अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळणकसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर!

मागील लेखात आपण महादेव शिवराम गोळे यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले. गोळे यांचे ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’ हे पुस्तक १८९५ साली प्रकाशित झाले. या पुस्तकावरील दीर्घ परीक्षण ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये जाने.-फेब्रु. १८९६च्या जोडअंकात प्रसिद्ध झाले. ते लिहिले होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी. त्यातील एक उतारा सुरुवातीला पाहू या-

‘‘केवळ विद्येकरितां विद्या शिकणारे विद्यार्थी अत्यन्त विरळा! नाहींतर सगळेच भांडारकर न रानडे झाले असते. निवळ विद्येकरितांच, दुसरा कोणचाही हेतु मनांत न धरितां, विद्या शिकण्यास पाठविणारा पालकही विरळाच. विद्या पैदा करितांना हाडाचीं काडें इतकीं करावीं लागूनही पुढें त्याची विशेष चीज नाहीं, मानमर्तब नाहीं, द्रव्यप्राप्ति नाहीं, हें पाहून पालकाबरोबर विद्यार्थ्यांचींही मनें विरघळून जावींत, त्यांच्या शरीरांतला उल्हास व जोम निर्जीव व्हावा हें साहजिकच आहे. बि. ए. पास झाल्यानन्तरच्या स्थितीपेक्षां पास होण्यापूर्वीचीच स्थिती बरी, असें हल्लीं डिग्रीवाल्यांस वाटूं लागलें आहे. विद्यार्थीदशेंत कल्पनातरंगांनीं रेखलेल्या पुढील आयुष्याच्या सुंदर चित्रांपेक्षां संसाराचें खरें स्वरूप अत्यंत हिडिस व ओकारी आणणारें असतें- हें तत्व ते विसरतात ह्मणून त्यांची अशी स्थिति होते असे ह्मणणें वस्तुस्थितीस धरून होणार नाहीं. ‘‘पुढें काय करावें’’ हा प्रश्न त्यांचेपुढें दत्त ह्मणून उभा राहतो. ग्रॅजुएटांना उपदेशाचीं व्याख्यानें झोडणारास सल्ला मसलत विचारावयास गेलें असतां ‘‘हा प्रश्न ज्याचा त्यानेंच सोडविला पाहिजे’’ असें उत्तर येतें. आणि तेहीं खरेंच; चोहोंकडूनच विपत्ति आली आहे; पाश्चिमात्य सुधारणेंत असें ठरलें आहे कीं, दारिद्र्याइतका लोकांना नाकें मुरडायाला लावणारा दरुगधि पदा अवघ्या सृष्टींत मिळायाचा नाहीं.’’

हे परीक्षण लिहिणाऱ्या खाडिलकरांचे वय होते अवघे चोवीस. जन्म व सुरुवातीचे शिक्षण सांगली येथे झालेले खाडिलकर १८८९ मध्ये पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले. १८९२ साली डेक्कन कॉलेजमधून ते तत्त्वज्ञान या विषयाचे पदवीधर झाले. पुढे दोन वर्षे सांगलीच्या माध्यमिक शाळेत अध्यापन करून ते कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. मुंबईत त्यांनी ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये लिहिण्यास सुरुवात केली. त्यात ‘ब्राह्मण आणि त्यांची विद्या’वरील परीक्षण, गौतम बुद्धांच्या चरित्र व कार्याविषयीची लेखमालिका या लेखनाचा समावेश आहे. गौतम बुद्धांवरील लेखमालिकेतील पहिल्याच लेखातील हा उतारा पाहा-

‘‘बुद्धकथा निवळ काल्पनिक नसून तीस बऱ्याच अंशीं ऐतिहासिक महत्व देतां येईल असें मानण्यास विचारणीय आणखी बरींच कारणें आहेत. पाली ग्रंथांतून बुद्धाच्या कृतीपेक्षां तत्वविचारांचें विशेष विवेचन केलेलें आढळतें. ऐहिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची व पारमार्थिक विषयांकडे सर्व लक्ष पोंचविण्याची हिंदु लोकांची नैसर्गिक प्रवृत्ति ध्यानांत धरली ह्मणजे बुद्धाच्या मतांचें इतकें विस्तृत वर्णन उपलब्ध असतां त्याचें चरित्र अल्पस्वल्प कां, ह्य़ाचें आश्चर्य मानण्यास जागा राहत नाहीं. ख्रिस्ताचें चरित्र लिहिण्याकडे लोकांचा कल लागेतों ख्रिस्ताचीं उपदेशपर संभाषणें व ह्य़ा संभाषणांचे विशेष प्रसंग, एवढय़ांचेंच वर्णन केलेले लेख प्रसिद्ध होते ना? प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता साक्रेटीस ह्य़ाचें सविस्तर चरित्र देण्याच्या भरीस न पडतां त्याच्या विचारांचा खल करून ते लोकांपुढें मांडण्यांतच ‘झेनाफन’नें आपल्या ग्रंथांचा बहुतेक भाग अडविला आहे ना? ख्रिस्त व साक्रेटिस ह्य़ा जर ऐतिहासिक व्यक्ति ठरतात तर आमचा बुद्धच एवढा नावडता कां व्हावां हें आह्मांस समजत नाहीं.’’

‘विविधज्ञानविस्तार’मधील खाडिलकरांचे लेखन टिळकांनी वाचले. ते लेखन, विचाराभिव्यक्ती टिळकांना भावली, अन् १८९६च्या सप्टेंबरापासून खाडिलकर ‘केसरी’त रुजू झाले. तिथे त्यांनी पहिल्याच दिवशी लिहिलेला ‘राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता’ हा लेख अग्रलेख म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. तिथे टिळकांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी निष्ठा राखत त्यांनी लेखन केले. दरम्यान १९०२-०५ या काळात ते नेपाळला होते. तिथे शस्त्रांचा कारखाना सुरू करण्याचा त्यांचा मनसुबा होता; मात्र त्याचा सुगावा बाहेर लागताच ते मायदेशी परतले आणि पुन्हा ‘केसरी’त दाखल झाले. काही काळ केसरीचे संपादकपद भूषवून ते टिळकांच्या निधनानंतर (१९२०) ‘केसरी’तून बाहेर पडले. पुढे १९२३ मध्ये त्यांनी ‘नवाकाळ’ हे साप्ताहिक पत्र सुरू केले. असहकार चळवळीच्या पाश्र्वभूमीवर १९२२ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या एका लेखातील हा उतारा पाहा-

‘‘यश मिळविण्यास विद्वत्तेचें सामथ्र्य चोहोंकडे पसरलेलें असावें लागतें असें नाहीं.. यशाचें सामथ्र्य तर्कटपणांत नसून विद्वत्ता लढण्याच्या वेळीं उपयोगी पडत नाहीं. कर्त्यां पुरुषाची बुद्धि स्थिर होण्यास विद्वत्तेची जरुरी असते, पण स्थितधी झालेल्या मुनींच्या संप्रदायाची अंमलबजावणी संसारांत घडण्यास सत्याची चाड, प्रामाणिकपणा, श्रद्धा व आत्मयज्ञ करण्याची तयारी या सद्गुणांचीच अधिक जरुरी असते. पराक्रम म्हणजे विद्वत्ता नव्हे! संप्रदायानें ठरविलेल्या तत्त्वांकरितां निश्चयानें श्रद्धापूर्वक केलेल्या आत्मयज्ञाला पराक्रम असें म्हणतात.. हिंदुस्थानांत आज उणीव आहे ती विद्वानांची नाही, पराक्रमी वीरांची आहे.. विद्वत्तेला आजही हिंदुस्थानांत आरामाची गुलामगिरी आवडते. विद्वत्तेची ही वेश्यावृत्ति नष्ट झाल्याशिवाय हिंदुस्थानचें कल्याण होणार नाहीं. अशा वेळीं पराक्रमी पुरुषांमध्यें ते विद्वान नाहींत म्हणून दोष काढणें म्हणजे राष्ट्राच्या हितावर कुऱ्हाड मारणें होय.. पराक्रमाची टर करणाऱ्या विद्वत्तेला विद्वत्ता तरी कसें म्हणावें? पराक्रमाच्या सद्गुणांचें स्वरूप ज्या बुद्धीला समजत नाहीं त्या बुद्धीवर व्यापकपणाचे संस्कार झाले आहेत असें कसें मानावें? पराक्रमाचें प्रतिबिंब ज्या बुद्धींत पडत नाहीं ती बुद्धि शिकल्यासवरल्यानें निर्मळ झाली आहे असें मानण्यास आधार काय? सद्गुणांचें, सत्याचें व परमेश्वराचें स्वरूप ग्रहण करण्यासाठीं शक्ती जेथें नाहीं, तेथें विद्वत्ता आहे असें कसें म्हणावें? ही विद्वत्ता नव्हे, नुसती घोकंपट्टी आहे! विद्वत्तेनें अंत:करण शुद्ध व्हावें लागतें आणि परमेश्वरी तेजाचे किरण ग्रहण करण्याइतकी निर्मलता उत्पन्न व्हावी लागते. ज्या विद्वत्तेमुळें मनुष्याची बुद्धि परमेश्वराचें अधिष्ठान होऊं शकत नाहीं, त्या विद्वत्तेस विद्वत्ता म्हणण्याऐवजीं विद्वत्तेचें सोंग म्हटलें पाहिजे!’’

वृत्तपत्रांतील खाडिलकरांची ही लेखन कारकीर्द सुरू असतानाच समांतरपणे त्यांची नाटककार म्हणूनही ओळख दृढ झाली. याची सुरुवात झाली ती त्यांच्या ‘सवाई माधवराव यांचा मृत्यु’ या पहिल्या नाटकापासून. हे नाटक १८९५ मध्येच ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये प्रसिद्ध झाले असले तरी ते पुस्तकरूपात प्रकाशित झाले १९०६ साली. या नाटकातील हा एक प्रसंग-

‘‘माधवराव- आपल्या दरबाराशीं इंग्रजांचें असलेलें काम नानांनीं तुमच्यावर सोंपविलें आहे, आणि ह्य़ा कामांतील हुशारीबद्दल नाना नेहमीं आमच्याजवळ तुमची तारीफ करीत असतात. -इंग्रजांच्या ह्य़ा बोलण्याबद्दल तुमचा काय सल्ला आहे?

जाधवराव- इंग्रजांना आपल्या राज्यांत व्यापाराची परवानगी देऊं नये, अशी ह्य़ा पायापाशीं माझी विनंति आहे.

माधवराव- निजाम, आम्ही, इंग्रज मिळून जसे टिपूवर उठलों, त्याप्रमाणें खडर्य़ाच्या अपमानामुळें धुसफुसणारा निजाम, हिंदूंना भ्रष्ट करण्याला टपलेला टिपू आणि बादशाही अंमलापासून चालत आलेले हक्क बुडविल्यामुळें रागावलेले इंग्रज, हे जर एक झाले तर-

नाना- तर काय व्हावयाचें?- आम्ही काय झोंपा घेतच पडलों आहों? सरकारच्या गादीचें वैभव पाहून इतर लोक मनांतल्या मनांत झुरतील आणि आमच्या नाशाकरितां आपआपसांतील वैरभाव टाकून आमच्याविरुद्ध जूट करतील, हें समजण्याइतकी, सरकारच्या पायाच्या प्रतापानें, सरकारच्या पदरच्या मुत्सद्यांत अक्कल आहे- खडर्य़ाच्या स्वारीच्या पूर्वी इंग्रजांनीं पाठविलेल्या यादीचें धोरण काय, हें मी ओळखून होतों, आणि खडर्य़ाच्या ज्या मैदानावर उभे राहून आम्ही निजामाच्या सैन्यास धूळ चारली, त्याच मैदानावर परशुरामभाऊंची तरवार विसावा घेण्यास म्यानांत शिरण्यापूर्वी, भोसल्यांचें बाण पुन्हां भात्यांत जाऊन स्वस्थ पडण्याचे अगोदर, शिंद्यांच्या जिवबादादांचा तोफखाना शांत होऊं लागला नव्हता तेव्हांच ह्य़ा नानानें पुढच्या लढाईंचा पाया रचला आहे. – निजामापासून आमच्या मनगटाच्या जोरावर आम्हीं कमावलेलें वैभव आम्हापासून हिसकावून घेण्याचा जर कोणी प्रयत्न करील तर त्याच्याशीं झुंजण्याची जय्यत तयारी राखण्याकरितां खडर्य़ाच्या लढाईनें मिळविलेली संपत्ति कवडीनकवडी आम्ही लष्कराकडे खर्च करूं अशा सर्व सरदारांनीं त्यावेळीं शपथा घेतल्या आहेत- इंग्रज, टिपू व निजाम एक झाले तर काय होईल म्हणून सरकारांनीं आतां भीति बाळगण्याचें कांहीं कारण नाहीं.

माधवराव- इंग्रजांना भिण्याचें कारण नाहीं आणि जबरदस्तीनें ते परवानगी मागत असले तर आम्ही साफ देणार नाहीं.- पण त्यांनीं पुण्यास व्यापार केला तर त्यांत आमचें काय नुकसान आहे?- परवां मॅलेटनें नजरनजराणे पाठविले होते. त्यांतल्या त्या विलायती चिजा फारच मोहक होत्या! मला वाटतें त्यांनीं जर आमच्या शहरांत पेढय़ा घातल्या तर आपल्या शहराला शोभाच होईल.

नाना- हा व्यापारी कावा सरकारच्या ध्यानांत आला नाहीं.- राघोबाला खाकेंत मारून आपली तलवार व बंदूक हे जलचर त्यावेळीं पुण्यांत घुसडूं पहात होते; तो डाव साधला नाहीं म्हणून आतां तराजूचा शिरकाव आमच्या राज्यांत करूं पहात आहेत! बादशहानें ह्य़ांना व्यापाराची परवानगी दिली, बादशाहीचें ह्य़ांनीं कोणचें कल्याण केलें?- कलकत्त्यास शिरून मणेऱ्याचें दुकान चालवितां बंगाल घशांत टाकला कीं नाहीं?- हें ह्य़ांचें

व्यापारी कसब!’’

या नाटकानंतर खाडिलकरांनी १८९८ मध्ये ‘कांचनगडची मोहना’ हे नाटक लिहिले. पुढे १९०७ मध्ये त्यांचे ‘कीचकवध’ हे महत्त्वाचे नाटक प्रसिद्ध झाले. याशिवाय ‘भाऊबंदकी’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत विद्याहरण’, ‘संगीत स्वयंवर’, ‘सत्त्वपरीक्षा’ अशी एकूण बारा नाटके त्यांनी लिहिली. गद्य आणि संगीत अशा दोन्ही रंगभूमींवर त्यांची नाटके गाजली. तत्त्वनिष्ठा व राष्ट्रभक्ती यांचे त्यांच्या लेखनाला अधिष्ठान होते. ते त्यांच्या नाटकांमधूनही जाणवते. वा. ल. कुळकर्णी यांनी ‘नाटककार खाडिलकर- एक अभ्यास’ या पुस्तकात खाडिलकरांच्या नाटकांचे वर्णन ‘विचार-नाटय़’असे केले आहे, ते सार्थच आहे. अखेरच्या काळात खाडिलकरांनी काही तत्त्वज्ञानविषयक पुस्तकेही लिहिली. त्यांच्याविषयी व त्यांच्या लेखनाविषयी जाणून घेण्यासाठी का. ह. खाडिलकर व न. र. फाटक यांनी लिहिलेली खाडिलकरांची चरित्रे वाचायला हवीत.

prasad.havale@expressindia.com