महाराष्ट्रातील मराठीहिंदी संघर्ष केवळ भाषेचा प्रश्न नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवी मूल्यांवर होणाऱ्या परिणामांचीदेखील समस्या आहे. समाजमाध्यमांवरून सध्या भाषा आणि संस्कृती हत्यारं असल्यासारखी वापरली जातायत. दिवसातील अधिकाधिक काळ रील्स पाहण्यात बुडालेल्या बहुतांश नागरिकांची मने तेथील द्वेषचालित अल्गोरिदम दररोज, दर तासाला, दर मिनिटाला बिघडवत चाललाय. रागक्रोध, आपलेबाहेरचे या जाणिवांनी मेंदू व्यापण्याचा प्रकार हळूहळू घडतोय. या घटना खरे संकट नाही, तर आगामी भीषण संकटाची नांदी कशी, याची तपशिलात चर्चा...

‘‘हाँ महाराष्ट्र नाही, तिथे जाऊन मराठी बोला… इथे राहायचं असेल भोजपुरी बोला….’’ – काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका दुकानात एका मराठी कर्मचाऱ्याला भोजपुरी भाषेत बोलण्यासाठी दमदाटी करण्यात आली. दमदाटी करणाऱ्या व्यक्तीने सदर घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून व्हायरल केला. फक्त ३० सेकंदांची ही रील होती, पण या ३० सेकंदांच्या रीलमध्ये दिसणारा अपमान, त्रास आणि मानसिक छळ हे केवळ एका व्यक्तीचे दु:ख नव्हे, तर आजच्या डिजिटल युगातील एका गंभीर समस्येचे दर्शन आहे – अल्गोरिदम-चालित द्वेषाभिसरण.

ही घटना महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अनेक भाषिक तणावाच्या व्हिडीओंची प्रतिक्रिया होती. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषा न बोलता येणाऱ्या स्थलांतरित लोकांवर दमदाटी करणारे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमांवर सादर केले होते. या सर्व व्हिडीओंनी एकत्रित प्रभाव निर्माण केला आणि त्यांची प्रतिक्रिया म्हणून उत्तर प्रदेशात ही घटना घडली. गेले काही दिवस महाराष्ट्रातील, खासकरून पुणे-मुंबई या स्थलांतरितांचे प्रमाण जास्त असलेल्या भागांतील लोकांच्या मनातील खदखद काही राजकीय पक्षाचे लोक आक्रमकपणे मांडताना दिसताहेत. या भाषेच्या प्रश्नावरली आक्रमक आंदोलने महाराष्ट्राला नवी नाहीत, १९५० पासून हा मुद्दा पेटता ठेवला जातोय.

याआधी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक आंदोलने २००८ च्या आगे-मागे झाली. तेव्हादेखील मुंबईत राहणाऱ्या, पण मराठी न बोलून त्यावर मुजोरी करणाऱ्या स्थलांतरितांवर दमदाटी करण्यात आली, दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा आग्रह करण्यात आला.

२००७-८ मधील व २०२५ मधील घडलेल्या घटना या साधारणत: सारख्याच, पण या दोन्ही घटनांमधील महत्त्वपूर्ण फरक म्हणजे समाजमाध्यमांचा लोकांवर पडलेला पगडा. समाजमाध्यमं २००७-८ च्या काळात तितकीशी परिपक्व नव्हती. मराठी भाषेच्या आंदोलनाविषयी होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया या राजकीय संघटनेमार्फत होत. म्हणजे कुठलीही क्रिया करायची झाल्यास किंवा तिला प्रतिक्रिया द्यायची झाल्यास संघटनेच्या धोरणानुसार करण्यात किंवा देण्यात येत असे. राजकीय कार्यकर्तेदेखील त्या संघटनेच्या रणनीतीनुसार अथवा धोरणांनुसारच कृती करत. सर्वसामान्य माणसेसुद्धा टीव्हीमधून घडणारी आंदोलने पाहून जास्तीत जास्त एखाद्या मोर्चामध्ये सहभागी होत, अथवा मतदानातून आपली प्रतिक्रिया देत. यापलीकडे ते फार काही कृती करू शकत नव्हते. कारण ती कृती करून जगासमोर दाखवायला आणि जगाकडून मान्यता मिळवायला त्यांच्याकडे तेव्हा व्यासपीठच उपलब्ध नव्हते. आज फोनमधील कॅमेरा आणि रील यामुळे ते व्यासपीठ सहज हाती आले आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशमधील व्हायरल व्हिडीओ किंवा राजकीय कार्यकर्त्यांचे पक्षाच्या धोरणाच्या अधिक पुढे जाऊन अतिउतावळी कारवाई किंवा हिंसक कृती समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यासारख्या प्रकारांचे स्तोम माजले आहे (हे इतके की एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांना हे असले व्हिडीओ बनवणे बंद करा, असे जाहीर आदेश द्यावे लागले). दुर्दैवाची बाब म्हणजे समाजमाध्यम वापरकर्ते हे व्हिडीओ व्हायरल करतात आणि अशाच कण्टेण्टला संलग्न अधिकाधिक रील्स (कण्टेण्ट) बनवतात. थोडक्यात काय, तर एखाद्या संघटनेने वा पक्षाने एखाद्या राजकीय आंदोलनस्वरूपी केलेल्या छोट्या निखाऱ्याचे रूपांतरण समाजमाध्यमं ‘लाइक्स’ आणि ‘व्ह्यूज’च्या प्रलोभनाने वणव्यात करते. या घटना म्हणजे खरे संकट नाही, या घटना आगामी भीषण संकटाची नांदी आहे. आजच्या डिजिटल युगात अशा घटना फक्त राजकीय संघटनांच्या नेतृत्वाखाली होत नाहीत, तर सोशल मीडिया अल्गोरिदमच्या प्रभावाने व्यक्तिगत पातळीवर घडत आहेत हे भयंकर चित्र आहे.

एकाकी योद्धे आणि संकट…

या नव्या युगातील सर्वात धोकादायक घटना म्हणजे अल्गोरिदम-चालित एकाकी योद्धे. हे असे लोक आहेत, जे कोणत्याही राजकीय संघटनेचे सदस्य नसतात (किंवा काही अपवादात असतातसुद्धा)… पण समाजमाध्यमांवरील व्हायरल कण्टेण्टच्या प्रभावाने अचानक हिंसक कृती करतात. त्यांना इतर कोणी व्यक्ती भडकवत नाही, फक्त अल्गोरिदम भडकवतो. एका संशोधनातून असे दिसून आले की, हिंसाचारातील रील्सना तिप्पट व्ह्यूज मिळतात. म्हणजे जर तुम्ही शांततेचा, प्रेमाचा, एकतेचा व्हिडीओ बनवाल तर त्याला एक लाख व्ह्यूज येतील, पण जर तुम्ही कोणावर तरी हल्ला करणारा, कोणालातरी मारहाण करणारा व्हिडीओ बनवाल तर त्याला तीन लाख व्ह्यूज येतील. यूट्यूबची शिफारस प्रणाली यूट्यूब वापरकर्त्याच्या एकूण व्हिडीओ पाहण्याच्या वेळेपैकी ७० टक्के वेळेसाठी जबाबदार आहे, म्हणजे जर तुम्ही यूट्यूब उघडले तर तुम्ही तीनच ते व्हिडीओ बघाल जे तुम्हाला बघायचे आहेत आणि सात असे व्हिडीओ बघाल यूट्यूब ला तुम्हाला दाखवायचे आहेत. हे सात व्हिडीओचे अल्गोरिदम अधिक एंगेजमेंट निर्माण करणारे ‘बॉर्डरलाइन कण्टेण्ट’ – म्हणजे अर्धी खरी अर्धी खोटी, उग्र, वादग्रस्त कण्टेण्ट दाखवते… अल्गोरिदमची मानसिक यंत्रणा अशी आहे : सुरुवातीला Initial Algorithm Exposure – भावनिक कण्टेण्टला प्राधान्य, त्यानंतर Engagement Reward – ज्यामुळे त्यापद्धतीचा कण्टेण्ट मिळत राहते, मग Content Escalation – अधिकाधिक extremist content कडे ढकलणे, त्यामुळे extremist विचारांचे Normalisation, आणि शेवटी Action Motivation – जिथे व्हायरल कण्टेण्ट प्रेरणा आणि सामाजिक समर्थनाचा पुरावा देते.

युद्धापेक्षा संहारक…

द्वेष-चालित अल्गोरिदम समाजासाठी युद्धापेक्षा धोकादायक आहे कारण युद्ध एकदाच होते, पण अल्गोरिदम दररोज, दर तासाला, दर मिनिटाला लोकांच्या मनामध्ये विषबीज पेरीत राहते. स्पेनमधील संशोधकांनी समाजमाध्यमाचा विदा (डेटा) वापरून स्थलांतरितांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे ६४ टक्के अचूकतेने भाकीत केले. हे दर्शवते की ऑनलाइन वापरापासून ऑफलाइन हिंसाचाराचे स्पष्ट मार्ग आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना व्यापारिक फायदा द्वेषाच्या कण्टेण्टमध्ये दिसतो. इन्स्टाग्राम रील्समध्ये क्रूर हिंसाचार दाखवणाऱ्या व्हिडीओंना अहिंसक कण्टेण्टपेक्षा जवळजवळ तिप्पट व्ह्यूज मिळतात. राजकीय पक्षांनी हे गणित समजून घेतले आहे आणि चुकीच्या मार्गाने लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

रेडिटवरील अदृश्य भांडण या समस्येचे आणखी एक कारण आहे. रेडिटवरील ६४.१ दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांपैकी मोठा भाग महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांच्यातील भाषिक संघर्षात सामील आहे. महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना माहीतच नाही की त्यांच्या नावाने रेडिटवर काय चर्चा सुरू आहे. १/ Maharashtra आणि १/ pune वर दररोज शेकडो टिप्पण्या येतात ज्यात उत्तर भारतीयांविरुद्ध तीव्र टीका केली जाते, तर १/ IndiaSpeak२ आणि १/ india वर मराठी लोकांविरुद्ध उलट टीका केली जाते.

या ऑनलाइन भांडणाची सर्वात धोकादायक बाब म्हणजे ते व्यापक समाजापर्यंत पोहोचत आहे. रेडिटवरून व्हायरल झालेले मुद्दे व्हाट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटरवर पसरतात आणि नंतर वास्तविक जगात हिंसाचारात रूपांतरित होतात.

सामूहिक कृतीचे नवे स्वरूप

पारंपरिक सामूहिक कृतीसाठी नेतृत्व, संघटना, संसाधने आणि स्पष्ट उद्दिष्टे असायची. अरब स्प्रगिंमध्ये ट्विटरचा वापर झाला, पण तिथेही स्पष्ट राजकीय नेतृत्व होते आणि सरकार बदलण्याचे निश्चित उद्दिष्ट होते. आजचे अल्गोरिदम-चालित सामूहिक कृती यापेक्षा वेगळे आहे कारण इथे कोणतेही केंद्रीय नेतृत्व नाही, कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट नाही, फक्त व्हायरल व्हिडीओच्या प्रभावाने लोक कृती करतात. हे New Normal बनत चालले आहे. महाराष्ट्रातील एका राजकीय कार्यकर्त्याने दुकानदारावर हल्ला केला, तो व्हिडीओ व्हायरल झाला, त्याची प्रतिक्रिया म्हणून उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने (जो कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नव्हता) मराठी व्यक्तीवर हल्ला केला. ही साखळी सुरू राहिली तर येत्या काळात प्रत्येक राज्यातील लोक इतर राज्यातील लोकांवर हल्ले करू लागतील. तेही फक्त व्हायरल व्हिडीओच्या प्रभावाने.

संघर्षाचा थोडा इतिहास…

स्थानिक लोक आणि स्थलांतरित यांच्यातील भाषिक संघर्ष ही हजारो वर्षांपासूनची मानवी समस्या आहे. प्राचीन काळातील साम्राज्यांपासून आजच्या आधुनिक राष्ट्रांपर्यंत- जेथे जेथे लोक आपल्या मूळ स्थानापासून दुसरीकडे गेले आहेत, तेथे तेथे भाषा, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा संघर्ष निर्माण झाला आहे.

कॅनडातील क्यूबेक प्रांतात फ्रें च भाषिक बहुसंख्य असूनही ३५टक्के कामगार इंग्रजी भाषेकडे आकर्षित होतात. बेल्जियममधील डच-फ्रें च तणावामुळे देशाच्या विभाजनाची भीती व्यक्त केली जाते. श्रीलंकेतील तमिळ-सिंहली संघर्षामुळे २६ वर्षांचे गृहयुद्ध झाले आणि लाखो लोक मारले गेले.

या सर्व संघर्षांची मूलभूत कारणे तीनच आहेत : आर्थिक स्पर्धा (नोकरी आणि संधींसाठी), सांस्कृतिक संरक्षणाची चिंता (भाषिक बहुसंख्याकांना अल्पसंख्याक होण्याची भीती), आणि राजकीय शोषण (निवडणुकीत भाषेचा वापर हत्यार म्हणून).

या जुन्या समस्येला आज डिजिटल इंधन मिळाले आहे. जे संघर्ष याआधी दशकांत मावळत होते, ते आता दिवसांत भडकतात. जे तणाव फक्त स्थानिक पातळीवर राहत होते, ते आता राष्ट्रीय पातळीवर पसरतात.

करुणा हा एकमेव उपाय…

या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे करुणा आणि सहानुभूती… अहुरा मझदाच्या तत्त्वज्ञानात चांगले विचार, चांगले शब्द, चांगली कृती याचे महत्त्व सांगितले आहे. डिजिटल युगात हे तत्त्व अधिक महत्त्वाचे झाले आहे.

सकारात्मक कण्टेण्टची शक्ती द्वेषयुक्त कण्टेण्टपेक्षा जास्त आहे, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हरियाणा-महाराष्ट्र एकता व्हिडीओने १५ दशलक्ष व्ह्यूज मिळवले, जे दाखवते की करुणेने भरलेले कण्टेण्ट द्वेषयुक्त कण्टेण्टपेक्षा अधिक व्हायरल होऊ शकते.

प्रभावशाली व्यक्तींनी आणि कण्टेण्ट क्रिएटर्सनी पुढाकार घेऊन यासाठी कार्यरत व्हायला हवे. अल्गोरिदम हे मनुष्याने बनवलेले आहे आणि मनुष्याच्या चांगुलपणानेच त्याला बदलले जाऊ शकते. जर पुरेसे लोक सकारात्मक कण्टेण्ट बनवायला सुरुवात करतील, तर अल्गोरिदमलाही त्यांच्या मागोमाग जावे लागेल.

भाषा संरक्षण आणि करुणा या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत. मराठी भाषेचे संरक्षण करताना स्थलांतरितांचा अपमान करण्याची गरज नाही. स्थलांतरितांना मदत करताना स्थानिक भाषेचा तिरस्कार करण्याची गरज नाही. ‘रोमात राहू, रोमसारखे वागू’ हे तत्त्व आदराने आणि प्रेमाने शिकवले जाऊ शकते.

निष्कर्ष म्हणून, महाराष्ट्रातील भाषिक संघर्ष हा केवळ भाषेचा प्रश्न नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवी मूल्यांवर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न आहे. सोशल मीडियाला द्वेष वाढवण्याच्या यंत्रणेतून करुणा वाढवण्याच्या प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. यासाठी व्यक्तिगत पातळीवर संयम, सामाजिक पातळीवर जागरूकता, आणि तांत्रिक पातळीवर जबाबदारी – या तिन्ही गोष्टींचे मिश्रण आवश्यक आहे. भाषा आणि संस्कृती हे मानवी वारसे आहेत, हत्यारे नाहीत. तंत्रज्ञान हे मानवतेची सेवा करण्यासाठी आहे, विभाजन करण्यासाठी नाही. जर आपण सर्वांनी मिळून अहुरा मझदाच्या तत्त्वानुसार चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कृती यांचे पालन केले, तर हे डिजिटल युग मानवतेसाठी वरदान ठरेल, शाप नाही.

(लेखक राजकीय संवाद विश्लेषक आणि माध्यमांचे अभ्यासक आहेत)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chintanthorat@protonmail.com