एका चॅनेलवर माझी मुलाखत चालू असताना पराग छापेकर या मुलाखतकाराने मला आजपर्यंत कधीही कोणीही न विचारलेला प्रश्न विचारला- ‘तुझ्या आयुष्यात ‘M’ या आद्याक्षराला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं तुला नाही का वाटत?’ उत्तर देण्याऐवजी माझाच चेहरा प्रश्नार्थक झालेला बघून त्यानेच मला पुढे प्रॉम्प्ट केलं, ‘तुझ्या आईचं नाव मीरा, बायकोचं मीना, आणि ज्याच्याबरोबर तू भरपूर काम केलं आहेस तो महेश!’ त्याने ‘म’चा असा इंटरेस्टिंग शोध लावलेला बघून मला ‘म’ज्जा वाटली! (नशीब! त्याला माझ्या जीवश्चकंठश्च मित्राचं नाव मकरंद गद्रे आहे हे माहीत नव्हतं. नाहीतर आर्किमिडीजनंतर छापेकरचंच नाव घ्यावं लागलं असतं!) मी विचार करायला लागलो. खरोखरच ‘M’नी सुरूहोणाऱ्या नावांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं आहे. ‘मीरा’ आईने वाढवलं, पढवलं, घडवलं आणि मार्गस्थ केलं. म्युझिकमधला ‘M’ माझ्या आईने मला दिला. मीनाने एकटीने आमच्या दोघांच्या वाटय़ाची संकटं अंगावर घेत माझ्याबरोबर आजवरचा प्रवास केला.. अजूनही करते आहे! ‘आई’, ‘निदान’, ‘वास्तव’, ‘अस्तित्व’, ‘काकस्पर्श’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी ज्याने मला साथीला घेतलं तो- कुठल्याही नात्यांपलीकडचा असलेला माझा मित्र- ज्याच्या नावातच डबल ‘M’ आहे असा- महेश मांजरेकर.
महेशची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट शिवाजी मंदिरला मागच्या बाजूने ग्रीनरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर झाल्याचं मला सुस्पष्ट आठवतं आहे. साल होतं १९९५. तो बहुधा मला शोधतच शिवाजीला आला असावा. कारण जिन्यात भेटताच त्याने मला विचारलं, ‘‘मैंने एक फिल्म किया है. उसका बॅकग्राऊंड म्युझिक करेगा?’’ मी म्हटलं, ‘‘आवडेल मला करायला.’’ ‘‘शाम को जिप्सी पे मिलते हैं..’’ असं म्हणून धारदार नाकाचा, खिशाला गॉगल लटकत असलेला, किरकोळ शरीरयष्टीचा, हिंदीतून बोलणारा महेश निघून गेला. महेश मांजरेकरला मी ‘अफलातून’ या नाटकात आणि टीव्हीवर ‘एक शून्य शून्य’ या मालिकेत बघितला होता. नाटकाच्या निर्मितीतही त्याच्या ‘अश्वमी थिएटर्स’ या संस्थेने बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. त्याकाळी तुफान चाललेलं ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक इंटर-कॉलेजिएट स्पर्धेतून व्यावसायिक रंगभूमीवर ओरिजिनल कास्टमध्ये आणण्याची आयडिया महेशचीच. मोहनकाका वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’बरोबर हातमिळवणी करून त्याने बऱ्याच नाटकांची निर्मिती केली. नाटय़निर्माता म्हणून यशस्वी झाल्यावर महेश शांत बसला नाही. सतत काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपडणाऱ्या या वडाळ्याच्या वळवळ्या तरुणाला चित्रपटसृष्टीने आकर्षित केलं नसतं तरच नवल! एकाही चित्रपटात साहाय्यक म्हणून काम न केलेल्या या उत्साही तरुणानं चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन- दोन्ही करायचं ठरवलं, आणि ‘आई’ बनवला.
शिवाजी पार्कच्या ‘जिप्सी’मध्ये भेटल्यावर मला महेशने ‘आई’ची कथा ऐकवली आणि व्हिडीओ कॅसेट दिली. चित्रपट तयार होता. चित्रपटातली गाणी आनंद मोडक यांनी केली होती. पण ते दुसऱ्या कामांमध्ये अडकले असल्यामुळे पाश्र्वसंगीताची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा निर्णय महेशने घेतला. खरं म्हणजे त्याआधी मी एकच चित्रपट केला होता (सई परांजपेंचा ‘दिशा’). त्यामुळे महेशने माझी निवड केल्याचं मला आश्चर्य वाटलं. अर्थात आनंदही झाला. मी पुण्याला पोहोचताच तत्परतेनं ‘आई’ पाहिला. मला सिनेमा खूपच आवडला. पहिलाच चित्रपट असूनही महेशने अत्यंत कुशलतेने ‘आई’ हाताळला होता. नीना कुळकर्णी, दिलीप कुळकर्णी, शिवाजी साटम यांनी त्यात उत्कृष्ट अभिनय केला होता. निर्मितीमूल्यं उत्तम होती. तांत्रिकदृष्टय़ाही विजय अरोराचं कॅमेरावर्क आणि व्ही. एन. मयेकरांचं एडिटिंग सफाईदार होतं. त्या काळात बनणाऱ्या तद्दन विनोदी चित्रपटांपेक्षा ‘आई’ खूपच उजवा होता. मी तात्काळ महेशला सिनेमा खूप आवडल्याचं पत्र लिहिलं आणि पाश्र्वसंगीताला खूप स्कोप असल्याचं कळवलं.
मराठी सिनेमात पाश्र्वसंगीत नव्याने रेकॉर्ड करायच्या भानगडीत त्याकाळचे बहुतांश निर्माते-दिग्दर्शक पडत नसत. सरळ स्टॉक म्युझिक लावून मोकळे होत. पण चाकोरीबाहेरच्या गोष्टी धाडसानं करणं हे महेशच्या स्वभावातच आहे. (‘होऊ दे खर्च..’ या त्याच्या स्वभावाचा त्याला अनेकदा फायदा झाला आहे, आणि बऱ्याचदा तोटाही!) रुईया कॉलेजच्या नाक्यावर, जिप्सीमध्ये, अश्वमी फिल्म्सच्या छोटय़ाशा ऑफिसमध्ये, त्याच्या चुनाभट्टीच्या घरी आमच्या भेटी होऊ लागल्या. जसजसा मी या अवलिया व्यक्तीला जास्त ओळखत गेलो, तसतसा तो मला आवडू लागला. काम संपलं की प्रत्येकाने आपापल्या घरी जायचं असतं, ही कॉन्सेप्टच नाहीए महेशकडे. (चुकून मित्रांनाही ओव्हरटाइम मिळत असता तर महेशचे मित्र अब्जाधीश झाले असते!) पण या मनस्वी माणसाच्या बाबतीत अमुक आठ तास कामाचे आणि तमुक विश्रांतीचे अशी विभागणीच नसते. काम हीच विश्रांती समजून तो काम करत असल्यामुळे आम्ही कधीही, कुठेही कामाविषयी बोलत असू. ‘आई’विषयी सर्वाधिक चर्चा त्याच्या पिवळ्या रंगाच्या झेनमध्ये झाली असावी. खूप इंटरेस्टिंग काही सुचलं की एखाद्या लहान मुलाला समुद्रकिनाऱ्यावर रंगीबेरंगी शिंपला सापडल्यावर तो ती घटना ज्या उत्साहाने सांगेल, त्याच उत्साहात महेश सुचलेलं सांगायचा. (आजही सांगतो!)
मी महेशला ‘आई’करिता साधारण माझ्या डोक्यात असलेली वाद्यरचना सांगितली आणि म्युझिशियन्सची टीम निवडली. अरेंजर पीयूष कनोजिया, ऱ्हिदमसाठी तौफिक कुरेशी, गिटार्सवर तुषार पार्टे आणि बासरीसाठी रोणू मुजुमदार. त्याकाळी आजच्याइतकी तांत्रिक प्रगती न झाल्यामुळे गाणं असो वा पाश्र्वसंगीत; सगळ्या वादकांनी एकत्र बसूनच रेकॉर्ड करायला लागायचं. बजेटवर बंधन असल्यामुळे दोन दिवसांत ध्वनिमुद्रण संपवायला लागणार होतं. त्यासाठी पूर्वतयारी व्यवस्थित करावी लागणार होती. पेपरवर्क करण्यासाठी आम्ही तौफिकच्या घरात- ‘सिमला हाऊस’मध्ये जमत असू. सर्व तयारी करून आम्ही फिल्मसिटीतल्या रेकॉर्डिग स्टुडिओत पोहोचलो. महेश रेकॉर्डिगला हजर होताच. माझ्या आधीच लक्षात आलं होतं, की या माणसाला संगीताचाही कान आहे. माझ्या दृष्टीने बरंच होतं. संगीताचे कान शाबूत असलेला दिग्दर्शक असेल तर त्याच्याशी सांगीतिक संवाद साधता येतो. (अर्थात अति शाबूत असलेल्यांचा त्रासही होऊ शकतो!) माझ्या चारही वादकांनी कमाल केली. चोख प्लॅनिंग असल्यामुळे ‘आई’चं पाश्र्वसंगीत ठरलेल्या वेळेत पूर्ण झालं. फायनल मिक्सिंगलाही मी होतो. आपलं काम करून बाजूला होणे हा माझा स्वभाव नाही. आणि महेशलाही अशीच माणसं आवडतात- जी कधीही, कुठलंही काम करू शकतात. गाडी चालवण्यापासून कोरस गाण्यापर्यंत सगळं यायला लागतं त्याच्या आजूबाजूच्या लोकांना! ‘आई’ तयार झाला! ‘आई’ची पहिली प्रिंट येण्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच लागून राहिली होती. आत्तापर्यंत मीदेखील अश्वमी फिल्म्सचाच एक घटक बनलो होतो.
चित्रपट पहिला असो वा दहावा; पहिली प्रिंट ही पहिल्या अपत्याइतकीच महत्त्वाची असते. प्रसूतीची वाट बघत असलेल्या बापासारखे आम्ही सगळे चुनाभट्टीला मुक्काम ठोकून होतो. सकाळी सकाळी प्रिंट आल्यावर आम्ही पिवळी झेन काढून प्रिंटची अवजड रिळं घेऊन एकवीरेच्या दर्शनाला गेलो. ‘आई’चा हीरो सुनील बर्वे चालकाच्या भूमिकेत होता! एकवीरेचं दर्शन घेऊन आम्ही पुण्याचं प्रभात थिएटर गाठलं. कारण सिनेमाच्या प्रदर्शनाचंही मार्गी लावायला हवं होतं. निर्माता म्हणून चित्रपट वितरणाचीही जबाबदारी महेशवरच होती. आणि घातलेले पैसे परत येतील की नाही याचं टेन्शन होतंच. प्रभातचे शरद पै ‘आई’ बघून खूश झाले. त्यांनी प्रभातला चित्रपट लावायचं आनंदाने मान्य केलं. १५ डिसेंबर १९९५ ला ‘आई’ प्रदर्शित झाला. महेशचा हा पहिलाच चित्रपट चालला. नुसता चालला नाही, प्रभातला ५० आठवडे धावला! (इंग्रजीत ‘द मूव्ही रॅन’ म्हणतात ना, तसा!) महेश आणि सादिक चितळीकरच्या अथक परिश्रमांनी उर्वरित महाराष्ट्रात ‘आई’ने संयुक्त १०० आठवडय़ांचा टप्पा पार केला. अनेक पुरस्कारही मिळाले.
घातलेले पैसे नुसतेच परत आले नाहीत, बरोबर आणखी साथीदार घेऊन आले! या घवघवीत यशामुळे आम्ही सगळेच हरखून गेलो. पण महेशच्या डोक्यात कधीच वेगळी चक्रं फिरायला लागली होती. प्रभातला ‘आई’ लावायचं ठरवून आम्ही मुंबईला परतत असतानाच त्यानी बव्र्याला आणि मला त्याच्या डोक्यात असलेल्या नवीन हिंदी सिनेमाची स्टोरी ऐकवली- ‘निदान’ची..
rahul@rahulranade.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मैफिलीत माझ्या.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My friend mahesh manjrekar
First published on: 27-03-2016 at 01:01 IST