मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात  असलेल्या या समाजास ‘मांगेला समाज’ असे नामाभिधान असून, या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते. मांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुश: आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे मूलत: असावेत.  सप्तगोदावरी प्रदेशात ते मूळात मच्छिमारीचा धंदा करीत असावेत आणि पश्चिम किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा कोकण किनाऱ्यावरही सुरू केला असावा.
भादव्या मयन्या पुनवेला रे रामा
नारळी पुनीवे सणाला।।
धनी माहो गेलेन बारान डोलीला
अवचित हुटले वादळवारो रे रामा
हुटले वादळवारो ।।
धनी माहा कहे येतीन गराला
रे रामा, कहे येतीन गराला ।।
धन्या जीवावर संसार दखलो रे
रामा जीवावर संसार दखलो
होन्याहो नारळ वाहिन दरीयाला ।।
धन्या तारू येऊन दे बंदराला
रे रामा, तारू येऊन दे बंदराला ।।
मांगेला समाजाचे हे नारळी पौर्णिमागीत! मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते. दर्याकिनारी राहणाऱ्या कोळी समाजाची उपजात  असलेल्या या समाजास ‘मांगेला समाज’ असे नामाभिधान असून, या समाजाची बोलीभाषा मांगेली ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते.
कुठल्याही बोलीभाषेची जडणघडण निसर्गावर अवलंबून असते. समुद्रकिनाऱ्यालगत राहणारे हे लोक मांगेली अगदी सहज, मोकळ्याढाकळ्या पद्धतीने बोलतात.
या समाजाचा इतिहास पाहता वि. का. राजवाडे यांच्या ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला ‘मांगेला’ हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे. नाशिक येथील एक तीर्थोपाध्ये अन्नाजी चंद्रात्रे यांच्या वहीवरून असे दिसून येते की, ही जात आपला संबंध निर्देश ‘मांगेले-तांडेल’ असा दुहेरी करते. नुसता ‘मांगेले’ किंवा नुसता ‘तांडेले’ असा एकेरी करत नाही. तांडा म्हणजे नावांचा (होडी) किंवा नावेतील खलाश्यांचा समूह! तांडय़ाचा जो पुढारी तो ‘तांडेल.’ ‘तांडेल-तांडेला’ हा व्यवसायवाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ) + इर: (प्रेरक, चालवणारा) = तंडेकर (तांडय़ाचा चालक). तंडेकर = तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी) ‘मांगेल’ हा शब्द ‘मांग + इल’ अशा दोन शब्दांचा समास आहे. पैकी ‘मांग’ हा शब्द ‘मातंग’ या शब्दाचा अपभ्रंश समजणे येथे युक्त नाही. ‘मांगेला’ या संयुक्त शब्दातील ‘मांग’ या शब्दाचे मूळ अन्यत्र शोधले पाहिजे. मूळ शोधण्यास ज्याअर्थी प्रयास पडतात, त्याअर्थी मांगेल लोक कोकणात फार प्राचीन काळी आलेले आहेत असे मानावे लागते. नाशिक येथील चंद्रात्रे यांच्याजवळील तिसऱ्या नंबरच्या वहीच्या ५२-५३ पानांवर मांगेल्याचे जे लेख आहेत, त्यातील नोंद ५ वी येणेप्रमाणे..
‘कृष्ण पी. माधव आ. बिलु पं. जानू भा. रामचंद्र चे बाबू सा. चु. झांबुचे शिनिवार सा. लथुमाव जानूचे भीमी माता- बुधीबाई. शिनिवार ची मा. तीरमखी-शिनिवारची स्त्री गंगाबाई सा. शिनिवारची बहीण दोवारकाबाई सा जात मांगेले- तांडेले आ. पाकघरी गा. घीवली, ता. माहीम.’
मांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुश: आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे लोक मूलत: असावेत. आंध्रादी देशात असताना तेथे वसाहत करून राहिलेल्या, वैदिक भाषा बोलणाऱ्या आर्याचा पगडा त्यांजवर बसून वैदिक व्यक्तिनामे उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंतर आंध्र प्रदेशातून ते कोकणच्या पश्चिम किनाऱ्यावर आले. सप्तगोदावरी प्रदेशात ते मुळात मच्छिमारीचा धंदा करत असावेत आणि पश्चिम किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा कोकण किनाऱ्यावर चालू केला असावा. इ. स.पूर्व नऊशेपासून इ. सनोत्तर चारशेपर्यंत- म्हणजे पाणिनीय व बौद्धकालाच्या ऱ्हासापर्यंतच्या काळात मांगेले कोकणात शिरले.
गुजरातच्या सुरवाडा, बलसाड समुद्रकिनाऱ्यावरील गावांपासून मुंबईकिनारी वसलेल्या कुलाब्याच्या दांडीपर्यंत व गोवा, दमण, दीव या प्रदेशातील समुद्रकिनारी वसलेल्या १०० हून अधिक गावांत मांगेला समाजाचे अस्तित्व आजही टिकून आहे. या साधारण पाच-सहा लाखाच्या किनारी लोकवस्तीत ही बोली बोलली जाते.
मांगेली या समाजाच्या बाया व पुरुषांच्या नादमयी गाण्यांमधून अनुभवायला मिळते. त्यातली ललकारी, हेल, ताल, लय व सुरांचे उच्चार वैशिष्टय़पूर्ण आहेत. लग्नातील गाणी, होळीची गाणी, देवदेवतांची गाणी, नारळीपौर्णिमा, गणेशोत्सव तसेच इतर सणांच्या गाण्यांमधून मांगेलीचा हा अनमोल ठेवा जतन केलेला दिसून येतो.
एक गीत वानगीदाखल-
‘आषाढ गेलो, भादवो आयलो,
तारवं डेवरू या..
दरयामनी जाऊन
मावरं मारू या’
लग्नगीत –
‘उंदूस फुंदूस रडता क्याला पोयरे
तुला दिले मांगेल्या गरा..
तांब्याही तार ठेसनामनी..
पोयरे तू रडू नाका गो मनामनी ।।
     अहरो मिळले तुला बापा हरको
     तुला वागवीन गो पोयरी हरकी
तांब्याही तार ठेसनामनी..
पोयरे तू रडू नाका गो मनामनी ।।
     आहू मिळले तुला आयश्या हरकी
     तुला वागवीन गो पोयरी हरकी ।।
     नवरो मिळले तुला मना हरको
     तुला वागवीन गो नवरी हरकी ।।
तांब्याही तार ठेसनामनी..
‘पोयरे तू रडू नाका हो मनामनी ।।’
होळीगीत-
‘झूंज झूंज पाखुर ग, जाय मा मायेरा
अवढो निरोप ग, हांग मा आयला,
हण आयले गो, आयले होळी यो,
वाट बगिता ग, पाठी बाहांही
कवा येन वारना, जान मा मायेरा ।।’
मांगेलीत इ-ई ऐवजी ‘य’ वापरला जातो. उदा. आई- आय, बाई- बाय, सई- सय.
‘इ’कारान्त व्यंजन ऱ्हस्व किंवा दीर्घ असा फरक नसतो. बहुतेक ‘इ’कारान्त उच्चार दीर्घ वाटतात. उदा. गोरी, कोळी.
मराठीतील बहुतेक व्यंजने जशीच्या तशी वापरली जातात. परंतु ती जोर देऊन दीर्घ उच्चाराची व्यंजने आहेत. ती त्या अक्षरांच्या (व्यंजन) जवळ येणाऱ्या ऱ्हस्व उच्चाराने बोलीत येतात. मात्र, लिहिताना ती मूळ मराठी रूपातच लिहिण्याचा आग्रह असतो.
उदा. घ- ग, घर = गर, घागर = गागर
च-स, चणे = सणे, चांद = सांद
ढ-ड, ढग = डग, ढमढम = डमडम
भ-ब, भाडे = बाडा, भजन = बजन
स-ह, सगेसोयरे = हगेहोयरा, सांगीतले = हांगतिला.
क्ष- अ क श, लक्ष्मण = लक्ष्शुमन
ज्ञ- न्य, ज्ञानेश्वर = न्यानेश्वर.
मांगेली बोलीत बहुतेक जोडाक्षरे अक्षराची फोड करून उच्चार करण्याची पद्धत दिसून येते.
उदा. प्र- पर, प्रभाकर = परभाकर, प्रवास = परवास, वगैरे
भ्र- भर, भ्रतार = भरतार = बरतार
ब्र- बर, ब्राह्मण = बरामन = बामन
काही अपभ्रंशीत शब्द-
कपाट-कबेट, घडय़ाळ- घडेल, स्टेशन- टेशन, स्टोव्ह- इस्टो, आगगाडी- आगीनगाडी, मंगळसूत्र-गातन, पुस्तक-बुक.
मांगेलीतील काही प्रातिनिधिक शब्द-
 माणूस- मानूस, पातेले- टोप, विळी-मोरली, जाळे- जार, गलबत- तारू, डोलकाठी-कलंबी, निशान- बावटा, तांदूळ- सावूर.
मांगेली बोलीभाषेत ‘हेल’ आढळतात.
केवढा- कवरा, कुठून- कटनी, एवढा-अवरा, चला- सला, चिंच- शिस, भात- धान, मासळी- मावरा, आहे- हाय, होता- ओतो, शिकतात- हिकतान.
नातेसंबंध : आई- आय, आया; वडील- बाप, बापू, आजी- डोकराय, आजोबा- डोकरापू, मुलगा-पोर, मुलगी- पोयरी, भाऊ- बाह, दादो,  बहीण- बाय, भावाची बायको- ओबी, बायकोची बहीण-हारी.
काळवेळ : सकाळ- हकळशापारा, दुपार-दुपारशापारा, संध्याकाळ- हांश्यापारा, रात्र- रातशापारा, राशी; उद्या- उद्याला, परवा- परवानदी, आठवडा-आठोडा, महिना- मयनो, वर्ष- वरीस, खूप वर्षे- गन्या वरशान.
मांगेली बोलीतील म्हणी आणि वाक्प्रचारही वैशिष्टय़पूर्ण आहेत..
१) ‘पोयरी देन, पण पाल्या
माथो नय देव्या हो’
(त्या गावात पाला मासा हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे. त्यामुळे लग्नात मुलगी दिली जाईल. पण पाला मासा सापडणाऱ्या किनाऱ्यावर वहिवाट दिली जाणार नाही.)
२) ‘दऱ्या मनी मासो
ना घरा भरोसो’
(माणूस आशेवर जगतो. त्यात मासेमार मासेमारीला जाताना कारभारणीला आशा लावतो की मी दर्यावर जाऊन भरपूर मासे आणीन.)
३) ‘दादा पुता भरलेलो गाव,
ना पाणी पियाला कया जाव’
(मुलाबाळांनी भरलेला गाव आहे, परंतु गावात पाण्याची टंचाई आहे.)
वाक्प्रचार-
१) काम करून काटो ढिलो झालो
(जास्त काम करून थकवा आला.)
२) यो तो मेलो आखोदी सरतास
(हा तर नेहमी दिवसभर खातच असतो.)
३) नुसतो आयत्यावर कोयतो मारू नका
(काम न करता श्रेय घेऊ नकोस.)
मांगेलीतला एक सहज संवाद-
मर्दे मास्तर- गो पारू बाय, कया सालली गा? हकाळपासून बगीता, ता नुसती धडपड सालले?
पारू- मास्तर, तारापूरश्या बाजाराला सालली बापा.
मर्दे मास्तर- अगो, अवढी धडपड करून हकळशा पारा बाजाराला सालली खरी, पण मावरा हाय का?
पारू- मास्तर, मावरा मारव्याहो यो आपलो वाडवडलापासून धंदो, तवा मावरा मिळे नय हये हांगून कसे सालेन बापा! यावर काय तरी उपाय करा!
मर्दे मास्तर- खरा हाय तू म्हणणा. यावर विसरविनिमय सुरू हाय. तवा तू जाय तारापूरश्या बाजाराला; मी जाता आकाशवाणीवरसो मांगेली भाषा कार्यक्रम ऐक्याला.
मांगेला समाजातील अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. आजही कोकणकिनाऱ्यापासून गुजरात, गोवा, दीव, दमणच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या मांगेला समाजात मांगेली ही मायबोली बोलली जाते. लोकबोलीच्या अर्थपूर्णतेने भरलेल्या मांगेली बोलीतून लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडते..
‘हये हाय आमशी, मांगेली बोली भाषा
आमीन बोलतांन कुलाबा दांडीवरशन
पण ऐक्याला जाता गोव्या किनाऱ्यावरती
आमीन बोलतांन गावात- घरात मांगेली
मांगेली भाषा हाय आमशी आय
ती देता आमाना मायेही साय ।।’   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangeli boli
First published on: 07-07-2013 at 12:09 IST