ऋजुता सोमण

नृत्याचा उगम, इतिहास, त्याचा शास्त्राधार, कथकचा तांत्रिक भाग, कथकची वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, घराणी विशेष.. अशा मुद्दय़ांपासून उदय शंकर यांच्यासारखे प्रेरणादायी कलाकार, महान समीक्षक, संशोधक दधिच दाम्पत्य यांची माहिती, तसेच सर्व घराण्यांतील आद्यगुरू, संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या कलाकारांची सूची व माहिती आणि पुण्यातील महान कलाकार व गुरू अशी विपुल माहिती मीना शेटे-संभू लिखित ‘घुंगूरनाद : कथकविश्व – विविध घराण्यांसह..’ या एकाच पुस्तकात उपलब्ध झाली आहे. याखेरीज आजचे कथकचे शिक्षण, नृत्यवर्ग, पालक, अभ्यासक्रम, पीएच.डी.मधील गुणवत्ता, आदी अनेक बाबींचा ऊहापोह या पुस्तकात आहे.

या पुस्तकात कथकशास्त्र, कथकचे तंत्र, उगम, इतिहास, आदी विषय विस्तृत आणि अतिशय सुंदररीतीने मांडले आहेत. परंतु या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे ‘कथकमधील घराणी’ यावरचे समग्र व संशोधनात्मक लेखन. प्रत्येक घराण्यातील गुरूंशी, त्या घराण्यांमधून शिकून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या महान कलाकारांशी सतत संवाद साधून त्या-त्या घराण्याविषयी अतिशय समर्पक व रोचक माहिती वाचकांसमोर मांडली आहे.

‘लखनौ’, ‘जयपूर’, ‘बनारस’ आणि ‘रायगड’ यातील पहिल्या तीन घराण्यांवर नेहमीच चर्चा होते. या तीन घराण्यांनाच आतापर्यंत जास्त प्रकाशात आणले गेले आहे. परंतु या पुस्तकात ‘रायगड’ घराण्यावरदेखील समग्रपणे चर्चा झाली आहे. या चारही घराण्यांचा उगम, त्यांचे आद्यगुरू, कलाकार, त्यांची साधना, जीवनकार्य हे सारे या पुस्तकात वाचायला मिळते. विशेषत: चौकटींमध्ये दिलेले काही प्रसंग, कथा या रोमांचकारी आहेत. त्या वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण करतात. त्या काळात घराणी कशी निर्माण झाली आणि पुढे ती पिढय़ान्पिढय़ा प्रवाहित कशी राहिली, याची तपशीलवार माहिती मिळते. तसेच घराणेशाही म्हणजे एककी विचारधारा नसून उलट एकमेकांच्या वैशिष्टय़पूर्ण अंगांची (अभिनयात्मक व नृत्यात्मक) उत्तम देवाणघेवाणही त्यांच्यात कशी होत असे आणि त्यातूनच सर्वागाने समृद्ध अशा ‘कथक’ शैलीचा विकास कसा होत गेला, हे लेखिकेने मांडलेल्या अभ्यासातून अतिशय प्रभावीपणे वाचकांसमोर येते.

लेखिकेने घराणेदार नर्तकांचे, गुरूंचे आणि या घराण्यांमधून शिकून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या महान कलाकारांशी संवाद साधून त्यांचा संघर्ष, मेहनत उलगडून सांगितली आहे. नृत्य शिकणाऱ्या आजच्या पिढीला हे नक्कीच उत्तेजन, प्रोत्साहन देणारे ठरेल.

कथकमधील घराण्यांवर विशेष प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकात कथकसंदर्भातील इतर अनेक विषयांचाही ऊहापोह केला आहे. त्यामुळे कथकच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरेलच; परंतु इतर वाचकांनाही या कलेसंदर्भात सर्व माहिती सहज, सुलभ तऱ्हेने मिळेल. पं. बिरजूमहाराज यांची प्रस्तावना आणि गुरू रामलाल बरेठ यांचा अभिप्राय यामुळे कथकसंदर्भातील या लेखनाला सकारात्मक पावती मिळाली आहे.

अल्प नृत्यशिक्षणानंतर लगेच शिकवण्या काढून नृत्यशिक्षण सुरू करणे, विद्यार्थ्यांना अल्प व जुजबी शिक्षणानंतर लगेचच जाहीर कार्यक्रम वा परीक्षांना बसविणे अशा आजच्या काही प्रवृत्तींवरही पुस्तकात चर्चा केली आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही ती अत्यंत उपयुक्त आहे. या चर्चेतून कथकची माहिती, त्यासाठीची साधना, संघर्ष अशा सगळय़ाच गोष्टींविषयी जागरूकता येईल.

‘लयकारीला अधिक महत्त्व’ या मुद्दय़ाचा ऊहापोह करताना मांडलेले – ‘कथकमध्ये पखवाज आणि तबला यांच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणात लयकारी घुसवली जाऊ लागली’ हे वाक्य थोडे खटकते. कथक ही संमिश्र कला आहे आणि अनेक उत्तम परंपरा व संस्कृतींचा त्यामध्ये संकर आहे. सुरुवातीला पखवाज आणि नंतर तबला या परंपरांतील लयकारी व त्यातील बोल यांची कथक कलाकारांबरोबर देवाण-घेवाण झाली. त्यामुळे ‘घुसवली गेली’ याऐवजी ‘लयकारी व बोलांचा अधिक प्रभाव होता’ असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरले असते. तसेच नृत्याच्या बोलांचा व लयकारीचा प्रभावदेखील तबला व पखवाजवादकांवर असावा. अनेकदा समान धाटणीचे बोल रंगमंचावर नर्तक व वादक संवादात्मकरीत्या सादर करताना दिसतात. मुख्य म्हणजे हा प्रघात अजूनही अस्तित्वात आहे. अजूनही नर्तक आणि तबला, पखवाजमधील उत्तम वादक यांच्यात बोलांची देवाण-घेवाण चालते. तसेच कर्नाटकी बोलांचादेखील कथकनर्तनावर व तबलावादकांवर प्रभाव आहे आणि त्यात गैरही काही नाही. खरं तर अशा देवाण-घेवाणीनेच सर्व कला समृद्ध होत जातात.

‘घुंगरांचे महत्त्व’ याबद्दल सांगताना ‘अभिनय दर्पण’ या नंदिकेश्वर यांच्या ग्रंथातील श्लोकाचा उल्लेख करायला हवा होता असे वाटते. नूपुर कसे असावेत, याची फार सुंदर कल्पना यात मांडली आहे. नूपुर मधुरनाद करणारे, सुबक, छोटे असावेत. त्यांच्या अधिष्ठात्री देवता म्हणजे नक्षत्रे असावीत व निळय़ा रंगाच्या धाग्यामध्ये पक्क्या गाठी मारून ते ओवावेत असे त्यात सांगितले आहे. निळी दोरी व नूपुर यांची बरोबरी निळय़ाशार आकाशातील नक्षत्रांशी केली आहे.

पुस्तकाचा विषय ‘कथक’ हा असल्यामुळे यात समग्र माहिती देत असताना ती आणखी विस्तृत करता आली असती. परंपरेवर चर्चा करताना रंगमंच, सादरीकरण, नवीन विषय, आदी आधुनिक काळात होत गेलेल्या बदलांविषयी थोडी विस्ताराने चर्चा करायला हवी होती असे वाटते. असे असले तरी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त आहे.

‘घुंगूरनाद : कथकविश्व- विविध घराण्यांसह..’ – मीना शेटे-संभू,

विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे,

पृष्ठे- २०८, मूल्य- ३०० रुपये.