जगण्याच्या प्रवासात दु:ख आपली साथ करतच असते; अगदी आपली इच्छा नसतानाही! प्रत्येक माणसाचे दु:ख वेगळे आणि त्याला सामोरे जाण्याची व त्या दु:खाचा आयुष्यावर परिणाम करवून घेण्याची क्षमताही वेगवेगळी. जगण्यातले एक मोठे दु:ख म्हणजे मृत्यूचे! कधी हे दु:ख मृत्युशय्येवर असलेल्यांचे, स्वत:च्या आजारपणाबद्दल, दिवसेंदिवस जवळ येणाऱ्या मृत्यूबद्दल असते; तर कधी आपल्या जवळच्या, प्रेमाच्या व्यक्तीला गमावण्याचे असते. मानसिकदृष्टय़ा आपण अशा घटनांना आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला कसे सामोरे जातो?

मनोचिकित्सक एलिझाबेथ क्युबलर-रॉस यांनी शेवटच्या आजाराने ग्रासलेल्या आणि ज्यांना मृत्यू समोर दिसत आहे अशा रुग्णांचा अभ्यास केला. वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारचा अभ्यास करून तो जगासमोर मांडणाऱ्या त्या पहिल्याच होत्या. या अभ्यासातूनच त्यांनी ‘On Death and Dying’ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या अभ्यासानुसार, मृत्युशय्येवर असलेले रुग्ण काही ठरावीक मनोवस्थांतून जातात. कालांतराने याच अवस्था मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांनाही लागू पडतात, असे लक्षात आले. एलिझाबेथ यांनी मांडलेल्या आणि कोणत्याही मोठय़ा दु:खाच्या वा दु:खातून बाहेर पडण्याच्या या पाच मनोवस्था म्हणजे-  नकार, राग, वाटाघाटी, नराश्य आणि स्वीकृती!

पहिली अवस्था म्हणजे त्या दु:खद घटनेला दिलेला ‘नकार’! जेव्हा असा एखादा दु:खाचा मोठा प्रसंग घडतो, तेव्हा आपले मन ते मानायला लवकर तयार होत नाही. एकदम मोठा धक्का आपल्या मनाला सहन होत नाही. त्यामुळे या अवस्थेत मन काही काळासाठी जे घडलेय ते नाकारायला बघते. ‘ती व्यक्ती आता आपल्यात नाही’ हे सारखे मनाला आठवून द्यावे लागते आणि त्यासाठी त्या साऱ्या दु:खद प्रसंगाची मनात पुन:पुन्हा उजळणी केली जाते. हळूहळू जसा हा नकार क्षीण होत जातो तसे मन दु:खाच्या दुसऱ्या भावनांचा अनुभव घेण्यास सज्ज होते.

यातील एक मुख्य प्रबळ अशी भावना म्हणजे- ‘राग’! परिस्थितीवरचा, डॉक्टरवरचा, स्वत:वरचा आणि प्रेमापोटी कधी कधी गेलेल्या त्या व्यक्तीवरचाही राग या अवस्थेत दिसून येतो. राग येण्याची आणखी एक हक्काची जागा म्हणजे देव! देवाने/ परिस्थितीने/ डॉक्टरांनी असे का केले, असा साधारण सूर असतो. खोलवर आपण बघितले, तर यात आपण कोणाला तरी दोष द्यायचा प्रयत्न करून आपल्या भावनांचा निचरा करत असतो. यात अर्थातच स्वत:चाही समावेश होऊ शकतो. जरी हा असा भावनांचा निचरा होणे आवश्यक असले, तरीही या अवस्थेत खूप वेळ राहणे आणि सारखा राग व्यक्त करणे याचे काही दुष्परिणाम असू शकतात. एक तर दुसऱ्यांवर काढलेला राग तुमचे नातेसंबंध पुढील आयुष्यासाठी बिघडवू शकतात; आणि स्वत:लाच दोषी मानले, तर त्याचेही रूपांतर तीव्र नराश्यात होऊ शकते.

याच्या पुढची अवस्था म्हणजे- ‘वाटाघाटी’! यात आपल्याला होत असणाऱ्या किंवा झालेल्या दु:खाच्या बदल्यात भविष्यकाळात काहीतरी करण्याची, देण्याची तयारी दाखवतो. देवाला बोललेले नवस किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा याच अवस्थेतून निर्माण होते. (उदाहरणार्थ, त्या आजाराच्या संशोधनासाठी देणगी देणे, त्या आजाराशी लढत असलेल्यांना मानसिक वा आर्थिक मदत करणे, इत्यादी)

याच अवस्थेचा आणखी एक प्रकार म्हणजे, जेव्हा आपण म्हणतो- ‘ठीक आहे, ती व्यक्ती त्रासातून तर सुटली. अजून सहन करावे लागले नाही. तिचे आयुष्य तर मजेत गेले.’ यात आपण आहे त्या परिस्थितीशी वाटाघाटी करून आपल्या मनाचे समाधान करत असतो. हे आपल्याला त्या दु:खातून बाहेर येण्यास आवश्यकच असते.

याच्या पुढचा टप्पा आपल्याला वर्तमानकाळात आणून उभा करतो आणि तो म्हणजे- ‘नराश्य’! काही घडलेच नाही, कोणामुळे घडले, घडणे कसे टाळता येऊ शकेल, या विचारांचा प्रवास शेवटी या टप्प्यावर येतो- जे घडले त्याचा अर्थ काय? आयुष्याचा अर्थ काय? या टप्प्यावर आपल्याला सगळेच निर्थक वाटायला लागते. ‘आपल्याला काही होत नाही’ ही नेहमी असणारी सुरक्षेची भावना गळून पडते आणि ‘कोणाला कधीही काहीही होऊ शकते’ यावरच मन विचार करायला लागते. जगायचे का व कसे, असे प्रश्न पडतात आणि माणूस त्याची उमेद, आशा काही काळासाठी गमावून बसतो.

आता या प्रवासातला शेवटचा टप्पा म्हणजे- ‘स्वीकृती’! आपल्या आयुष्यात झालेल्या घटनेचा स्वीकार, त्यामुळे बदललेल्या आपल्या आयुष्याचा स्वीकार, दु:खाचा स्वीकार! या अवस्थेत दु:ख कमी होते असे नाही; पण या दु:खाला स्वीकारून आणि समजून आपण पुढील आयुष्यासाठी तयार होतो. आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख पूर्णपणे कधी जात नाही; पण आता आपण आपल्या नेहमीच्या ‘नॉर्मल’ म्हणता येईल अशा मानसिक अवस्थेत पोहोचतो आणि आयुष्याला पुन्हा सुरुवात करतो. झालेल्या दु:खातून बाहेर पडण्याची ही सर्वात महत्त्वाची आणि शेवटची अवस्था!

पण आपल्याला झालेले दु:ख खरेच एवढे पद्धतशीरपणे क्रमाने या पाच अवस्थांमधून जाते? नक्कीच नाही. प्रत्येक माणसाचे दु:ख वेगळे आणि त्या माणसाच्या स्वभावानुसार व आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तो या वेगवेगळ्या अवस्थांतून जातो, तर काही अवस्थांतून जातही नाही. हे टप्पे याच क्रमाने येतात असेही नाही. दु:खातून बाहेर पडण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते आणि यात माणूस एकाच वेळी एकापेक्षा जास्त अवस्थांतल्या भावनाही अनुभवू शकतो. त्यातच दु:खातून बाहेर पडण्याचा प्रवास हा एक पाऊल पुढे तर दोन पावले मागे असाही कधी कधी होतो. त्यामुळे प्रत्येक अवस्थेला लागणारा वेळ हाही वेगवेगळा असतो.

हे सगळे असूनही या पाच अवस्थांचे महत्त्व कमी होत नाही. या पाच अवस्था आपल्या भावनांचे वर्गीकरण करतात आणि ढोबळमानाने आपल्याला प्रत्येक टप्प्यावर काय केले पाहिजे, हेही सुचवतात. आयुष्यातले दु:ख तर आपण टाळू शकत नाही; पण दु:खाची काम करण्याची पद्धत एकदा समजली, की कदाचित आपण त्याला जास्त समर्थपणे हाताळू शकू, नाही का?

parag2211@gmail.com