक्षात येते. पण ‘परफेक्शन’च्या सोसात असा थेट ‘हृद्याप्रभावी’ प्रमाद हल्ली ऐकायला मिळत नाही.

तुम्ही साठच्या दशकातील गाणी ऐका. खासकरून पंचमदांची गाणी. त्यांचं ताल संयोजन फार वेगळं असायचं. ते स्वत: तबला आणि इतर वाद्यो सुंदर वाजवायचे. त्यांची अनेक गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. त्यांचं एक गाणं आहे, ‘मेरी जाँ मैंने कहा’… त्या गाण्याची जी सुरुवात होते ना ती काहीशी निसटली आहे. बारकाईनं ऐकलं तर लक्षात येईल की ते गाण्याच्या लयीसोबत आलं नाहीये. तेव्हा तर ‘लाइव्ह’ रेकॉर्डिंग असायचं. या गाण्यातील ती सुरुवात फार अवघड आहे. गाण्याचे स्वर जेव्हा पहिल्यांदा येतात तेव्हा ते थोडेसे इथे-तिथे होतात, मग पुढे मात्र त्यात अचूकता येते. पण मला विचाराल तर ते जे सुरुवातीचे सरकलेले सूर उमटले तेच जास्त ‘परफेक्ट’ किंवा नैसर्गिक होते. म्हणजे संगीताच्या चौकटी जरा बाजूला ठेवून पाहिलं तर संगीतकर्त्यांकडून नकळत घडलेली ही गोष्टच ऐकायला गोड वाटते. आणि कधीतरी ते गाणं या राहून गेलेल्या प्रमादासह लोकप्रिय होतं.

गाण्याचं ताल संयोजन करण्याची माझी पद्धत तुम्हाला सांगतो, जर मला एखाद्या गाण्यात तालांचं संयोजन करायचं असेल तर मी एखादा ताल नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. ताल जसाच्या तसा उचलून गाण्यात वापरायचा हे मला मंजूर नसतं. मी याबाबत फार ठाम असतो की, एखाद्या गाण्यात मुखडा असेल तर संपूर्ण मुखडा अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत मीच वाजवणार. आणि त्यात कधी थोडा रेंगाळणारा भाग आला तर काय बिघडतं? तो तसाच राहू द्यावा. म्हणजे अनेकदा स्टुडिओमध्ये असं होतं की, वाद्यां वाजवणारे आठ लोक एकत्र असतात, अशा वेळी जिथे एकसाथ ‘ताख’ वाजवायचा असतो तिथे एकदम थोडीशी लय निसटून ताखऐवजी. ‘खाख’ पडतो. अशा वेळी थोडंसं गडबडलं असं वाटतं, पण त्यातच मजा आहे. म्हणजे आठ लोक एकत्रित वादन करत असतील तर थोडं इथे-तिथे होणं साहजिकच आहे. पण त्यातही एक गंमत आहे. म्हणजे पाहा, जर गाण्याच्या मागे तबला थोडासा जास्त असेल तर जरुरी नाही की ते सोबतच जातील. अब्बाजी सांगायचे तसं- भारतीय शास्त्रीय संगीतात ‘भरी आणि खाली’मध्ये सौंदर्य आहे. तेव्हा संगीतात ही जी मौज आहे ती येऊ द्यात. अचूकतेचा कठोर आग्रह नको.

मला लहापणापासून खूप गोष्टी करायच्या होत्या. याबाबतची एक आठवण खास आहे. लहानपणी रेडिओवर जेव्हा आर. डी. बर्मन यांचं ‘अपना देस’ चित्रपटातील ‘दुनिया में… लोगों को’ हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यातील श्वासांची लयकारी ऐकून मी इतका थक्क झालो की, संपूर्ण दिवस मी ती लयकारी करत घरभर फिरत होतो. आईला तर वाटलं, माझ्यात भूत संचारलं की काय? पण खरंच या गाण्यातील लयकारीनं मला अक्षरश: वेड लावलं. लहानपणापासून असं काही वेगळं ऐकलं की ते लगेच मनात रुंजी घालत राहायचं. माझ्या लहानपणी माहीमला जिथे आम्ही राहायचो तिथेच शेजारी बाबा मखदूम शाह यांचा दर्गा होता. तिथे उरूसात नगारे वाजायचे, तेव्हा मी जेवण सोडून रस्त्यावर तो ‘नाद’ ऐकण्यासाठी जायचो. इतकं मला ‘ताला’चं वेड होतं. मला कायमच आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. मग पुढे जेव्हा थोडं संगीताचं आकलन झालं तेव्हा शास्त्रीय संगीत सोडून चित्रपट संगीताकडे वळलो. नंतर तालांचे प्रयोग करताना अब्बाजींकडून मिळालेला समृद्ध वारसा गाठीशी होताच, त्यामुळे मला कुठेही थांबावं लागलं नाही.

अब्बाजींमुळे आम्ही सर्जनशील…

घरात अखंड संगीत होतं, त्यातही तबला अधिक होता. म्हणजे आमच्या घरात ‘ए टू झेड’ संगीत होतं – ए म्हणजे अल्लारख्खा आणि झेड म्हणजे झाकीर हुसेन! मी लहान असताना जेव्हा अब्बाजी तबल्यावर ताल धरत असत तेव्हा तिथे उभा राहू ठेका धरत असे. अब्बाजी माझे वडीलही होते आणि गुरूही! वडील म्हणून त्यांनी कधीच कोणती गोष्ट करण्यापासून अडवलं नाही. अगदी तेव्हाही नाही अडवलं, जेव्हा मी शास्त्रीय संगीत सोडून चित्रपट संगीताकडे वळलो. घरात असं मोकळं आणि स्वातंत्र्य देणारं वातावरण होतं, त्यामुळे कधीही बंडखोरी वगैरे करावी लागली नाही… तसा विचारही मनाला शिवला नाही. उलट संगीताचा वारसा असणाऱ्या घरात इतकं स्वातंत्र्य मिळणं हे फार दुर्मीळ आहे.

वडील म्हणून त्यांनी आम्हा मुलांचे लाडही तितकेच केले. यावरून आमची आई कधी कधी त्यांना म्हणत असे, ‘‘अशाने मुलं बिघडतील.’’ आम्ही कधी हट्ट केलाच आणि त्यांना तो पूर्ण करणं शक्य असेल तर तो त्यांनी पुरवला, पण गुरू म्हणून ते फार शिस्तप्रिय होते. ते शिकवत असायचे तेव्हा कधी कधी आम्ही संगीताचे बोल लिहून घेत असू ते मात्र त्यांना अजिबात पसंत नसे. त्यांचं म्हणणं असे की, आपण जेव्हा रंगमंचावर कला सादर करतो तेव्हा वही घेऊन बसत नाही. या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत. याचा फायदा असा झाला की, आमची स्मरणशक्ती सुधारली. एखादी गोष्ट एकदा दोनदा ऐकली तरी सहज लक्षात राहू लागली. या शिस्तीचा पुढे संगीत क्षेत्रात फायदाच झाला. मला अजूनही आठवतंय, तबला शिकताना सुरुवातीला ते काहीतरी सादर करून दाखवत असत. पण त्यांनी सादर केलेली एखादी गोष्ट आम्ही जशीच्या तशी सादर केली की ते आम्हाला ओरडायचे. ते म्हणायचे, ‘‘अरे, तू मला शिकवतोयस का की असं वाजवायचं म्हणून? काहीतरी वेगळं करावं. पोपटासारखं जे दाखवलंय त्याचीच नक्कल पुन्हा करून दाखवू नये.’’ यामुळे नकळतच आमच्यावर नवीन काहीतरी करण्याचा संस्कार झाला. माझं प्रामाणिक मत आहे की, अब्बाजींमुळे आम्हाला सर्जनशीलतेचं वरदान लाभलं.

‘जेम्बे’ला आपल्या संगीताने स्वीकारावं…

आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतानं अनेक पाश्चात्त्य वाद्यां स्वीकारली. व्हायोलिनसारखं वाद्या पाश्चात्त्य आहे. कर्नाटक आणि उत्तर भारताच्या शास्त्रीय संगीतात तर त्याचा वापर अगदी सहज होतो. आज जेम्बेचा प्रचार फार झाला आहे. आता हे वाद्या शास्त्रीय संगीतात अनेकांना आवडतं, या वाद्याला भरपूर प्रेम मिळतंय. शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गजांचं प्रेम जसं मला मिळतंय तसं ते या वाद्याचंही कौतुक करतात. मी तर तालाचं सादरीकरण करताना जेम्बेचा उपयोग तर करतोच, मात्र साथसंगत करतानाही या वाद्याचा वापर करतो. मला असं वाटतं की, मी जी काही मेहनत करतोय याचं फळ तर मला मिळत आहेच. पण आज जेम्बे लोकांना आवडतंय हे पाहून जास्त आनंद होतो. जेम्बेच्या प्रसारासाठी मी प्रयत्न करतो आहेच, पण माझं एक स्वप्न आहे की ‘जेम्बे’ला भारतीय शास्त्रीय संगीतानं स्वीकारावं.

शिकवण ‘तबल्या’चीच फक्त वाद्यां निराळी

मी संगीतात कोणताही प्रयोग करायला जातो तेव्हा त्यात शास्त्रीय संगीत आपसूकच येतंच. कारण माझ्या संगीत निर्मितीचा गाभा हाच मुळाच भारतीय शास्त्रीय संगीताचा आहे. अब्बाजींना याचा आनंद होता की, मला जी तबल्याची शिकवण मिळाली आहे तीच शिकवण मी इतर वाद्यांच्या साहाय्यानं उलगडण्याचा प्रयत्न करतोय. ‘अजपा जाप जपो भाई साधो, सासों की करलो माला’ यात कबीर ‘श्वासांची माळ’असं म्हणतायेत तर ते इतकं आवडलं की त्यात मी श्वासांची लयकारी करण्याचा प्रयोग केला. म्हणजे मी जेव्हा श्वासांची लयकारी करण्याचा प्रयत्न करतो; तेव्हा अगदी मी शास्त्रीय संगीतात जसं ‘भरी आणि खाली’ असतं तोच प्रयत्न लयकारी करतानाही असतो की ‘भरी आणि खाली’ची उत्कंठा मी श्वासाच्या माध्यमातून उलगडू शकेन. आणि ताल कुठे नाही? आपल्या श्वासातही ताल आहे की! आपल्या हृदयाच्या ठोक्यांना, नाडीला ताल आहे, आपल्या बोलण्याला आणि चालण्यालाही एक ताल आहे. म्हणजे आपल्या साऱ्याच अस्तित्वाला एक ताल आहे फक्त तो आपल्याला ओळखू येत नाही.

अहंकार विसरूनच ‘फ्युजन’ साकारते…

जेव्हा जेव्हा मी एखाद्या संगीतकारासोबत एकत्र येऊन वाद्यांचे प्रयोग करतो; तेव्हा आपल्याला सारं काही विसरून जायचं असतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला विसरायची असते ती म्हणजे आपल्यातील अहंकार, त्यानंतर आपलं जे संगीत आहे तेही विसरून जा. आणि तुमच्या सोबत फ्युजन करणारा कलाकारही जेव्हा या गोष्टी करेल तेव्हाच मला वाटतं सर्वोत्त्कृष्ट फ्युजन आकाराला येईल. विशेष करून मी तरुणांना हा सल्ला देईन की दुसऱ्या कलाकाराविषयी आदर आणि प्रेम राखा. मी इतर कलाकारांना भेटताना हे तथ्य पाळतोच. आणि माझा अनुभव असा आहे- जेव्हा आपण सारं विसरून एकमेकांना भेटतो, तेव्हाच आपण आपली साचेबद्धता मोडून नव्या आकाराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतो.

संगीतात व्यवहार लक्षात घ्या

जर तुम्ही संगीत क्षेत्रात व्यवसाय करत असाल आणि तुमच्या उपजीविकेचा हाच मुख्य स्राोत असेल तर आधी व्यवहार लक्षात घ्या. त्यामुळे काम करत असताना आधी त्याचा मोबदला किती मिळणार आहे याची माहिती करून घ्या. पण यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मोबदला म्हणून कितीही पैसे मिळो, पण तुमचं काम हे लाखात एकच असलं पाहिजे. त्यामुळे व्यवहार लक्षात घेऊन आपण जे काम करतोय त्यावर आपली छाप कशी पडेल हेही पाहिलं पाहिजे. मला एक किस्सा आठवतोय, एकदा राकेश चौरसियांना कुणीतरी विचारलं की, ‘‘तुम्ही जेव्हा कार्यक्रमासाठी जाता तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त भीती कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ त्यावर ते लगेच म्हणाले, ‘‘पैसे मिळतील की नाही याचीच भीती वाटते.’’ कार्यक्रम करताना व्यवहाराबाबत माहिती असणं फार गरजेचं आहे. मी स्वत:ही कार्यक्रम करताना या गोष्टीची खात्री करत असतो आणि आजच्या काळात तर व्यवहारी दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे.

‘सूरसे ताल मिला!’

माझी पत्नी गितीकानं माझ्यासाठी तिनं तिचं गाणं बाजूला ठेवलं. तिची भक्कम साथ मला आहे. गितीकाची आणि माझी पहिली भेट झेविअर्स महाविद्यालयात झाली. तिथेच आमची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मी तिच्या प्रेमात आधी पडलो, ती नंतर पडली आणि आम्ही लग्न केलं. ती गायिका असल्यानं आमचं जमलं आणि खरं सांगायचं तर ‘सूरसे ताल मिला!’ आम्हाला आई-वडिलांचे, अब्बाजी-अम्मीजींचे आशीर्वाद मिळाले. पुढे आमच्या मुलाचं नाव ठेवताना डोक्यात ‘शिखर’ हे नाव होतं. अब्बाजींना सांगितलं की मला मुलाचं नाव एखाद्या तालाच्या नावावरून ठेवायचं आहे आणि ‘शिखर’ हे नाव डोक्यात आहे. त्यांनाही हे आवडलं. शिखर हे तालाचं नाव आहे आणि तो सतरा मात्रांचा ताल आहे. पण नाव ठेवताना मात्र आम्ही ‘शिखरनाद’ असं ठेवलं.

‘मुंबई स्टॅम्प’ कसे साकारले?

साधारण २००१ साल असावं तेव्हा माझे थोरले बंधू झाकीर भाईंनी आम्ही अमेरिकेत असताना मला प्रसिद्ध बँड ‘स्टॉम’ ऐकण्याविषयी सुचवलं. तेव्हा मला या बँड विषयी खरी काही माहिती नव्हती. मात्र मी जेव्हा त्यांना ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी अक्षरश: टाकाऊ अशा वस्तूंमधून ताल निर्माण केले आहेत. मुंबईला परतल्यानंतर मलाही असंच काहीतरी करावंसं वाटत होतं. ‘स्टॉम’ने मी प्रभावित झालो होतो. मी लगेच कामाला लागलो. माझ्या शिष्यांना सांगितलं की, ज्या टाकाऊ वस्तू तुम्हाला मिळतील त्या घेऊन या. प्रयोग करून पाहिला तेव्हा लक्षात आलं, ही तर केवळ नक्कल होतेय. त्यावेळी मला अब्बाजींनी दिलेली शिकवण आठवली, कधीही नक्कल करू नका हे त्यांनी आमच्यावर बिंबवलं होतं. मग मी विचार केला तेव्हा मला वाटलं, माझ्याकडे तबला आणि ज्ञान आहे. मी या ज्ञानाच्या जोरावर फक्त तबल्यातूनच नाही तर कुठल्याही माध्यमातून अभिव्यक्त होऊ शकतो. त्याच सुमारास मी दक्षिणेतील प्रसिद्ध तालवादक विक्कू विनायकराम यांच्याकडे शिक्षण घेत होतो. मग मी ठरवलं, आपण दक्षिणेतील आणि उत्तरेतील संगीत एकत्र करून काहीतरी प्रयोग करूयात. माझ्यावर लोकसंगीताचा प्रभावही होताच. त्यातही महाराष्ट्रातील लेझीम, लावणी आणि गोंधळ हे सगळं मला फार आवडतं. मग या सगळ्या तालांना या प्रयोगात कसं आणता येईल हा विचार केला. आणि मग या सगळ्यापासून प्रेरणा घेत मी अगदी वेगळ्याच बाजाची ताल निर्मिती ‘मुंबई स्टॅम्प’मध्ये केली.

चित्रपट संगीत प्रभावांनी भरलेले…चित्रपट संगीतच्या सुरुवातीच्या काळात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रभाव होता. अगदी ठुमरी, भजन आणि गझल वैगरेंचाही प्रभाव होता. आणि नंतर अगदी लोकसंगीताचा प्रभावदेखील आपल्याला दिसून येतो. पंचमदाचं गाणं घ्या ना, ‘चुनरी संभाल गोरी…’ या गाण्याची सुरुवात लेझीमच्या तालापासून झालीये हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळे चित्रपटातील संगीत हे त्या त्या संगीत दिग्दर्शकाची अभिरुची आणि त्यांच्यावर कोणत्या संगीताचा प्रभाव पडला यावरही अवलंबून आहे. सी. रामचंद्र यांना पाश्चात्त्य संगीत फार आवडायचं, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये ते जास्त दिसतं. नौशाद साहेबांवर भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रभाव होता त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीत डोकावतंच. नंतर संगीतकार लक्ष्मीकांत आणि पंचमदांच्या काळात तर चित्रपट संगीत पुष्कळच बदललं. सलीलदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुमती’ चित्रपटाचं संगीत ऐकलं तर त्यावरील पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा प्रभावही कळून येतो. इलेक्ट्रॉनिक संगीताची ओळख रेहमानने करून दिली असं मानलं जातं आणि अर्थात त्यानंही यात योगदान दिलंच, पण रेहमान ज्यांच्यासोबत काम करत होता ते दक्षिणेतील संगीतकार इलायराजा यांनी खरी इलेक्ट्रॉनिक संगीताची ओळख करून दिली. हे श्रेय त्यांचे आहे.

‘रियाजा’मुळे अलिप्त होणं सोपं…

संगीत क्षेत्रातील बरीच मंडळी अलिप्त होण्यासाठी रियाज करतात. मीही सगळ्यापासून अलिप्त होण्यासाठी रात्रीच्या वेळी रियाज करतो. रात्रीच्या वेळी मला जेम्बेवर प्रयोगही करता येतात. पण त्या आधी मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो ती म्हणजे फोन बंद करून ठेवतो. तुम्हाला सगळ्यापासून दूर जात स्वत:ची लय शोधायची आहे ना, मग आधी फोन बंद करा. आजचं सगळं जगणंच फोनभोवती फिरत असतं. आपल्याला सतत फोन लागतो. त्यामुळे मी अगदी मध्यरात्री रियाज पूर्ण होईपर्यंत फोन बंद ठेवतो.

काळाच्या पुढे विचार करणारी ‘अम्माजी’

माझी आई म्हणजे आम्हा सगळ्या भावंडांच्या ‘अम्माजी’ने कायमच आम्हाला सगळ्यांना कलेसोबत शिक्षणाचं महत्त्वही पटवून दिलं. म्हणजे मी सांगतोय तो काळ पन्नासच्या दशकातील आहे. तेव्हाही तिनं माझ्या मोठ्या बहिणांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी महाविद्यालयात पाठवून पदवी शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आम्हा सगळ्यांना तिनं शिस्त लावली. आमच्या घरात अनेकदा पंडित रविशंकर आणि इतर कलाकारांच्या मैफिली होत असत. या मैफिली रात्री उशिरा सुरू होऊन पहाटे चारपर्यंत वगैरे चालत. अशा वेळी आम्हा मुलांना वाटायचं, आता शाळेला सुट्टी! पण आई सकाळी आम्हाला झोपेतून उठवून शाळेत पिटाळत असे. ती काळाच्या पुढे विचार करणारी होती. याचं एक उदहारण द्यायचं झालं तर, आम्ही आधी माहीमला राहायचो. अम्माजीला तिथलं जगणं माहीत होतं, पण आम्हा मुलांना एका बहुभाषिक अशा विस्तृत जगाची ओळख व्हावी म्हणून तिनं आमचं बिऱ्हाड माहीम वरून ‘नेपियन सी रोड’ इथं हलवलं. म्हणजे आमच्या जडणघडणीच्या बाबतीत ती किती विचारी होती हे यावरून लक्षात येईल.

अब्बाजींनी भेद केला नाही…

कलाजगतात आणि त्यातही संगीताच्या जगात असा एक समज असतो की गुरू शिष्यांना जेवढं देतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त तो आपल्या मुलांना देतो. मी म्हणेन की, हा समज फार चुकीचा आहे. कारण गुरू हा ‘गुरू’च असतो आणि त्याला देणंच माहीत असतं. यावरून झाकीर भाईंचं एक वाक्य आठवलं, ‘‘गुरूपेक्षा अधिक महत्त्व हे शिष्याला असतं.’’ शिकण्याची, ज्ञानाची लालसा शिष्यापाशी असते म्हणून गुरू असतो. त्यामुळे शिष्यांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अब्बाजींचे एक शिष्य रणजित बारोट म्हणायचे, ‘‘जेव्हा जेव्हा मी अब्बाजींच्या समोर शिकण्यासाठी म्हणून बसतो तेव्हा मला असं वाटतं की मी एका विशाल सागरासमोर उभा आहे आणि समोर सुनामी सारखं ज्ञान माझ्याकडे येतंय. माझ्या हाती इवलासा द्रोण आहे, त्यात जितकं येईल तितकंच माझं आहे.’’ त्यामुळे आपली ‘घेण्या’ची क्षमता किती आहे हेही महत्त्वाचं आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आजही शिष्यच आहे. अब्बाजी नेहेमी म्हणायचे की, ‘‘आजन्म शिष्य होऊन राहा. तुमच्यात शिकण्याची आणि दुसऱ्याकडून चांगलं घेण्याची इच्छा ही सर्वोच्च असली पाहिजे.’’ हे आयुष्यभर जपत राहायला हवं. तारुण्य हे हृदयात असतं आणि संगीत ही एक अशी कला आहे की त्याच्याशी जर तुम्ही जोडलेले असाल तर ते तुम्हाला कायम तरुण ठेवतं. माझी अशी फार फार इच्छा आहे की, एक दिवस असा यावा की मी जे वाद्या वाजवेन, त्या वाद्याच्या अपूर्व रंगात मी इतका तल्लीन होऊन जाईन, इतका रममाण होईन की मी स्व:च एक वाद्या होऊन जाईन… अशी अवस्था यावी.

‘हिट’, ‘फिनोलेक्स’ आणि जिंगल्स

मी बऱ्याच जिंगल्स केल्या. जेव्हा ‘हिट’ स्प्रे आला होता तेव्हा त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं. मग डास आल्यानंतर आपण ज्या पद्धतीने हालचाली करतो त्यातून जे ताल निर्माण होतात ते घेऊन ती जिंगल केली. फिनोलेक्सच्या ४५ सेकंदांच्या जिंगलमध्ये फक्त बटणांचा आवाज आहे. मडक्यात बटणाचा आवाज कसा येईल, भिंतीवरल्या बटणावर चेंडू फेकून मारला तर कसा आवाज येईल तर असे बटणांचे आवाज घेऊन ती जिंगल केली. भारतीय रेल्वेसाठी मी एक जिंगल केली होती तर त्यात कुठलेही वाद्या वापरलं नव्हतं. केवळ शरीर आणि आवाजाच्या साहाय्याने मी तालनिर्मिती केली होती. कान चित्रपट महोत्सवात याच जिंगलसाठी मला ‘सर्वोत्तम संगीता’साठीचं सुवर्णपदक मिळालं होतं.

तुम्ही एखादं वाद्या घ्या किंवा एखादं गाणं घ्या, त्यात सर्वश्रेष्ठ काय आहे तर ‘सूर’ हेच सर्वश्रेष्ठ आहेत. सूर एकत्र येतात, तेव्हा सूर हे मुख्य प्रवासी आहेत आणि चालक… एखादा कलाकार सुरांना जेव्हा बांधतो तेव्हा तो ठेका काय असणार आहे हे ठरवतो. सुरांना योग्य दिशेनं जिथं पोहोचायचं आहे आणि समेवर यायचं आहे ते लयीच्या सोबतच होणार असतं. ठेका असा असायला हवा की सुरांना जराही धक्का लागता कामा नये. एखादा गायक जेव्हा अशा लयीसह आणि ठेक्यासह सुरांना सादर करून समेवर येतो तेव्हा रसिकांना कलेचा एक अलौकिक असा अनुभव मिळतो.

‘जेम्बे’शी गट्टी जमली

मी संगीतात खूप प्रयोग केले. अगदी सुरुवातीला मी काँगा हे वाद्याही वाजवून पाहिलं, ड्रम्सवरही मी प्रयोग करून पाहिले. १९९८ मध्ये झाकीर भाईंनी मला एक छोटा जेम्बे आणून दिला. या वाद्याशी माझी लगेच गट्टी जमली आणि मला वाटलं हे तेच वाद्या आहे जे मला कधीपासून हवं होतं. अब्बाजींनी इतकं दिलं होतं त्यातील एक ‘रेला’ मला आठवला आणि मला वाटलं हा रेला मी जेम्बेवर वाजवू शकतो. जेव्हा मी त्यावर प्रयोग करायला सुरुवात केली तेव्हा खरं तर हे वाद्या फारसं कुणाला माहीत नव्हतं. आज माझे कितीतरी शिष्य, माझा मुलगा शिखरनाद जेम्बे वाजवतो तेव्हा मला आनंद होतोच. पण जेव्हा माझ्या शिष्यांव्यतिरिक्त कुणीतरी जेम्बे वाजवतं तेव्हा अनेकांना यातून प्रेरणा मिळतेय हे पाहूनही मी अधिक भारावतो.

सध्या तरी ‘एआय’चं आव्हान नाही…

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चांगल्या हेतूने केला तर ते निश्चितच फायद्याचं आहे आणि भविष्यासाठीही चांगलं आहे. याचा सध्या तरी भारतीय संगीताला थेट धोका नाहीये. आपलं संगीत मग ते उत्तरेचं असो अथवा दक्षिणेचं ते अधिककरून (इम्प्रोवाईज) रागाच्या चौकटीत सादर होणारं असं संगीत आहे त्यामुळे कलाकार जेव्हा ते रसिकांसमोर सादर करतो, तेव्हा त्यात फार उत्स्फूर्तता असते. ते आधी ठरवून केलेलं नसतं. त्यामुळे सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता इथे पोहोचली आहे असं मला वाटत नाही. आता फक्त एका कलाकाराने गायलेलं एखादं गाणं दुसऱ्या कलाकाराच्या आवाजात रूपांतरित करणं इतकंच कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते. आणि तेवढ्यापुरतं ते ठीकही आहे. पण कदाचित दहा वर्षांनंतर कृत्रिम बुद्धिमत्तेला या गोष्टी करणं साध्य होईलही, पण तेव्हाचं तेव्हा बघून घेता येईल.

शब्दांकन : सिद्धार्थ म्हात्रे

siddharth.mhatre@expressindia.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.