जन्म, मृत्यू, गंभीर आणि थकवणारी आजारपणं अशा भावनाशील प्रसंगांत अनेकदा डॉक्टर साक्षी असतो. एव्हढेच नव्हे, तर अशा वेळी डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत असताना तोही अनेकदा भावनिक, मानसिकदृष्टय़ा त्यात गुंततो. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘डॉक्टर म्हणून जग(व)ताना ’ हे पुस्तक अशा निरनिराळ्या उत्कट अनुभवांकडे संवेदनशील, समंजस व चिंतनशील भूमिकेतून बघणारे आहे. ‘बालरोगतज्ज्ञ’ बनण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांपासून कराडमध्ये तीस वष्रे एक संवेदनशील, जबाबदार, प्रामाणिक बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना, तसेच काही सहकारी डॉक्टरांसोबत काढलेले मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यशस्वीपणे चालवताना आलेले वेगवेगळय़ा टप्प्यांवरचे हृदयस्पर्शी अनुभव व त्यावरील चिंतन या पुस्तकात आहे. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण हे ‘शिकाऊ डॉक्टर’ला सर्व अंगाने ताणणारे असते. दिवसरात्र इस्पितळात काम, त्याचा शारीरिक, मानसिक ताण, अतिशय अवघड परीक्षेसाठी अभ्यास या सर्वाना तोंड देत केलेल्या प्रवासापासून पुस्तकाची सुरुवात होते. पुढे अत्यंत नावारूपाला आलेल्या डॉक्टरी व्यवसायातून ‘वेळेवर’ निवृत्त होईपर्यंत वेगवेगळय़ा टप्प्यांत आलेले अनुभव नुसते कालक्रमानुसार न मांडता त्यातून उलगडलेल्या अनेकविध मुद्यांभोवती डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (डॉ. सुब्र) यांनी प्रकरणे गुंफली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवजात बाळ गंभीर आजारी पडल्यास त्याला जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे हे खरेच; पण जगलेले मूल जन्मभर मतिमंद राहील अशी शक्यता असल्यास डॉक्टरलाही अनेकदा योग्य काय या बाबत संभ्रम पडतो. कारण मूल मतिमंद होईल असा अंदाज अगदी क्वचितप्रसंगी खोटा ठरतो, पण जर खरा ठरला तर अनेकदा मतिमंद जिवाचे, पालकांचे आयुष्य कमालीचे ओढग्रस्तीचे, दु:खदायक शेवट असलेले बनते. ‘संभ्रम’ या प्रकरणात याविषयी वाचताना जाणवते, की काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे नसतात.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor mhanun jagavtana by dr sulabha brahmanalkar
First published on: 31-12-2017 at 00:42 IST