मलेशियाने पर्यटनाभिमुख व्यवस्था कशी असावी, याचा एक आदर्शच घालून दिला आहे. कलर्स ऑफ मलेशिया, मलेशिया शॉपिंग फेस्टिवल, शू फेस्टिवल अशी अनेक निमित्ते साधून जगभरातल्या पर्यटकांना मलेशियाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत.  
‘मलेशिया- ट्रली एशिया’ असे घोषवाक्य मिरवणाऱ्या या देशाने पर्यटनाला प्रोत्साहन देत त्याला अर्थव्यवस्थेचा कणा बनविण्याची किमया साधली आहे. ‘वन मलेशिया’ असे म्हणत देशाच्या एकतेचा गौरव करत आपली संस्कृती जपली आहे. मात्र, ‘जुनं ते सगळंच सोनं’ असा अट्टहास न धरता नव्याचे स्वागतही केले आहे.
मलेशिया म्हटले की पेट्रोनस ट्विन टॉवर्स हे पक्के समीकरण आहे. हे टॉवर्स राजधानीच्या सौंदर्यात भर घालतातच, शिवाय त्यांनी मलेशियाची कीर्तीही सर्वदूर पोहोचवली आहे. त्यामुळे मलेशियनांच्या लेखी हे टॉवर्स त्यांच्या देशाची आन-बान-शान आहेत. हे सयामी जुळे टॉवर्स म्हणजे कल्पकतेचा उत्तुंग नमुना आहे. स्टील आणि काच यांचा मुख्यत: वापर करून ते उभारण्यात आले आहेत. ४५२ मीटर उंचीचे हे टॉवर्स असून, ४१-४२ व्या मजल्यांदरम्यान या दोन वास्तूंना जोडणारा एक स्काय ब्रिजही आहे. तिथून होणारे क्वालालंपूरचे दर्शन केवळ अविश्वसनीय! तिथून जणू खेळण्यातल्या गाडय़ा रस्त्यावर धावताना दिसतात. झुडपांएवढी झाडं. मधेच काही बुटक्या इमारती. टॉवर्सच्या मागील बाजूचा स्वििमग पूल तर इटुकला पिटुकला, पण रेखीव दिसत होता. तितक्यात पुढे जाण्याची सूचना मिळाली आणि आम्ही पोचलो ट्विन टॉवर्सच्या थेट ८६ व्या मजल्यावर. तेथे खास पर्यटकांसाठी टेहळणी कक्ष आहे. क्षणभर आपण ढगात आहोत की काय असे वाटले. अवघे क्वालालंपूर आपल्या कवेत वसल्याचा फील इथे येतो. फक्त अर्धा तासच इथे थांबता येतं. परतताना प्रती सेकंद सात मीटर इतक्या वेगाने लिफ्ट खाली येते आणि अवघ्या काही मिनिटांत आपण जमिनीवर येतो. खालच्या काही मजल्यांवर आलिशान शॉिपग कॉम्प्लेक्स आहेत. दोन्ही टॉवर्स इतके सारखे वाटतात, की ते वेगवेगळ्या कंपन्यांनी  बांधले आहेत यावर विश्वास ठेवणे कठीणच.
.. नुकताच अंधार पडू लागला होता आणि आम्ही निघालो होतो हायवेनजीक नव्याने वसवण्यात आलेल्या दिव्यांच्या आणि रंगांच्या दुनियेत! सेलँगोर भागातील आय-सिटीच्या सफारीवर. प्रकाशाच्या सान्निध्यात घालवलेली ती संध्याकाळ एकदम अविस्मरणीय ठरली. आय-सिटीमध्ये तब्बल ७२ एकरांच्या परिसरात आपण दिवाळीला लावतो तशा दिव्यांच्या माळा लावलेली झाडे दुरून दिसत होती. प्रवेशद्वाराजवळ सूर्यफुलांची डुलणारी बाग, पाठोपाठ विविध प्राणी-पक्षी आणि चेरी, पाम ट्री अशा वेगवेगळ्या झाडांच्या हुबेहुब प्रतिकृती.. त्याही लाइट्सने सजवलेल्या. तब्बल एक दशलक्षहून अधिक एलईडी दिव्यांचा वापर करून साकारलेली ही प्रकाशनगरी भूमिगत वीजपुरवठय़ाने साकारण्यात आली आहे.
इथे मेपल ट्री, पाइन ट्रीची झाडे स्वागताला आहेत. कुठे हिरव्या, तर कुठे गुलाबी पानांची झाडे. चेरीच्या हिरव्या झाडाला लगडलेल्या लालचुटूक चेरी अन् जांभळ्या फुलांनी डवरलेले झाड यामुळे हा रंगीबेरंगी माहोल अधिकच खुलतो. मज्जा करायला बच्चेकंपनीसाठी आणि मोठय़ांसाठीही आकाशपाळणे, टॉय ट्रेन आहेत. रंगांच्या आणि प्रकाशाच्या या जादुई दुनियेतली ही सफर एक अनोखा अनुभव देऊन जाते. रस्त्याच्या मधोमध तुम्ही चालत असता दुतर्फा प्रकाशाची झाडे डोलत असतात. आपण भारावून गेल्यासारखे पाहत असतो आणि तितक्यात लक्षात येते- अरे, आपणही रंगीत प्रकाशाचे किरण ल्यायलो आहोत. आय-सिटीतल्याच एखाद्या झाडासारखे चमकत आहोत.
आय-सिटीमध्येच ‘रेड कार्पेट’ हे व्ॉक्स म्युझियम उभारण्यात आले आहे. जगप्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, हॉलीवूडमधील दिग्गज कलावंत तसेच जागतिक विक्रमवीर अवलिये यांचे मेणाने साकारलेले पुतळे येथे आहेत. अगदी जिवंत वाटाव्यात अशा या प्रतिकृती आहेत. मेरिलीन मन्रो, नेल्सन मंडेला, जॉर्ज डब्ल्यू. बुश, ब्रुस ली ते अगदी ब्रॅड पीट, मारिया शारापोव्हा असे विविध क्षेत्रांतले नामवंत इथे पुतळारूपी आहेत. व्ॉक्स म्युझियमच्या शेजारीच स्नो-वॉक आहे. पाच अंश सेल्सियसपेक्षाही कमी तापमान येथे असून आतमध्ये इग्लू, बर्फाची घरे, घसरगुंडय़ा, मिनी बॉबस्लेड आणि बर्फाची शिल्पे आहेत. अर्थात आय-सिटीत असल्याने बर्फाच्या या दुनियेतही लाइट्सचा खुबीने वापर करण्यात आलाय. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या स्लाइड्समधून जेव्हा आपण खाली घरंगळतो तेव्हा हुडहुडी भरवणारी थंडी वाजून तोंडातून आवाजही फुटत नाही.  
त्यानंतर आम्ही निघालो बटु केव्हज् या गोंबाक जिल्ह्य़ातल्या प्राचीन गुहा पाहायला. १८६० च्या दशकात चिनी लोकांना या भागात चुनखडीचा खडक असलेल्या काही गुहा सापडल्या. पण असे म्हणतात की, एका भारतीय व्यापाऱ्याने मुरुगन तथा कार्तिकेय स्वामीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या मंदिरात केली व तेव्हापासून हे धार्मिक ठिकाण बनले. गुहा उंचावर असल्याने १९२० च्या आसपास तेथे २७२ लाकडी पायऱ्या उभारल्या गेल्या. २००६ मध्ये १४० फूट उंचीची मुरुगन स्वामीची महाकाय सोनेरी मूर्ती येथे उभारण्यात आली आणि पर्यटकांच्या नकाशावर बटु केव्हज् ठळकपणे आल्या. ही मूर्ती इतकी भव्य आहे, की आ वासून आपण त्याकडे पाहतच राहतो. वर गुहेत गेल्यावर चक्क तमीळ भाषेतील आरत्या व संस्कृत मंत्र कानावर पडतात. अनेक मलेशियन तमीळ हिंदूंची येथे मनोभावे पूजाअर्चा सुरू असते. या महाकाय गुहेतील वातावरण त्यामुळे प्रसन्न वाटते. चुनखडकाचे खाली लोंबणारे ओघळ एखाद्या शिल्पासारखे भासतात. गुहेत ते ठिकठिकाणी दिसतात. मलेशियात भारतीय वातावरण अनुभवल्याचे अनोखे समाधान घेऊन आपण परततो.
मलेशियात पर्यटकांसाठी पर्वणी ठरावीत अशी बरीच ठिकाणे आहेत. पण लंकावी बेट या सगळ्यावर कडी करणारे आहे. लहान-मोठय़ा १०४ बेटांचा समूह असणारे हे ठिकाण मलाक्काच्या सामुद्रधुनीमुळे मलेशियाच्या भूमीपासून अलग झाले आहे. आम्ही क्वालालंपूरहून विमानाने लंकावीकडे निघालो तेव्हा वातावरण थोडेसे ढगाळ होते. मात्र, काही अंतर गेल्यावर आकाश निरभ्र झाले. लंकावी जवळ येऊ लागले तशी छोटी छोटी हिरवीगार, विविध आकारांची बेटे ढगांआडून लपाछपीचा खेळ करत पुढे जाऊ लागली. ‘पळती बेटे’ पाहण्याचा हा सिलसिला बराच वेळ चालला आणि आम्ही दाखल झालो लंकावीच्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या ‘केदाह’ प्रांताच्या रत्नजडित साम्राज्यात. लंकावी ‘डय़ुटी-फ्री आयलंड’ घोषित करण्यात आल्यामुळे येथे पर्यटकांना खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येतो.
लंकावीचा अर्थ होतो लालसर-तपकिरी रंगाच्या गरुडाची भूमी! लंकावीचा दोन-तृतीयांश भाग घनदाट अरण्ये, हिरवाईने आच्छादलेली पर्वतराजी, टेकडय़ा आणि वनस्पतींनी व्यापलेला आहे. त्यामुळे सदासर्वकाळ येथील वातावरण आल्हाददायक असते. सुरुवातीला आम्ही भेट दिली लंकावीचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘ईगल स्क्वेअर’ला! भलामोठा गरूड आपले पंख पसरून आकाशात झेपावण्याच्या स्थितीतले मानवनिर्मित शिल्प येथे साकारण्यात आले आहे. १२ मीटर उंच असणारा हा गरूड लंकावीची राजमुद्रा म्हणून दिमाखात उभा आहे. लंकावीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. १७६० सालच्या आसपास सुलतान अब्दुल्ला मुकारम शाह (दुसरा) याच्या कारकीर्दीत मसुरी नावाची एक सुंदर, रूपवान स्त्री होती. तिच्यावर व्यभिचाराचा आरोप करण्यात आला व तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. तिने वारंवार सांगूनही कुणीच तिच्या पावित्र्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, ती मेली तेव्हा तिला झालेल्या जखमांमधून पांढऱ्या रक्ताची लकेर दिसली- जी तिचा निरपराधपणा सिद्ध करत होती. कुणी म्हणे, अचानक तिच्याभोवती पांढऱ्या धुक्याचा पडदा तयार झाला- ज्याने ती निष्कलंक असल्याचे सिद्ध झाले. मात्र, पुढील सात पिढय़ांपर्यंत लंकावीची भरभराट होणार नाही, असा शाप तिने दिला. त्यानंतर काही दिवसांतच लंकावी उद्ध्वस्त झाली. भातशेते पेटवून देण्यात आली. बरीच वर्षे लंकावी ओसाड माळरान राहिले. खरे-खोटे माहीत नाही, पण आता शाप दिल्यानंतरच्या सात पिढय़ा होऊन गेल्यात म्हणे. म्हणून लंकावीची भरभराट होतेय.
लंकावीवर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. मँग्रोव्ह टूर त्याची साक्ष होती. चक्क तिवरांच्या जंगलातून आम्ही बोटीने किलिम नॅचरल पार्कची सफर केली. बोटीत आम्ही मोजकेच होतो. तिवरांची पोपटीसर झाडे आजूबाजूला आणि पलीकडे छोटय़ा-मोठय़ा आकाराच्या टेकडय़ा. त्यांच्यावरही हिरव्या रंगाची झूल चढलेली. मधेच दगडी पृष्ठभाग डोकावत असल्यामुळे कळले, की ही छोटी छोटी बेटेच आहेत. दुतर्फा अशी हिरवाई, पुढे दोन बेटांमधून झेपावणारा रस्ता आणि क्षितिजापर्यंत पसरलेले पाणी. हिरव्या झाडांची सावली पडून पाणीही हिरवे भासत होते. या हिरव्या रंगाने एक सुंदर माहोल तयार झाला होता. आधी गाणी गुणगुणत थट्टामस्करी करणारे आम्ही नंतर नंतर शांत, आत्ममग्न झालो होतो. ते उत्कट, गहिरे क्षण अनुभवत होतो. मध्येच आमच्या गाईडने एक बुटाच्या आकारासारखे बेट दाखवत म्हटले, ‘ते पाहा. त्याला म्हणतात- शू आयलंड..’ तेव्हा कुठे आमची तंद्री भंग पावली.   
त्यानंतर लंकावीला क्रुझवर घालवलेली ती संध्याकाळ संपूर्ण सहलीला चार चाँद लावणारी होती. दुपारीच आम्हाला नदीतून खोल पाण्यात नेले गेले आणि जेथे नदी सागराला मिळते त्याच्या थोडे आधी आम्ही क्रूझच्या मागील बाजूला बांधलेल्या जाळीतून समुद्रात उतरतो. पोहायला नाही, तर पाण्यात पहुडायला! जाळीला धरून आकाशाकडे तोंड करून लाटांच्या आवेगावर आम्ही झुलत होतो. हा जॅक्युजी प्रकार अनेकजण पहिल्यांदाच अनुभवत होते. पाठीला फुकटात मसाज करून घेण्याचा हा लोकप्रिय प्रकार असल्याचे आमचा इन्स्ट्रक्टर सांगत होता. पण खरी मजा पुढे होती. जेथे नदी समुद्राच्या पाण्याला मिळते तेथे पाण्यातून विद्युतप्रवाहासारखे झटके लागतात. तितके तीव्र नाही; पण जाणवतात, हे नक्की. कारण पाण्याचे तापमान अचानक बदलते. असा पहिला झटका लागला तेव्हा माझ्या बाजूला होती एक दक्षिण कोरियाची बाई. मी इतक्या जोरात ओरडले आणि घाबरल्यामुळे तिचा हात धरला. तीही ‘नो वरी.. नो वरी.. यू विल बी ऑल राइट..’ असे काहीसे मला सांगत होती. माझ्यासारखाच इतर अनेकांनाही झटका बसला. सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती तशी क्रूझही परतीच्या प्रवासासाठी सज्ज झाली.
क्रूझच्या वरच्या मजल्यावर स्पॅनिश, आफ्रिकन भाषा बोलणारे लोक कुठल्याशा गाण्यांवर नृत्याचा आनंद घेत होते. सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. संध्याकाळ इतकी रमणीय असू शकते..? मुंबईच्या रोजच्या धावपळीत तर इतक्या शांतपणे ही कातरवेळ अनुभवताच येत नाही. नारिंगी रंग आकाशात पसरला होता. मनातल्या विचारांची जागा आता काही आठवणींनी घेतली. सूर्याचे पाण्यावर पडणारे लांबुडके प्रतिबिंब हळूहळू मंद मंद होत फिक्या जांभळ्या आकाशातून खाली सरकत गेले. दुपारी आग ओकणारा सूर्य अस्ताला जातेवेळी इतका शांत होतो.. मोहक रंगांची उधळण करत आपला निरोप घेतो.. सारेच अजब! पश्चिमेचे आभाळ अजूनही एखाद्या चित्रकर्मीच्या कॅन्व्हाससारखे आकर्षक भासत होते. आतून खूप शांत वाटत होते. मायदेशापासून दूर एकटीने अनुभवलेली ती संध्याकाळ कायम स्मरणात राहील, हे नक्की. क्रूझवर काही तासांकरता एकत्र जमलेले अनेक देशांचे, अनेक भाषा बोलणारे आम्ही सगळे तो सूर्यास्त पाहून भावुक झालो होतो. निरोप घेताना एकमेकांना हस्तांदोलन करून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होतो. ‘शब्दांच्या पलीकडले..’ असे काहीतरी अनुभवल्याचा आनंद मनात साठवत होतो.
अशा अनेक आठवणी सोबत घेऊन मलेशियाची सहल साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. या इवल्याशा देशाने पर्यटनाभिमुख व्यवस्था कशी असावी याचा एक आदर्शच घालून दिलेला आहे.
शेवटच्या दिवशी लंकावीहून निघालो. दिवस फार पटकन् गेले असे वाटत होते. मलेशियन एअरलाइन्सच्या आरामदायी लाऊंजवर आराम करून आम्ही भारतात येणाऱ्या विमानात बसलो. शांत.. निवांत वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर आता वेध लागले होते मुंबईच्या धावपळीचे.. घाईगर्दीचे.