दृश्यकलेतलं स्त्रीचं वस्तूकरण ठामपणे नाकारण्याचा इतिहास हा स्त्रियांनीच घडवलेला आहे. काळाच्या आणि संस्कृती/ समाज यांनी गृहीतच धरलेल्या बंधनांना हळूहळू तोडत हा इतिहास पुढं गेला. भारतीय चित्रकलेत यातलाच एक टप्पा म्हणून गोगी सरोज पाल, रीनी धुमाळ यांच्यासाख्या चित्रकर्तींची नोंद होईल…
पुरुष चित्रकार आणि स्त्री ही त्याची ‘मॉडेल’- तीच त्याची स्फूर्तिदेवता वगैरे… आणि अनेकदा तीच त्याची प्रेयसी (जग तिच्यासाठी ‘रखेल’ हा शब्द कुजबुजत वापरतं)- अशी उदाहरणं तिकडे युरोपात साधारण १६ व्या शतकापासून आणि आपल्याकडेही एकोणिसाव्या शतकापासून आहेत. यशस्वी चित्रकारांचा हा सरंजामी थाटच एक प्रकारचा. त्या थाटाचे आधुनिक अवतार दिसत राहिले, त्याला रगेल/ रंगेलपणाचे निकष लागत राहिले. त्याहीनंतर अनेक पुरुष चित्रकारांनी स्त्रीदेहाची ‘रसरशीत फळाप्रमाणे पुष्ट’ चित्रणं केली.
झाडावरून तोडून तुमच्या डायनिंग टेबलावर अवतरलेलं फळ ही वस्तू आणि चित्रकारासमोरची बाई हीसुद्धा चित्रण करण्याची वस्तूच, इतका सरळसाधा प्रकार हा. स्त्री-चित्रणाच्या या पुरुषी जगातून बाहेर पडणं हेच दृश्यकलेतल्या स्त्रियांच्या ऐतिहासिक योगदानापुढलं आव्हान होतं. म्हणजे एकप्रकारे, जग या सगळ्या चित्रकार स्त्रियांना जणू बेमुर्वतपणे प्रश्न विचारत होतं : आम्ही बुवा बाईकडे चित्रातल्या वस्तूसारखंच बघतो… तुम्ही काय नवे दिवे लागणारात?
यावर उत्तरं आलीच. अगदी सतराव्या शतकातल्या थोड्याथोडक्या युरोपीय (विशेषत: इटालियन) स्त्रियांनाही या आव्हानाची जाणीव होती, याचा पुरावा म्हणून आर्टेमिसिया जेन्टेलेचि हिच्याकडे बोट दाखवलं जातं. तिनं स्वत:चीच व्यक्तिचित्रं केली! इतकी की, आजच्या अंजू दोडियांच्या पूर्वसुरी म्हणून या आर्टेमिसियांचा उल्लेख करता येईल. लढाऊ कॅथरीन, वाद्या वाजवणारी स्त्री, चित्र रंगवणारी किंवा स्वत:च चित्र झालेली स्त्री असे आर्टेमिसियांचे चित्रविषय होते. रुथ मिलिंग्टन यांच्या ‘म्यूस’ (स्फूर्तिदेवता) या पुस्तकात ‘सेल्फ अॅज म्यूस’ असं एक मोठं प्रकरणच आहे आणि त्यात फ्रीडा काह्यलो, ट्रेसी एमीन (विशेषत: तिचं मांडणशिल्प- ‘बेड’) अशा घडत्या इतिहासाचे उल्लेख आहेत. पण कलेचा इतिहास काही फक्त पाश्चात्त्य जगात घडत नसतो. तो इथंही घडत होताच. भारतीय स्त्रियांच्या एकमेकींविषयीच्या आत्मीयतेचं चित्रण अमृता शेरगिल करत होत्या, कुणी रतन वडके ‘सेल्फ न्यूड’ करत होत्या, भारतीय कलाशाळांत शिकलेल्या अनेकजणी ‘स्त्रीचं जग’ हाच विषय निर्णयपूर्वक हाताळत होत्या, यातल्याच कुणी स्त्रीला शक्तिशाली म्हणून चित्रित किंवा शिल्पित करण्याच्याही निर्णयापर्यंत आल्या होत्या आणि पुढं नलिनी मलानी, नीलिमा शेख, अशा काहीजणींनी समाज आणि स्त्री यांच्या नात्याबद्दल आज-आत्ता आत्मपरीक्षण झालं पाहिजे असा आग्रह मांडला होता. पण अशा काहीजणी अपवादच होत्या. बाकीच्या बऱ्याचजणी ‘स्त्रीजीवन’, ‘स्त्रीच्या भावभावना’ अशा विषयांची चित्रं करणाऱ्या. यात शैलीचं वैविध्य निश्चितपणे होतं. उदाहरणार्थ, प्रतिभा वाघ यांची चित्रं. महाराष्ट्रातल्या पिंगुळी- चित्रकथी शैलीचा अभ्यास आणि एकंदर भारतीय लघुचित्रशैलींची जाण यांतून प्रतिभा वाघ यांची चित्रं रूपसमृद्ध झाली आहेत. पण त्यातल्या स्त्रिया जमेल तितक्या स्वच्छंदी- स्वतंत्र आहेत. पण पुरुषप्रधान जगाच्या चौकटीला चित्रकर्तीची मान्यता असावी, अशा प्रकारचा आशय या चित्रांमध्ये आढळतो (प्रतिभा वाघ यांची अनेक वर्षांची कलासाधना आता प्रतिभावाघ.कॉम या वेबसाइटवर दिसू शकते. ती अवश्य पाहावी. पण ‘दर्शिका’ या सदराचा हेतूच, आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला- आणि पर्यायानं भारतातल्या स्त्री-चळवळीला ५० वर्षं होत असल्याच्या निमित्तानं, ही चळवळ चित्रकलेतूनही पुढे गेली का- असल्यास कशी- याची तपासणी करणं हा आहे.) या चळवळीच्या संदर्भात चित्रं पाहाता येतात, कारण मुळात चळवळीचं आवाहनच व्यापक होतं. त्याआधीच्या ‘शिकलेली बायको’ (१९५९) , ‘पोस्टातील मुलगी’ (१९५४) वगैरे चित्रपटांतूनही दिसलं होतं की मुली- स्त्रिया सक्षम होऊ शकतात- पण ही सक्षमता स्वयंभू असायला हवी, तरच एकंदर जगातलं स्त्रीचं स्थान भोग्यवस्तूसारखं राहाणार नाही, अशी संघटित जाणीव भारतातल्या स्त्री-चळवळीनं १९७५ पासून दिली.
या पार्श्वभूमीवर आज दोघींच्या चित्रांकडे पाहू. त्याहीपेक्षा, ज्या काळात ‘वस्तूकरण नको, मग काय हवं?’ या प्रश्नाचं उत्तर इच्छा असूनही अनेकींना सापडत नव्हतं, त्या १९७५ नंतरच्या काळाकडे पाहू.
गोगी सरोज पाल (१९४५-२०२४) आणि रीनी धुमाळ (१९४८-२०२१) या दोघीही आज या जगात नाहीत. जगही बरंच बदललं आहे- या जगात आता मिठू सेन, शिल्पा गुप्ता, रीना सैनी यांसारख्या दृश्यकलावंत आहेत. पण या दोघीही तिशीच्या आतबाहेर होत्या, त्यांनी चित्रकलेच्या विद्यार्थिनी म्हणून, मग चित्रकार म्हणून काहीएक चमक दाखवलेलीच होती, साधारण १९६५ ते १९७५ या दशकभरात स्त्रीकेंद्री चित्रंही काढली होती… अशा वेळी १९७५ उजाडलं… स्त्रीमुक्तीचा उद्घोष- त्या वेळी बऱ्याच जणांना पटला नाही तरी- झालाच. यानंतर या दोघींचीही चित्रं अधिक बदलली, असं दिसतं. आपल्यासाठी हे इतकंच आत्ता महत्त्वाचं आहे. ही चित्रं महान आहेत, असं सुचवण्याचा हेतू इथं अजिबात नाही. काळाच्या अमुक टप्प्यावरली अमुक एक घडामोड म्हणूनच आपण १९७५ नंतर कुणा चित्रकर्तींमध्ये काही फरक पडल्याचं दिसतं का, याविषयी चर्चा उपस्थित करतो आहोत आणि त्याची उदाहरणं म्हणून इथं रीनी धुमाळ आणि गोगी सरोज पाल आहेत. दोघीही मूळच्या मुद्राचित्रकार, दोघींचेही नवरे चित्रकारच, हा निव्वळ योगायोग म्हणू किंवा ‘अदर थिंग्ज बीइंग कॉन्स्टन्ट’ सारखा भाग मानून, साधारण वय, शिक्षण, परिस्थिती, जोडीदार हे सारं जवळपास सारखंच असलेल्या या दोघींनी काय केलं, हे पाहू.
गोगी सरोज पाल यांनी मुद्राचित्रांप्रमाणेच, सिरॅमिक कलेतही काम केलं. त्यांची उपलब्ध रंगचित्रं ही १९८० नंतरचीच आहेत, याचं हे एक कारण. अमृता शेरगिलच्या चित्रांमधल्या स्त्रिया एकमेकींसह बसलेल्या दिसतात, तशाच गोगी यांच्या चित्रांतही आधी होत्या. नंतर मात्र ही स्त्री-समूहांची चित्रं बदलली. या स्त्रिया वस्त्रहीन- निसर्गावस्थेत- पण अगदी सहजपणे (अजिबात ‘पोज’ न देता) बसलेल्या दिसतात. पण त्याआधी १९८३-८४ मध्ये ‘मण्डी’ ही चित्रमालिका गोगी यांनी केली… त्यातले स्त्री-समूह वेश्यांचे होते. मण्डी याच नावाचा श्याम बेनेगल यांचा चित्रपट फेब्रुवारी १९८३ मध्ये आला होता, त्यातून केवळ मध्यवर्ती कल्पनेची उसनवारी करून, आपल्याच चित्रांतल्या स्त्रियांना गोगी यांनी जणू प्रश्न विचारला- तू अशी असतीस तर? गोगी सरोज पाल यांच्या या ‘मण्डी’तल्या बायका (बेनेगल यांच्या चित्रपटातल्या शबाना आझमीप्रमाणेच) जगणं स्वीकारणाऱ्या आणि स्वत:वर विश्वास ठेवणाऱ्या दिसतात. या मालिकेनंतर त्यांनी नग्न स्त्रीदेहाच्या तीन रूपांवर भर दिला- किन्नरी, नायिका आणि कामधेनू ही ती तीन रूपं. यापैकी किन्नरी ही मुक्त पक्षिणी- ती जरी बसलेली दिसली, तरी कधीही उडणार आहे. कामधेनू ही पोषणकर्ती. तिचं शरीर गाय आणि बाई यांच्या संगमाचं. नायिका ही प्रेक्षकांना भावदर्शनाचा अनुभव मुद्दाम सादर करून दाखवणारी- त्या अर्थानं ‘मण्डी’तल्या स्त्रियांसारखीच, पण त्याहीपेक्षा ज्युडिथ बटलर यांच्या ‘परफॉर्मेटिव्ह जेंडर’चा अनुभव देणारी. बटलर यांचं लिखाण गोगी यांनी वाचलं असेलच असं नाही; पण स्त्री असं तुम्ही जिला म्हणता ती मुळात ‘समाजाच्या स्त्रीबद्दलच्या अपेक्षा (अनिच्छेनं का होईना) पूर्ण करणारं ’ माणूसच असते, या सत्यापर्यंत गोगी नक्कीच पोहोचल्या होत्या असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळतं.
रीनी धुमाळ यांच्याबद्दल निकटवर्तीयांकडून वगैरे काही जाणून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकानं केलेला नाही. पण त्या महत्त्वाकांक्षी असाव्यात. त्यांनी आधी ‘देवी’ या विषयावर चित्रं केली. मग चित्रातली स्त्री ‘राणी’ झाली. डोक्यावरला मुकुट तसाच राहिला. या चित्रांच्या अलीकडे- पलीकडे, काही आत्ममग्न स्त्रियांची चित्रंही रीनी यांनी केली. मुद्राचित्रणाच्या पद्धतींमुळेही असेल, पण रीनी यांच्या चित्रांमध्ये रेषा भरपूर असायच्या. रंग पुंजक्यांसारखे पण महत्त्व रेषांनाच असायचं. या रेषांची दृश्यभाषा वाचण्याचा प्रयत्न केला तर, निश्चयानं आणि निकरानं काहीतरी विधान करण्याचा आविर्भाव त्या रेषेतून जाणवेल. या आविर्भावाचा संबंध चित्राच्या आशयाशी नसतो. पण स्त्री ही आदरणीय- उच्च स्थानावर बसलेली आहेच, असं सांगून आशयाचा प्रश्नच रीनी सोडवून टाकतात.
या दोघींची चित्रं अनेकदा प्रदर्शित झाली, चित्रलिलावांमध्ये आली… त्या अर्थानं त्यांनी कलाबाजार-केंद्री इतिहासात स्थान मिळवलेलं आहेच. स्त्रीमुक्तीचा संस्कार त्यांच्या चित्रांवर निश्चितपणे दिसतो आहे, पण तरीही ही चित्रं ‘मुक्त’ नाहीत. ही मधली अवस्था आहे. तो टप्पा आता भारतीय कला-इतिहासाचा भाग आहे. इतिहासाच्या या पायावरच, पुढल्या अनेकींची उभारणी सुकर झालेली आहे.
(चित्र सौजन्य : गोगी सरोज पाल यांची दोन्ही चित्रं ‘दिल्ली आर्ट गॅलरी’च्या संकेतस्थळावरून, तर रीनी धुमाळ यांचं चित्र ‘एनजीएमए’च्या सौजन्याने)
abhijit.tamhane@expressindia.com