किशोर पाठक हे ऐंशीच्या दशकातले महत्त्वाचे कवी. तेव्हापासून आजपर्यंत  पाठक यांनी अभिव्यक्तीतील सातत्य कायम राखले आहे. विविध वाटा-वळणांमधून त्यांची कविता कायम सजग, प्रवाही राहिलेली आहे. एवढेच नव्हे, तर तिने समकालाचा बदलता पाटही आपल्या प्रवाहात सामावून घेतला आहे. समकालाशी संबद्धता हा त्यांच्या कवितेचा एक विशेष राहिला आहे. मात्र, समकालाशी संबद्ध होताना त्यांच्या कवितेने आपला मूळ स्वभाव शाबूत ठेवला आहे, हे विशेष. नुकताच त्यांचा ‘काळा तुकतुकीत उजेड’ हा नवा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. मानवी नातेसंबंधांचा शोध हे त्यांच्या कवितांचे प्रमुख आशयसूत्र राहिले आहे. या शोधादरम्यान मानवी संबंधांच्या विविध आयामांचा दुपदरी, चौपदरी पट उलगडला जातो. स्त्री-पुरुष नातेसंबंध, नात्यांच्या जोड-तोडीतून दोन्हीकडे होणारी संवेदनांची वाताहत, स्त्रीभावाचा तळठाव शोधण्याची उलघाल, वर्तमानाचा हालता, फिरता, बदलता कॅनव्हास आणि त्यात होणारा मूल्यांचा लय-विलय हे सारे आपल्या कवितेत संवेदनशीलतेने पकडण्यात किशोर पाठक सफल झाले आहेत.

या संग्रहाचे शीर्षक ‘काळा तुकतुकीत उजेड’ हे एका प्रतिमांकित सत्याकडे निर्देश करणारे आहे. ‘काळा तुकतुकीत उजेड’ आणि ‘शुभ्र काळोख’ अशा परस्परविरोधी भासणाऱ्या प्रतिमांचा संचार त्यांच्या सगळ्या कवितांमधून जाणवतो. जगण्यातला काळोखही कधी शुभ्र असू शकतो, तर उजेड ‘काळा तुकतुकीत’.. या सत्याकडे किशोर पाठक आपले लक्ष वेधतात. जगण्याच्या संभ्रमित कोलाहलात स्वसंवेदना जाग्या ठेवून स्वत:ला शाबूत ठेवायचे, जगण्यावर जागत्या डोळ्यांनी पहारा ठेवत ‘काळ्या उजेडाचा’ शोध घ्यायचा आणि त्या उजेडात कवितेच्या शक्यतांचे अंकुर जोपासत राहायचे, हे कवीचे अटळ भागधेय  पाठक यांनी असोशीने स्वीकारले आहे.

‘अंधार मोजून सुटत नाही उजेडाचे प्रश्न गहन

निबीड काळेशार शब्द तोडून करावा लागतो

प्रवास’

असा या प्रवासासंबंधीचा उद्गार किशोर पाठक काढतात.

जगताना माणसांशी असणारे बंध-अनुबंध अटळ असतात. जगतानाचं एक जगणं हे भोवतीच्या माणसांनीच व्यापलेलं असतं. ही रक्ताची- बिनरक्ताची, नात्याची- बिननात्याची, जोडली- तोडली जाणारी माणसं म्हणजे जगण्यातील आसक्तीचंच रूप. या निरंतर आसक्तीला शब्द बहाल करताना पाठक म्हणतात-

‘आरक्त व्हायचे विरक्त व्हायचे

माणूस म्हणून चुंबून घ्यायचे

पुन्हा ओठ पुसून नवे नाते टिपायला चोच तयार’

क्वचित या माणसांचा प्रचंड कंटाळा येतो. तरीही माणसांनी वेढून असणे टाळता येत नाही. माणसांच्या या अपरिहार्य असण्याच्या काही नितांतसुंदर कविता या संग्रहात भेटतात.

‘माणसे खचाखच भरलीत मेंदूत

जसा लोकलचा डबा’

या शब्दांत ही अपरिहार्यता ठळक होते. माणूस जगतो म्हणजे एक प्रकारे स्वत:ला खोदत राहतो. विविध वस्तू, कल्पना, विचार यांसह स्वत:ला खोदता खोदता मृत्यू नावाच्या हयातीत न गवसणाऱ्या वस्तूपर्यंत येतो. हा स्वत:चा जगण्यातून घेतला जाणारा शोध माणसाला ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर देऊन जाईलसे वाटते; परंतु तसे होत नाही. मागचा, पुढचा, वर्तमान जगण्याचा, स्मृती-विस्मृतींचा झिम्मा माणसाला तसे करण्याची मुभा देत नाही. एक प्रकारे तत्त्वज्ञानात्मक प्रश्नांमधून, ‘कोऽहम्’सारख्या आत्मशोधाच्या ध्यासातून या कविता जन्म घेतात. आजच्या काळात काहीशी असंबद्ध झालेली आध्यात्मिक जाणिवेची बैठक या कवितांना आहे. अगदी स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा तळ शोधतानाही कवी ही बैठक विसरू शकत नाही. स्त्री-पुरुष नात्यातील सुंदर, कृतार्थ क्षण कवी इंद्रधनुष्याचे रंग पकडावेत तसा कलात्मकतेने पकडण्याचा प्रयत्न करतो..

‘चंद्रकोरीलाच अडकवू आयुष्याचे झुंबर

प्रत्येक लोलकातून फिरत राहतील

रंगीबेरंगी अनुभव’

या तरल अनुभवांची प्रत, कोटी ठरवताना किशोर पाठक आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाच्या तळाशी पोहोचतात. संगीताच्या प्रत्येक सुरावर श्वास उधळत, हवा तसा फिरत, आयुष्याचा गुंता झेलत कवितागत ‘मी’ आशयाची रेघ काढत राहतो..

‘तान थरथरते.. भिरभिरत वर जाते..

स्थिर होते.. तसे तुझे अस्तित्व..’

अशा शब्दांत त्याला ‘ती’चे अस्तित्व सापडते.

या संग्रहात स्त्रीमनाचा तळठाव शोधणाऱ्या, तिच्या व्यथा, वेदना आकळून त्याला काव्यशब्द देणाऱ्या अनेक कविता आहेत आणि त्या या संग्रहाचा मोठा मूल्यात्मक ठेवा आहेत. खरे तर स्त्रीवादी जाणीव ही आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्त्रियांच्या संवेदनेत झिरपली आहे आणि स्त्रियांच्या कवितेतून ती विविध पातळीवर व्यक्तही झाली आहे. परंतु, वर्तमानात काहीशा केवळ जाणिवेच्या पातळीवर असलेल्या स्त्रीवादी जाणिवेला पुरुषमनाच्या सह-अनुभूतीची साथ गरजेची आहे. मराठीत काही मोजक्या पुरुष कवींनी असे स्त्रीमन तंतोतंत जाणून व्यक्त केले आहे. कवी म्हणून किशोर पाठक यांचेही नाव आपल्याला या मोजक्या कवींमध्ये घ्यावे लागते. विशेषत: ‘काळा तुकतुकीत उजेड’ या संग्रहात त्यांनी स्त्रियांच्या विशिष्ट दु:खाचे प्रदेश नेमकेपणानं उलगडून दाखवले आहेत. विशेष म्हणजे अनेक वेळा कवितागत ‘मी’ ही स्त्रीच आहे. उदा.

‘मी स्त्री- किती अगतिक

मी स्त्री- हेच माझे शस्त्र’

या कवितेतून स्त्री-पुरुष संबंधांतली अटळ लढाई व सत्तासंघर्षांवर ते बोट ठेवतात. एका बाजूला स्त्री म्हणून अगतिक वाटत असतानाच बाई असण्याचेच शस्त्र करून बाई नि:शस्त्र पुरुषाला बळ पुरवते. त्या बळाचा वापर तो तिलाच पराभूत करण्यासाठी करणार आहे, हे जाणूनही! सत्तासंघर्षांत स्त्री-पुरुषांच्या भूमिकांमधला, दृष्टिकोनामधला, वर्तनामधला हा फरक पाठक शस्त्राच्या उचित प्रतिमेतून अधोरेखित करतात-

‘कुठे पाहतेस?

ते तुझे डोळे फोडतील

कुठे जातेस?

ते तुझ्या वाटा मोडतील’

……

‘तू एक चालती-बोलती बाहुली

चावीपुरते सरकत राहायचे’

या ओळींतून स्त्रियांवर असलेली तथाकथित नैतिकतेची बंधने आणि त्यांच्याकडून केवळ चावीबरहुकूम मर्यादशील वावराची अपेक्षा हे सनातन वास्तव ठळक होते.

‘मी नसावे उच्छृंखल, पण स्वैर तुझ्यासोबत

मी नसावे आगाऊ, पण तरतरीत

तुझ्यासाठी इतरांसमोर’

ही वर्तमान पुरुषी व्यवस्थेनं स्त्रीवर लादलेली अपेक्षा आहे. तिने बदलत्या काळानुसार स्मार्ट, तरतरीत, हुशार असावे, चारचौघांत वावरताना त्याला मिरवता येईल असे असावे. परंतु तरीही मर्यादेची चौकट मात्र सांभाळण्याचे भान तिने सुटू देऊ नये. आपल्या मालकी हक्कावर अतिक्रमण होईल इतके हुशार तिने असू नये अशी ‘बहुदुधी, आखूड शिंगी’ अपेक्षा आजही केली जाते. त्यातील विरोधाभासावर किशोर पाठक नेमका प्रकाश टाकतात. पुरुषप्रधान व्यवस्थेतील ही दुटप्पी मूल्यव्यवस्था ते अनेक कवितांमधून मांडतात.

पाठक यांची काव्यशैली काहीशी तरल, हळुवार आहे. संवेदनांचे सूक्ष्म धागे अगदी छोटय़ा नाजूक चिमटीत पकडण्याची वृत्ती ही काव्यशैली जपते. मुख्य म्हणजे आशयद्रव्य कोणतेही असो;  पाठकांच्या कवितेचा काव्यात्म गाभा कुठेही हरवत नाही. ती कधीच गद्यस्वरूप वा भाषणवजा कंठाळी होत नाही, हे विशेष. तरल संवेदनांतूनही तीव्र सामाजिक आशय मांडता येतो याचा वस्तुपाठ देणारा हा संग्रह नक्कीच वाचावा असा आहे.

‘काळा तुकतुकीत उजेड’- किशोर पाठक

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई</strong>

पृष्ठे- १०२,  मूल्य : रु. १२०.