नीलिमा बोरवणकर

‘पाऊसकाळ’ ही औदुंबर परिसरातल्या एका छोटय़ा गावाची कहाणी सांगणारी कादंबरी. विनाअनुदानित शाळेत बिनपगारी शिक्षकाची नोकरी स्वीकारलेला एक तरुण शिक्षक आपल्याला ही गोष्ट सांगतोय.

ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

घरापासून दीड-दोन कोसावरच्या मानगावात हा नायक त्याच्या पणजीकडे लहानपणापासून येत असलेला. गाव त्याच्या ओळखीचं. गावात आजीचं बडं प्रस्थ. ती ग्रामपंचायतीत निवडून आली असल्यानं गावकऱ्यांसाठी ‘मेहेरबान.’

नायकाच्या लहानपणी गाव वेगळं होतं. माणसं वेगळी होती. दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणारी आणि दुसऱ्याच्या दु:खाची चार पावलं सोबत करणारी होती. त्यांच्या मनगटात अचाट ताकद होती. एखाद्यावर कुणी विनाकारण हात टाकला तर त्याला वठणीवर आणण्यासाठी बाह्य सरसावणारी. ज्वारी, गहू, हरभरा, कापूस या पिकांनी संपन्न असणारं, धनापेक्षा मनाला जास्त किंमत देणारं, माणुसकीचं अतूट नातं जपणारं हे गाव नायकाला प्रिय होतं. साहजिकच या गावात मिळालेली नोकरी बिनपगारी असली तरी उद्या अनुदान सुरू झालं की पगारही मिळू लागेल, या भावनेनं तो ती स्वीकारतो.

नेहमी कस्तुरीच्या सुगंधासारखं मनात दडून बसलेलं हे गाव. सातवीपर्यंत याच गावात नायकाचं शिक्षण झालं होतं. पण पुढे पणजी वारली, गावचा संबंध संपला. त्यानंतर कित्येक वर्षांनी या गावात जायचा योग आल्यानं मोठय़ा उत्सुकतेनं नायकानं गावची वाट धरलेली.

कादंबरीतील सुरुवातीची प्रकरणं पूर्वीच्या गावाची, तिथल्या लोकांच्या मानसिकतेची, संस्कृतीची ओळख सांगणारी आहेत.

पण आता गावातला रस्तासुद्धा बदललाय. त्याचं वर्णन करताना लेखक लिहितो.. ‘‘सायकलवरून जाताना पोटातली आतडी गोळा होत होती. कुठला खडा आणि कुठला खड्डा चुकवायचा हेच कळत न्हवतं. त्या रस्त्यावरून जाताना मला वाटलं, अडलेल्या बाळंतीन बाईला जर या रस्त्यावरनं आनलं तर तिची आपोआप सुटका होईल.’’

नुसता रस्ताच नाही, तर गावात सगळंच बदललं होतं. शाळेतल्या मुलांबरोबर त्याने मैत्रीपूर्ण संबंध ठेवू बघताच हेड सरांनी लगेच सांगितलं, ‘‘आपलं काम बरं आणि आपण बरं, उगाच कुठल्या गटात जाऊ नका.’’ गावात गटातटाची राजकारणं सुरू झाली होती. ज्याच्याकडे स्वत:ची शेती होती त्याच्या हातात पैसा खुळखुळत होता. त्याच्या मुलांकडे गाडय़ा आल्या होत्या.

कृष्णाकाठ सोडला तर तीन वर्षांच्या दुष्काळानं संपूर्ण तालुक्यातल्या माणसांचं कंबरडं मोडलं होतं. गावातल्या धनदांडग्यांना त्याची फिकीर नव्हती, कारण नदीला वरचेवर धरणातलं पाणी यायचं. प्रत्येकाची पाण्याची स्कीम असल्यानं नदीत पाणी येताच मोटारी सुरू व्हायच्या. सलाईन दिल्यावर आजाऱ्याला टवटवी येते तसा सोळपटलेला ऊस तरारून उठत होता. या पाण्याच्या निमित्तानं गावातल्या गटातटाची राजकारणं सुरू होतीच. काहींनी अमाप पैसा केला, तर काहींना पाण्यासाठी दुसऱ्यांचे अपमान सोसावे लागले.

हवा बदलली आणि अचानक कोयना धरण फुटल्याची बातमी आली. नदीचं पाणी वाढू लागलं. महापुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं गाव पुढच्या वर्णनात येतं. घर, शेत, जमीनजुमला, जनावरे पाण्याखाली गेल्यानंतर दुसऱ्या गावाच्या आश्रयास गेल्यावरसुद्धा मूळ प्रवृत्ती कायम ठेवणारी, ताठर, बेरकी, कलागती करणारी माणसं या कादंबरीत भेटतात. कादंबरीची भाषा अर्थातच ग्रामीण असली तरी शहरी वाचकालाही ती कळते. अनेकदा वऱ्हाडी भाषेतले काही शब्द अजिबात न कळल्यानं वाचकाला सहअनुभव घेण्यात आडकाठी निर्माण होते, तसं या कादंबरीत होत नाही. उपमासुद्धा इतक्या स्वाभाविक, की दृश्य समोर उभं राहतं.. ‘‘माझी स्वारी मटणाच्या वासावर मांजराच्या पिलासारखी घोटाळत राहिली..’’ ‘‘म्हातारीनं पुनवंच्या चांदासारख्या गोल गरगरीत भाकरी थापल्या.’’ प्रथमपुरुषी निवेदन आणि मोजके संवाद यामुळे एखाद्यानं गोष्टीवेल्हाळपणे आपल्याला काही सांगावं आणि आपण त्यात गुंतून जावं तसं या कादंबरीत आपण रमून जातो. आपल्या पहिल्याच कादंबरीतून वाचकांना एका वेगळ्या अनुभवविश्वाचा ज्वलंत प्रत्यय  विजय जाधव यांनी दिला आहे.

‘पाऊसकाळ’- विजय जाधव, मौज प्रकाशन गृह, पाने- १७२, किंमत- २७५ रुपये