अनुभवातून अवगत झालेलं शिक्षण हे दीर्घकाळ स्मरणात, वर्तनात राहतं असा आपल्यापैकी बऱ्याचजणांचा अनुभव आहे. एखादी संकल्पना पुस्तकात वाचून, एखाद्याकडून ऐकून किंवा प्रत्यक्ष पाहून आपल्या समजुतीत उतरते आणि ती एकदा समजली की तिचे प्रयोजनही लक्षात येऊ लागते. अनुभवाचेही काहीसे तसेच आहे. एखादा अनुभव अनेक गोष्टींची शिकवण देतो.. विविध स्थिती- परिस्थितींचे दर्शन घडवतो.. कायमस्वरूपी जीवाशी जोडला जातो.. जाणिवा प्रगल्भ करतो.. दृष्टिकोन विकसित व सशक्त करतो.. विवेकबुद्धी जागवतो.. माणुसकीचे जतन करतो.. माणूस म्हणून जगायला आणि जगवायला शिकवतो. असा अनुभव हाच खरा बोधात्मक अनुभव होय. पंढरीच्या वारीचा अनुभवही याच प्रकारचा!
शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली, प्रतिवर्षी जिथे स्वरूप अधिकाधिक तेजस्वी होत आहे अशी ही दिमाखदार, देदीप्यमान वारी. अध्यात्माच्या अधिष्ठानावर पाय घट्ट रोवून वाटचाल करणारी वारी ही एक आगळीवेगळीच मानसिकता आहे. वारीला संतांमुळे लाभलेली पक्की वैचारिक बैठक आणि वारकरी सांप्रदायातील विचारकांनी ती समजून घेऊन वारकऱ्यांना समजावून दिलेला त्याचा अर्थ अद्भुत आहे. त्याचे सर्वस्पर्शी दर्शन वारकरी सांप्रदायाच्या तसेच त्यातील संतांच्या चरित्रांवरून आणि त्यांच्या मौलिक ग्रंथांवरून यथोचितपणे घडते.
पंढरीच्या वारीचा भाग बनताना जीवनकौशल्याशी निगडित सिद्धान्तांचे मौलिक दर्शनही घडते. एकाच ध्येयाने जोडल्या गेलेल्या हाडामांसाच्या माणसांच्या या विराट समूहाचे दर्शन घडवणारी ही वारी अंतिम निष्कर्षांपेक्षा प्रक्रियेला जास्त महत्त्व देणारी आहे. एकत्रितपणाची शिकवण देणारी.. ऊन, पाऊस, रान, रस्ता, तसेच येईल त्या परिस्थितीशी झगडत, प्रत्येक आव्हान पेलत अखंडित वाटचाल करण्याचा अट्टहास म्हणजे वारी. प्रचंड गर्दीत पंढरपुरात पोहोचल्यावरही प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाचे दर्शन घडेल- न घडेल; परंतु कळसाला नमस्कार करून त्यातही समाधान मानायला शिकवणारी अशी ही वारी. उराशी.. मुखी सतत एकच नाम, एकच ध्यास बाळगणारी वारीतली प्रत्येक व्यक्ती. fitness drinks किंवा diet regime चे बंधन नसताना साध्या भाकरी-भाजीच्या आहारावर पावलं मजबूत करणारी ही वारी. सुनियोजित वेळी निघून त्या- त्या ठरावीक मुक्कामी विश्रांती घेत पुन्हा जोमानं चालण्याची इच्छाशक्ती निर्माण करणारी अशी ही वारी. खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या सोबतच्या व्यक्तींची जात-पात-धर्म-ओळख, श्रीमंती-गरिबी अशी कसलीच किल्मिषं मनी न बाळगणारी, किंबहुना ही सर्व बिरुदं मन:पटलावरून नाहीशी करणारी ही वारी. सर्वाना ‘माणूस’ म्हणून मानणारी ही वारी. कीर्तनरूपात संगीतकलेला आपलंसं करणारी आणि प्रवचन-निरूपणांतून जीवनाचे अद्भुत दर्शन घडविणारी.. स्वत:शीच स्वत:चा वाद-संवाद घडवून आणणारी ही वारी. निसर्गाच्या प्रत्येक रूपाचे- ऊन, पाऊस, वादळवारा या आव्हानांचा सामना करणारी, त्यांनी डगमगून न जाता मार्गक्रमण सुरू ठेवण्याची आत्मिक शक्ती देणारी ही वारी. आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक तसेच वैश्विक जबाबदाऱ्या पार पाडून पारमार्थिक ध्येय गाठण्यास शिकविणारी ही वारी. साधा वेश, प्रामाणिक स्वरूप, एकाग्र विचारसरणी अंगी बाणवायला शिकवणारी ही वारी.
वाटेत किमान सुखसोयी तरी असतील का, याची शाश्वती नाही, अन् त्यांची अपेक्षाही नाही. मोजकी साधनसामग्री आणि किमान सोयीमध्येही भागविण्याची मनाची पक्की तयारी करणारी ही वारी. comfart zone मध्ये न रेंगाळता वाटचाल करत असताना सामोरे येतील ते अपेक्षित/अनपेक्षित बदल स्वीकारून सुयोग्य रीतीने ते आत्मसात करण्याचे बळ अंगी बाणवणारी आणि आडमुठेपणाला मूठमाती देणारी ही वारी. एककल्ली मानसिकतेची आसक्ती असली तरी एकत्रितपणाच्या सिद्धान्ताच्या मोहिनीने टोकाच्या मानसिकतेच्या आहारी जाण्यापासून रोखणारी अशी ही वारी. समाज-संस्कृतीचे सिद्धान्त अंगी बाणवून वावरण्यास शिकवणारी ही वारी. व्यक्तीची आत्मिक ऊर्जा योग्य दिशेने वळविणारी, समूहाचा घटक बनताना आत्मचिंतनाची ओढही लावणारी ही वारी.
वारीतील कार्यक्रम व प्रथांकडे बारकाईने पाहिले तर त्यात अशा बऱ्याच गोष्टी आढळतात. त्यांना लोकांनी त्यांच्या सवयी आणि सोयीने नावे दिली आहेत. व्यभिचार, नकारात्मकता, आळस, आराम यांच्या विरुद्ध दिशेने प्रवाहित व्हायला शिकवणारी ही वारी! ती पाहणाऱ्या, अनुभवणाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समजून घेण्याची मानसिकता बाळगणाऱ्यांसाठी ते एक चालते-बोलते-गाते, हसते-खेळते समाधानी विद्यापीठच आहे. श्रद्धा आणि शिस्तबद्धता या दोन स्तंभांवर उभी असलेली वारी जीवनसंदेश देते. वारीला धर्म-पंथाच्या लौकिक व उथळ दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास वारकऱ्यांचे हे वर्तन एखाद्यास भ्रामकही वाटू शकेल. परंतु वारीतील तात्त्विक आणि जीवनसंदेश लक्षात घेतल्यास वारी म्हणजे नक्की काय, हे ध्यानी आल्यावाचून राहणार नाही.
साखर गोड आहे हे कोणी कितीही सांगितले, समजावले, तिच्या गोडपणाचे वर्णन केले, तरीही साखरेचा दाणा जिभेवर ठेवल्याविना त्याचा प्रत्यय येणे कठीण; तसेच वारीचे खरे रूप अनुभवण्यासाठी, वारीचा संदेश आपल्या जीवनात समाविष्ट करण्यासाठी, तिची गोडी अनुभवण्यासाठी किमान चार पावले तरी वारकऱ्यांसोबत चालून पाहायला हवी. चारची चारशे पावले कशी होतील, हे सांगता येणार नाही. आत्मपरीक्षणाने जीवन समृद्ध करू पाहणाऱ्या- किमान तशी इच्छा बाळगणाऱ्याने एकदा तरी पंढरीची वारी याचि देही अनुभवावीच. डोळसपण आणि जाणिवा जागृत ठेवून! आत्मपरिवर्तनाची जबाबदारी वारी आपसूकच घेईल!
केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Hundred years of Bhiskrit Hitkarini Sabha founded by Dr Babasaheb Ambedkar
‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे
rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Shrawan 2024 Rashi Bhavishya
श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग
astrology budha gochar 2024 mercury transit in leo these zodiac sign will be shine an happy
बुधाचा सिंह राशीत प्रवेश; २९ जुलैपासून ‘या’ तीन राशींची श्रीमंती वाढणार! व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
naina gunde
विशेष लेख: स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही
Why are Naxalites banned from many villages in Gadchiroli
गडचिरोलीतील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांकडून नक्षलींना प्रवेशबंदी का? ती कितीपत प्रभावी?
Loksatta Natyarang letter writing Dilip Prabhalkar patrapatri Correspondence
नाट्यरंग : जगण्यातील विसंगतींची खुसखुशीत चित्र