scorecardresearch

लोकस् आणि लाइक्स

लेखनापुरतं बोलायचं तर संगणक आणि वर्ड प्रोसेसर यामुळे जगभरची लेखनकलाच बदलून गेली आहे.

‘ज्ञानेश्वरी’मधली एक सुंदर ओवी मित्राला ऐकवत होतो आणि मधेच अडलो. ‘सांगतो नंतर..’ असं त्याला म्हणणार तोवर त्याने त्याच्या मोबाइल फोनवरचं ज्ञानेश्वरीचं अ‍ॅप उघडलं, मला अध्याय विचारला आणि ती ओवी समोर झळकली. आणि मग ती ओवी त्या चमचमत्या स्क्रीनवर बघताना जाणवलं, की केवढा बदल झालाय यार! तंत्रज्ञानासोबत साहित्यही किती गतिमान झालंय. मोबाइलवर आपण लोकलमध्ये पेपर वाचतो, टॅबवर लेख, संगणकावर ब्लॉग किंवा मग किंडलवर हवं ते पुस्तक. आणि लिहितोही कसे आपण सध्या? हाताने क्वचितच कधी! मोबाइलच्या पडद्यावर झरझर अक्षरं दाबतो आपण. किंवा की-बोर्ड वाजत राहतो- चढय़ा सुरातल्या तबल्यासारखा लेख किंवा ब्लॉग किंवा ई- मेल किंवा फेसबुक पोस्ट लिहिताना! आणि हे आता आपण वेळ असेल तरच लिहितो; अन्यथा स्माइलीचा सिंबॉल आपण वेळी-अवेळी पुढय़ात सरसावतो आणि लिहिण्याची फारशी गरज उरत नाही. मित्राच्या मोबाइलवर ती ओवी बघताना हे सारं नकळत जाणवलं. तोवर ज्ञानदेव पुढे उद्गारते झाले- ‘‘ऐसेनि गंभीरपणे। थिरावलेनि अंत:करणे..’’ स्थिरावलेल्या अंत:करणाने गंभीरपणे फेसबुकवर गद्य व पद्य पोस्ट प्रसिद्ध करणारी नवीन पिढी मग डोळ्यांपुढे आली. जगण्याची गती वाढली. इंटरनेटमुळे संवादाची गती वाढली. ‘वर्ड’मुळे लिहिण्याची गती वाढली. आणि म्हणून बसून लेखकानं विचार करण्याची.. स्थिरावलेल्या अंत:करणाने विचार करण्याची गती मंदावली असं म्हणणं फारच सरधोपट होईल. अनेक तऱ्हांनी तंत्रज्ञानामुळे साहित्य पालटतं आहे. लेखक, वाचक, प्रकाशक, संपादक, विक्रेते अशा सर्व स्तरांवर तो बदल जाणवू लागला आहे. आणि बदल हा मला तरी नेहमी आश्वासक वाटतो!
लेखनापुरतं बोलायचं तर संगणक आणि वर्ड प्रोसेसर यामुळे जगभरची लेखनकलाच बदलून गेली आहे. मजकूर टंकित करणं, साठवणं, उतरवणं, प्रिंट करणं, त्याचं संपादन करणं, पुनर्लेखन करणं, स्पेलिंग व शुद्धलेखन तपासणं हे सारं वर्ड प्रोसेसरमुळे इतक्या सहजतेने होऊ लागलं, की गेल्या वीसेक वर्षांमध्ये लेखकांची पिढीच्या पिढी हातानं लेखन करणं सोडून संगणकावर थेट लिहू लागली. आणि मग बघता बघता इंटरनेट आलं. ते मोबाइलवरही आलं. ते अभिजनांपुरतंच सीमित न राहता खेडय़ापाडय़ांमध्ये झिरपलं. या नेट-क्रांतीमुळे लेखकाला वाचकापर्यंत पोचण्याच्या अनेक शक्यता दिसू लागल्या. ‘ब्लॉग्ज’ आधी फारसे रुजले नाहीत. पण मग उत्साहात मंडळी लिहू लागली. लोकही वाचू लागले. पण मराठीत मला वाटतं, पहिली उडी कवितांची पडली. मला आठवतंय, २००२-२००३ च्या आसपास मी ‘मायबोली’ या वेबसाइटवर धपाधप स्वरचित कविता टाकत असे. माझ्यासारखी अनेक उत्साहित तरुण विशीतली टाळकी तिथे हररोज कविता टाकत, पाडत, लिहीत! त्यातले पुष्कळजण पुढे चांगले लेखक म्हणून उदयाला आले, हेही दखल घेण्याजोगं. प्रसाद शिरगावकर, नीरजा पटवर्धन यांच्या तिथल्या तेव्हाच्या कविता माझ्या पिढीच्या अनेकांना आजही आठवतात. हीच कविता-नेटक्रांती पुढच्या पिढीने फेसबुकच्या माध्यमातून केली. प्रणव सखदेव, सत्यपालसिंग राजपूत, तेजस मोडक, पवन नालट, योजना यादव, इ. तरण्या मंडळींच्या कविता या फेसबुकवर नित्य भेटतात. त्यांच्या कवितांचे बाज निराळे आहेत. काहींचे कवितासंग्रह आलेत, काहींचे नाही. पण त्याने काही फरकच पडत नाही. ‘स्थिरावलेल्या अंत:करणा’ने ही मुलं नित्यनेमाने फेसबुकवर त्यांच्या नवनव्या कविता प्रसिद्ध करतात आणि रसिक ते वाचतात. ‘फेसबुक पोस्ट’ हे एक मोठं माध्यम आहे कविता पोचवायचं. पण स्वतंत्रतयाही लिहिलेली ‘फेसबुक पोस्ट’ ही साहित्यात- अगदी ललित साहित्यामध्येही- आपण जमा करायला हवी, इतकं ताकदीचं लिखाण सध्या तिथे होतं. कधी व्यक्तिगत अनुभव, कधी सामाजिक टिप्पणी, कधी विनोद (आठवा : ज्युनियर ब्रrो यांची कलाबाई!), कधी प्रवासवर्णन, कधी कथात्म वर्णन, कधी लघुकथाच अशा साऱ्या पोस्ट ललित किंवा ललितेतर या द्वंद्वाला प्रत्यही छेद देत रोजच्या रोज अपलोड होत असताना त्याला साहित्य न म्हणणं हे करंटेपणाचंच ठरेल. म्हणजे सगळ्या पोस्ट या ‘साहित्य’ या शीर्षकात जमा होणार नाहीत हे उघडच आहे, पण बऱ्याचशा होऊ शकतात. जे जाणवलं ते ‘गंभीरपणे, थिरावलेनि अंत:करणे’ वाचकांपर्यंत विचार करून शब्दांद्वारे पोचवणं हे जर साहित्य असेल, तर ते फेसबुकवर आहे! कादंबरीचा आवाका फेसबुक पोस्टला नाही, हे उघडच आहे; पण ललित गद्याचा आहे. आणि तोही पुरेसा बळकट आहे. या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने केवळ लेखनाच्या प्रसिद्धी-शक्यता दुणावल्या असं झालं नाही, तर लेखकाचं परिप्रेक्ष्यही विस्तारलं. मी फ्रेंच पॉलिनेशियामध्ये न जाताही नेटवर तिथल्या बेटाचा सविस्तर अभ्यास करू शकतो, फोटो, व्हिडीओ आणि गुगल मॅपवर प्रत्यक्ष ‘स्ट्रीट व्हय़ू’ बघू शकतो आणि मग माझ्या कथेतल्या किंवा कादंबरीतल्या एखाद्या पात्राला तिथे पाठवू शकतो! जर लेखकाला चांगलं ललित लिखाण करायचं असेल तर तपशील हे फार महत्त्वाचे असतात. आणि नेटमुळे ते सुकरपणे मिळतात, किंवा त्यांची फेरतपासणी करावी लागते.
मुख्य म्हणजे या नेट-क्रांतीमुळे लेखक आणि वाचक कधी नव्हे एवढे निकट आले आहेत! बोरकरांनी एके ठिकाणी ते राजकवी तांबे यांना कसे दुरून न्याहाळत असतात याचं वर्णन केलं आहे. आज वाचक लेखकाला रोजच्या रोज फेसबुकवर, व्हॉट्सअ‍ॅपवर भेटतात. स्वस्तुतीमध्ये मग्न झालेले लेखक आणि खूशमस्करे वाचक-चाहते (जे अनेकदा नवोदित लेखक असतात!) हे चित्रही आहे. पण हे सारं चालायचंच.. नाही? त्याहून मोलाचा मला वाटतो वाचक-लेखकांमध्ये एखाद्या लेखाच्या निमित्ताने झडणारा प्रदीर्घ असा सर्जनशील संवाद! कविता महाजनांच्या गाजलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भाषणापासून ते आसावरी काकडे यांनी फुलाच्या छायाचित्रासोबत पोस्ट केलेल्या तरल कवितेपर्यंत वाचक-लेखक संवाद झडताना दिसतो.
आणि ई-मेल्स! हे खाजगी माध्यम; पण अनेक लेखक एकमेकांना किंवा वाचकांना जोरात ‘मेला-मेली’ करतात असं ऐकिवात आहे. कुणी सांगावं, जी. ए. आणि सुनीताबाईंसारखा अर्थगर्भ पत्रसंवाद या दिवसांत ई-मेलवर होत असेल कुण्या प्रतिभावंतांमध्ये!
पण मग या तंत्रज्ञानामुळे केवळ माध्यमात, आविष्करणात फरक पडला, की दस्तुरखुद्द आशयात? की साहित्यनिर्मितीच्या गाभ्यात? कवितेत ‘माऊस’ किंवा ‘सॉफ्टवेअर’ किंवा ‘जेलीबिन’ शब्द फेकले की ती काही आधुनिक होत नाही. अनेकदा ती बुरसटलेलीच असते! पण असंही नवसाहित्य मला दिसतंय- जिथे या तंत्रज्ञानाचा आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांचा पायरव जाणवतो. असं वाटतं, की संवादाची ही वाढलेली गती कशी शब्दा- शब्दांमध्ये भिनली आहे. मग त्याचा विषय ‘मॉडर्न’ नसू दे, पण आशय आहे. रोशेल पोतकर यांच्या ‘दि अरिद्मॅटिक ऑफ ब्रेस्ट’ या कथासंग्रहात हा नव्या काळाचा पायरव.. प्रणयाच्या वाटेवरचा पायरव जाणवतो. या कथांना ‘इरॉटिका’ म्हणावं, तर त्या इतक्या सखोल, गंभीर आहेत! पण त्याचवेळी या कथांमधली प्रणयाची उन्मुक्त छाया काही लाजून कडेला उभी नाही! हेही तंत्रज्ञानामुळे साहित्यात झालेलं एक परिवर्तन.
तुम्हाला यापुढे पुस्तक एका ‘लेबला’त टाकता येणार नाही. कारण लेखकाचा आवाका वाढला आहे आणि त्याच्यावर संपादकाचं (अनेकदा) बंधन नाही. आणि हा तर स्वतंत्र लेखाचाच मुद्दा आहे. जाणता संपादक लेखक घडवू शकतो, हे म्हणणं जरासं ताणलेलं झालं. पण एक नक्की- जाणता संपादक गुणी लेखकाला दहा दिशा दाखवू शकतो. तो लेखक शंभर दिशा बघत हरवला असेल तर त्याला एका लायनीत संपादक उभा करून त्याच्यावर मेहतन घेऊ शकतो. ब्लॉग, फेसबुक पोस्ट इ. ला संपादक नाही! त्याचे तोटेही आहेत, फायदेही आहेत. अर्थात आता मराठीत ऑनलाइन साहित्यिक अंक निघू लागले आहेत. सायली राजाध्यक्ष संपादन करीत असलेले अंक हे अनेकांना जुन्या सत्यकथेच्या दिवसांची आठवण करून देतात. मेघना भुस्कुटे आणि संवेद गळेगावकर हे ‘रेषेवरची अक्षरे’ नावाचा अंक काढतात आणि तो साक्षेपी संपादनाचा प्रत्यय देतो. मी एकच लेख तिथे लिहिला, पण चेष्टेत सांगायचं तर लेखाआधी, लिहिल्यानंतर, ई-मेल पोचल्यानंतर, अंक प्रसिद्ध झाल्यानंतर संपादिकेचे एवढे दीर्घ मेल्सचे माझ्या इनबॉक्सवर मारे झाले, की बस रे बस! पण हे चेष्टेतच काय! मला सांगायचंय की, ऑनलाइन अंक आणि त्यांचे संपादक ही गोष्ट मशरूमसारख्या मधेच उगवणाऱ्या अनेक होतकरू दिवाळी अंकांपेक्षा सांस्कृतिकदृष्टय़ा खूप महत्त्वाची घटना आहे!
आणि आपण वाचक! मधे मधे लिहीत असलो तरी मी वाचकच मानतो आधी स्वत:ला. आणि मग या सांप्रत नेट- साहित्यकल्लोळात एक वाचक म्हणून मी काय मिळवतो आहे, काय गमावतो आहे, हे बघणं मला महत्त्वाचं वाटतं. जेव्हा #sixwordstory  फिरते, जेव्हा लघुत्तम कथा आसपास एकाएकी दिसतात. जेव्हा कुणी म्हणतं की, वाचकांना छोटंच वाचायला हवं आहे म्हणून असं लेखक micro-fiction  लिहिताहेत, तेव्हा तेव्हा मला हॅरी पॉटरचे ठोकळे घेऊन वाचत बसलेली जगभरची पोरं दिसू लागतात! आज मराठीतही केवढय़ा नव्या कादंबऱ्या येत आहेत. विषय-आशय जाऊ द्या, कादंबरी ही सहसा दीर्घ पल्ल्याची वाचनप्रक्रिया असते. पण तरुणही केवढय़ा कादंबऱ्या फटाफट वाचतात! मग ती ‘तांडव’ असो, किंवा ‘जू’ किंवा ‘प्रतीक’ किंवा ‘शोध’ किंवा ‘मुळारंभ’! इंग्रजीतही कादंबऱ्या वेगाने प्रसिद्ध होत आहेत. वाचकांना छोटय़ा पल्ल्याचं आवडतं, हे फारच सुलभीकरण झालं. वाचकाला हवा असतो जिवंत अनुभव. त्याच्या जगण्याचा तुकडा त्याला समोर साहित्यात दिसतो तेव्हा पृष्ठसंख्या, शब्दसंख्या हे गौण भाग असतात! मग त्याला ‘हायकू’ही आवडू शकतो तीन ओळींचा किंवा जाडजूड ‘तुंबाडचे खोत’ही!
हां, पण एक गोष्ट आहे. आजच्या वाचकाला सलग वाचायला खूपदा खरंच वेळ नसतो. तुकडय़ा-तुकडय़ात कधी कादंबरी वाचली जाते आणि मधेच व्हॉट्सअॅपवर छोटीशी लघुत्तम कथाही! खरं तर आजचा वाचक एकाच वेळी अनेक ‘इनपुट्स’ घेत वाचत जात असतो. हे आपल्या या काळाला साजेसंच! मग मोबाइलवर ‘लोकसत्ता’चा अग्रलेख वाचल्यानंतर पटकन् व्हॉट्सअॅपवर आलेली कविताही त्याच लयीत वाचली जाते. मला वाटतं, आपण आजचे वाचक या काळामुळे, काळाच्या तंत्रज्ञानामुळे जागरूक वाचक झालो आहोत. आपल्याला फसवणं आता लेखकांना अवघड आहे!
पण मग या नेट-रेटय़ात वाचक म्हणून आपण काय गमावतो आहोत? मी काय गमावतोय? ई-बुक वाचताना गमावलेला पुस्तकाचा स्पर्श-गंध-रूप? अनेकांना वाटतं- पुस्तकाचा स्पर्श त्यांना ई-बुकमध्ये मिळत नाही! मलाही नाही. पण हे पिढी-पिढीवर अवलंबून असणार.. नाही का? माझी जडणघडण पाचव्या वर्षांपासून हातात ‘चंपक’चे अंक घेत झाली, तशी आताच्या मुलांची नसणार! या मुलांना ई-बुक हे परकं वाटणार नाही. किंडलची काळी, तुळतुळीत कड त्यांच्या बोटांना आयुष्यभर वाचताना त्यांना भावनिक स्थैर्य देत राहणार! ही फेसबुकवरची तरुण पोरं ‘लोकस्’ असा शब्द वापरत आहेत. आवडतोय तो मला. इंग्रजीतला अनेकवचनी ‘एस्’ मराठी ‘लोक’ या शब्दाला या काळानं जोडलाय. त्याला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. तो ‘लोकस्’ हा शब्द कसा लोकांचं लक्ष वेधून घेतो आहे! ‘लोकहो’ ‘जनहो’ यापेक्षा मला तरी आवडलाय हा ‘लोकस्’! आणि मग या अत्यंत जुजबी पोस्टला ‘लोकस्’ अंगठे उंचावत ‘लाइक ्’ करत आहेत. तो नवा लेखक त्या फसव्या ‘लाइक्स’मध्ये हरवून जाताना मला लख्ख दिसतो आहे! आजचे चतुर वाचक न बघताही, न वाचताही संबंध जपण्यासाठी ‘लाइक्’चं बटण दाबतात, हे त्याला ठाऊक नाही!
मग मी डोळे मिटून बिल् ब्रायसनचं ऑडिओ-बुक ऐकतोय. पुस्तक वाचण्यासाठी ही एक वेगळी तऱ्हा. बिल मस्त कहाणी सांगतोय त्याच्या प्रवासाची. आणि मग एकाएकी नेवाशाच्या त्या खांबाला पाठ टेकून समोरच्यांना शहाणं करून सोडणारी गोष्ट सांगणारा तो ज्ञानदेव नावाचा अपरंपार प्रतिभेचा धनी मला मिटल्या डोळ्यांपुढे दिसू लागला आहे! आणि ध्यानी येतंय की, हे एक वर्तुळच पूर्ण झालं की! गोष्ट सांगण्याची ती जुनी मौखिक परंपरा पुस्तकांमुळे काहीशी खंडित झाली. मग आता ई-पुस्तकं आली. आणि ही ऑडिओ-बुक्स फिरून त्या मौखिक कथाकथनाकडे नेताहेत आपल्याला! तंत्रज्ञान साहित्याला बदलवतंय, आणि साहित्यही तंत्रज्ञानाला जिवंतपण प्राप्त करून देतंय! आणि ही मस्त नवी पिढी समोर वाचक म्हणून आहे. हे नवे वाचक ‘लोकस्’ आणि त्यांचे खरेखुरे ‘लाइक्स’ आजच्या मराठी साहित्याचा अवकाश घडवीत आहेत.. घडवणार आहेत!
डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Impact of technological advancement on literature

ताज्या बातम्या