ज्येष्ठ पत्रकार आणि संस्कृतच्या  अभ्यासक, मराठी भाषेच्या उत्थानाचे व्रत घेतलेल्या वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्या आठवणी जागविणारा लेख..
वसुंधराबाईंचे निधन झाल्याची बातमी आठेक दिवसांपूर्वी आली, ती तशी अनपेक्षित नव्हती. गेली चार-पाच र्वष त्या दुर्धर कर्करोगाशी झगडत होत्या. प्रकृतीतील चढउतार चालू होते. पण शेवटी त्या हतबल, क्षीण झाल्या असाव्यात. अगदी अलीकडेच डॉ. अरुण टिकेकरांचे निधन झाल्यावर बाईंशी बोलणे झाले, त्यावेळी त्यांच्या तब्येतीबद्दल मी करत असणारी विचारणा कानांआड करत त्या डॉ. टिकेकरांबद्दलच बोलल्या. पण तो संवाद फार वेळ चालला नाही. त्यांना थकवा जाणवत असावा. नेहमीसारखे ‘भेटू या लौकरच..’ असे निरोपाचे बोलणे झाले, ते शेवटचेच! भेट काही झाली नाही.
त्यांच्या जाण्याची बातमी ऐकल्यावर एकदम वाटले- मूल्ये, तत्त्वनिष्ठा, स्वाभिमान, बाणेदारपणा या गुणांचा आदर करत, त्यांचा आपल्या जगण्यात अंगीकार करणाऱ्यांच्या दुर्मीळ होत चाललेल्या परंपरेतील आणखीन एक दुवा निखळला. आज सार्वजनिक व वैयक्तिक जीवनात अति वेगाने होत असणाऱ्या मूल्यांच्या पडझडीच्या काळात निराश न होता, आपली मूल्यनिष्ठा न सोडता शक्य तितके चांगले करण्याच्या वृत्तीने काम करणारी वसुंधराबाईंसारखी माणसे आपल्यातून जातात; तेव्हा आपण वैयक्तिक व सामाजिक पातळीवरही बरेच काही गमावलेले असते.
बाईंच्या आजारपणाने अलीकडे त्या सार्वजनिक जीवनात फारशा सक्रिय नव्हत्या, पण तरीही उमेद कायम होती. फोनवरच्या बोलण्यातही त्यांची ठाशीव, पण मृदू आवाजात बोलण्याची लकब कायम होती. आणि आपल्यावरील कौटुंबिक व इतर जबाबदाऱ्या पुऱ्या करण्याची ओढही!
२०११ मध्ये राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदावरून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतरचे कितीतरी बेत त्यांच्या मनात होते. एशियाटिकच्या सभासद त्या होत्याच; पण तोवर सोसायटीच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेऊ  न शकलेल्या बाईंनी निवृत्तीनंतर तिथे काम करण्याची आपली इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली होती. मात्र, लगेच आलेल्या आजारपणाने त्यांना काहीच करता आले नाही.
अप्पा पेंडसे यांच्यासारखे बाणेदार पत्रकार वडील, शिक्षिका असणारी आई आणि कम्युनिस्ट विचारांची रुजवण महाराष्ट्रात करणाऱ्यांमध्ये अग्रभागी असणारे काका- लालजी पेंडसे अशी वैचारिक पाश्र्वभूमी वसुंधराबाईंना घरातच लाभली होती. आपल्या या संस्कारांचा, आई-वडिलांचा अभिमान साहजिकच त्यांना वाटत असे. घरातून दिल्या जाणाऱ्या अनमोल स्वातंत्र्याची, तशीच त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव व किंमतही त्यांना होती. आपली वेगळी वाट निवडताना हे सारे संचित त्यांच्याजवळ होते. त्याचा दृश्य परिणाम त्यांच्या पुढच्या कारकीर्दीवर झालेला दिसतो. उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द आणि नंतर प्राध्यापकी.. तत्कालीन सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीची ही वाटचाल चाकोरीबद्धच वाटण्यासारखी होती. नंतर मात्र त्यांनी पत्रकारितेत जाण्याचा निर्णय घेतला. मराठी पत्रकारितेत महिला पत्रकार अपवादात्मक असताना वडिलांच्या प्रभावामुळे वसुंधराबाईंनी हा मार्ग निवडला असेल का, असे मला कधीतरी वाटून गेले होते. (त्या काळातील लता राजे, संजीवनी खेर, नीला उपाध्ये अशा हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ाच महिला पत्रकारांची नावे आठवतात.) पुढे त्यांनी साप्ताहिक ‘लोकप्रभा’चे संपादकपद, ‘नवशक्ती’चे संपादकपद व इतर तत्सम पदांवरील जबाबदारी लीलया सांभाळली.
मला विशेष वाटले ते हे, की पत्रकारिता करताना त्यांनी मराठी साहित्यिक व सांस्कृतिक जीवनाशीही स्वत:ला जोडून घेतले होते. त्यामुळे साहित्य संघाचे कार्यवाहपद, पुढे साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद अशी जबाबदारी त्यांनी सक्षमतेने पार पाडली. या सर्व वेळी त्यांच्या व्यवहारातील चोखपणा, कामाबद्दलची तळमळ वाखाणण्यासारखी होती.
संस्कृत हा त्यांच्या अभ्यासाचा व आवडीचा विषय. (त्या जगन्नाथ शंकरशेट पुरस्काराच्या मानकरी होत्या.) त्याचा उत्तम उपयोग त्यांनी दूरदर्शनवर सादर झालेल्या ‘अमृतमंथन’ कार्यक्रमाच्या वेळी केला. नक्की कल्पना नाही, पण साहित्य संघाच्या कार्यवाह असताना संघातर्फे सादर होणाऱ्या संस्कृत नाटकांबाबतीतही कदाचित त्यांचे संस्कृतचे ज्ञान उपयोगी पडले असेल. दूरदर्शनवर सादर झालेल्या, वसुंधराबाईंचे निवेदन व संशोधन असणाऱ्या या ‘अमृतमंथन’ कार्यक्रमाची मी मनापासूनची चाहती होते. त्यामध्ये डॉ. मो. दि. पराडकरांसारख्या दिग्गज संस्कृत तज्ज्ञाबरोबर होणारी त्यांची चर्चा माहितीपूर्ण व अभ्यासाधारित असे. संस्कृतमधील अभिजात कलाकृतींवरील चर्चेचा आस्वाद घेताना पुन:प्रत्ययाचा आनंद या कार्यक्रमामुळे लुटता आला. सतत बारा वर्षे चाललेल्या या कार्यक्रमासाठी त्या केवढी तयारी करत, हेही त्यांनी नंतर कधीतरी सांगितले होते.
या कार्यक्रमाबरोबरच अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी मांडलेल्या महाकोषाच्या योजनेमुळे बाईंचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यावेळची त्यांची तडफदार भाषणं आणि ती योजना मांडण्यामागची त्यांची स्वाभिमानी वृत्ती मनाला स्पर्शून गेली होती. त्यांची त्यावेळची धडपड, साहित्यिकांना सतत केली जाणारी आवाहने सारेच आज निर्थक ठरले आहे. ही चांगली योजना पूर्णपणे आकाराला येण्याआधीच बारगळली याचे अनेकांना वाईट वाटले.
माझी त्यांच्याशी आधी प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक झाल्यावर एका प्रकल्पाच्या निमित्ताने ती झाली. एकदा ओळख झाल्यावर मात्र मैत्री झाली. संस्कृत हा दोघींच्या समान आवडीचा व अभ्यासाचा विषय असल्याने क्वचित् प्रसंगी वेळ मिळेल तसे त्याबद्दल बोलणे होई. माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनी प्रमुख पाहुण्या या नात्याने केले. मोठय़ा वयात, कामानिमित्ताने झालेला परिचय! तरीही एकमेकींशी बोलण्यात मोकळेपणा आला, खास मनातले इवलेसे गुपित वा एखादा सलही कधीतरी बोलण्याएवढा विश्वास वाटला, क्वचित एकमेकींची थट्टाही केली गेली, हे विशेष. गंमत म्हणजे कोणतेही कारण नसताना हा परिचय, मैत्री ‘अगं-तुगं’ म्हणण्यापर्यंत पोचली नाही.. दोघींच्याही बाजूने- हे मात्र नवल.
राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकपद त्यांनी दहा वर्षे निभावले. शासन पुरस्कृत संस्थेची जबाबदारी सांभाळताना कराव्या लागणाऱ्या कसरती त्यांनाही कराव्या लागत होत्या. डॉ. सरोजिनी वैद्य या संस्थेच्या प्रथम संचालक. त्यांनी दूरदृष्टीने संस्थेची भक्कम पायाभरणी करण्यासाठी संस्थेची उद्दिष्टे निश्चित करून, त्यांच्याशी सुसंगत अशा उपक्रमांचा आरंभ केला होता. त्यानंतर वसुंधराबाईंनी ते उपक्रम पूर्णत्वाला कसे पोचतील हे पाहिले. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली. कधी अनपेक्षित अशा अडचणी आल्या, शासनातील फेरफारांमुळे उपक्रमांची गती खुंटली गेली तरी कधी थोडे थांबून, कधी थोडीशी वेगळी दिशा पकडून त्यांनी ती कामे पुरी करून घेतली. एखादे चांगले काम सुरू करण्याबरोबरच ते पुरे करणेही महत्त्वाचे असते. शिवाय दीर्घकालीन प्रकल्प तडीस नेताना अनेक हातांची जरूर असते, हे ओळखून वसुंधराबाईंनी नवीन माणसांना संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही नवे उपक्रमही सुरू केले. पारदर्शक व्यवहाराचा आग्रह धरत संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्याचे ध्येय त्यांनी नजरेआड होऊ दिले नाही. आपली प्रकाशने सामान्य लोकांपर्यत पोचावीत यासाठी वसुंधराबाईंनी महाराष्ट्रातील दूरदूरच्या जिल्ह्यंच्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शने भरवायला सुरुवात केली. त्यामुळे संस्थेचीही माहिती लोकांना कळू लागली. आता दरवर्षी साहित्य संमेलनामध्येही संस्थेच्या पुस्तकांचा स्टॉल लावला जातो.
मराठीचा विकास व्हावा, मराठीतून विविध विषयांचे शिक्षण घेता यावे यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या मदतीने ‘विज्ञान संकल्पना कोश’ तयार केला गेला आहे. त्याला वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांची प्रस्तावना आहे. मराठीतील चांगल्या साहित्यकृती इतर भाषांमध्ये अनुवादित करण्याची सुरुवात त्यांनी संस्थेत केली. मराठीतून हिंदीत झालेल्या अनुवादांत ‘करुणाष्टक’, ‘माचीवरला बुधा’, ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’, ‘मी भरून पावले आहे’ इ. पुस्तकांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यतील बोलीभाषांचा समाज-वैज्ञानिक अभ्यास, आधुनिक भाषाविज्ञान आदी भाषाविषयक पुस्तकांची निर्मिती, दलित-ग्रामीण शब्दकोश, इतरही कोश, पूरक शैक्षणिक साहित्य- निर्मिती यांसारखे मराठीच्या विकासाबाबतीतील महत्त्वाचे उपक्रम त्यांच्या काळात राबवले गेले.
वसुंधराबाईंनी बरेच स्फुटलेखन केले असले तरी सारे पुस्तकरूपाने आलेले नाही. ‘कौटिल्याच्या अर्थशास्त्रा’वरील पुस्तक हेच केवळ संस्कृतशी संबंधित प्रसिद्ध लेखन. ‘अमृतमंथन’ कार्यक्रम बारा वर्षे करूनही त्याच्या चित्रफिती उपलब्ध नसल्याने त्यासाठी घेतलेले परिश्रम व केलेले संशोधन वाया गेले. ‘लोकसत्ता’मधील त्यांच्या ‘कुटुंबकथा’ खूपच लोकप्रिय झाल्या. त्या मात्र संकलित झाल्या. एकदा मी त्यांना गमतीत म्हटले, ‘तुमच्या या छोटय़ा कथा म्हणजे ‘वसुंधराया: कुटुम्बकणिका:’ आहेत.’ शैलीच्या आहारी न जाता, मर्यादित अवकाशात, नेमकेपणे व उद्बोधनपर आणि चिंतनाची डूब असणारे असे त्यांचे लेखन असे. आता वाटते, पत्रकार म्हणून सतत डेडलाइन पाळण्याच्या गडबडीत त्यांच्या आवडीचे, वेळ घेऊन लिहिण्याचे लेखनविषय मागे पडले असतील का? कन्या, पत्नी, माता या साऱ्या भूमिका निभावताना आयुष्यात कसोटी पाहणारे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. मानसिक स्वास्थ्य राखणे कठीण झाले. त्यातही लेखन मागे पडले असावे. जीवनाने त्यांना तेवढी सवड दिली नाही याची खंत वाटते.
डॉ. मीना वैशंपायन – meenaulhas@gmail.com