भारत आणि पाकिस्तान.. इंग्रजांच्या साम्राज्यवादाशी एकत्रित सामना करून स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर झालेले हिंदुस्थानचे दोन भाग. हे दोन्हीही भाग गेली ६९ वर्षे सतत संघर्ष, अविश्वास आणि मतभेदांच्या छायेत असलेले. भौगोलिकदृष्टय़ा खूप दूर असूनदेखील महाराष्ट्राचे व पाकिस्तानचे, विशेषत: सिंध प्रांतातील कराची शहराचे काहीसे दुर्मीळ स्नेहबंध आहेत. त्यातील आपल्याला विशेष माहीत नसलेला एक दुवा म्हणजे कराची शहरातील एन. जे. व्ही. हायस्कूल!
इ. स. १६०० मध्ये सर थॉमस रो याने मुघल बादशहाकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या आणि हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. कंपनी सरकारने व्यापाराबरोबरच हळूहळू स्थानिक राजकारणात सक्रीय होत आपले पाय रोवायला सुरुवात केली. १७५८ मध्ये सिंध प्रांतात कंपनी सरकारने पहिले व्यापारी केंद्र उघडले. त्यानंतर १८४३ मध्ये मीर नासीर खान तालापूर याच्याकडून चार्ल्स नेपियर याच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने सिंधचा ताबा मिळवला आणि सिंध प्रांत एका भल्यामोठय़ा ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’चा भाग बनला.
सिंध आपल्या अखत्यारीत आल्यानंतर कंपनीने तिथे शैक्षणिक व राजकीय सुधारणा करायला सुरुवात केली. सर चार्ल्स नेपियर याची सिंधचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. त्याच्यानंतर १८५० मध्ये सर बार्टल फ्रिअर सिंधचा गव्हर्नर झाला. गव्हर्नर झाल्यावर फ्रिअरने आपले लक्ष शैक्षणिक व राज्यकारभारासाठी वापरता येणाऱ्या भाषेकडे केंद्रित केले. कंपनी सरकारच्या राजवटीपूर्वी सिंधमध्ये पर्शियन भाषा प्रचलित होती. मात्र, आता सिंधमधील शिक्षण सिंधी भाषेतून दिले जावे असे फ्रिअरचे मत होते. १८५१ मध्ये त्याने, सरकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक सिंधी भाषा कागदोपत्री कारभारासाठी अवगत करावी, असा आदेश काढला. परंतु त्यामुळे एक अवघड प्रश्न उभा राहिला. सिंधी भाषेला तिची स्वत:ची अशी खास लिपी नव्हती. सिंधमधील व्यापारी आठ वेगवेगळ्या लिपींमध्ये सिंधी भाषा लिहीत असत. या लिपी होत्या- लुहाणकी, भाट्टकी, थट्टाई, सेरीयाकी, खोजाकी, खुदाबादी व नेमोणकी. तसेच सिंधी-हिंदू स्त्रियांना गुरुद्वारांमधून गुरुमुखी ही पंजाबी भाषेची लिपीही शिकवली जाई.
सिंध प्रांताच्या दादू जिल्ह्यत खुदाबाद हे शहर आहे. १५५० च्या सुमारास व्यापार आणि खाजगी पत्रव्यवहाराकरिता स्वर्णकार समाजाने खुदाबादी ही लिपी प्रचलित केली. हळूहळू सिंधी व्यापाऱ्यांनी आपले हिशोब आणि पत्रव्यवहार या खुदाबादी लिपीत लिहिण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांमध्ये प्रचलित झाल्याने या लिपीला वाणिकी, हटवाणिकी किंवा हाटकी म्हटले जाऊ लागले.
त्यामुळे आता सिंधीसाठी एकच सर्वस्वीकृत लिपी ठरवणे आवश्यक होते. मात्र, त्याबाबत एकवाक्यता होत नव्हती. त्याविषयी अनेकांची वेगवेगळी मते होती. बार्टल याच्या मते, सिंधी भाषेसाठी अरबी लिपीच योग्य होती. त्याच्या मते, अरबी लिपीतील चिन्हे/ नुक्ते सिंधी भाषेतील विशिष्ट उच्चारांसाठी योग्य होते. तर कॅ. जॉर्ज स्टॅक याच्या मते, हिंदू व्यापाऱ्यांमध्ये प्रचलित असणारी एखादी लिपी योग्य ते बदल करून वापरणेच योग्य होते. मात्र. यात थोडा वादाचा मुद्दा होता. सिंधमधील हिंदू व्यापाऱ्यांनी अरबी लिपीला संमती दिली नसती. आणि इस्लामी व्यापाऱ्यांकडून खुदाबादीसारख्या लिपीला संमती मिळणे कठीण होते. सर बार्टल फ्रिअर यालादेखील या परिस्थितीची जाणीव होती. तसेच खुदाबादी लिपीचेही काही दोष होतेच. या लिपीत व्यंजनांचा संपूर्ण अभाव असल्याने एकाच शब्दाचे अनेक उच्चार शक्य होऊन त्यातून अर्थाचा विपर्यास होणे सहज शक्य होते.
१८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी अरबी लिपीला अजमावून पाहण्याचे मान्य करून सालाना दहा हजार रुपये शैक्षणिक खर्चासाठी मंजूर केले. त्याबरोबरच शासकीय कामासाठी सिंधी भाषा अरबी लिपीत लिहिली जाईल असा निवाडाही दिला. तसेच स्थानिक लोकांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करत सिंधमधील हिंदू आणि इस्लामी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शाळा उघडण्याचा निर्णयही घेतला गेला. इस्लामी विद्यार्थ्यांना अरबी लिपीतून, तर हिंदू, सिंधी विद्यार्थ्यांना खुदाबादी लिपीतून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला.
त्यावेळेस नारायण जगन्नाथ वैद्य हे ईस्ट इंडिया कंपनीने सिंधमध्ये नेमलेले पहिले डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८६८ मध्ये कंपनीने वैद्य यांची खुदाबादी लिपीतील त्रुटी सुधारण्यासाठी नेमणूक केली. वैद्य यांनी सुचविलेल्या सुधारणा दिवाण प्रीभादास रामचंदानी, दिवाण उधाराम मिरचंदानी, दिवाण नंदिराम मिरानी, खान बहादूर मिर्झा, सादिक अली बेग, मिया मोहम्मद, काझी घुलाम अली व मिया गुलाम हुसेन यांच्या विशेष समितीने मान्य केल्या. या समितीचे प्रमुख बी. एच. इलियस होते.
१८६९ मध्ये कराची येथील बंदर रोड (आता ‘मोहम्मद अली जिना रोड’) येथे हिंदू सिंधी शाळा स्थापन झाली. वैद्य यांनी सुचविलेल्या सुधारणा केलेल्या खुदाबादी लिपीतून शाळेत शिक्षणास सुरुवात झाली. व्यापारी कुटुंबांतील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याचा तो चांगला मार्ग होता.
यानंतर खुदाबादी लिपीतून सिंधी साहित्य प्रकाशित होऊ लागले. ‘डोडो चानसेर’ ही सिंधी लोककथा खुदाबादीमध्ये प्रकाशित झाली. १८९९ मध्ये ‘सुर्खी’ हे पहिले सिंधी नियतकालिक प्रसिद्ध झाले. सिंधी बायबल सोसायटीने सेंट मॅथ्यूची वचनेदेखील खुदाबादी लिपीत प्रसिद्ध केली.
दुर्दैवाने सिंधीची ही ऊर्जितावस्था फार काळ टिकू शकली नाही. सिंधमध्ये हळूहळू अरबी लिपीचा वापर लोकप्रिय होत गेला. सिंधमधील व्यापारीवर्गाने मात्र खुदाबादी लिपीचा वापर आपल्या कारभाराकरता मर्यादित स्वरूपात सुरूच ठेवला होता. फाळणीनंतर मात्र सिंधी भाषेकरिता सिंधमध्ये अरबी लिपीचाच वापर अधिकृतरीत्या होऊ लागला. भारतात मात्र काही मोजक्या बुजुर्ग मंडळींनाच आता ही लिपी अवगत आहे.
२१ जानेवारी १८७९ रोजी वैद्य यांची पुण्याला बदली झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये नेमलेल्या शालेय पुस्तकांची तपासणी करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीवर त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर त्यांची बदली म्हैसूर येथे एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून झाली. ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेले ते पहिले नेटिव्ह एज्युकेशन इन्स्पेक्टर होते. १८७४ मध्ये मुंबई विद्यापीठाचे ते सिनेट सदस्यही होते. १५ सप्टेंबर १८७४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन’च्या अहवालावरून लक्षात येते की, वैद्य यांच्या सिंधमधील कामाच्या अनुभवामुळे त्यांनी १८६७ मध्ये लुईस राईस यांनी आखून दिलेल्या परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले. वैद्य यांच्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र फारच कमी माहिती उपलब्ध आहे. तथापि त्यांना संस्कृत साहित्याची जाण व आवड असावी. १८७९ मध्ये शंकर पंडित यांनी संपादित केलेल्या ‘विक्रमोर्वशियम’मध्ये ‘..याचे हस्तलिखित त्यांना रावसाहेब नारायण जगन्नाथ वैद्य यांच्याकडून मिळाले’अशी नोंद आहे. दुर्दैवाने सिंधमधील हवामान त्यांना मानवले नाही. २२ मार्च १८८४ रोजी मुंबईत त्यांचा सेवाकालातच ज्वरामुळे मृत्यू झाला. लुईस राईस यांनी सादर केलेल्या अहवालात याबाबत नोंद केली आहे. राईस वैद्यांच्या मृत्यूलेखात लिहितात, ‘रावसाहेब नारायण जगन्नाथ वैद्य यांनी अनेक वर्षे सिंध प्रांतातील शैक्षणिक सुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. याबद्दल त्यांचे नाव प्रदीर्घ काळ लक्षात राहील.’ त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता कराचीमधील पहिल्या सरकारी शाळेस त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कराचीमधील सर बार्टल फ्रिअर यांनी स्थापन केलेल्या या शाळेत सुरुवातीस ६८ विद्यार्थी होते. १८७६ मध्ये शाळा सध्याच्या जागी स्थलांतरित करण्यात आली. बंदर रोडवर (मोहम्मद अली जिना रोड) उभी असलेली या शाळेची भव्य इमारत कराचीमधील संरक्षित हेरिटेज वास्तूंपैकी एक आहे. सुरुवातीला या शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ असे होते. १९३९ मध्ये मुंबईतील बॅ. सी. डी. वैद्य या त्यांच्या नातवाच्या विनंतीवरून शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’ असे केले गेले. आज कराचीमध्ये ही शाळा ‘एन. जे. व्ही.’ या नावाने ओळखली जाते. दुर्दैवाने आज खुद्द शाळेतील वैद्य यांच्या फोटोखाली उर्दूमध्ये ‘विद्या’ असे लिहिलेले दिसते. नारायण जगन्नाथ वैद्य यांच्या कार्याचे विस्मरण झाल्याचेच हे द्योतक होय.
‘एन. जे. व्ही.’ शाळेने शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. इंग्रजी भाषेचे प्रसिद्ध व्याकरणकार पी. सी. व्रेन हे शाळेचे सोळावे मुख्याध्यापक होते. (१९०४- १९०६). कराची शहराचे पहिले महापौर (१९३३) जमशेद नुसरवानजी मेहता आणि सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध कथाकार अमर जलील हे या शाळेचे माजी विद्यार्थी होत. एन. जे. व्ही. शाळेच्या इमारतीचाही एक खास इतिहास आहे. फाळणीच्या धामधुमीच्या काळात एन. जे. व्ही. शाळेसह बंदर रोडवरील अनेक इमारतींमध्ये निर्वासितांनी आश्रय घेतला होता. पाकिस्ताननिर्मितीच्या काही काळ आधी पाकिस्तानातील सर्वात जुन्या सिंधी विद्यापीठाची कराची येथे स्थापना झाली होती. या विद्यापीठाची सुरुवात एन. जे. व्ही. शाळेच्या तळमजल्यावर झाली. प्रो. हलीम या पहिल्या उपकुलगुरूंचे कार्यालय येथेच होते. १९४८ मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेनंतर सिंध विद्यापीठ हैदराबादला हलविण्यात आले. कराची येथील डो मेडिकल हे सिंधमधील जुने आणि महत्त्वाचे कॉलेज काही काळ या शाळेच्याच इमारतीत होते. सिंधची विधानसभाही काही काळ येथे कार्यरत होती. रावसाहेब वैद्य यांनी सिंध प्रांतामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी जे मोलाचे कार्य केले, त्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता हा लेखप्रपंच.
डॉ. रूपाली मोकाशी dr.rupalimokashi@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan jagannath vaidya high school at karachi
First published on: 29-05-2016 at 01:30 IST