ग्रीस आणि भारत हे अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा असलेले देश आहेत. प्रत्येक देशाच्या पुराणकथा हा केवळ मनोरंजकच नव्हे तर उद्बोधक ठेवा असतो, सांस्कृतिक वारसा असतो. ग्रीस व भारताची पुराणे हा तर फारच मोठा मौल्यवान खजिना आहे. ही पुराणे इतिहासाइतकीच महत्त्वाची असतात. कारण आपल्या स्वत:च्या संस्कृतीचे पूर्वज कसे होते, त्यांचे सार्वजनिक व व्यक्तिगत जीवन कसे होते, त्यांच्या श्रद्धा, विचार व भावना काय होत्या, हे समजावून घ्यावेसे आपल्याला वाटतच असते. ग्रीकपुराणाच्या ज्ञानाचा उपयोग सर्व पाश्चात्त्य कला, साहित्य आणि एकूणच ती संस्कृती समजून घेताना निश्चितच होतो. ग्रीक पुराणे व भारतवर्षांतील ‘कथासरित्सागर’ हे खरोखरच कथांचे अद्वितीय सागर आहेत आणि प्राचीन मानवी कल्पनाशक्तीचे सर्व प्रकारचे आविष्कार त्यांच्यामध्ये दिसून येतात. हे जीवनाचं कथारूप दर्शन आहे आणि मानवी अस्तित्वाचं विश्लेषणही त्यात सूक्ष्मपणे निहित आहे. ग्रीकांची व भारतीयांची प्रतिमा उभ्या करण्याची शक्ती थोर होती. त्या शक्तीमुळे या दोन देशांची पुराणे आजही आकर्षक रूपात टिकून आहेत.

या दोन्ही देशांच्या पुराणकथांमधले साम्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. फ्रॉइडच्या मते, मिथ वा पुराणकथा म्हणजे माणसाच्या दडपलेल्या इच्छांचे, कल्पनांचे व्यक्तीकरण. संस्कृतीच्या एका अवस्थेमध्ये साऱ्याच मनुष्यजातीच्या भावभावना बहुधा एकाच प्रकारच्या असाव्यात. सुंदर स्त्रियांना पळवून नेणे ही अगदी नेहमी घडणारी घटना. मग साहजिकच त्यांना सोडवण्यासाठी साहसे अथवा युद्ध करणे आलेच! त्यांच्या रोमहर्षक कथा झाल्या. ‘रामायण’, ‘इलियड’मध्ये सीता, हेलन या सुंदर नायिकांना पळवून नेले गेले आणि त्यांना परत मिळवण्यासाठी युद्धे झाली. नायकाच्या दीर्घ आणि लांबवरच्या प्रवासात त्याला चमत्कृतीपूर्ण अनुभव मिळत असत. अपोलोनिअसच्या ‘आर्गोनॉटिका’ नावाच्या काव्यामध्ये जासनने सोनेरी लोकर आणण्यासाठी केलेल्या दीर्घ, रोमांचक, विलक्षण व विचित्रही घटनांनी भरलेल्या समुद्रप्रवासाचे वर्णन आहे. श्रीरामचंद्र, पांडव, विशेषत: अर्जुन व भीम, ओडिसिअस दीर्घ प्रवास करतात. ‘रामायण’ हा शब्दच रामाचे अयन म्हणजे प्रवास करणे अशा अर्थाचा आहे.

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

एक प्रकारे या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या लोककथा होत्या, असे म्हणता येईल. लिखाणाची कला नसलेल्या जुन्या जगात कथांचे कथन शिळोप्याच्या गप्पांमधून होत असेल. भारतात दीर्घ काळ चालणारे यज्ञ हे या कथांचे त्या वेळचे आणखी एक स्थान होते. महाकवींच्या प्रतिभेने त्या कथांच्या कच्च्या सामग्रीतले सत्त्व ओळखले, त्याला आपल्या कल्पनाशक्तीने सजवले. थोडा हलका अद्भुताचा चमकदार शिडकावा केला. कारण लिहिण्याची कला विकसित नसलेल्या त्या काळात तिथे आरामात आस्वाद घेऊ शकणारे वाचक नव्हते, तर ऐकायला बसलेले श्रोते होते. त्यांना मधेच उठावेसे न वाटता अखेपर्यंत ऐकण्यात रस वाटायला पाहिजे होता. पण महाकवींनी तो अद्भुताचा शिडकावा वास्तवाला धक्का पोचणार नाही इतपतच दिला. मूल्ये हरवू दिली नाहीत, उलट प्रस्थापित केली आणि दोन्हीकडे त्या कथा मौखिक महाकाव्यांचे विषय बनल्या.

प्राचीन काळी तत्त्वदर्शनांचे प्रभावी युग जसे भारत व ग्रीस या दोनच देशांत अवतरले, त्याचप्रमाणे भारत व ग्रीसखेरीज तिसऱ्या कुठल्याही देशाची पुराणे आणि म्हणून महाकाव्ये इतकी समृद्ध व चिरंतन नाहीत. या सर्व कथांत वास्तव किती, ऐतिहासिकता किती, कल्पनेच्या भराऱ्या किती हा वेधक प्रश्न आहे. या सर्वाचे मिश्रण तर तिथे आहे. साहित्य आणि पुरातत्त्वशास्त्र यांच्या पुराव्यांची सरमिसळ होते. कधी ते एकमेकांना दृढता देतात, तर कधी दोन्हीचा संघर्ष होतो. आपल्याकडे तर पुराण हाच इतिहास मानलेला आहे. ‘महाभारता’मध्ये ‘जयो नाम इतिहास:’ असे सरळ नमूद केले आहे. ‘इलियड’चा एक अनुवादक ई. व्ही. रू म्हणतो, ‘इलियड जेवढा इतिहास सांगते तेवढा आणि तसा इतिहास इतिहासाच्या दप्तरातून आणि इतिहासाच्या ग्रंथालयांच्या कपाटांतून मिळणार नाही. इतिहास साक्षेपाने निवडून, टिपून, वेचून घ्यावा, संभाव्यतेचा निकष लावून घ्यावा, हेच उचित ठरेल. केवळ नाणी व शिलालेख नाहीत, म्हणून सर्व काही त्याज्य मानणे हेही अविवेकी ठरेल.’ ग्रीक पुराणकथांच्या अनेक तत्त्वांमध्ये वास्तवता आणि ऐतिहासिकता यांची सशक्त मुळे आहेत. हाइनरिख श्लीमानने उत्खननातून ‘इलियड’मधल्या ट्रॉयच्या अस्तित्वाची ऐतिहासिकता सिद्ध केली आहेच.

संस्कृतीच्या एका अवस्थेत जगाच्या निर्मितीविषयीच्या ग्रीकांच्या कल्पनांतून या ग्रीक पुराणकथा फुलत गेल्या. मूलत: त्या मौखिक काव्य परंपरेतून रचल्या व गायल्या गेल्या. पुरातत्त्वज्ञांना तुर्कस्तान व आसपासच्या प्रदेशात उत्खननात प्रचंड प्रमाणात वस्तू, फुलदाण्या वगरे सापडल्या आहेत. अनेक शिल्पे मिळाली आहेत. प्राचीन भारत व ग्रीसमध्ये संबंध असल्यामुळे भारतात, महाराष्ट्रात भाजे येथील लेण्यांमध्ये सेन्टॉर, पंखधारी अश्व पेगॅसस यांची शिल्पे दिसतात. पुरातत्त्वज्ञांना इन्डो-ग्रीक नाण्यांवर, कुषाणांच्या नाण्यांवर झ्यूस, अथीना, अपोलो, डिमीटर, डायोनिसस, पॉसिडॉन, हेरॅक्लीस अशा ग्रीक देवतांच्या आकृती आढळल्या आहेत. उत्खननात सापडलेल्या पुष्पपात्रांवरची चित्रे ही एक स्वतंत्र अभ्यासाची शाखा बनली आहे. प्रचंड वैविध्य असलेले देव-देवता, नायक- नायिका, शिवाय अर्धमानव प्राणी अशा सर्वाच्या जीवनाच्या, त्यांच्या साहसांच्या या कथा आहेत.

या कथांचे विश्व इंद्रधनुषी आहे. त्यातले रंग बटबटीत नाहीत, पण गडद आहेत. सर्व प्राचीन ग्रीक साहित्याचे आधार या पुराणकथांमध्ये आहेत. या पुराणकथांमध्ये देवांचा राजा झ्यूस आहे. त्याच्या भाऊ, बहिणी, पत्नी हेरा, विद्योची देवता, प्रेमदेवता अशा जीवनाच्या विविध अंगांशी संबंध जोडलेल्या विविध देवता, सर्व अमूर्त संकल्पनांच्या देवता आहेत. काही भारतीय पुराणकथांतल्या मेरू किंवा कैलास पर्वतासारख्या ऑलिंपस पर्वतावर हे सर्व देव राहतात. तोच स्वर्ग आहे. त्यांचे देह अमूर्त किंवा संकल्पनांच्या स्वरूपात नाहीत; ते दृश्य, पण आदर्श आहेत. त्यांना अगदीच अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास कशानेही जखम होत नाही आणि कोणत्याही व्याधी नाहीत. अनेक देशांतले व धर्मातले देव आपण जग निर्माण केल्याचा दावा करतात. ऑलिंपिक देवांचा तसा दावा नसतो. ते शेती, शासन किंवा व्यापार यातले काही करत नाहीत. झ्यूस सोडल्यास ते कुणाला घाबरत नाहीत. ते पीत असलेल्या अमृतामुळे ते अमर तर आहेतच, पण चिरतरुणही आहेत. ‘पुण्य केल्यास स्वर्गप्राप्ती’ ही संकल्पनाच तिथे नाही. त्यामुळे या स्वर्गात मानवांना कधीच प्रवेश नाही. जे देव तिथे आहेत, ते आहेत. मात्र तिथून त्यांचे माणसांच्या दुनियेवर बारीक लक्ष असते. झ्यूसच्या राजवाडय़ात अमृत पिता पिता या देवता स्वर्ग व पृथ्वीवरच्या घडामोडींच्या चर्चा करीत असतात.

ग्रीक पुराणकथांमध्ये अनेक देवतांचा मोठा पसारा आहे. आसपासच्या निसर्गातल्या आणि जीवनातल्या घटनांचे अर्थ लावण्याचे प्रयत्न करताना माणसांनी त्या सर्वाचे कत्रे ठरवून टाकले. प्रत्येक गोष्टीसाठी एक कारणीभूत देवता तिथे मानली. थोडक्यात, सृष्टीतील विशिष्ट घटनेचा कार्यकारणभाव उलगडण्याकरता कल्पिलेली चेतनशक्ती म्हणजे देवता. समुद्राची समुद्रदेवता, सूर्यदेवता, चंद्रदेवता अशा निसर्गातल्या सर्व गोष्टी म्हणजे देवता मानल्या. अर्थात, बुद्धिवादाच्या दृष्टीने या उपपत्ती काल्पनिक वा भ्रांतिमय आहेत. ऑलिंपिक देवतांबरोबरच इतरही अनेक देवता या पुराणात आहेत. पॅनसारखे अर्धमानव-अर्धप्राणी असे देव, झऱ्यांच्या देवता, झाडांच्या देवता, नद्यांच्या देवता, वनदेवता आहेत. या पुराणातली जगाची कल्पना म्हणजे पृथ्वी सपाट आणि गोल आहे. या पृथ्वीच्या तबकडीला पूर्व-पश्चिम असे विभागून एक समुद्र तिचे दोन समान भाग करतो, म्हणून त्याचे नाव ‘मेडिटरेनियन’- भूमध्य समुद्र असे आहे. जगाचा केंद्रबिंदू ऑलिंपस पर्वत हे देवांचे वसतिस्थान आहे. त्याचे दरवाजे ढगांचे आहेत. या स्वर्गात संगीताचा देव अपोलो आपले वाद्य वाजवत असतो व काही देवता गात असतात.

इंद्राचा दरबारही असाच वर्णिलेला असतो. देव अमृतच पीत असतात. रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा वगरे अप्सरा नृत्य करत असतात. म्हणजे तपशिलांचेच फरक! याही देवांचे लक्ष पृथ्वीवर असतेच; शिवाय नारद मुनी त्रलोक्यात संचार करणारे आहेत, ते वार्ताहरासारखे येऊन अधिक तपशील वा ‘आँखों देखा हाल’ सांगत असतात. मात्र हे देव ग्रीक देवांपेक्षा तसे वेगळे आहेत. अथीना, पॉसिडॉन, अपोलो हे सर्व ग्रीक देव युद्धात, लढण्यातही प्रत्यक्ष भाग घेतात. भारतीय पुराणातल्या देवतांशी या देवतांची तुलना केली तर असे दिसते, की आपले देव इतके उग्र नाहीत, सौम्य आहेत. ते मानवी व्यवहारात फार ढवळाढवळ करत नाहीत. कदाचित याचे कारण भारतीय तत्त्वज्ञानातला ‘कर्मसिद्धान्त’ हे असेल. कर्मभोग अपरिहार्य असल्यामुळे देवही तो बदलू शकत नाहीत, म्हणून देव तसा प्रयत्न करत नसावेत.

आज ग्रीक देवतांची कोणी पूजा करत नाही. इ. स. पूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात तत्त्वज्ञान, इतिहास, गद्य आणि बुद्धिवाद यांचा उदय झाल्यावर पुराणकथांचे सत्य किंवा वास्तव म्हणून महत्त्व कमी होऊ लागले. पुराणातल्या वंशावळींच्या जागी चमत्काराचा घटक वज्र्य करणारी इतिहासाची संकल्पना अधिष्ठित होऊ लागली. ग्रीक इतिहासकार व तत्त्वज्ञ पुराणावर टीका करू लागले आणि कवी व युरिपिडिससारखे नाटककार त्यांच्या साहित्यात त्याची पुनर्रचना करू लागले. होमरच्या परंपरेवर टीका होऊ लागली. पण तरी ग्रीक संस्कृतीने या पुराणकथा जिवंत ठेवल्या. त्यांचा प्रभाव काव्यावर अक्षुण्ण राहिला आणि चित्रकला व शिल्पकलेचा प्रमुख विषय म्हणून त्यांचे स्थानही विचलित झाले नाही. या देवतांचा अभ्यास आता धर्मशास्त्र किंवा देवताशास्त्र या विभागात नाही, तर साहित्याच्या विभागात केला जातो. तिथे मात्र त्यांना जागा आहे आणि नेहमीच राहीलही. प्राचीन व आधुनिक कला व काव्याच्या उत्कृष्ट निर्मितीमध्ये त्यांचे स्थान इतके उच्च आहे, की त्या विस्मरणात जाणार नाहीत. त्यांच्याविषयीच्या कथांतील काव्य व कलामूल्यामुळे त्या अविस्मरणीय आहेत व राहतील.

या पुराणकथा आणि त्यातून उगवलेली महाकाव्ये यातून त्या काळातल्या माणसांच्या मनात डोकावता येते. बांधवाच्या हत्येचा किंवा अपमानाचा सूड घेणे हे ग्रीक, विशेषत: रोमन परंपरेत बंधनकारक कर्तव्य मानले गेले होते.  भारतीय महाकाव्य ‘महाभारत’ हा सूडाचा प्रवास आहे, असे अनेक वेळा वाटते. त्या विषयावर बरेच लेखनही केले गेले आहे. अनेक ग्रीक पुराणकथाही सूडचक्राच्या कथा वाटतात. त्या कथा इंग्रजीत भाषांतर होऊन आल्यावर त्यांच्या प्रभावाने इंग्रजीतही हिंसेने भरलेली नाटके लिहिली गेली. पण त्याचबरोबर असेही वाटत राहते, की अशा कथांची सर्वच काळातल्या माणसांना भूक असते का? कारण आजही एकविसाव्या शतकात बॉलीवूड-हॉलीवूडमध्ये सूडचक्राच्या कथांचा खच पडत असतो. म्हणजे या पुराणकथा जुन्यापुराण्या झाल्या नाहीत, तर वेगळ्या रूपात आपल्या आसपास अजून जिवंतच आहेत, असे म्हणावे का?

परंतु यातल्या अनेक प्राचीन कथांमध्ये अभिजात साहित्यिकमूल्य आहे आणि त्यांचे शेवट खुले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आधारित अनेक कृती लिहिल्या गेल्या. या पुराणकथांचे वैविध्य विलक्षण आहे. कधी परीकथा, लोककथा, इसापच्या प्राणिकथा यांचेही घटक या कथांमध्ये आलेले दिसतील. त्यामध्ये नेहमीच तर्कशास्त्र व न्यायबुद्धी आढळेल असे नाही. पण जगातल्या व जीवनातल्या सगळ्या घटनांमध्ये तरी कुठे तर्कशास्त्र व न्यायबुद्धी दिसते? अखेर मनमानी करणारी नियती हीच सर्वसत्ताधीश असते. अणि सर्व प्राचीन ग्रीक साहित्यात या नियतीची सार्वभौमता हीच केंद्रस्थानी आहे. या पुराणांतला झ्यूस काय किंवा इतर देवता काय, या नियतीच्या प्रतिनिधीच आहेत.

या देवतांच्या पुराणकथांमध्ये होणारे मानसशास्त्राचे दर्शनही मनोवेधक आहे. त्यामुळेच सिग्मंड फ्रॉइडसारख्या आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी मनोगंडांना किंवा मनोविकारांना नार्सिसस मनोगंड, इडिपस गंड वगरे पुराणकथांमधल्या व्यक्तींची नावे दिली आहेत. पुराणातील अनेक व्यक्तिरेखा समाजाच्या सामूहिक जाणिवेत आदिबंध होऊन राहतात. त्यामुळे सर्जक कलावंतांच्या कलाकृतींमध्ये त्या कोणत्या ना कोणत्या तरी रूपात प्रकटतातच. त्यातील प्रतिमा आपल्या सामूहिक जाणिवेत तरळत असतात. सुशिक्षितांच्या बोलण्यात व पत्रकारितेच्या भाषेतसुद्धा त्या प्रकटतात. पाश्चात्त्य स्थापत्यकलेत, चित्रकलेत व साहित्यात ग्रीक पुराणकथांच्या कधी धूसर तर कधी स्पष्ट छाया दिसून येतात.

तत्त्वज्ञ प्लेटोही या देवतांना मानत असे. त्याचे होमरसह सर्व कवींच्यावर जे आरोप होते त्यातला एक असा होता, की कवी थापाडे असतात. होमर देवतांना हास्यास्पद करून त्यांची चेष्टासुद्धा करतो, देवता अशा असू शकत नाहीत. कवींच्या फक्त अशा काव्याला परवानगी असावी, जे देवतांची व चांगल्या माणसांची स्तुती करते, असे तो म्हणतो. राणी लेडाकडे हंसाच्या रूपात झ्यूस गेला, हे सत्य असणे शक्य नाही. ती कथा सांगणारा म्हणजे कवी होमर खोटारडा, थापाडय़ा आहे. असो बापडा! माझी भूमिका अशी आहे, की प्लेटो तत्त्वज्ञ म्हणून महान आहे. त्याच्यानंतरचे बरेचसे तत्त्वज्ञान त्याच्या ग्रंथाच्या तळटिपेसारखे आहे, असे म्हटले जाते, तेही खरे असेल. झ्यूस वगरे देवताही पूजनीय व पूर्ण असतील. असोत! मला मोहवते ती त्या (थापाडय़ा!) कवींची कल्पनाशक्ती, त्यांच्या त्या कथांमधून घडणारे मानवी जीवनाचे, मानसिकतेचे, दुर्बलतेतून घडलेल्या अटळ अशा चुकांचे, स्खलनांचे, त्यांतून उभे राहण्याच्या प्रयत्नांचे, दुर्दैवांचे, नियतीच्या तिढय़ांचे व ते भोगण्यातल्या कारुण्याचे दर्शन आणि त्या सर्वावर या कवींनी केलेले भाष्य. या कथांतील हे साहित्यिक मूल्य अधिक महत्त्वाचे वाटते. पुराणांचा काळ निर्विवादपणे ठरवणे कठीण आहे. पण काळ कोणताही असो, माणूस सदैव एकच आहे. त्याच्या हृदयाचा आकार काही बदललेला नाही. त्यामुळे त्या हृदयाची स्पंदने, लास्ये, अश्रू टिपणाऱ्या या कथा अजरामर आहेत.