भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती त्या भाषिक समाजाच्या संस्कृतीचा, विचारांचा आणि अनुभवांचा आरसा असते. हजारो वर्षांचा वारसा लाभलेली मराठी भाषाही अशीच समृद्ध आहे. या भाषेतील वैविध्य, बोलींची बहुविधता, विपुल शब्दसंपत्ती यांचा अभ्यासपूर्ण वेध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी सातत्यानं केला. असाच एक स्तुत्य प्रयत्न सुहास अनंत रानडे यांनीही केला आहे. भाषेचा शब्दसंग्रह जेवढा समृद्ध तेवढी ती भाषा समृद्ध. ज्या भाषेत एका संदर्भशब्दाला अनेक पर्यायी शब्द असतात, एका शब्दापासून नाम, विशेषण, क्रियापद, धातुसाधित आणि म्हणी-वाक्प्रचार निर्माण करता येतात ती भाषा समृद्ध. शब्दसमूहावरून भाषेची श्रीमंती ठरत असते. जितका शब्दसमूह विपुल तितका भाषेचा विस्तार, प्रसार अधिक. भाषेत जितक्या क्रिया अधिक तितके धातू अधिक. समाजाच्या भाषेवरून तो समाज किती प्रगत आहे याचा अंदाज बांधता येतो. मात्र भाषा कितीही शब्दसमृद्ध असली तरी आपले विचार, भावना नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी अचूक शब्दांची निवड करावी लागते. अशा निवडप्रसंगी मदतीला येतो तो समानार्थ शब्दकोश. ही गरज लक्षात घेऊन सुहास अनंत रानडे यांनी ‘मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही’ या आपल्या ग्रंथमालेतील खंड १, प्राणिजगत- प्रकरण १ (अ )चतुष्पाद (जरायुज -सस्तन -भूचर ) पशू सादर केला आहे. रानडेंनी या खंडाच्या पहिल्याच परिशिष्टात ‘नियोजित ३९ खंडांची विषयानुसार यादी’ दिली आहे आणि त्या खंडांचा आराखडाही तयार असल्याचे ते सांगतात. हा पहिला खंड तयार करण्यासाठी त्यांनी किती भाषांच्या आणि बोलींच्या कोशांचा आधार घेतला आहे, कोणकोणते संदर्भग्रंथ वापरले आहेत ते स्पष्ट करतात. या कोशात प्रमाणित मराठी शब्दांचे समानार्थ शब्द देताना त्यांनी मराठीच्या प्रांतिक बोलीभाषांमधून, विविध जाती-जमातीच्या बोली भाषांमधून, महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या विविध भाषांमधून, भटक्या विमुक्तांच्या भाषांतून, मध्ययुगीन मराठी भाषेमधून, पालीभाषा इत्यादीमधून जास्तीतजास्त शब्द घेतले आहेत. तसेच, अरबी-फारसी-तुर्की, पोर्तुगीज भाषांतील आणि संस्कृत भाषेतील शब्दही घेतले आहेत. आजच्या मराठीत संस्कृतमधल्या तत्सम आणि तद्भव शब्दांची संख्या ही ४० टक्क्यांच्या जवळपास असल्याने मराठी साहित्यात, बोलण्यात येणाऱ्या शब्दांचा समावेश कोशकारांनी या खंडात केला आहे. महाराष्ट्रातील विविध प्रांतातील शब्दांचाही समावेश या कोशात केला आहे. कारण त्या त्या प्रांतातील वातावरणाचा, उद्याोगांचा, सणवारांचा, प्रथांचा परिणाम होऊनही शब्द-निर्मिती झालेली असते.

संस्कृत भाषेत समानार्थ शब्दकोश बनवण्याचे कार्य पुराणकाळापासून झालेले आहे याची साक्ष देतो महर्षी कश्यप यांचा ‘निघंटू’ हा कोश. मराठीतही १८६० साली बाबा पद्मानजी यांनी ‘शब्द रत्नावली’ नावाचा कोश तयार केला त्यात मराठी पर्यायी शब्द दिले आहेत. नंतरही अनेक समानार्थी शब्दकोश घडवले गेले. मात्र त्यातील फक्त नऊ समानार्थ शब्दकोशांचाच शोध रानडेंना लागू शकला. हे सर्व शब्दकोश प्रमाण मराठी भाषेला धरून आहेत. त्यांत प्रांतिक भाषेत, आदिवासी भाषेत, भटक्या विमुक्तांच्या भाषेत बोलणाऱ्यांच्या शब्दांचा समावेश नाही. रानडे आपल्या मनोगतात म्हणतात, भाषेचा इतिहास सिद्ध करण्यासाठी इतर गोष्टींबरोबर शब्दांची म्हणजे कोशांची निर्मिती करावी लागते. भाषेत जेवढे जास्त शब्द, तेवढा त्या समाजाचा इतिहास जाणणे सोपे होते. एखादा समाज सुधारणेच्या कोणत्या अवस्थेत आहे हे पाहावयाचे झाले तर त्या समाजाची भाषा पाहावी, असं वि. का. राजवाडे म्हणतात. म्हणूनच या कोशनिर्मितीद्वारे मराठी शब्दसमूह जास्तीतजास्त समृद्ध करण्याचा हा रानडे यांचा प्रयत्न. त्यासाठी रानडे यांनी विविध संदर्भ जमवले, अनेकांचे मार्गदर्शन घेतले, अत्यंत कष्टपूर्वक साधने जमवली. संदर्भ ग्रंथ यादीतील ग्रंथांची संख्या १५५ आहे. ‘आणि इतर बरंच काही’ याअंतर्गत येणारे विषय १२६ आहेत. या कोशाची रचना करताना रानडेंनी एकूण १०९ भाषा/बोलींचा अभ्यासपूर्ण शोध घेतला. त्यांची यादीही त्यांनी परिशिष्टात दिली आहे. मात्र हा शोधअभ्यास परिपूर्ण नाही, अपूर्णच आहे याची कबुलीही ते देतात.

लुप्त होत जाणाऱ्या भाषेविषयी, शब्दांविषयी काळजी व्यक्त करताना ते लिहितात की, भाषेचे, शब्दांचे नष्ट होणे भाषांचा क्षय, विलय हे केवळ त्या भाषेपुरते मर्यादित नसते; तर त्यातून व्यक्त होणाऱ्या व्यापक संस्कृती, वारसा, त्यातील जीवन, अनुभव, स्थानिक पर्यावरणाशी नाते, अधिवास, माणसाचा पूर्वेतिहास या साऱ्यांचे ते नष्ट होणे असते. असे शब्द ज्या बोलीत आहेत अशा बोली संपतात तेव्हा त्या समूहाचे साहित्य, ज्ञान, इतिहास हे सर्व संपते. त्या समाजाच्या संस्कृती, चालीरीती, रूढी-परंपरा संपतात. आपण आपल्या प्रदेशातील प्रांतिक, आदिवासी आणि भटके विमुक्त यांच्या बोलण्यातील शब्द गाळले तर भाषेतिहास, समाजेतिहास अपूर्णच राहतील. म्हणून महाराष्ट्राच्या प्रांतिक, आदिवासी व भटके विमुक्त यांच्या भाषेतील जेवढे शब्द मिळतील, तेवढे घेण्याचा प्रयत्न या कोशकारांनी केला आहे. तसंच आजच्या मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा प्रचंड भरणा झालेला आहे. मराठीतले शब्द मागे पडले आहेत, विस्मृत होत आहेत. या कोशामुळे इंग्रजी शब्द वापरण्याला थोडा तरी आळा बसेल अशी आशा रानडे व्यक्त करतात, ती सार्थ ठरावी.

या समानार्थ कोशाच्या ‘आणि इतर बरंच काही’मध्ये बरंच काही वाचनीय आहे. मनोरंजक, माहितीपूर्ण आहे. उदाहरणार्थ- ‘अस्वल’ हा शब्द घेतला तर नरासाठी, मादीसाठी, पिल्लांसाठी, त्यांच्या कळपांसाठी कोणते समानार्थी शब्द आहेत ते तर दिसतातच, त्यासाठीचे इतर भाषेतील शब्दही सापडतात, ‘आणि इतर बरंच काही’मध्ये अस्वलाची शास्त्रीय माहिती, अस्वलाशी संलग्न माणसे, अस्वलासंबंधी काही व्युत्पत्ती, त्याचे पुराणातील संदर्भ, त्याविषयीच्या धार्मिक समजुती, रामायण-महाभारतातील संदर्भ, जैन धर्म, बौद्ध धर्म, जातककथा यांतील अस्वल संदर्भ, त्याची शुभाशुभ लक्षणे, अस्वलावरील म्हणी व वाक्प्रचार, वेदांग ज्योतिष आणि अस्वल, अस्वल ग्रामनामे, कुलनामे, देशी-विदेशी नाणी, कातळशिल्पे, खेळ, शस्त्र, वस्त्र, मृगपक्षी शास्त्र, आयुर्वेद, शेअर बाजार… एक न अनेक विषयांशी अस्वल कसे जोडलेले आहे ते रंजकपणे सांगितले आहे. उंटाविषयी वाचताना राजस्थानमध्ये ७०० वर्षांपूर्वी बाबूजी राठोड यांनी आत्ताच्या पाकिस्तानमधून उंट आणला. वाळवंटी वातावरणात तग धरण्याच्या त्याच्या क्षमतेने राजस्थानात त्याची वाढ झाली आणि ते महत्त्वाचे वाहतुकीचे साधन बनले. राजस्थानमध्ये उंटांची पारंपरिक पद्धतीने जोपासना करणारी रायका नावाची जमात आहे. त्यांच्याकडे शेकडो वर्षांच्या अनुभवातून आलेले ज्ञान आहे. हे समजल्यावर १९९० मध्ये इलसे कोहलर शेलेफसन नावाची जर्मन पशुवैद्या स्त्री उंटांवर संशोधन करण्यासाठी २५ वर्षं राजस्थानात राहिली. त्यातून तिने २०१४ साली ‘कॅमेलकर्मा’ हे पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यामुळे राजस्थान सरकारने उंटाला राजस्थानचा राज्यप्राणी म्हणून घोषित केलं वगैरे माहिती समजते.

या कोशाचं कोणतंही पान उघडावं आणि त्याच्या वाचनात हरवून जावं, असा अनुभव विलक्षण आनंददायी. मराठी भाषेची राखण आणि संगोपन करण्याचा रानडे यांचा हा प्रयत्न अभिनंदनीय आणि नितांत वाचनीय. परममित्र पब्लिकेशनने हा मोलाचा ग्रंथ प्रकाशित करून मराठी भाषेची सेवाच केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ‘मराठी समानार्थ लघु शब्दकोश आणि इतर बरंच काही’ खंड १, प्राणिजगत- प्रकरण १ (अ )चतुष्पाद (जरायुज -सस्तन -भूचर) पशू, – सुहास अनंत रानडे, परममित्र प्रकाशन, पाने-९६८, किंमत-२००० रुपये.

veena.gavankar@gmail.com