मागील पंचवीस वर्षांत सर्वसाधारणपणे आत्महत्या करण्याचे प्रमाण जगभरातच वाढलेले दिसून येते. मुले-मुली आणि अकरा ते वीस वर्षांतल्या तरुण-तरुणींत हे प्रमाण जवळपास तीनशे टक्क्यांनी वाढल्याचे काही संशोधनातून दिसून आले आहे. किशोरवयीन मुला-मुलींच्या आत्महत्या, त्यामागील विविध कारणांचा मानसशास्त्रीय ऊहापोह करण्याचा प्रयत्न ‘मुलांच्या आत्महत्या’ या पुस्तकातून शशी बेडेकर यांनी केला आहे. लेखक निवृत्त मुख्याध्यापक असल्याने शालेय अभ्यासक्रम, परीक्षा, वाढत्या स्पर्धा – परीक्षा उपक्रमांचा विद्यार्थ्यांवर येणारा ताण, विद्यार्थ्यांचा या ताणासोबत सुरू असलेला झगडा याचा भरपूर आणि प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. किशोरवयीन मुला-मुलींच्या मन:स्थितीचा थांगपत्ता लागणं ही तशी आव्हानात्मकच बाब आहे मात्र बेडेकरांनी केवळ याचेच विश्लेषण केले नाही तर समुपदेशन म्हणजे काय, मुलांमध्ये मत्रभावनेची रुजवात, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करण्याचे महत्त्व याचे सखोल विश्लेषण केलं आहे. सामान्यत: एखादी व्यक्ती तणावाखाली दिसली तर ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, असे म्हणले जाते, मात्र डिप्रेशन अनेक प्रकारचे असू शकते, तसेच तो तणाव ही एखाद्या मानसिक आजाराची सुरुवातही असू शकते, अशा वेळी नेमके काय केले पाहिजे, यावर बेडेकर भर देतात. केवळ समस्येचं विश्लेषण करून ते थांबत नाहीत, तर आपल्या आसपास एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर काय करावे, कुठून मदत मिळवावी यासाठी दिलेले हेल्पलाइन नंबर्स हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे. पुस्तकात जागोजागी मानसशास्त्रीय संदर्भ येतात. काही संस्थांची आत्महत्यांबाबतची सर्वेक्षणं, तज्ज्ञांची मतं या बाबींमुळे लेखकाने या समस्येचा सांगोपांग आढावा घेताना भरपूर संशोधन केल्याचे जाणवते.

  • ‘मुलांच्या आत्महत्या’ (समस्या आणि उकल) – शशी बेडेकर,
  • मनोरमा प्रकाशन,
  • पृष्ठे- २४०, मूल्य- २०० रु.

 

प्रतिभावंत चित्रकाराचे जीवनदर्शन

आपण विविध कलाप्रदर्शने पाहतो. शिल्पं, चित्र, कलाकृतींचा आनंद घेतानाच ती साकारणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याबाबतही उत्सुकता निर्माण होते. ही उत्सुकता शमवण्यासाठीच मग आपण चित्रकार, कलावंतांच्या आयुष्याबाबत जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळेच व्हॅन गॉग, लिओनार्दो दा विंची, मायकेल अँजेलोंसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांवर भरभरून पुस्तकं लिहिली गेली आहेत, सिनेमे बनत आहेत. राजा रविवर्मासारख्या दिग्गज भारतीय चित्रकारांवरही विपुल लेखन वाचायला मिळते. नामवंत चित्रकारांबाबत मराठीतही आता पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र रूढार्थाने आपल्या कारकिर्दीत फार प्रसिद्ध नसलेल्या, पण प्रतिभावान कलावंतांच्या कारकिर्दीचा दस्तऐवज उपलब्ध असणे अद्यापही दुर्मीळ आहे. ‘चित्रकार पाथरे’ या पुस्तकाबाबत असे निश्चित म्हणता येते. अरुण पाथरे या प्रतिभावंत चित्रकाराच्या कलाजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. शरद व सुचिता तरडे या कलावंत दाम्पत्याने आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या चित्रकार पाथरे यांचा प्रदीर्घ सहवास, त्यांची चित्रकला- शिल्पकला आणि त्यांचा कलाविषयक विचार, त्यांच्या स्वभावाचे पैलू हे सारे शब्दबद्ध केले आहे. पाथरेंसारख्या कलावंताच्या कारकिर्र्दीची ओळख करून देत असताना, त्यांच्यातील सहृदयी माणसाचे दर्शन घडवण्याचं कामही या लेखकद्वयीनं केलं आहे. कलावंत म्हणून अतिशय समृद्ध असणारी व्यक्ती जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते, तसेच कलावंताचा अंगभूत विक्षिप्तपणा.. या बाबींमुळे प्रस्थापित व्यवस्थेशी जुळवून घेताना होणारी घालमेल आणि त्यामुळेच वैयक्तिक तसेच कलेच्या समृद्ध होण्यातील अडथळे ही यातील आशयाचा महत्त्वाचा भाग आहे. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयापासून आयुष्यातला महत्त्वाचा काळ या दाम्पत्याने पाथरेंसोबत व्यतित केला आहे. त्यामुळे केवळ चित्रकार पाथरे असे हे वर्णन न राहता या दाम्पत्याचे त्यांच्यासोबत असलेले ऋणानुबंध म्हणजे या पुस्तकाचे एक सौंदर्यस्थळच आहे. पाथरे यांच्या अनेक महत्त्वाच्या कलाकृतींचा या पुस्तकातून छायाचित्ररूपाने आस्वाद घेता येतो, हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़.

  • ‘चित्रकार पाथरे’ – शरद आणि सुचिता तरडे
  • हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स
  • पृष्ठे- १५४, किंमत- ७५० रुपये.