चंद्रकांत कुलकर्णी
‘ध्यानीमनी’सारखंच मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तिन्ही भाषांमध्ये मी दिग्दर्शित केलेलं आणखी एक नाटक म्हणजे ‘गांधी विरुद्ध गांधी’! ‘प्रकाशनो पडछाया’ ही दिनकर जोशींची मूळ कादंबरी. ‘प्रकाशाची सावली’ हा स्मिता भागवतांनी तिचा केलेला मराठी अनुवाद. या कादंबरीच्या निमित्तानं इतिहासातील एका अंधाऱ्या भागावर प्रकाश पडला. आमचा नाटकवाल्यांचा मित्र आणि छायाचित्रकार उदय मिटबावकरनं ‘ही कादंबरी आवर्जून वाच,’ असं मला सांगितलं. ती वाचल्यावर मी याबाबत अजित दळवींशी बोललो. तोपर्यंत त्यांच्याही ती वाचनात आलीच होती. मात्र, नाटय़रूपांतरासाठी कादंबरीच्याही पलीकडे जाण्याची गरज होती. त्यासाठी इतर संशोधन, वाचन केलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं.. जे अत्यंत खरं होतं. बराच काळ गांधीजींविषयीची लुई फिशर, निर्मलकुमार बोस, नलिनी पंडित यांची पुस्तकं, बापूंचा उपलब्ध असलेला पत्रव्यवहार असं समग्र वाचन अजितदादानं नेटानं केलं. तो राज्यशास्त्राचा प्राध्यापक आणि नाटककार असल्यामुळे या संदर्भाचा अतिशय योग्य वापर पुढे त्यानं नाटकाच्या रचनेत केला.
दरम्यान, मी दिनकर जोशींना भेटून त्यांच्याशी नाटकाविषयी बोललो. गंमत म्हणजे तोपर्यंत हे नाटक कधी लिहिलं जाणार, निर्माता कोण, हे काहीही प्रतलावर नव्हतं. मग सुरू झाला नाटकाच्या लेखन-पुनल्रेखनाचा दौर. किती ड्राफ्ट्स झाले, किती वेगवेगळ्या पद्धतीनं आकृतिबंधाची रचना झाली, हे आता आठवलं तरी दमणूक होते. हरिलाल आणि त्याचं मन अशीही एक अनवट रचना अजितदादानं लिहून पाहिल्याचं आठवतं. सरकारी कार्यालयातल्या फायलींच्या गठ्ठय़ासारखा कागदांचा अक्षरश: ढीग जमा झाला. अजितदादा अथक परिश्रमानं त्याच्या वळणदार हस्ताक्षरातल्या प्रती कुरियरनं पाठवायचा आणि त्या अधाश्यासारख्या वाचून आमचं फोनवर प्रदीर्घ संभाषण! बरं, तेव्हा स्मार्टफोनही नव्हते- की हस्तलिखिताचे फोटो काढून धडाधड ‘व्हॉट्सअॅप’ करून झालं मोकळं! अंतिमत: जी संहिता तयार झाली ती मात्र अतिशय बांधेसूद होती. प्रवाही संवाद, नितळ भाषा, पारदर्शक भावना-विचारांचे कंगोरे असलेली अशी ती होती. तीन भाषांमध्ये भाषांतर होतानाही त्यातला भावार्थ हरवत नाही, ही या लेखनाची खासियत! नाटकात महात्मा गांधी बोलताना ते ‘असंच’ बोलतील आणि प्रतिवाद करताना ‘हरिलाल’चं म्हणणं अगदी योग्य आहे असं त्या क्षणी वाटायला लावण्याची ताकद, सच्चेपणा आणि ऑथेंटिसिटी या संवादांमध्ये आहे. या लेखनप्रक्रियेविषयी अजित दळवींनी ‘लोकसत्ता’मध्येच सविस्तर लिहिलंय. तेव्हा ती पुनरावृत्ती टाळून तिन्ही भाषांमध्ये हे नाटक सादर करतानाचे काही अनुभव, निरीक्षणं मी इथे नोंदवणार आहे.
अनेक चुका करणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीपासून ‘महात्मा’, ‘राष्ट्रपिता’ असा सन्मान, संबोधन प्राप्त होईपर्यंतचा अतिशय उत्कट आलेख ‘मोहनदास करमचंद गांधी’ या माणसाच्या आयुष्याला आहे. जगाच्या पातळीवरचं गेल्या शतकातलं हे एक अत्यंत महत्त्वाचं राजकीय, सामाजिक नेतृत्व! आधी स्वत:वर आणि मग इतरांवर ‘सत्याचे प्रयोग’ करत आयुष्य जगण्याची एक विशिष्ट, निरलस, आदर्श ‘पद्धत’ शोधून काढण्याची त्यांना ओढ होती. शिवाय जगताना तीच तत्त्वं आचरणात आणण्याचं व्रत आयुष्यभर पाळणारा हा महान माणूस. दिनचर्या, आरोग्य, धर्म, संस्कार, राजकारण, समाजकारण.. प्रत्येक बाबतीत चिंतन, मनन करून ‘सत्य, अिहसा, शांतता’ या तिहेरी सूत्राची पाठराखण करताना त्यांच्या आयुष्यात सतत वादळं येत गेली. आज त्यांच्या मृत्यूनंतरही ७० वर्षे जगभर गांधीवादाचा विचार पदोपदी केला जातोय, एवढं हे थोर व्यक्तिमत्त्व. त्यांच्या आचार-विचारांचं तेज इतकं प्रखर होतं, की अत्यंत जवळ असणाऱ्यांना अनेकदा त्याची झळ लागणं क्रमप्राप्तच होतं. मात्र, अशी परवड झालेल्या अनेकांचा एकच प्रतिनिधी शोभावा अशी दारुण शोकांतिका ‘हरिलाल’ या त्यांच्या थोरल्या मुलाच्या वाटय़ाला आली. इतकी करुण, की बापूंच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसमुदाय व्यथित मनानं उपस्थित होता, त्यात देशोदेशींचे प्रतिनिधीही होते, पण भणंगावस्थेत याच गर्दीत कुठंतरी मागं उभा असलेला हरिलाल आपल्या पित्याच्या पार्थिवाला अग्नीही देऊ शकला नाही. या उपेक्षेचा कळस म्हणजे त्यानंतर सहाच महिन्यांनी सायन हॉस्पिटलमध्ये बेवारस मृतदेहातला ‘हरी’ कुणीतरी येऊन ताब्यात घेईल म्हणून तिथंही अखेपर्यंत ताटकळतच होता!
आयुष्यभर पिता-पुत्रातला हा संघर्ष धगधगतच राहिला. अध:पतन, ऱ्हासाच्या या ‘हरिपर्वा’ला अन्याय, विद्रोह, बंडखोरीचा शाप होता. स्वभावातली चंचलता, मनाचा दुबळेपणा, असंख्य चुकीच्या निर्णयांची जंत्री असे अनेक ‘शोकात्म प्रमाद’ हा शोकांतिकेचा नायक आयुष्यभर करीतच राहिला. पिता-पुत्राच्या या संघर्षांला मानसिक, वैचारिक पाया होता. सार्वजनिक आयुष्यात स्वत:ला देशाच्या हवाली केलेल्या पित्याविरुद्ध वैयक्तिक हक्कासाठी, शिक्षणाच्या अधिकारासाठी झगडणाऱ्या हरिलालचीही स्वत:ची म्हणून एक बाजू होतीच. बापू आणि कस्तुरबांच्या एका छोटय़ाशा संवादखंडात नाटकातल्या या संघर्षांचं नेमकं सूत्र सूचित होतं-
बापू : मी काय करावं हरीसाठी असं वाटतं तुला?
बा : शक्य असेल ते सारं..
बापू : तो कसाही वागला तरीही?
बा : हो. तरीही.
बापू : कुणी दिला त्याला हा अधिकार?
बा : त्याच्या जन्मानं. तो मुलगा आहे तुमचा. तुम्हाला इतर अनेक मुलं आहेत; पण त्याला एकच पिता आहे!
‘सुयोग’चे सुधीर भट यांनी या नाटकाच्या निर्मितीचं धाडसी पाऊल उचललं. गोपाळ अलगेरी, मंगेश कांबळी हेही त्यांच्या मदतीला होते. दर्जेदार निर्मितीमूल्यं असलेल्या या प्रयोगाचं त्यांनी उत्तम नियोजन केलं. नाटकाचा निर्मितीखर्चही मोठा; पण सुधीर भटांनी त्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. सुमारे चाळीस वर्षांचा काळ असलेलं कथानक लाभलेल्या या तीन अंकी रचनेत दिग्दर्शक, नट आणि तंत्रज्ञांसाठी मोठं आव्हान पेरलेलं होतं. दक्षिण आफ्रिका ते राजघाट अशा असंख्य स्थळांवर यातली दृश्यं घडतात. एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी ही मांडणी असल्यामुळे या नाटकाचं ‘प्री-प्रॉडक्शन’ तसंच हाताळलं गेलं. दिग्दर्शन साहाय्य करणाऱ्या शिल्पा नवलकर आणि आशुतोष भालेरावसह आम्ही अनेक तक्ते, वेळापत्रकं, याद्या केल्या. वेशभूषाकार असिता जोशीनंही खूप तपशिलात जाऊन काम केलं. असंख्य पात्रं, स्थळ-काळ-वयानुसार गांधीजींच्या वेशभूषेत, रंगभूषेत, गेटअपस्मध्ये होणारे असंख्य बदल.. यांतली अस्सलता जपण्यासाठी असिता तर थेट ‘गांधी’ सिनेमाच्या वेशभूषाकार भानू अथय्यांनाही भेटून आली. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी विशेष साहाय्य केलं. आणि प्रत्यक्ष नाटकाच्या वेळी हा व्याप सांभाळला सुरेश ओटवणेकरांनी.
अशोक पत्कींनीही पार्श्वसंगीतासाठी अतोनात परिश्रम घेतले. संगीताची संकल्पना ठरवण्यापूर्वी त्यांनी सगळी तालीम दोनदा पाहिली. तालीम संपल्यावर त्यांनी नाटकाला दिलेली पहिली दाद मला आजही आठवते. चाळीस वर्षांचा हा अवकाश त्यांनी संगीताच्या मदतीनं अक्षरश: भारून टाकला. सलग दोन-तीन दिवस झालेल्या रेकॉर्डिगला जवळपास सर्व टीम प्रत्यक्ष उपस्थित होती. या नाटकाचं ध्वनिसंयोजन करणं खूप किचकट आणि जिकिरीचं होतं. काळ उभा करण्यासाठी ध्वनींचे अनेक तुकडे, प्रार्थना, जहाज, आगगाडी, घोषणांचे आवाज वापरले होते. पण नवनीत नवलकर आणि हृदयनाथ राणे यांनी स्पूल रेकॉर्डवर ते अप्रतिम वाजवले. तीच गोष्ट प्रकाशयोजनेविषयी. शशिकांत भावे, उमेश मुळीक यांनी अंधार-प्रकाशाचा हा खेळ नजाकतीनं केला. हे लिहिताना अचानक आठवलं- की नाटकात ध्वनिमुद्रित केलेलं नेहरूंचं भाषणही चक्क अतुल कुलकर्णीच्याच आवाजातलं आहे. संपूर्ण नाटकभर तो स्वत:च गांधींच्या आवाजात बोलत होता. पण ऐकणाऱ्याला एकदाही तो नेहरूंचा आवाज अतुलचाच होता अशी शंकाही आली नाही. स्थळ-काळ-कृतीच्या सूत्रात हे सगळं रचण्याची कठीण कामगिरी नेपथ्यकार अजित दांडेकरवर होती. प्रत्यक्ष नेपथ्यबदलाच्या वेळी मात्र अनेक वस्तूंची, फर्निचरची अडचण होतेय, रंगमंचावरील काळोखाची वेळही त्यामुळे वाढतेय असं जाणवलं. दिग्दर्शक म्हणून तपशिलापेक्षा मोजकेपणा आणि सूचकतेवर मी अधिक भर द्यायला हवा होता हे मला उमगलं. हा गोंधळ पुढे हिंदी आणि गुजराती नाटकांच्या वेळी डिझाईन करतानाच ठरवून दुरुस्त केला. नेपथ्यकार छेल-परेशभाईंनी ‘बुकसेट’ संकल्पनेची शक्कल लढवली आणि काम सुटसुटीत झालं.
नाटक उभारताना रंगमंचीय अवकाशातील वेगवेगळ्या घटकांचा वापर कसा करता येतो याचा दिग्दर्शक म्हणून खूप चांगला विचार या नाटकाच्या वेळी करता आला. विशेषत: हालचाली, कंपोझिशन्समध्ये दरवेळी काहीतरी नवीन करून पाहता आलं. एक ठळक आठवण आहे ती हरिलालनं गांधीजींना लिहिलेल्या लांबलचक अनावृत पत्राच्या दृश्याची. दिग्दर्शक म्हणून या प्रसंगानं मला खूप झुंजवलं. किशोर कदमसारखा तगडा नट सोबत होताच; पण हे पत्र एकाच जागी किंवा फार तर दोन एरियांत विभागलं गेलं तरीही त्यात एक साचलेपणा येण्याची शक्यता होतीच. पुन:पुन्हा ते दृश्य वाचताना अचानक लक्षात आलं की कुणाचंही पत्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा कानात त्याच व्यक्तीचा आवाज घुमत असतो. पत्रातल्या भावनांच्या तीव्रतेनुसार कधी कधी तर ती व्यक्ती जवळ बसून आपल्याशी बोलतेय असाही भास होतो. मग याच भावनेचा प्रत्यक्ष वापर मी हालचालींमध्ये करून पाहिला. आणि काय आश्चर्य! तो सगळा आशय, त्याची तीव्रता याचं रूपांतर एका उत्तम रंगमंचीय दृश्यभाषेत समोर उभं राहिलं. मग भारतातून पत्र लिहिणारा हरिलाल रंगमंचावर क्षणार्धात दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आणि बापूंच्या अगदी जवळ बसून बोलू लागला. रागाच्या भरात तो त्यांच्या भोवतीही फिरला आणि दमून पुन्हा भारतातही परत आला. उत्तम अभिव्यक्तीसाठी नटाला तर या डिव्हाइसचा चांगला उपयोग झालाच; पण प्रेक्षकांसाठीही ते दृश्य परिणामकारक आणि नावीन्याचा अनुभव देणारं ठरलं. नाटकाच्या सुरुवातीचं आणि शेवटचं दृश्यही असंच महत्त्वाचं होतं. आयुष्यभर एकमेकांशी नीट संवाद न झालेले हे पिता-पुत्र आयुष्याच्या अखेर यमुनेच्या किनाऱ्यावर राजघाटाच्या परिसरात जणू एकमेकांशी हितगुज करत बसलेत- अशी ही अर्थपूर्ण रचना! त्याचं लिखाणही अत्यंत मार्मिक, आशयघन असं आहे. आयुष्यभराच्या संघर्षांचा सूर आता खूप शांत, समजूतदार असा झालाय. ही दृश्यं बसवतानाही सगळ्या शक्यतांचा वापर करून पाहिला. ‘गांधीजींची काठी धरून पुढे चालणारा छोटा मुलगा’ ही एक सगळ्यांच्या मनात ठसलेली प्रतिमा आहे. शेवटच्या दृश्याच्या अखेरीस या चित्रचौकटीपर्यंत पोहोचल्यावर एक वेगळंच दिग्दर्शकीय समाधान मिळालं आणि नाटक अगदी अचूक बिंदूवर येऊन संपलं!
या नाटकाची पात्रयोजना ही अक्षरश: परीक्षा पाहणारी होती. भक्तीताई सोडून जवळजवळ इतर सर्वच जण पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर काम करणार होते. हरिलालसाठी पहिल्या दिवसापासूनच किशोर कदमच हवा हे मनात पक्कं होतं. ‘यळकोट’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ अशा तीन महत्त्वाच्या नाटकांमध्ये त्याच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेलं असल्यामुळे नट म्हणून त्याची समज व ताकद माहीत होती; आणि तो हरिलाल उत्तम साकारेल याविषयी खात्रीही! कसोटी होती ती गांधीजींच्या भूमिकेसाठी कलावंतनिवडीची. काही प्रस्थापित, नावाजलेल्या नटांचीही नावं तेव्हा विचाराधीन होती. आधीच हा विषय म्हणजे व्यावसायिकदृष्टय़ा धाडस. अशावेळी ‘नाव’ असलेल्या नटांमुळे नाटकाला मदत होईल, हा निर्मात्याचा दृष्टिकोन व्यवहार्य होता. परंतु हळूहळू एक विचार माझ्या मनात पक्का रुजत होता, की एखादा ‘अपरिचित’ चेहराच ‘गांधीं’ची भूमिका जास्त योग्यरीत्या साकारू शकेल. कदाचित परिचित कलावंताची ‘इमेज’ हा अडथळाही ठरू शकेल.
..आणि मग एक दिवस एनएसडीहून नुकताच मुंबईत आलेला अतुल कुलकर्णी माझ्या वांद्रय़ाच्या घरी भेटायला आला. समोरच्या मॅटवर मांडी घालून तो शांतपणे बोलत बसला होता. त्याचा ‘चाफा’ नाटकातला अभिनय तर मला फारच भावला होता. त्याचा चेहरा, त्याचे कान, मंद हसत बोलण्याची त्याची खास शैली.. मला ‘गांधी’ दिसू लागले होते! मी वरवर त्याच्याशी बोलत होतो खरा; पण आतला आवाज मला सांगत होता : हाच तो!
आणि मग पुढचा इतिहास घडला.. (पूर्वार्ध)
chandukul@gmail.com