लहानपणापासून जे वर्तमानपत्र मी वाचत आलो त्यात मला नियमितपणे एक सदर लिहायची विचारणा करण्यात आली तेव्हा मी अतिउत्साहात ‘हो’ म्हणून बसलो. मात्र, काय आणि कसं लिहायचं, याचा पेच पडला.  पहिल्यांदा लेखणी उचलली आणि तिथेच थबकलो. फार मोठमोठय़ा माणसांनी आपल्या लेखणीने जी जागा सुशोभित केली होती, त्या जागेवर आता आपण काय लिहावं? याआधी काही कलाकारांनी आपल्या सदरात उत्तम लेखन केलं आहे, त्यांची जागा आता मला घ्यायची आहे, या विचाराने थोडंसं दडपणही आलं. थोडेफार लेख मी याआधीही लिहिले आहेत. अगदी क्रीडा-पाक्षिकातही वर्षभर मी लिहीत होतोच. बहुसंख्य मराठी नाटककारांसारखी दुसऱ्या भाषेतून मूळ जीव उचलून भाषांतरित स्वरूपाची तीन-चार नाटकंही माझ्या हातून होऊन गेली. (‘लिहून झाली’ असं नाही म्हणवत. ‘होऊन गेली’ म्हटलं की चोरीची तीव्रता आपल्याच मनाला जरा कमी भासते.) पण या वर्तमानपत्राचा वाचकवर्ग विशाल पसरलेला आहे. अत्यंत चौकसपणे तो वाचतो. त्यामुळे लिहिला गेलेला दरेक शब्द फार जपून योजावा लागणार. कुठलाही संदर्भ चार वेळा पारखून योजावा लागणार याची दहशत नाही म्हटलं तरी मनात डोकावून गेली. (निदान पहिल्या चार-पाच लेखांत तरी हे कटाक्षाने पाळावं लागणार. मग पुढे आपण निर्ढावत जातो. घराच्या कोपऱ्यावर एखादा पोलीस उभा राहिला की सुरुवातीचे दहा-पंधरा दिवस आजूबाजूच्या टग्या लोकांना थोडी दहशत असते. काही दिवसांनी तो पोलीस आजूबाजूच्याच एखाद्या चहाच्या दुकानात चहा पिऊ  लागला की सगळे त्याच्या जवळ उभे राहून नजरेनं त्याच्याशी सलगी साधू लागतात. मग हळूहळू त्याच्या असण्याची सवय होते आणि पुन्हा स्थिती मूळ पदावर येते. तसं काहीसं माझ्याही बाबतीत होईल.)

काय बरं लिहावं? आणि कोण म्हणून लिहावं? (स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माझ्या मनात घोळ झाला आहे, आणि मी कोणी मनोविकारग्रस्त आहे असा समज कृपया करून घेऊ  नका. मी अत्यंत गंभीरपणे विचार करतो आहे. त्या विचारात व्यग्र असल्यामुळे हे प्रश्न मनात उभे राहिले आहेत.) कलाकार म्हणून लिहावं? लेखक म्हणवून घ्यायला मला थोडासा किंतु वाटतो. सुपारी खाणाऱ्या संपादकाला लोकमान्य टिळक म्हणावं तसं थोडंसं वाटतं. अभिनेता म्हणवून घ्यायला तितका धसका बसत नाही. कारण भल्याबुऱ्या का होईना, पन्नासच्या वर नाटकांत मी भूमिका केल्या आहेत. कुठल्या भूमिकेवर छाप उमटली नसेल, पण तरीही काही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पण अभिनेता म्हणून जर काही आमच्या व्यवसायाबद्दल लिहिलं तर सर्वसामान्य वाचकांना (माफ करा! ‘सर्वसामान्य वाचक’ असं काही नसतं. ‘वाचक’ या शब्दाच्या मागे ‘रसिक’चं इंजिन असावंच लागतं, असं माझ्या परिचयाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखकांनी मला बजावून सांगितलं होतं, ते मी विसरलो.) माझ्या व्यवसायातल्या खाचाखोचांबद्दल काय रस असणार? नाटक पाहायला गेल्यानंतर कृष्णाची भूमिका करणारा कितीही म्हातारा असला तरी काय झालं? गाणी ठणकावून झाली पाहिजेत, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या असंख्य रसिकांना मी नाटय़विषयक मूलभूत व्याख्या काय सांगणार? ‘मूलभूत’ या शब्दाबद्दल माझ्या मनात लहानपणापासून भयंकर दहशत आहे. ‘नेणिवा’, ‘जाणिवा’, ‘भावले’ या शब्दांनी तर मला दरदरून घाम सुटतो. नाटकाच्या परीक्षणात हे शब्द नेहमी वापरले जातात. (म्हणजे नेमकं कशात? कारण ‘सुविहित, आखीवरेखीव, आकृतिबंध किंवा बंध’- जे काय असेल ते. ‘दमदार/ कसदार अभिनय’ लिहिलेलं वाचलं की या शब्दांना नेहमीच मला ‘भालदार-चोपदार’चा वास येतो.) तर त्यात जे काही लिहिलं जातं त्यावरून जर ‘अभिनेता’ या शब्दाची व्याख्या करायची तर तीन-चारच्या पुढे कोणी अभिनेते असतील असं वाटतच नाही. (‘अभिनेता’ हा शब्द हल्लीच्या actor  या अर्थाने वापरलाय. त्यात दोन्ही आले. हो. पहिल्याच लेखानंतर ‘पुरुषी विचारांचा लेख’ असा भडिमार नको.) आणि इतक्या संख्येनं कमी असलेल्यांत आपली गणना झाली तर ते वाचणार कोण? आणि मग मी लोकप्रिय लेखक होणार कसा?

point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

काय लिहावं हे अजून ठरत नाहीये. कोणी काहीही म्हणा, पण अभिनेत्याला मान मिळत नाही. हल्ली या मालिकांची बोट फुटल्यामुळे लोक बरोबर (हल्ली या ‘बरोबर’ शब्दावरही ‘सोबत’ या शब्दाचं आक्रमण झालंय. ‘चहासोबत बिस्किट खा!’ वगैरे बिनधास्त म्हटलं जातं. ‘सोबत’ ही ‘सावधानतेतून कुणाला तरी घेऊन जाणे’ या अर्थाने असते. ‘जंगलात माझ्यासोबत चल!’ पण ‘पोस्टात जाताना बरोबर चल!’ असंच म्हटलं पाहिजे. तिथे ‘सोबत’ शब्द बरोबर नाहीये. म्हणजे माझा याबाबतीत आग्रह नाहीये. कारण पुन्हा हल्ली ‘चूक तेच बरोबर’ असा हट्ट करणाऱ्यांचाही मोठा दबावगट निर्माण झाला आहे. हे थोडं विषयांतर झालं, पण ते मुद्दामहून केलंय. अजून नेमकं काय लिहावं ते कळत नाहीए म्हणून.) तर.. लोक बरोबर फोटो काढायचा आग्रह करतात. प्रसंगी धक्काबुक्कीही करतात. मात्र, फोटो काढायच्या आधी ‘माझं नाव काय ते सांगा..’ असं म्हटलं की गर्दी पांगते. क्वचित प्रसंगी ज्या मालिकेत मी काम करतो तिचं चुकीचं नाव सांगितलं जातं. सरदारजी म्हटलं की जसा आपण ड्रायव्हर किंवा हॉटेलवाला, नाहीतर हॉकीपटू असा अंदाज व्यक्त करतो, तसाच कलाकारांबद्दल अंदाज व्यक्त केला जातो. मात्र जर कुणी फोटो काढू नका असं म्हटलं की जी शेरेबाजी कानावर पडते त्यावरून कलावंताला समाजात मान मिळतो असं म्हणायला माझी जीभ रेटत नाही. खऱ्या अर्थाने ज्यांना दिवसाच्या कुठल्याही वेळी, महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेशात बहुसंख्य लोक ओळखतात असे तीन-चारच कलाकार आहेत. अशोक सराफ हे त्यातले एक. दुसरा प्रशांत दामले. पुढे यादी प्रत्येकानं आपली आपली कुवत बघून वाढवत न्यावी. मी इथं यादी करायला बसलो नाहीये. कुणाला वगळायचा हेतू नाही; फक्त माझं नाव या यादीत अजिबात नाही, हे मात्र निश्चित.

कलाकार असलो तरी लगेच मला सामाजिक भानाचं शेपूट चिकटावं असंही मला वाटत नाही, कधी वाटलंही नाही. त्यामुळे ‘झाला अन्याय की धावलो आपण!’ असं करायचं माझ्या मनात खरंच येत नाही. त्यासाठी जे करायचं ते मी माझ्या माझ्या पद्धतीनं करतोही; पण त्याला ‘सामाजिक भान’ असं भारदस्त नाव द्यायला धजावत नाही. कारण परमेश्वर प्रत्येक कामासाठी तो- तो माणूस निर्माण करतो आणि समाजाचा समतोल राखतो, या मतावर माझी श्रद्धा आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी चित्रपट निर्माण करू नये आणि मेहबूब खान यांनी समाजसुधारणेच्या प्रश्नात लक्ष घालू नये! (अरे! या दोन नावांनी अचानक मी सर्वधर्मसमभावाचं उदाहरण दाखवून दिलं की काय?) शिवाय आला पाऊस, झालं मन व्याकूळ! पडला दुष्काळ, की सुचल्या चार ओळी.. असंही मला होत नाही. त्याबद्दल प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या मकरंद आणि नानाबद्दल मला खूप आदर आहे. पण ते आपल्याला करता येत नाही म्हणून खंतही वाटत नाही. जितेंद्र जोशी आणि इतर तरुण मुलांना वाटतं तितकं तीव्रतेनं मला नाही वाटत. पण नाही वाटत, त्याला काय करणार? शिवाय पाहिला कुठला चित्रपट की लगेच तो कसा आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे आणि इतरांना तो कसा कळला नाही.. धिक्कार असो अशा क्षुद्र प्रेक्षकांचा.. असं आजकाल बोकाळलेल्या facbook वर मी हिरीरीने लिहीत नाही.

आपलं काम समोर आलेल्या प्रेक्षकांचं माफक मनोरंजन करणं हे आहे. आणि आपण त्या कामात शक्यतो गुंतून जावं असं मला वाटतं. आणि आज इतकी वर्ष मी तेच करतो आहे. आणि खरं सांगायचं तर त्यात मी अत्यंत खूश आहे.

बापरे! या सगळ्यात काय लिहायचं ते अजून ठरलंच नाही. असो. पहिल्या प्रयोगाला तिसरी घंटा होऊन नाटक सुरू होतं तेव्हा तरी पुढे काय होणार हे कुठं कळतं?

संजय मोने

sanjaydmone21@gmail.com