समाजाचे शासन करण्यासाठी जी मूल्ये आवश्यक असतात, त्यांवर केवळ धर्माचाच एकाधिकार असतो, असे आजच्या काळातही आपण म्हणू लागलो तर त्याचा अर्थ एकच होऊ  शकतो. तो म्हणजे एक तर आपल्याला मानवी समाजाने केलेल्या वैचारिक प्रगतीची माहितीच नाही, किंवा मग आपण धूर्त आहोत. हे सध्या फोफावलेल्या बाबा-बुवांच्या प्रस्थामुळे नित्य अनुभवास येत आहे. लोकहिताची चाड असणाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. अन्यथा, ही ‘बाबा’गाडी अशीच चालू राहील..

राजकारण आणि धर्मकारण यांचा नेमका संबंध काय असावा?

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

अनेकांच्या दृष्टीने हा प्रश्नच गैरलागू आहे. त्यांचे म्हणणे असे असते, की राजकारणाला धर्माचे अधिष्ठान हवे. या म्हणण्याचा आदर करून त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. आपण जेव्हा ‘धर्माचे अधिष्ठान’ हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ राजकारणात धार्मिक कर्मकांडे, पूजाअर्चा आणावी असा नसतो. राजकारण हे मूल्याधिष्ठित हवे, त्याला नैतिकतेचा आधार हवा आणि ती मूल्ये, ती नैतिकता ही धार्मिक हवी, असे त्यात गृहीत असते. येथे पुन्हा असा प्रश्न निर्माण होतो, की कोणती धार्मिक मूल्ये राजकारणात हवीत? ती अर्थातच सत्य, अहिंसा, न्याय आदी मूलभूत मूल्ये. राज्यव्यवस्थेने या मूल्यांनुसार चालावे, राजा म्हणजे प्रजेचा उपभोगशून्य स्वामी हवा, त्याने सातत्याने लोककल्याणाचाच विचार करावा, हेच आपल्याला अपेक्षित असते.

पण मग त्यासाठी धर्माच्या अधिष्ठानाचे अवडंबर कशाला? समाजाचे शासन करण्यासाठी जी मूल्ये आवश्यक असतात, त्यांवर केवळ धर्माचाच एकाधिकार असतो, हे हवे तर मध्ययुगीन समाजाने मानावे. तेच आधुनिक काळातही आपण म्हणू लागलो तर त्याचा अर्थ एकच होऊ  शकतो. तो म्हणजे- एकतर आपल्याला मानवी समाजाने केलेल्या वैचारिक प्रगतीची माहितीच नाही, किंवा मग आपण धूर्त आहोत.

‘आजची आपली राज्यसंस्था ही एका सामाजिक कराराचे अपत्य आहे..’ हा राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचा आधुनिक सिद्धान्त. त्याचा शब्दश: अर्थ घेऊन, त्याचा काथ्याकूट करून हा सिद्धान्त म्हणजे काही ऐतिहासिक तथ्य नाही, असे ज्यांना म्हणायचे त्यांना वाटा मोकळ्या आहेत. पण त्यातला मुद्दा असा आहे, की सामाजिक उत्क्रांतीमध्ये हळूहळू समाजाने स्वत:च्या शासनाचे काही नीतिनियम तयार केले, कायदे तयार केले. आणि त्यानुसार आजची राज्यसंस्था चालत असते. हे नियम, कायदे म्हणजे राज्यघटना! ती काही आकाशातून पडलेली नाही. तिच्यातील विचार हे काही श्रुती नाहीत. उलट, ती आधुनिक ‘स्मृती’ आहे. आजवरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातून निर्माण झालेल्या सामाजिक नैतिक मूल्यांना वाट पुसतच राज्यघटना तयार होऊ शकते. अन्यथा ती एक वेळ राज्यसंस्थेच्या हिताची असेल; पण लोकांची मात्र कधीच असू शकत नाही. भारतीय राज्यघटना ही लोककल्याणकारी आहे, याबाबत कोणाचे मतभेद असण्याचे कारण नाही. आजच्या राज्यसंस्थेला तिचे अधिष्ठान आहे. तेव्हा त्याजागी आणखी धर्माचे अधिष्ठान आणून फालतू गर्दी करण्याचे काहीही कारण नाही. पण तरीही काही मंडळी राज्यसत्तेला धर्मसत्तेची वेसण हवी, वगैरे म्हणत असतात.

असे जे म्हणतात त्यांची चाल आणि चरित्र आपण नीट पाहिले पाहिजे. असे म्हणणाऱ्यांत प्रामुख्याने दोनच व्यक्ती असतात. एक तर स्वत:ला धर्ममरतड समजणारे आणि दुसरे धर्माचे राजकारण करणारे. हल्लीचे हे धर्ममरतड स्वत:स संत वगैरे म्हणवतात व त्यांच्या संघटना असतात. खरे तर भारतीय परंपरेत संत ही अत्यंत पवित्र अशी संकल्पना आहे. तिच्या जवळही येण्याची या धर्ममरतडांची लायकी नसते. परंतु स्वत:स संत, साधू, साध्वी असे म्हणवून घेत ही मंडळी आपल्या धर्मपरंपरेतील जुन्या आणि खऱ्या संतांशी नाते सांगण्याचा प्रयत्न करून आपले वजन वाढवून घेत असतात. ते वस्तुत: धर्माचे दलाल वा ठेकेदारच. त्यांना राज्यसंस्थेवर प्रभाव गाजवायचा असतो, तो तेथे कालातीत मूल्यांची, नैतिकतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी नव्हे. भारताचा प्राचीन धार्मिक इतिहास पाहिला तर ही बाब लक्षात येईल, की ‘सोने-नाणे आम्हां मृत्तिकेसमान’ म्हणणाऱ्या, भेटीस आलेल्या सुलतानाला ‘अन्य काही नको, तू तेवढा बाजूला सरक. कारण तुझ्यामुळे माझ्या अंगावरचे सूर्याचे किरण अडताहेत..’ असे सुनावणारे संत ही आपली खरी  उज्ज्वल परंपरा आहे. आज त्यांचा वारसा ही जणू आपल्याच बापजाद्यांची संपत्ती असे सांगत फिरणाऱ्या तथाकथित संतांना मात्र आपण केव्हा एकदा राज्यकर्त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो असे झालेले असते. लाखो बालबुद्धी भक्त आणि करोडोंची संपत्ती या जोरावर संस्थानाधीश, मठाधीश वा डेरेस्वामी झालेल्या या बाबा-बुवांना आपले हे राज्य चालविण्यासाठी अखेर राजकारण्यांचा, राज्यसत्तेचा आधार हवाच असतो. तो नसेल तर आपली मनमानी सत्ता चालूच शकणार नाही, हे त्यांना मनोमन माहीत असते. त्यामुळे ते राज्यसत्तेच्या कृपेसाठी सतत हपापलेले असतात. त्या कृपेची ते दुप्पट जाहिरात करीत असतात. दोन हेतू असतात त्यामागे. एक तर त्यातून या बाबाशाहीला सत्तेचे सहज कवच मिळते आणि त्याचबरोबर त्यांचे स्वत:चे महिमानही वाढते. खूप तऱ्हा असतात त्याच्या. त्याचे साधे उदाहरण पाहायचे असेल तर आपले हे बाबाजी आणि मंत्रीजी एकत्र असतील असा कोणताही कार्यक्रम पाहावा. व्यासपीठावर आल्या आल्या ते एकमेकांना मिठय़ा मारतील वा मंत्रीजी बाबाजींचे हात जोडून दर्शन घेतील, एकमेकांशी हास्यविनोद करतील, मग हळूच बाबाजी मंत्रीजींच्या कानात फुसफुसतील. हे सर्व लोकहितार्थ चाललेले असते. म्हणजे लोकांवर याची छाप पडावी, की बाबाजींना मंत्रीजी एवढा मान देतात म्हणजे बाबाजी केवढे मोठे! जिज्ञासूंनी येथे बाबा रामदेव यांचे सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वीचे योग-कार्यक्रम आठवून पाहावेत. नेते, अभिनेते आणि समोर हजारो आरोग्येच्छुक जनता असा माहोल असे तो.

यातून राजकारण्यांचीही चांगलीच नफेखोरी होत असते. ‘गर्दी तेथे आम्ही’ हा त्यांचा बाणा असतोच. बाबा, बुवा, साध्वी, माँ आणि पीर-फकिरांकडे तर हुकमी ‘डबल रिफाइंड’ गर्दी असते. आपापल्या धार्मिक वा छुप्या जातीय अस्मितेने पेटलेली तर ती असतेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मेंदूने ‘दिव्यांग’ असते ती. तिचे पुरेसे रेजिमेन्टीकरणही झालेले असते. ते करण्याचे अनेक उपाय असतात. त्यात सर्वाची विशिष्ट वेशभूषा, संबोधनांच्या खास पद्धती, विशिष्ट टिळे, माळा, बाबा-बुवांच्या प्रतिमांची पेने, डायऱ्या या साऱ्यांतून गर्दीला एकजिनसी करण्यात येते. स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे विरघळवून टाकली जातात त्यात. नामस्मरणाने वह्यच्या वह्य भरण्याचे पुण्यकर्म हल्ली अनेकजण करायला लावतात आपल्या भक्तांना. हे वरवर साधे, निरुपद्रवी वाटत असले तरी त्या कामाचे उद्दिष्ट ‘लष्कराच्या ड्रिल’हून वेगळे नसते. बाबा-महाराज सांगतील तो निर्बुद्धपणा निमूटपणे करणाऱ्या पलटणी उभ्या राहतात त्या यातूनच. या पलटणी ही खरी राजकारण्यांची गरज असते. आपला मतदारसंघ, त्यातील जातींचे प्राबल्य, त्या जातींचे बाबा ही सगळी गणिते बांधूनच मग ते मठ, आश्रम वा गडांच्या पायऱ्या चढतात. तेथे जाऊन, अध्यात्म आणि राजकारण यांचा कसा अन्योन्य संबंध हवा आणि धर्मसत्तेने राज्यसत्तेवर कसा अंकुश ठेवला पाहिजे, याची प्रवचने झाडतात. त्यांची ही साखरपेरणी मग कामाला येते निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी आपले हे निरिच्छ, मायामोहादी सहा रिपूंवर विजय प्राप्त केलेले जगद्गुरू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी मग हळूच कोणाला मतदान करायचे याचे आदेश देतात वा फतवे काढतात. यात कोठे आले सत्य आणि न्याय? कोठे आली धार्मिक नीतिमूल्ये? हा शुद्ध भौतिक व्यवहार असतो.

काही बुवा-बाबांना तो अधिकच चांगलाच समजलेला आहे. राजकीय नेता बनण्यासाठी जे लागते ते सगळे आपल्याकडे आहे.. वक्तृत्व आहे, लोकांना विकासाची- मग तो आध्यात्मिक असो की भौतिक, त्याची- स्वप्ने दाखवून भुलविण्याची शक्ती आहे, मागे दिव्यांग मेंदूंची सेना आहे.. धनशक्ती तर येतेच आपोआप.. त्याने दंडातल्या बेटकुळ्या आणि भरदार छाती विकत घेता येते म्हटल्यावर आपणच राज्यसत्तेवर अधिकार का सांगू नये, असे या बुवा-बाबांना वाटले तर त्यात नवल नाही. यातून अनेक बाबा, बुवा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे दिसते. काहींनी आपले पठ्ठे मैदानात उतरविले होते. येथे पुन्हा ताजे म्हणून आपल्या उद्योगपती बाबांचे उदाहरण देता येईल. त्यांनी स्वत:चा पक्षच काढला होता. मोदी सत्तेवर आल्यानंतर भारत स्वाभिमानी झाल्याचे वाटून मग त्यांनी तो गुंडाळला. त्याआधी अर्थातच त्यांनी अध्यात्माचे चूर्ण केले होते.

राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या बुवा-बाबांची जमात काही निराळीच असते. दोन चेहरे असतात त्यांचे. एक असतो तो धर्ममरतड आणि समाजसेवी असा चेहरा. ते देणग्या गोळा करतात. त्यातून सुपरस्पेशालिटी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, आश्रम.. झालेच तर अन्नछत्र असे उद्योग ते सुरू करतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहतात. बाबा कसे धर्ममरतड, जनसेवक आहेत असे म्हणतात. आता हे सारे उद्योग उभे असतात ते लोकांकडून आलेल्या पैशांतूनच. अमाप कमाई होत असते त्यातून. ती करपात्रही असते. मग सरकारला कर भरण्याऐवजी त्यातून धर्मादाय उद्योग सुरू केले तर काय बिघडले, असा विचार करून ते समाजसेवा करतात. त्यातून त्यांची ‘थोर समाजसेवक’ ही प्रतिमाही तयार होते, आणि वर त्यांच्या व त्यांच्या भक्तगणंगांच्या काळ्या पैशांना टिनोपॉली पावित्र्यही बहाल करता येते. हे झाले म्हणजे मग भक्तांनाही आपल्या बुवा-बाबाकडे एवढय़ा भारी चारचाक्या कुठून आल्या, हे विचारायची सोय व शुद्ध राहत नाही. आणि बाबाही ‘जग ही माया आहे’ म्हणायला मोकळे असतात. हा त्यांचा दुसरा खरा चेहरा. तो असतो ‘मांडवली’बाज दलालाचा! भारतीय समाजाने असे अनेक बाबा पाहिले आहेत. त्यांचा मेरूमणी म्हणजे चंद्रास्वामी.

त्याचे मूळचे नाव नेमीचंद जैन. तो राजस्थानातला. त्याचा उदय इंदिरा काळातला. राज्यसत्तेच्या आवारात तो कसा दाखल झाला, हे कुणालाच माहीत नाही. एक मात्र खरे, की सुरुवातीपासून तो वरच्या वर्तुळातच वावरत होता. माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंग यांनी त्याचा एक किस्सा सांगितला आहे. १९७५ मध्ये ते लंडनमध्ये उप- उच्चायुक्त म्हणून काम करीत असताना हा गडी त्यांना भेटला होता. इंदिरा गांधी यांचे विश्वासू यशपाल कपूर यांच्याकडून आलोय म्हणाला. त्याला तेव्हा मार्गारेट थॅचर आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची भेट हवी होती. हा आपल्या नेहमीच्या बाबांसारखा नव्हता. त्याच्यामागे गर्दी नव्हती. तो तांत्रिक होता. भविष्य सांगायचा तो. स्वाभाविकच सातत्याने विविध भयांनी ग्रस्त असलेले राजकारणी त्याच्या मागे लागले. पण स्वत: त्याचे भविष्य उजाडले ते पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात. त्याच्या भक्तगणांत थॅचरबाईंपासून एलिझाबेथ टेलर या नटीपर्यंत आणि ब्रुनेईच्या सुलतानापासून अदनान खशोगी या शस्त्रदलालापर्यंत अनेक उच्चपदस्थांचा समावेश होता. भारतातील सुब्रमण्यम स्वामींसारखे महान नेतेही त्याच्या दिल्लीतील आश्रमात जात असत. या सगळ्याचा वापर तो राजकीय दलालीसाठी करायचा. ती एवढय़ा थराला पोचली होती, की राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात त्याचे नाव घेतले जाते. हल्ली राजकीय कामे आंतरराष्ट्रीय स्तरावर करताना दिसतात ते आपले ‘यमुनाजळ’वाले श्री श्री. ही म्हणजे अगदीच दादा प्रकरणे. त्यांपुढे मराठा मोर्चाची आग विझविण्याचा व्यवहार करणारे कोकणातले जगद्गुरू म्हणजे अगदीच भय्यू.

पंजाब-हरयाणातल्या तथाकथित डेरेस्वामींमुळे बुवा-बाबांचा हा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला, इतकेच. पण महाराष्ट्रातही ठिकठिकाणी असे किरकोळीतले दलाल लोकांच्या धर्मभावनांचा वापर करून आपले सत्ताक्षेत्र विस्तारताना दिसत आहेत. यातील भयानक भाग म्हणजे यांच्या या धर्मदलालीला समाजाने प्रतिष्ठा दिलेली आहे. त्याच प्रतिष्ठेच्या जोरावर आणि इंदिरा गांधी, झैलसिंग यांच्यासारख्यांच्या छत्रछायेत कधी भिंद्रनवालेंचा दहशतवाद वाढतो, तर कधी नरेंद्र मोदी यांच्यासारख्यांच्या सत्संगाने आसारामांसारख्यांचे ऐयाशी साम्राज्य विस्तारते. या सगळ्यांच्या दिव्यांग भक्तांचे एक वेळ समजून घेता येईल. मेंढरांमध्ये विचारशक्ती नसते. त्यामुळे बाबावरील बलात्काराचा आरोप सिद्ध झाला तरी- ‘हे आपल्या धर्मास ‘धुमील’ करण्याचे षड्यंत्र आहे,’ असे कोणी त्यांना सांगते आणि ते माना डोलवत दगड हातात घेतात. हे दगड कधी प्रत्यक्षातले असतात, कधी ते समाजमाध्यमांतून मारले जातात, इतकेच. आसाराम प्रकरणात रोजच हे पाहावयास मिळते आहे. हे सारे भयानक आहे. पण त्याहून चिंताजनक बाब ही आहे, की स्वत:स सुबुद्ध म्हणवणारा समाजही त्यापासून अलिप्त राहिलेला नाही. धार्मिक राजकारणाने त्यालाही दिव्यांगत्व प्राप्त होऊ  लागले आहे. आज एका धर्माच्या बाबाविषयी बोलले की हे सुबुद्ध लोक विचारतात- ‘तुमच्यात त्या दुसऱ्या धर्माबद्दल बोलण्याची हिंमत नाही का? आमच्याच धर्माविषयी का बोलता? हे आमच्या धर्माला ‘धुमील’ करण्याचे कारस्थान आहे.’ ही मंबाजी प्रवृत्ती झाली. आणि ती फोफावत चालली आहे. हीच प्रवृत्ती आज राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा असे म्हणत आहे. असे म्हणून आपण मोठा परमार्थ सांगत असतो असे त्यांना वाटत असले तरी लोकहिताची चाड असणाऱ्यांनी त्याचा खरा अर्थ ओळखला पाहिजे. अन्यथा, राजकारणातली ‘बाबा’गाडी अशीच चालू राहील..

रवि आमल ravi.amale@expressindia.com