समीर गुळवणे – samirgulavane@gmail.com

लहान असताना मला जादूगाराच्या टोपीचं खूप अप्रूप वाटायचं. त्याची ती उपडी केलेली, ज्याला हॅट म्हणावी अशी काळी टोपी आणि त्याच्या जोडीला ती जादूची कांडी. ती टोपी अफलातून गोष्ट आहे; जी कशाचं काहीही बनवू शकते असं मला वाटायचं. जादूगार त्या रिकाम्या टोपीतून ससा बाहेर काढायचा. ससा आत ठेवून जादूची कांडी टोपीभोवती गोल फिरवून ‘आबरा का डबरा’ असं म्हणत काहीसं नाटय़पूर्ण वातावरण निर्माण करीत त्यातून कबुतर बाहेर काढायचा. पुढे छंद म्हणून निसर्गअभ्यास करताना घरी लावलेल्या बेल आणि कडीपत्त्याच्या इत्यादी झाडांवर फुलपाखरांचे जीवनचक्र बघायची संधी मिळाली आणि तेव्हा या जादूगाराच्या अदाकारीची आठवण झाली.

फुलपाखरांच्या जीवनचक्रामध्ये अंडी, सुरवंट, कोश व प्रौढ फुलपाखरू अशा अवस्था असतात. विशिष्ट प्रजातीची मादी एका विशिष्ट प्रजातीच्या झाडावरच अंडी घालते. आपल्या पायावर असणारी स्पर्शेन्द्रिये वापरून फुलपाखरे झाड अचूक ओळखतात. म्हणूनच त्यांना उत्तम वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात. उदाहरणार्थ, कॉमन बॅरन हे फुलपाखरू आंब्यावर, लाइम फुलपाखरू लिंबाच्या झाडावर, कॉमन मॉरमॉन- कडीपत्ता, टेल्ड-जे खोटा अशोकवर अंडी घालतात. अंडय़ातून सुरवंट बाहेर येतो व त्याच प्रजातीच्या झाडाची पाने खातो. सुरवंटाला कुरतडण्याचे अवयव असतात. रंगही सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होईल असाच. काही प्राथमिक अवस्थेतील सुरवंट पक्ष्याच्या विष्ठेसारखे दिसतात. अशा रंगसंगतीमुळे त्यांचे भक्षकांपासून संरक्षण होते. केवळ सुमारे दोन टक्के च सुरवंट फुलपाखराच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतात. बाकी मुख्यत: पक्षी, सरडे, बेडूक, कीटक इत्यादींचे भक्ष्य बनतात. अन्नसाखळीचा घटक व परागीभवनात होणारी मदत इत्यादीमुळे फुलपाखरांना निसर्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरांत दुर्दैवाने त्यांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. त्यांचे संवर्धन होणे फार जरुरीचे आहे.

सुरवंट अक्षरश: अधाशासारखे खाद्य-वनस्पतींची पाने खातात आणि त्यांची झपाटय़ाने वाढ होते. पूर्ण वाढ झाल्यावर आपल्या शरीरातून स्रवलेल्या धाग्याचा वापर करून ते स्वत:भोवती कोश बनवतात. कोश प्रजातीनुसार वेगवेगळे असतात. पण त्यांचे रंग बहुतेक वेळा सहसा कोणाला सहज दिसू नयेत असेच असतात. यानंतर कोशात आश्चर्यकारक बदल होतात. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, सुरवंटांच्या शरीराच्या काही भागांचे विघटन द्रव स्वरूपात होऊन पुन्हा नवीन अवयव तयार होतात. हळूहळू उदर, डोके, डोळे, स्पृशा, पाय यांची वाढ होऊ लागते. म्हणजे या कोशिताच्या आत सुरवंटामध्ये संपूर्ण बदल घडून येतो. आत मोहक रंगीत पंखांच्या जोडय़ा, सहा पाय, दोन स्पृशा, संयुक्त डोळे असे अवयव बनतात आणि मुख्य म्हणजे कुरतडण्याचे अवयव जाऊन मधुरस सेवनासाठी शुंडा बनते. साधारण दोन ते तीन आठवडय़ाच्या कालावधीनंतर अनुकूल हवामान असल्यास अचानक कोशिताचा रंग गडद होतो. हाच तो जादुई क्षण! पारदर्शक झालेल्या कोशितामधून फुलपाखराच्या पंखांचे रंग दिसू लागतात. जणू सुरवंट कोशितामध्ये जातो, निसर्ग कोशितावर जादूची कांडी फिरवतो आणि कोशितातून फुलपाखरू बाहेर येते. बाहेर आल्याआल्या त्याचे पंख ओले आणि चुरगळलेले असतात. फुलपाखरू उलटे लटकते व त्याच्या पंखात रक्त भरले जाते. आता हळूहळू पंख पसरले जातात आणि ते पूर्णपणे वाळण्यासाठी त्याला वाट बघावी लागते. हा क्षण धोकादायक असला तरी जमिनीवर, झाडांवर संचार करणाऱ्या सुरवंटाला आता फुलपाखरू बनून आकाशात उड्डाण करून नवीन जीवनाची सुरुवात करून देणारा तो निर्णायक क्षण ठरतो. मधुरस आणि मीलनासाठी जोडीदार यांच्या शोधात फुलपाखरू आकाशात भरारी घेतं. एकमेकांशी अन्नासाठी स्पर्धा होऊ नये याची खबरदारी घेत जणू सुरवंट आणि फुलपाखरू यांनी केलेलं रूपांतर विशेषच मानावं लागेल.

खरं तर सप्टेंबर ते जानेवारी म्हणजे ‘फुलपाखरू ऋतू’च म्हणायला हवा. लॉकडाऊन असला तरी बाहेरच्या हिरव्यागार कॅनव्हासवर फुलपाखरांच्या रंगांची होत असलेली उधळण बघायला विसरू नका. त्याचा मनसोक्त आनंद घ्या.