व्यक्त होणं ही एक महत्त्वाची मानवी प्रक्रिया आहे; आणि गरजही! हे ‘व्यक्त होणं’- इतरांपुढेच नव्हे, तर स्वत:पुढेही! या व्यक्त होण्याचाच एक भाग म्हणजे संवाद.. इतरांशी व स्वत:शीही! कळत-नकळत घडणारा, अविरत, सकारात्मक-नकारात्मक स्वरूपाचा, विचार, भावना, कृती, परिस्थिती तसंच व्यक्तिमत्त्व पैलूंतून निर्माण होणारा. आणि या सर्व बाबींवर प्रभाव टाकणारा. आपणा सर्वाच्या सवयीचा, हक्काचा साथीदार असा हा ‘आत्मसंवाद’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटची कॉमेंटरी जशी मैदानावर घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेत राहते, निरीक्षणं मांडत राहते; तशीच काहीशी कॉमेंटरी म्हणजे आपला आत्मसंवाद! हा संवाद फक्त त्या व्यक्तीलाच सुस्पष्ट ऐकू येतो आणि तिच्या मानसिकतेवर प्रभाव टाकतो. आत्मसंवाद म्हणजे स्वत:शी केलेली बातचीत, चर्चा, कधी शब्दांचा ऊहापोह, तर कधी मुद्देसूद मांडणी. एखादी कृती करत असतानाच त्याबद्दल आपले मत मांडणारा, निर्णयात्मक भूमिका घेऊ पाहणारा असा हा आत्मसंवाद! आत्मसंवाद स्वउत्तेजनार्थ असेल तर तो आत्मोन्नती घडवणारा, उत्पादनक्षमता वाढवणारा ठरू शकतो. परंतु तो जर टीकात्मक व कठोर स्वरातला असेल तर आपल्या भावनांची लय बिघडवून टाकतो. आपण स्वत:ला ‘काय’ सांगतो, याचा परिणाम आपली भावस्थिती, विचारचक्र आणि कृतीवरच नव्हे, तर शारीरिक स्वास्थ्यावरही होताना दिसतो. बऱ्याचदा तो इतका सूक्ष्म असतो, की त्याची जाणीवही आपल्याला होत नाही. सुप्त स्वरूपात का होईना, तो सुरू राहतो. हा आत्मसंवाद प्रकारचा असतो. सकारात्मक, वस्तुनिष्ठ आणि नकारात्मक. हल्ली ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’, ‘पॉझिटिव्ह सेल्फ टॉक’ या संकल्पनांचा सुळसुळाट आढळतो. जो-तो गर्तेत सापडलेल्याला हा सल्ला देताना दिसतो. सकारात्मकता स्वागतार्ह आहे यात शंका नाही; परंतु तेवढीच पुरेशी आहे का, याचा विचार होणे गरजेचे आहे. सकारात्मकतेसोबत वस्तुस्थितीनिष्ठ विचार- आचारही गरजेचा. नव्हे,अनिवार्यच!

वस्तुस्थितीनिष्ठ आत्मसंवाद ही सशक्त मानसिकतेची खूण आहे. परिस्थितीचं सुयोग्य, प्रगल्भ अवलोकन व मूल्यमापन करून आपण जो निर्णय घेऊ, तो लाभदायी ठरावा, ही सदिच्छा बाळगणं म्हणजे सकारात्मकता. म्हणजे पाण्यात वा ताणात बुडालेल्या व्यक्तीला ‘चिंता करू नकोस, सकारात्मक विचार कर,’  असं सांगणं किती उथळ आहे, हे आपल्या लक्षात येईल.

वस्तुस्थितीनिष्ठ आत्मसंवाद कसा करावा, हे आता पाहू. ‘जाणीव’ ही या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पायरी. आपल्या आत्मसंवादाचे स्वरूप नक्की कसे आहे, वरीलपैकी कोणता पैलू आपल्या आत्मसंवादात प्रकर्षांने जाणवतो, विचारांची श्रृंखला कोणत्या दिशेने चालली आहे, या विचारपद्धतीचा स्रोत काय, कोणत्या कारणांमुळे मी ही विचारश्रृंखला बहरू/ बोकाळू देत  आहे, ही जाणीव महत्त्वाची. उदा. समजा, लहानपणी शाळेत गृहपाठात आपल्या हातून एखादी चूक झाली तर त्याबद्दल समजावून सांगण्याऐवजी शिक्षकांनी जर आपला पाणउतारा केला, आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ‘तू मूर्ख आहेस’ असं म्हटलं- तेही वारंवार- तर अखेर आपला कळत-नकळत त्यावर विश्वास बसू लागतो. (निदान त्याची शक्यता तरी वाढते.) आणि मग आपल्या वागण्या-बोलण्यात त्याचे पडसाद उमटतात. एक प्रकारचे  ‘स्क्रिप्ट’ तयार होते. कोणत्याही गोष्टीला सामोरे जाताना हे ‘स्क्रिप्ट’ सादर होतं आणि आपण अवसान गाळून बसतो. अशी ‘स्क्रिप्ट्स’ कार्यरत असतात आणि आपल्या मानसिक आंदोलनांना ती कारणीभूत ठरतात याची जाणीव झाली की आपण आपले ‘स्क्रिप्ट’ कसे लिहायचे, त्यावर इतरांचा किती प्रभाव पडू द्यायचा, यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. मग ही ‘स्क्रिप्ट्स’ जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असतील याची आपण खबरदारी घेऊ आणि  त्या दिशेने प्रयत्न करू. ‘मी एखादी गोष्ट नाही करू शकत, ती करणे अशक्य आहे, मी अपयशीच होईन,’ अशा विचारचक्रात अडकताच सावध व्हा. स्वत:ला विचारा की, या विचाराला काही पाया/ पुरावा / सत्यता आहे का? मानसशास्त्रीय पद्धतींपैकी ‘स्टॉप’ (थांबा!) टेक्निक अशा वेळी बऱ्याचदा कामी येतं. या विचारचक्राचा प्रादुर्भाव वाढताच आपण बौद्धिक/ भावनिक ‘स्टॉप’ म्हणायचे (मनातल्या मनात; पण अगदी मोठय़ाने!) आणि आपल्या बौद्धिक शाखा एखाद्या अन्य कृतीत गुंतवण्याचा प्रयत्न करायचा. थोडक्यात, नकारात्मक आत्मसंवादाची सवय मोडून काढण्याचा प्रयत्न करायचा.

बऱ्याचदा ही नकारात्मक मानसिकता लहानपणीच्या अनुभवांमध्ये/ परिस्थितीमध्ये दडलेली नसून, सद्य:स्थितीत आपण कोणती मानसिकता बाळगणाऱ्यांच्या संगतीत वावरतो, यावर ती अवलंबून असते. नकारात्मक आत्मसंवादाचे पुरस्कर्ते आसपास असल्यास आपणही नकळतपणे तसेच विचार बाळगू लागतो आणि कालांतराने नकारात्मक विचारांच्याच अधीन होतो. अशा संगतीच्या आहारी गेल्यास काय होईल, हे वेगळे साग्ांायला नकोच! ज्या व्यक्तींच्या नन्नाच्या  पाढय़ामुळे  आपल्यावर विपरीत परिणाम होणार असेल, तर अशा संगतीचा फेरविचार करावा. संगत टाळणे कठीण असल्यास भावनिकदृष्टय़ा तिच्यापासून अंतर बाळगावे.आपली ध्येयं, कल्पना महत्त्वाकांक्षा यांची चर्चा आपल्यापुरतीच मर्यादित ठेवावी. वस्तुस्थितीनिष्ठ आत्मसंवादाला पोषक अशीच संगत व वातावरण निवडावे. त्यातून मिळणारी ऊर्जा उत्तम आत्मसंवादास साहाय्यकारी करेल.

बऱ्याचदा आपला आत्मसंवाद भूतकाळातील चुका वा भविष्यातील अशाश्वततेत रुतलेला असतो. त्यामुळे ‘आता’मध्ये आपण जितके जगू, तितके जास्त गत-चुकांचा स्वीकार करून  त्यातून आपण बोध घेऊ शकू व भविष्यातील आव्हानांचा  सामना करण्याची तयारी करू शकू. आपल्या आत्मसंवादाकडे समीक्षकासारखे पाहावे. तणावग्रस्त, तसेच तीव्र आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपला आत्मसंवाद ढासळायला लागतो. आपण स्वत:च्या   क्षमतांप्रती अविश्वास दाखवू लागतो. नैराश्याचा सूर लावतो. अशा क्षणीचा नकारात्मक आत्मसंवाद रोखायला हवा. नकारात्मकता त्यागून उमेद, ऊर्जा निर्माण करणारे शब्द जवळ करायला हवेत. बऱ्याच मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की, अशा कठीण परिस्थितीदरम्यान आत्मसंवादात स्वत:चे संबोधन ‘मी’ (प्रथमपुरुषी) असे करण्याऐवजी आपले ‘नाव’  घेऊन किंवा ‘तू’ असे केल्यास परिस्थिती आटोक्यात असल्यासारखे वाटू लागण्याचा संभव वाढतो. म्हणजे ‘मी का इतका ताण घेतो आहे?’‘ मी असं वागलो?’ यापेक्षा ‘तू ताण घेण्याचं काय कारण आहे?’ वा ‘राहुल, असं वागण्यामागे काय कारणं दडलेली आहेत?’ असे म्हटले की दाह कमी होतो. त्यामुळे एखादी समस्या वा स्थितीकडे तटस्थपणे पाहता येऊन गरजेची असणारी भावनिक नीती आखता येते. मुख्य म्हणजे कल्पनेतला आराखडा कृतीत उतरवता येतो. त्यामुळे समस्येकडे दहशतीपेक्षा आव्हान म्हणून पाहण्याकडे कल निर्माण होऊ शकतो.

आपल्या ध्येयानुसार आपला आत्मसंवाद योजावा. उदा. खेळात सूचनापर आत्मसंवाद असावा. उदा. ‘मला मैदानाची ही बाजू राखताना दक्ष राहायचं आहे’ किंवा ‘खांदे मागे आणि नजर स्थिर ठेवायची आहे’, इ. याबरोबरच उत्तेजनार्थ आत्मसंवादही विसरू नये. उदा. ‘उत्तम कामगिरी चालली आहे’, ‘तू हे जरूर करू शकतोस. आगे बढो,’ इ. अशाने आपले मनोबल वाढते आणि तग धरण्याची मानसिकता वृद्धिंगत होते. ‘मी एखादी गोष्ट करू शकत नाही’ यापेक्षा ‘मी एखादी गोष्ट करत नाही’ या दोन वाक्यांतील मथितार्थात फरक आहे. पहिल्यात आपण आपल्या क्षमतेबद्दल साशंक आहोत; तर दुसऱ्यात आपण विचारपूर्वक निर्णयाने काहीतरी ठरवल्याचा भास होतो. दुसऱ्यात कृती सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळते. यामुळे आपले विचार-आचार आपल्या ताब्यात आहेत असे भासते आणि हेच आपले उत्तेजन ठरते.

यावरून आपल्या लक्षात येईल की, आत्मसंवादात थोडेफार केलेले शाब्दिक व शैलीतील बदल हे खूप मोठा परिणाम घडवून आणू शकतात. आणि त्यायोगे आपल्या विचार, भावना व आचारांवरही! ही प्रक्रिया सखोल आहे.  काही अंशी दीर्घकालीनही. पण एकदा का ती सवयीची झाली, अंगवळणी पडली, की दृष्टिकोन बदलेल, अर्थ बदलतील, मायने बदलतील. वस्तुस्थितीनिष्ठता प्रस्थापित करता येईल. त्यामुळे आपल्या आत्मसंवादाचे महत्त्व ओळखावे. त्याचे निरीक्षण करावे. त्यातून पोषक असेल ते निवडावे, ते प्रत्यक्षात राबवावे. नकारात्मकतेकडे लोटणाऱ्या घटकांपासून भावनिक अंतर ठेवावे. ‘मी कधीच केले नाही’,  ‘मी कधीच यशस्वी होणार नाही’ अशी ‘च’ची  बाधा झालेला टोकाचा आत्मसंवाद टाळावा. जसे ‘मी उद्यापासून व्यायाम करणार आहे.’ पण तो ‘उद्या’ येता येत नाही. कधीतरी, अधेमधे केव्हातरी येतो. तसे या प्रक्रियेचे होते. असे करण्याचे टाळावे. कधी कंटाळा येईल, राहूनही जाईल, विसराल; परंतु शक्यतो खंड पडणार नाही याकडे लक्ष द्या. त्याकरता आपल्या लक्षात आणू देतील अशा बारीकशा खुणा आसपासच्या गोष्टींवर कराव्यात. उदा. रंगीत चिठ्ठय़ा चिकटवून त्यावर ‘आज बोललात का.. स्वत:शी?’, ‘दक्ष राहा’, ‘स्वत:शी काय बोलताय हे ऐका, विचार करा आणि वागा’ असे काही संदेश याकामी उपयुक्त ठरू शकतात.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया राबवताना स्वत:शी सक्तीने किंवा कठोरपणे न वागता स्वत:चे मदतनीस म्हणून वागावे.. आस्थेने, आशावादी आणि आत्मविश्वासाने!

॥ तुका म्हणे होय मनासी संवाद

आपुलाचि वाद आपणासि॥

ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfinterface
First published on: 25-09-2016 at 01:07 IST