१९७६ सालाच्या आरंभी एक दिवस मोहन गोखलेनं एक पुस्तक हातात ठेवलं. पुस्तकाचं नाव होतं ‘नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका’.. मराठी साहित्यातले युगप्रवर्तक कवी/ साहित्यिक आणि समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकात नटश्रेष्ठ या नाटकासह त्यांनी ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असताना- खास आकाशवाणी या माध्यमाकरिता लिहिलेल्या चार संगीतिका अंतर्भूत केल्यात.. मोहननं मला त्यातली ‘बदकांचे गुपित’ ही संगीतिका संगीतबद्ध आणि दिग्दर्शितही करण्याविषयी सुचवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत मी कधी दिग्दर्शन केलं नव्हतं.. पुन:पुन्हा मी ‘बदकांचे गुपित’ची संहिता वाचत राहिलो. शंतनू आणि मनोरमा या मूलबाळ नसलेल्या जोडप्याला असलेली अपत्यप्राप्तीची आशा.. शंतनूच्या बहिणीला झालेला मुलगा.. त्याच्या मित्राला, ऑफिसातल्या सहकाऱ्यांना झालेल्या अपत्यप्राप्तीचा आनंद आणि त्यामुळे त्यांच्या भावजीवनात उठलेले तरंग असा काहीसा या संगीतिकेचा विषय.

पाश्चिमात्य लोककथांनुसार किंवा संकेताप्रमाणे स्टोर्क पक्षी घराच्या धुरांडय़ातून नवे अपत्य हलकेच घरात आणून सोडतात. मर्ढेकरांनी ग्रीक नाटकातल्या कोरस म्हणजे निवेदकवृंदाचा कथानकातील प्रसंग जोडणीकरिता प्रयोग करताना स्टोर्क पक्ष्यांच्या समूहाऐवजी बदकांच्या कळपाची योजना केली. पुन्हा क्व्याक क्व्याक करत गाणाऱ्या बदकांच्या वृंदगानातून शंतनू-मनोरमा या अपत्यहीन दाम्पत्याच्या जगण्यातलं एकसुरीपणही अधोरेखित होतं. या संगीतिकेमध्ये सर्व पात्रे ही गाण्यातूनच परस्परांशी अगर स्वत:शीही संवाद करतात. बदकांच्या समूहामध्ये तीन पुरुष बदके आणि तीन स्त्री बदके असा सहाजणांचा समूह निवडला.

संगीतकाच्या आरंभी शंतनू-मनोरमेच्या घरात घडणाऱ्या पहिल्या प्रवेशाचे प्रास्ताविक आणि त्यातल्या पात्रांची ओळख करून देणारे गाणे किंवा दुसऱ्या/ तिसऱ्या प्रवेशांची प्रस्तावना करणारी गाणी आणि शेवटचे गाणे ही सर्व गाणी मी नर्सरी ऱ्हाइम्स म्हणजे बालगीताच्या शैलीत स्वरबद्ध केलीत. सहा गायक-गायिका उपलब्ध असल्याने मग संवादी सुरावटींचाही प्रयोग केला. शंतनू, मनोरमा, शंतनूचा मित्र वसंत दाणी, अकौंटन्ट आडमुठे आणि चपरासी भय्या अशा पात्रांकरिता उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत, चित्रपटसंगीत अशा विविध शैलींचा प्रसंग/भावानुरूप प्रयोग केला. हे सगळं प्रायोगिक रंगभूमीवर- थिएटर अकादमीच्या एकांकिका उपक्रमांतर्गत होत असल्याने केवळ हार्मोनियम आणि ढोलकी एवढय़ा सीमित वाद्यमेळाच्या साथीनं ही संगीतिका आकाराला आली. मुळात मर्ढेकरांनी संगीतकाची मांडणी विनोदाच्या अंगानं केल्यानं बदकांच्या क्व्याक क्व्याकयुक्त गाण्यांनी जशी विनोदाची पखरण झाली तशीच ती शंतनूच्या ऑफिसातल्या अकौंटन्ट आडमुठेच्या. साहेबाच्या केबिनचे दार भीत भीत आधी थोडे उघडून, किलकिल्या फटीतून थोडे डोकावून मग विनोदी पद्धतीने प्रवेशण्यातून आणि पुढल्या प्रसंगातूनही फार मजेदारपणे झालीय. ‘सर, येऊ का? परवानगी हळू मागण्या, सर येऊ का? हळू मागू का?’ असं गातच तो प्रवेशतो, तर शंतनूच्या ऑफिसातल्या प्रवेशानंतर येणाऱ्या बदकांच्या समूहाच्या गाण्यात ‘क्व्याक क्व्याक क्व्याक.. फाइल्स करा प्याक’, हे गाताना दुसऱ्या प्रवेशाच्या सुरुवातीला शंतनूच्या ऑफिसातल्या मस्टरवर सह्य़ा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतली बदकं आता आपापल्या टेबलांवरच्या फाइल्सची आवरासावर करत पुढच्या ‘सहा वाजले..’ हे शब्द गाताना सर्वात उंच बदकाचा हात (मोठा काटा) आणि सर्वात कमी उंचीच्या बदकाचा हात (छोटा काटा) यांच्या साहाय्यानं घडय़ाळातल्या काटय़ाची सहा वाजले हे दर्शविणारी विरचना साकारतात आणि छोटय़ा काटय़ाच्या खाली गुडघ्यावर बसून स्त्री बदकानं गायलेली बिगबेन या लंडनमधल्या विश्वविख्यात घडय़ाळाची लोकप्रिय सुरावट, त्यापाठोपाठ उर्वरीत बदकांनी ठणठण असे वेगवेगळ्या संवादी सुरात गात दिलेले घडय़ाळाचे टोल, त्यातून पुढच्या शंतनू-मनोरमा प्रवेशाचं सूचन करणाऱ्या ओळी गात विंगेत जाणं. शंतनू-मनोरमेच्या आयुष्यात कुठलाही नवा अंकुर (अपत्य) नसल्याने त्यांच्या अवघ्या जगण्यात एकसुरीपणा भरलाय, नव्हे तोच त्यांना कळसूत्री बाहुल्यांसारखं नियंत्रित करतोय. हे दर्शविण्याकरिता प्रत्येक प्रवेशापूर्वीचं गाणं गाताना हा बदकांचा समूह नेपथ्यात आवश्यक ते बदलही करतो. त्या त्या प्रवेशातल्या पात्रांना कळसूत्री बाहुल्यांगत रंगमंचावर त्यांच्या नियोजित जागी आणून ठेवतो आणि प्रवेश संपताना पात्रांना पुन्हा विंगेत घेऊन जातो.

खरं तर हे संगीतक मर्ढेकरांनी आकाशवाणी म्हणजे श्राव्य माध्यमाकरिता लिहिलं असल्यानं ध्वनीतूनच सर्व कथानक मांडण्याचं बंधनयुक्त आव्हान होतं. पण मर्ढेकरांच्या संहितेत ती दृकश्राव्य माध्यमातून आविष्कृत होण्याच्या शक्यता असल्याने मला दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल टाकताना खूप आनंद मिळाला. बदकांचे गुपित संगीतबद्ध केलं, गाणाऱ्या कलाकारांना गाणी शिकवली, महिनाभर फक्त गाण्यांच्या तालमी झाल्या आणि मग उभ्यानं तालमी सुरू केल्या. सुरुवातीला काही सुचेना, पण मग एक वही आणून उजव्या पानावर गीतमय संवाद आणि डाव्या पानावर रेखाटन असा गृहपाठ सुरू केला. जोडीला माझ्या अनुभवी कलाकाराचं पाठबळ, आधुनिक मराठी रंगभूमीवरचा सवरेत्कृष्ट गायक अभिनेता चंद्रकांत काळे शंतनूच्या भूमिकेत, तर वीणा देवांनी मनोरमा साकारली. दिलीप जोगळेकर (अकौंटन्ट आडमुठे), मकरंद ब्रrो (वसंत दाणी), प्रकाश अर्जुनवाडकर (भय्या) यांच्यासह अर्जुनवाडकर भगिनी, माधुरी पुरंदरे, विजय जोगदंड, नंदू पोळ आणि श्रीराम पेंडसे असा बदकांचा समूह.. एक टेबल, चार मोडे, एक ऑफिस ब्रीफकेस, कपबश्यांसह ट्रे, खुळखुळा, पिपाणी, खेळण्यातलं बदक अशा मोजक्या साधनसामग्रीसह बदकांच्या गुपितचा पहिला प्रयोग रेणुकास्वरूप कन्याशाळेच्या सभागृहात झाला. प्रयोगानंतर थिएटर अकादमीच्या उपस्थित रंगकर्मीसोबत झालेल्या चर्चेत संगीताव्यतिरिक्त दिग्दर्शनादि घटकांवर फार काही अनुकूल अभिप्राय आले नाहीत. मी बराचसा खट्टू झालो. त्या रात्री खोलीवर परतताना मनभर निराशा होती. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. होते कुरूप वेडे पिल्लू त्यात एक.. मी स्वत:ला त्या कुरूप आणि वेडय़ा पिल्लाच्या जागी पाहत होतो..

महिनाभरानं सोलापूरला ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘महानिर्वाण’चे प्रयोग शनिवार-रविवार आयोजित केले होते. रविवारी संध्याकाळी ‘बदकांचे गुपित’चा प्रयोग करायचे ठरले. प्रयोगाला विशेष उपस्थिती जब्बार पटेल आणि त्यांचे गुरू प्रा. श्रीराम पुजारीसर यांची असणार होती.. प्रयोग सुरू झाला. सोलापूरकर रसिकांची सुंदर दाद.. प्रयोगानंतर लगेचच ‘महानिर्वाण’चा प्रयोग असल्यानं जब्बार आणि आदरणीय पुजारीसर यांच्या प्रतिक्रिया कळू शकल्या नाहीत, पण ‘महानिर्वाण’च्या प्रयोगानंतर जेवण झाल्यावर जब्बारांनी सर्व कलाकारांसोबतच्या गप्पाष्टकात ‘बदकांचे गुपित’ची प्रचंड तारीफ केली. तसेच ‘ ‘घाशीराम.’, ‘महानिर्वाण’नंतर थिएटर अकादमीची सवरेत्कृष्ट निर्मिती’, ही आदरणीय पुजारीसरांची प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचली.

या श्रेयात नि:संशयपणे चंद्रकांत काळे आणि सर्व कलाकार/वादक तसेच तंत्रज्ञांचाही वाटा होताच. तसाच लेखक बाळ सीताराम मर्ढेकर आणि ही संहिता मी मंचस्थ करावी या हेतूनं मला ‘नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका’ हे पुस्तक आणि प्रेरणा देणाऱ्या मोहन गोखलेचाही. खरी गंमत तर पुढेच आहे. पहिल्या प्रयोगानंतर ‘चाली बऱ्या आहेत (बाकी काही खरं नाही अशा अर्थाच्या कायिक अभिनयासह)’ अशा प्रतिक्रिया व्यक्त करणारी काही मंडळी जब्बार पटेल आणि आदरणीय श्रीराम पुजारीसरांच्या प्रशंसेनंतर ‘बदकांचे गुपित’च्या यशाबद्दल माझे भरभरून कौतुक करू लागली. रंग बदलणाऱ्या सरडय़ाप्रमाणे माणसांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांचं कौतुकाच्या वर्षांवात झालेलं स्थित्यंतर हे अनपेक्षित, विस्मयकारक होतं तसंच मनोरंजकही. माझ्या आडनावात दडलेलं डक म्हणजे बदक आणि हे (मो)‘डकां’चे गुपित मला त्यांच्या लेखी राजहंस ठरवते झाले. माझी अवस्था मात्र ‘भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले’, अशी झालेली.

त्या रात्री बसमधून पुण्याकडे परतताना कितीतरी वेळ खिडकीपाशी बसून बाहेरच्या अंधारात बघताना मला बदकांच्या गुपितच्या चाली सुचतानाचा थरार आठवत होता. तालमीतले अनेक क्षण आणि पहिल्या प्रयोगानंतरच्या थंड प्रतिक्रियांमुळे आलेली निराशा, साऱ्या स्मरणांचा पट मन:चक्षूंपुढे उलगडत गेला आणि बदकांच्या समूहानं गायलेल्या भरतवाक्याचे शब्द कानात गुंजत राहिले.

क्व्याक क्व्याक क्व्याक.. बदकं आम्ही फाक-डे शिलेदार..

आता निजू ठिकठाक

क्व्याक क्व्याक क्व्याक.. चांदण्याचि झाक..

दाणा टिपा.. पाणी टिपा.. मारू नका हाक..

क्व्याक क्व्याक.. क्व्याक..

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music direction experience shareing of badkanche gupit
First published on: 21-04-2013 at 12:07 IST