प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल आता भारतीय लेखक आणि साहित्य रसिकांचंच केवळ आकर्षणस्थळ उरलं नसून, ते जागतिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तीर्थस्थळ बनलं आहे. त्यामुळे या साहित्यवारीला उत्सुकतेनं जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यंदाच्या लिट् फेस्टचा माहोल आणि फलित मांडणारे दोन लेख..

‘‘या वर्षी जयपूर लिट् फेस्टमध्ये काही वादंग होताना दिसत नाही.. की राज्य सरकारकडून आयोजकांना बरीच रसद पोहोचली आहे?’’

‘‘ही मंडळी म्हणजे इंग्रजाळलेली.. त्यांना जमिनीवरील प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही.’’

‘‘पाच दिवस नुसती मौज करण्यासाठीच तर हा प्रपंच..’’

‘‘इंग्रजी लेखकांना भारतीय वाचकांवर लादणे हाच या महोत्सवाचा उद्देश आहे..’’

‘‘इथे भारतीय भाषांतील लेखक दिसत नाहीत, मग आम्ही का जावे तिथे?’’

– हे आणि असे बरेच प्रश्नार्थक सूर दरवर्षी जयपूर साहित्य मेळा भरण्याच्या सुमारास उमटत असतात. यंदाही हे असे प्रश्नार्थक सूर काहींनी आळवले होतेच. मात्र, आताशा सवयीच्या झालेल्या या प्रश्नांना, आक्षेपांना ऐकतच हा साहित्य मेळा जसा दरवर्षी भरतो, फुलतो, तसाच तो यंदाही भरला. पाच दिवसांत देशविदेशातील नामांकित लेखकांच्या तब्बल १८१ सत्रांनी फुलला. नव्हे, वरील आणि त्याव्यतिरिक्तच्याही अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा ठरला!

ऐतिहासिक खुणा मिरवणाऱ्या जयपूर शहरी हा साहित्य मेळा गेली १३ वर्षे भरतो आहे. यंदा त्याचे १४ वे पर्व पार पडले. खरे तर आधी ‘हेरिटेज फेस्टिव्हल’ या व्यापक महोत्सवाचा एक भाग म्हणून हा साहित्य मेळा सुरू झालेला. दोन वर्षांनंतर त्या मुख्य महोत्सवाचे आयोजन खोळंबले; मात्र हा साहित्य मेळा सुरूच राहिला. पहिल्या-दुसऱ्या पर्वात काही शे माणसांनी उपस्थिती लावलेला हा साहित्य महोत्सव नंतर मात्र असा विस्तारला, की आता तो जगभरच्या साहित्यरसिकांचा ‘मेळा’च झाला आहे. यंदा तर तब्बल चार लाखांहून अधिक जणांनी इथे उपस्थिती लावली असे सांगितले जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आणि जगातील विविध देशांतून आलेले हे वाचक-प्रेक्षक. इथे एक फेरफटका मारला तरी ही विविधता पहिल्या नजरेतच ध्यानात येते. इतक्या साऱ्यांना तिथे जावेसे वाटले, असे काय आहे या साहित्य मेळ्यात?

या प्रश्नाच्या उत्तराकडे जायचे तर साहित्य मेळ्याच्या यंदाच्या पर्वाचा थोडक्यात आढावा घ्यायला हवा..

दिग्गी पॅलेस या १८६० साली बांधलेल्या आणि आता हेरिटेज हॉटेल म्हणून चालवल्या जाणाऱ्या राजवाडय़ाच्या आवारात दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा साहित्य मेळा भरला. हे स्थळ जणू या मेळ्याचा आत्माच. मध्यभागी एक चौकवजा मोकळी जागा आणि त्याभोवती सहा वेगवेगळ्या ठिकाणी होणारी चर्चासत्रे- अशी ही रचना. झगमगाटी शहरीकरणाचा थाट भारतातील इतर शहरांप्रमाणे इथेही दिसत असला, तरी साहित्य मेळ्याचे हे स्थळ नैसर्गिक प्रसन्नता शाबूत असणारे आवार राखून आहे. तिथे सकाळी नऊपासून सुरू होणाऱ्या बरोब्बर एक-एक तासाच्या सत्रांना संध्याकाळपर्यंत चांगलीच उपस्थिती असते. टॅब्लॉइड आकाराच्या कार्यक्रमपत्रिकेत नमूद चर्चासत्रांचा आपापला प्राधान्यक्रम ठरवून लगबगीने त्या ठिकाणी हजर राहणाऱ्या वाचक-प्रेक्षकांत जशी  वयस्क मंडळी होती, तशीच तरुणाईही दिसत होती. स्थानिक राजस्थानी होते, तसेच विदेशी पर्यटकही होते. लिहिते हात असणारे काही ओळखीचे चेहरे दिसत होते, तसेच पहिल्यांदाच आलेले व दबकत, अंदाज घेत वावरणारेही होते. इंग्रजी ही मेळ्याची मुख्य संवादभाषा असली तरी उपस्थितांतून मराठीसहित अनेक भारतीय भाषांतील बोल ऐकू येत होते. पण हा बहुभाषिक संवाद एका शिस्तीने पार पडत होता. चर्चासत्रांतील वक्ते बोलत होते, उपस्थित ते शांतपणे ऐकून घेत होते. कधी टाळ्यांनी प्रतिसाद देत होते, प्रश्न विचारत होते. चर्चासत्रांनंतर वक्ते/लेखकांची स्वाक्षरी घेण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्था केलेली होती, तिथे तर या मंडळींमध्ये थेट संवादही घडत होता. शशी थरूर आदी लोकप्रिय लेखकांची स्वाक्षरी घेण्यासाठी तर लांबलचक रांगा लागत होत्या. कोणास काही मदत लागली, चौकशी करायची असली, तर मेळ्याचे कार्यकर्ते तत्पर होते. एकुणात, महोत्सवाची आखणी करण्यामागील व्यवस्थापकीय विचार असा मूर्त रूपात दिसत होता.

मोठय़ा समूहाला सहभागी करून घेणारा हा साहित्य मेळा सुसह्य़ आहे म्हणूनही अनेकजण तिकडे वळतात, हे खरेच. परंतु त्याउप्परही आणखी काही त्यात आहे, ज्यामुळे बहुविध मंडळी या साहित्य मेळ्याला दरवर्षी मोठय़ा संख्येने येत असतात. त्याचे पहिले कारण म्हणजे या मेळ्याचे समकालीनत्व. देशातील आणि जगभरातील सद्य: वास्तवाचे पडसाद त्यात नेहमीच उमटतात. यंदा तर विस्कटलेल्या वर्तमानाचा तीव्र स्वर इथल्या जवळपास प्रत्येक सत्रात ऐकू आला. विशेषत: सुधारित नागरिकत्व कायदा आणि संभाव्य नागरिक नोंदणीविरोधी भूमिका अनेक वक्त्यांनी ठामपणे घेतली. या दोन्ही विषयांचे उल्लेख होत तेव्हा उपस्थितही त्यास प्रतिसाद देताना दिसत. शशी थरूर असोत वा विल्यम डॅलरिंपल, हर्ष मॅण्डेर असोत वा पवन के. वर्मा, नंदिता दास असो वा विधू विनोद चोप्रा.. अनेकांनी भवतालातील ताण्याबाण्यांची दखल घेतली. हे ताणेबाणे जसे नागरिकत्वाच्या मुद्दय़ावरून जोर धरलेल्या आंदोलनांचे होते, तसेच भारतीय संस्कृतीच्या बदलत्या स्वरूपाचेही होते. त्यात तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीतून उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल झाली, तशीच पर्यावरणीय आव्हानांचाही विचार झाला. शहरीकरणाच्या प्रक्रियेतील खाचाखोचा मांडल्या गेल्या, तसाच ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा लेखाजोखाही घेतला गेला. लोकशाहीच्या वाटचालीचा आढावा घेतला गेलाच; शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रवाहही मांडले गेले. नव्या इंग्रजी पुस्तकांवर इथे चर्चा झाली, तशीच भारतीय भाषांत नव्याने लिहित्या झालेल्यांचा परिचयही वाचकांना करून देण्यात आला. विषय कोणताही असो, वर्तमानाशी सांगड घालतच तो मांडला जात होता.

याला जोडूनच दुसरे कारण म्हणजे इथे असणारी लेखक-वक्त्यांची मांदियाळी. शोभा डे, केकी दारूवाला, शुभा मुद्गल, मकरंद परांजपे, मकरंद साठे, सुकेतू मेहता, मनीष मल्होत्रा यांच्यापासून नमिता वायकर, अमिताभ कांत, राजदीप सरदेसाई, राणा अयूब, दिया मिर्झा, नंदिता दास, सोनाली बेंद्रे, ओम स्वामी ते थेट अभिजीत बॅनर्जी, जयराम रमेश, श्याम सरण अशी भारतीय मंडळी इथे होती; तसेच ब्रिटिश कादंबरीकार होवार्ड जेकबसन, ‘लेटर्स टू ए यंग मुस्लीम’ या पुस्तकाने चर्चेत आलेले सौदी राजदूत ओमर घोबाष, ब्रिटिश विज्ञानलेखक मार्कस डय़ू सॉते, अमेरिकी लेखक स्टीफन ग्रीनब्लॅट असे अनेक अभारतीय लेखक-अभ्यासकही इथे होते. भारतीय वाचकांना काही परिचयाचे असलेले, काही पूर्णत: अपरिचित. त्या- त्या क्षेत्रातील ताजे व महत्त्वाचे लेखन केलेल्या या मंडळींकडून थेट त्याविषयी ऐकायला मिळणे ही पर्वणी नव्हे, तर आणखी काय!

विविध विषय आणि त्यावर बोलणाऱ्यांचीही विविधता हे जसे या साहित्य मेळ्याचे वैशिष्टय़ जाणवले, तसेच भारत आणि जग यांच्यातील संवादसेतू बांधणे हादेखील या मेळ्याचा एक महत्त्वाचा हेतू दिसतो. भारतीय इंग्रजी लेखकांविषयी सलमान रश्दींसारख्यांनी निर्माण केलेली प्रतिमा मिटवण्यासाठीची जी एक लेखन चळवळ भारतीय स्तरावर आकाराला आली, तिच्याशी जोडून घेण्यात या मेळ्याने आतापर्यंत नेहमीच प्राधान्य दिले आहे. भारतीय लेखनाची जगाला ओळख करून द्यायची आणि जगभरच्या लेखकांचे लेखनकर्तृत्व भारतीयांना सांगायचे कार्य हा साहित्य मेळा करत आला आहे. यंदाच्या पर्वातही ते दिसून आले. फैज अहमद फैज वा फिराक गोरखपुरी यांच्या कवितांविषयीचे सत्र असो किंवा सआदत हसन मंटोवरील वा हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या साहित्यिक कर्तृत्वाची ओळख करून देणारे सत्र असो; त्यास उपस्थित असणारे आणि तिथे मांडल्या जाणाऱ्या मतांना प्रतिसाद देणारे भारतीय आणि अभारतीय वाचक-प्रेक्षक पाहून तर याची खात्रीच पटली. विशेषत: भारतीय तरुणाईची या सत्रांना असलेली खच्चून उपस्थिती म्हणजे अशी सत्रे साहित्यिक पुनशरेधासमान का ठरतात, हेही आकळते. यासोबतच बंगालमधील नक्षलवादी म्हणून तुरुंगवास भोगलेल्या मनोरंजन ब्यापारींसारखा लेखक, झारखंडमधील हंसदा सोवेंद्र शेखरसारखा तरुण बंडखोर लेखक असो वा अभिनव चंद्रचूडसारखा युवा कायदे अभ्यासक.. या मंडळींनी मांडलेले विचार सद्य: कंठाळी वातावरणात शहाणीव देणारे ठरले.

असे असूनही या मेळ्याबद्दल वर उल्लेख केलेले प्रश्नार्थक सूर का उमटतात? तर- या मेळ्यातील मोकळीकतेने! ही मोकळीक जशी अभिव्यक्तीची आहे, तशीच ती विरोधी विचारांना सामावून घेण्याची, चर्चेनेच ते खोडून काढण्याचीही आहे. इथला मुख्य व्यवहार इंग्रजीतूनच होत असला तरी अनेक जण इथे जातात ते केवळ या मोकळिकीमुळेच. या मोकळीकेचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे त्यात कोणी श्रेष्ठ नसतो वा कनिष्ठ. अत्यंत नवखा, तरुण वक्ता तिथल्या ज्येष्ठ, लोकप्रिय वक्त्याच्या विचारांचा बेडरपणे प्रतिवाद करू शकतो. मुख्य म्हणजे दोन्ही बाजूंनी ते तितक्याच उदारपणे स्वीकारलेही जाते. भारतीय भाषांमधील साहित्य व्यवहारात असणारी कंपूबाजी आणि प्रस्थापिततेची सुप्त आकांक्षा पाहता अशी मोकळीक काहींना सलणारीच ठरावी. मुख्य म्हणजे सरकार कोणाचेही असो, गेल्या १३ वर्षांत हा साहित्य मेळा इमानेइतबारे आपले कार्य करत आला आहे. यंदाही त्याने तेच केले. याचे कारण ‘ज्ञानविज्ञानी उमाळा। सत्ता मारी तिरपा डोळा।’ हे मर्ढेकरांचे शब्द केवळ मराठीपुरतेच नाहीत!