आमच्या अगदी प्रेमळ अशा मोठय़ा मावशीच्या बंगल्यावर आम्ही सगळे सुटीसाठी राहायला गेलो आहोत. सकाळ झाली आहे. सर्व बायका स्वयंपाकघरात भरपूर नारळ खवून कोंबडी जराही तिखट लागणार नाही- अगदी कोबीच्या भाजीसारखीच लागेल याची काळजी घेत मसाला वाटत आहेत. रस्सा थोडा जास्तीचा करायचा आहे, कारण कुणीही बायका नॉनव्हेज खात नाहीत. त्यांना त्याच रश्श्यात फ्लॉवर-बटाटा घालून जेवण होणार आहे. अगदी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अंगणात सडा टाकत तुळशीची पूजा करताना आणि घरातल्या पूजेसाठी शेजारच्या लेल्यांच्या बागेतली प्राजक्ताची फुले वेचताना माझ्या मावशीने माझ्या मावसभावाला ‘‘कोंबडी आणतानाच नीट साफसूफ करून तिचे रक्त उगाच घरात सांडणार नाही हे पाहा. घरातून कापडी पिशवी घेऊन जा. प्लास्टिकच्या पिशवीत आणू नकोस,’’ असे फर्मान सोडले आहे. घरातले मोठे पुरुष अजून उठायचे आहेत. ते उठले की त्यांना चहापाणी केले की पुन्हा बायका स्वयंपाकघरात जाणार. मुले उठली आहेत. दहा दिवसांच्या गोडधोड खाण्यानंतर आज मावशी मस्त चिकन करणार आहे, या बातमीने मुले खुलून गेली आहेत. आमच्याकडे एका मामीला ‘कोण किती पोळ्या खाणार?’ असे स्वयंपाकाच्या आधी विचारायची घाणेरडी खोड आहे. मुले तिची तारांबळ उडवत मजा घेत आहेत. कुणी तिला दोन सांगते, मग परत थोडय़ा वेळाने पाच. कुणी तिला ‘मी सतरा पोळ्या खाईन,’ असे सांगते. त्यामुळे तिची पोळ्यांची गणिते चुकत आहेत. मधल्या मावशीच्या मुलाला दहावीत बरे मार्क पडले आहेत, त्यामुळे सगळ्या कोंबडय़ांचे सगळे पाय तो खाणार आहे, असे तो आरडाओरडा करून सांगतो आहे. मावशीच्या यजमानांची पूजा आटोपली आहे. ते निळा कद नेसून मोठय़ा गंभीर चेहऱ्याने चहाला बसले आहेत. बंगल्याच्या मागच्या अंगणात लूना स्टॅन्डवर उभी करून धाकटा मामा घरात लपतछपत शिरतो. त्याच्या हातात काचेचे काहीतरी वाजणारी मोठी कापडी पिशवी आहे. ‘झाली का रे पक्या सगळी सोय?’ असे माझे वडील आणि मधल्या मावशीचे यजमान मामाला विचारतात. मामा मान डोलावून ‘हो’ म्हणतो. ‘कसली सोय? काय आणले आहे त्या पिशवीत?’ असे कुणी मुलाने त्याला विचारले की तो सांगतो, ‘मोठय़ा लोकांचे औषध आहे. लहान मुलांनी ते प्यायचे नाही.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी गौरी-गणपती गेले की आमच्या आईच्या माहेरी चिकनच्या पाटर्य़ा होत. कारण काय, तर श्रावणात गोडधोड खाऊन पुरुष माणसे कंटाळली आहेत. आपल्या घरी चिकन केले जाते हे शाळेत किंवा इतर नातेवाईक माणसांना सांगायचे नाही, असा आम्हाला दम दिला जात असे. मला त्याचे काही वाटत नसे. कारण आमच्या कुंडलकरांच्या घरी सदासर्वकाळ माणसे नळ्या ओरपत असत. काका, बाबा अशा आमच्या घरातल्या कोल्हापुरी थाटाच्या माणसांना आईच्या माहेरचे कोकणस्थी चवीचे नारळ मारून चव बुजवलेले मांसाहारी जेवण आवडत नसे. आईच्या माहेरी आले की माझे वडील प्रत्येक घासासोबत कच्ची हिरवी मिरची खात.

चिकन खाणे म्हणजेच मांसाहार असे आम्हाला लहानपणी वाटे. ‘चिकन’ या शब्दाचा नीट अर्थ आम्हाला तेव्हा कळत नसे. चिकन हे आम्हा १) पुणेरी, २) पांढरपेशा, ३) बुद्धिमान आणि ४) मध्यमवर्गीय या चारही कंसात खुणा केल्या असलेल्या सोज्वळ पोरांमध्ये शाळेत मोठा थ्रिलिंग विषय होता. ‘तू नॉनव्हेज खातो का?’ असे वर्गात सगळी मुले एकमेकांना काही कारण नसताना विचारात बसलेली असायची. ‘तुमच्या घरी ड्रिंक्स घेतात का?’ हा त्याच्या पुढील प्रश्न असायचा. पण शाळेत आणि समाजात ‘या गोष्टी आमच्या घरात नेहमी केल्या जातात,’ हे सांगायची आमची टाप नव्हती. कारण आमचे वडील आम्हाला मोकळेपणाने बेदम मारू शकायचे. आणि त्याची आम्हाला भीती वाटायची.

लहानपणी आमच्या घरातली पुरुष माणसे स्टीलच्या फुलपात्रात रम किंवा व्हिस्की पीत. म्हणजे घरातल्या लहान मुलांना कळू नये- की घरात दारू प्यायली जात आहे. तांब्यात पाणी असायचे. फुलपात्रात दारू. आणि कॉटखाली कापडी पिशवीत उरलेल्या दारूच्या बाटल्या लपवलेल्या असत. सगळे बेफाम दारू पीत असत. चव किंवा आवड म्हणून मोजकी दारू पिणारे सभ्य लोक मी आयुष्यात फार नंतर पाहिले. लहानपणी घरात पुरुष माणसे एकत्र दारू प्यायला बसली की आम्ही मुले थोडय़ा वेळाने होणारी मौज पाहायला सरसावून बसत असू. जिथे पुरुष माणसे औषध घेत बसली आहेत तिथे जायची परवानगी नसायची. आमची बहीण मधेच जाऊन त्यांना दाणे, वेफर्स असा खाऊ  पुरवून येत असे. ते तिच्याकडे सारखा बर्फ मागत असत. आमच्या घरांमध्ये दारू पिऊन बायकांना मारायची किंवा शिवीगाळ करायची पद्धत नव्हती. पण दारू पिऊन माणसे खूप इमोशनल होत आणि एकमेकांची माफी मागत. मधेच स्वयंपाकघरात येऊन आपल्या बायकोला पूर्वी झालेल्या भांडणाबद्दल ‘सॉरी’ म्हणत. एकमेकांना मिठय़ा मारून रडत. आम्हा मुलांना एरवी अबोल असणारे किंवा चिडचिड करणारे आपले बाबा किंवा मामा असे पूर्ण इमोशनल होऊन रडारड करताना पाहून पोटभर हसू येत असे. पुरुष असे पूर्ण इमोशनल झाले की लगेचच गरम गरम पोळ्या करायला घेऊन त्यांना आणि मुलांना वाढायचे अशी पद्धत होती. ‘मासूम’ सिनेमात नासिरुद्दीन शाह एका पार्टीत बायकोशी गाणे म्हणून रोमॅंटिक वागतो, हे पाहिल्यापासून आमच्या घरी दारू पिऊन गायची पद्धत सुरू झाली होती. असे कुणी गायला लागले की घाबरून लगबगीने आमची मोठी मावशी- ‘‘चला बाई, पोळ्या करायला घ्या. निर्मला, तू ताटे-वाटय़ा घे. वहिनी, तुम्ही रश्श्याला एक उकळी आणा..’’ अशी लगबग सुरू करायची. आम्ही मुले दारामागे लपून कुणीतरी इमोशनल होऊन रडायला लागायची वाट पाहायचो. कारण सगळी गंमत त्यातच होती.

चिकनच्या पाटर्य़ा आणि दारू पिणे हे घाबरून आणि गुप्तपणे केले जात असे. कुणी विचारले तर सगळे हे नाकारत. आपण मांसाहार करतो किंवा दारू पितो हे कुणीच कबूल करीत नसे. चिकन खाऊन झाले की सगळी हाडे गोळा करून रात्री गुपचूप दूर जाऊन टाकून यावी लागत. कारण सकाळी मोलकरणींना ते दिसले तर त्या शेजारच्या जोशी किंवा गोखले किंवा चोरडिया किंवा अशा कोणत्यातरी वहिनींना चहाडय़ा सांगतील अशी भीती घरच्यांना वाटत असावी. पण अशीच हाडे शेजारच्या गोखले वहिनीपण दूर जाऊन टाकून येतात, हे आमच्या आया-मावश्यांच्या लक्षात येत नसे. मोलकरणीपासून फार जपून राहावे लागत असे. आजकाल तशा खमक्या आणि तोंडाळ मोलकरणी दिसेनाशा झाल्या आहेत. आमच्या लहानपणी अशा तोंडाळ आणि प्रेमळ बायका आमच्या घरी होत्या. मला सणावाराला अंडे खायचे असले की त्या आपल्या घरी करून मला आणून द्यायच्या.

मी शाळेच्या अथर्वशीर्ष म्हणायच्या पथकात होतो. रोज पहाटे उठून सोवळे नेसून आम्हाला कसबा पेठ आणि दगडूशेठ या दोन मोठय़ा गणपतींसमोर बसून एकवीस अधिक एकवीस असे बेचाळीस वेळा अथर्वशीर्ष म्हणावे लागत असे. तिथे सर्व ठिकाणी आम्हाला केळी, साबुदाणा खिचडी आणि पेढे देत असत. त्या दिवसांत गोड खाऊन मला नको नको होत असे. आमच्या घरी गौरी-गणपती असताना साधे अंडे उकडून खायचीही चोरी होती. मग घरात काम करणाऱ्या बायका हळूच मागच्या अंगणात मसालेदार कोंबडी किंवा पापलेटचा तळलेला तुकडा मला द्यायच्या. ही सोय आई-बाबांनी मिळून मोठय़ा हुशारीने केली होती. त्यामुळे आमच्या घरी सतत दर्शनाला आणि आरतीला येऊन आमचे गणिताचे आणि इंग्रजीचे मार्क विचारत बसणाऱ्या चोंबडय़ा नातेवाईकांना आम्ही काय खातोपितो हे कधीच कळत नसे.

शाळेत हळूहळू आम्हाला लक्षात येऊ  लागले की अनेक मुलांच्या घरी चिकन खातात आणि औषध पितात. पण बाहेर सांगायचे नसते. एकदा माझ्या बाबांच्या ऑफिसात पार्टी होती आणि आम्ही ठेवणीतले कपडे घालून गेलो होतो. तिथे एक सुंदर, उंच, गोऱ्या बाई होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या औषध घेत होत्या. त्या पंजाबहून आलेल्या बाई मला फारच आवडल्या. माझी आई म्हणाली की, तिचे नाव डॉली आहे. ती तिच्या नवऱ्याला कंपनी देण्यासाठी कधीतरी पिते. तेव्हा ‘कंपनी देणे’ हे मराठीतले नवे क्रियापद मला त्या डॉलीमुळे शिकायला मिळाले. ‘कंपनी देतेस का?’ असे मराठी पुरुष बायकोला विचारू लागले. ‘मी नेहमी घेत नाही, कधीतरी ह्य़ांना कंपनी देते,’ असे बायका स्वयंपाकघरात इतर बायकांना सांगू लागल्या.

सचिन कुंडलकर

kundalkar@gmail.com

मराठीतील सर्व करंट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathakathan by sachin kundalkar
First published on: 10-09-2017 at 00:48 IST