गिरीश कुबेर

ओपनहायमरची व्यक्तिरेखा, त्याच्या आयुष्यातले द्वंद्व आणि एकूणच त्या वेळचा काळ याची काहीही राजकीय चर्चा न करता केवळ चित्रपटाविषयी बोलणे म्हणजे गांधींची चर्चा केवळ रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या अप्रतिम ‘गांधी’ चित्रपटापुरतीच करण्यासारखे. तेव्हाही तसेच झाले. गांधी लक्षात घेतल्याखेरीज ‘गांधी’ केवळ एक कलाकृती म्हणून पाहणे सर्वार्थाने अपूर्ण ठरते. म्हणून ओपनहायमर या सिनेमाच्या निमित्ताने त्या काळाचीदखलदेखील महत्त्वाची ठरते. चित्रकर्त्यांला ओपनहायमर या व्यक्तिरेखेने आकृष्ट का केले असेल, याची उत्तरे त्यामुळे अधिक स्पष्ट होऊ शकतात..

Female Heroes of kargil war
Kargil War Female Heroes : कारगिल युद्धातील महिला योद्धा! पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांनी कसा राखला होता जखमी सैनिकांचा गड?
brave officers of the Indian Army reached Dras-Kargil on a motorcycle
भारतीय लष्कराच्या जाँबाज अधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले द्रास-कारगील!
loksatta kutuhal bill gates important contribution in the field of artificial intelligence
कुतूहल : बिल गेट्स
Narendra Modi Vladimir Putin AP
युद्धादरम्यान रशियन सैन्यात भारतीय विद्यार्थी भरती का होतायत? पुतिन सरकार म्हणाले, “आमची इच्छा नव्हती की…”
China Ambassador Feihong said that China is always grateful for the humanitarian service of Dr Kotnis
डॉ.कोटणीसांच्या मानवतावादी सेवेबद्दल चीन देश सदैव ऋणी ; चीन राजदूत फेहाँग यांचे भावोद्गार
PM Modi tells President Putin amid attacks on Ukraine
युद्धाने प्रश्न सुटत नाहीत! भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान मोदी यांचे खडेबोल
Last year, a video clip emerged which showed Tibetan spiritual leader Dalai Lama purportedly kissing a boy on his lips and it sparked outrage.
दलाई लामांनी लहान मुलाला किस केल्याचं प्रकरण, POCSO अंतर्गत कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली
lokmanas
लोकमानस: राजकीय कारणांसाठी जनगणना टाळू नये

गेले दोन आठवडे ओपनहायमर चित्रपटाविषयी बरेच काही छापून आले. त्यातील बहुतांश वाचले. आणि चित्रपटही पाहिला. तो पाहिल्यानंतर काही जणांनी त्याविषयी लिहिलेले पुन्हा वाचले. हे लिहिणाऱ्यातले बरेच जण ख्रिस्तोफर नोलानचे मोठे चाहते वा अभ्यासक आहेत. त्यामुळे त्याचे आधीचे चित्रपट, या चित्रपटाच्या मांडणीतील शैली, एकाच वेळी तीन-चार प्रतलांवरील घडामोडी गुंफण्याचा त्याचा प्रयोग आणि अर्थातच त्या चित्रपटातील कलाकारांचा नितांतसुंदर अभिनय असे बरेच काही लिहिले गेले. इंग्रजी भाषेत तर या लिखाणास पूरच आला म्हणायचा.

पण पंचाईत अशी की, हे सगळे चित्रपटाविषयी होते आणि आहे. चित्रपट सर्वोत्तमच आहे यात शंका नाही. परंतु त्याविषयी भरभरून लिहिणारे हे विसरतात की ओपनहायमर नावाची एक व्यक्तिरेखा खरोखरच होऊन गेली. ओपनहायमरची व्यक्तिरेखा, त्याच्या आयुष्यातले द्वंद्व आणि एकूणच त्या वेळचा काळ याची काहीही राजकीय चर्चा न करता केवळ चित्रपटाविषयी बोलणे म्हणजे गांधींची चर्चा केवळ रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या अप्रतिम ‘गांधी’ चित्रपटापुरतीच करण्यासारखे. तेव्हाही तसेच झाले. गांधी लक्षात घेतल्याखेरीज ‘गांधी’ केवळ एक कलाकृती म्हणून पाहणे सर्वार्थाने अपूर्ण ठरते. म्हणून ओपनहायमर या सिनेमाच्या निमित्ताने त्या काळाची दखल घ्यायला हवी. विविध आघाडय़ांवर मानवी प्रतिभेच्या दीपमाला उजळून निघत होत्या तो हा काळ. व्यक्तिश: मला या काळाचे प्रचंड अप्रूप आहे. त्याविषयी मिळेल ते वाचण्यासारखा दुसरा आनंद नाही. विज्ञानाचा वसंतोत्सव असे त्या काळाचे यथार्थ वर्णन ठरेल. लिओनार्दो द विन्ची, राफेलपासून मायकेल एंजेलोपर्यंत एकापेक्षा एक कलावंतांमुळे जसे पंधराव्या शतकातील रेनेसाँ घडले तसे काहीसे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडले.

ओपनहायमर चित्रपटात आणि अन्यत्रही पहिले महायुद्ध, राज्यक्रांतीनंतरच्या सोविएत रशियाशी सुरू असलेले शीतयुद्ध आणि पुढे हिटलरच्या जर्मनीने रासायनिक, जैविक आणि आण्विक शस्त्रास्त्र निर्मितीत घेतलेली आघाडी यांची चर्चा होते. जणू काही सर्व वैज्ञानिक शोधांमागे हे शीतयुद्ध आणि तत्सम कारणेच आहेत, असे हे सर्व पाहणाऱ्यांस वाटावे. वास्तविक इतिहास असा आहे की, पहिले महायुद्ध सुरूही झाले नव्हते तेव्हापासून विज्ञानाच्या भौतिक आणि रसायनशास्त्रात विविध प्रयोग सुरू होते आणि विविध ठिकाणच्या वैज्ञानिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही सुरू होता. त्यात पुढाकार घेतला होता बेल्जियमचे उद्योगपती अर्नेस्ट सॉल्वे यांनी. त्या देशाची राजधानी ब्रुसेल्स येथे पहिल्यांदा या उद्योजकाने १९११ साली ठिकठिकाणच्या भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञांस एकत्र आणले. या पहिल्या परिषदेचा विषयच मुळी किरणोत्सर्ग हा होता. मारी क्युरी, अर्नेस्ट रूदरफोर्ड, मॅक्स प्लॅंक, यांच्या बरोबरीने आईन्स्टाईन या परिषदेत सहभागी होते. त्या वेळी आईन्स्टाईन जेमतेम ३१ वर्षांचे होते आणि या परिषदेत सहभागी झालेला फ्रेडरिक लिंडरमन नावाचा ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ तर फक्त २६ वर्षांचा होता. हे लिंडरमन नंतर दुसऱ्या महायुद्धात विन्स्टन चर्चिल यांचे सल्लागार बनले.

त्यानंतर जवळपास दरवर्षी ही परिषद भरली. तिचे नावच सॉल्वे परिषद असे पडले. बहुधा आर्थिक कारणांमुळे जेव्हा सॉल्वे यांस ही परिषद भरवणे अवघड गेले तेव्हा बेल्जियमच्या राजाने यासाठी पुढाकार घेतला. त्याने ही परिषद भरवली. एखादा राजा असे काही मूलगामी काम करणाऱ्यांस एकत्र बोलवून वैचारिक घुसळण करू पाहतो ही घटनाच किती रोमांचकारी!

एव्हाना पहिले महायुद्ध सुरू झाले आणि संपले. त्यानंतर पहिल्या महायुद्धानंतरच्या परिषदेत जर्मन वैज्ञानिकांना मज्जाव केला गेला. कारण अर्थातच जर्मनीची युद्धखोरी. पण विज्ञानाच्या क्षेत्रातील हा भेदाभेद आईन्स्टाईन यांना आवडला नाही. खरे तर या गृहस्थाने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपल्या मातृभूमीचा.. म्हणजे जर्मनीचा.. त्याग केला होता. कारण? जर्मनीत वाढू लागलेला राष्ट्रवादाचा उन्माद. वयाची विशीही न गाठलेला तरुण राजकीय कारणांसाठी मातृभूमीचा त्याग करू शकतो ही घटना प्रचंड परिणामकारक आहे. ‘‘राष्ट्रवाद हा बालकांना होणारा आजार आहे. जणू मनास आलेले गोवर’’, असे म्हणून (‘Nationalism is an infantile thing.  It is the measles of mankind.’’) आईन्स्टाईन या तरुणाने आपली जन्मभूमी सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले. हिटलरचा फॅसिझम आणि तिकडे रशियात वाढू लागलेला कम्युनिझम या दोहोंची आईन्स्टाईन यांना घृणा होती. ‘‘फॅसिझम असो वा कम्युनिझम. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा संकोच करून त्यांस गुलाम करणारी राजकीय सत्ता ही मानवतेची शत्रूच मानली जायला हवी. व्यक्तीस स्वविकासार्थ किती मोकळीक, स्वातंत्र्य दिले जाते यावर त्या समाजाचे बरेवाईटपण ठरते,’’ हे आईन्स्टाईन यांचे विचार आजही अनेकांसाठी आम्ल-पित्तकारक ठरतील. पण असे असूनही केवळ जर्मनीचे आहेत म्हणून वैज्ञानिकांना या परिषदेत मनाई करणे आईन्स्टाईन यांस मान्य नव्हते. यावरून राजकीय मुद्दा कोठे सोडायचा याचे त्यांना असलेले भान कळेल. त्यामुळे जर्मन वैज्ञानिकांना प्रतिबंध केला म्हणून तेही या परिषदेत सहभागी झाले नाहीत.

या सॉल्वे परिषदांतली सर्वात महत्त्वाची गणली जाते १९२७ सालातील परिषद. या परिषदेचे वर्णन वाचले तरी आजही केवळ कल्पनेनेच मोहरून जायला होते. एव्हाना विज्ञानाच्या व्यापक हितार्थ आईन्स्टाईन यांनी आपला या परिषदेवरचा बहिष्कार मागे घेतला. कोण कोण होते या परिषदेस? आईन्स्टाईन, नील बोर, मारी क्युरी, वेर्नर हेसेनबर्ग, पॉल डिरॅक वगैरे २९ विज्ञानवंत या परिषदेत सहभागी झाले. त्यातील १७ जणांना पुढे नोबेल पारितोषिक मिळाले यावरूनच या परिषदेची उंची लक्षात यावी. काय काळ असेल हा? आईन्स्टाईन, रूदरफोर्ड, एन्रिको फर्मी, मॅक्स प्लँक, नील बोर वगैरे भौतिकशास्त्रज्ञ, पोलिओची लस विकसित करणारा जोनास साल्क, वातावरण आणि आपल्या शारीर प्रतिक्रिया यांवर मूलगामी निरीक्षणे मांडणारा (आठवतो कुत्र्यास खाणे देण्याची वेळ आणि त्याच वेळी घंटा वाजणे प्रयोग?) इव्हान पावलाव, मनोविकारतज्ज्ञ सिग्मंड फ्रॉईड, बट्र्राड रसेल इत्यादी विज्ञानेश्वर या एकाच कालखंडात होऊन गेले. इतकेच काय विख्यात गणिती/ भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फेनमन (‘शुअर्ली यू आर जोकिंग, मि. फेनमन’ या अत्यंत लोकप्रिय पुस्तकाचे लेखक) हाही या काळाच्या अखेरच्या टप्प्यातला. अणुबाँब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन’ प्रकल्पावर तरुण फेनमेन उमेदवारी करत होते. तुलनाच करायची तर आपल्याकडे न्या. रानडे, न्या. तेलंग, तर्खडकर बंधू, रकमाबाई राऊत, धोंडो केशव कर्वे, फिरोजशहा मेहता ते आगरकर, टिळक वगैरेंच्या काळाशी करता येईल. सगळे प्रकांडपंडित एकाच काळात. तेही राजकीय भूमिका घेण्यास मागेपुढे पाहत नव्हते. सॉल्वे परिषदेतील सहभागींसही राजकारणाचे वावडे नव्हते. हे एकापेक्षा एक बुद्धिमान वैज्ञानिक. पण हिटलरच्या वाढत्या ज्यूविरोधी वर्तनावर ताशेरे ओढण्यास ते मागेपुढे पाहत नसत.

या काळात ओपनहायमर हे नावदेखील कोठे नव्हते, हे लक्षात घ्यायला हवे. याचा अर्थ विज्ञानाच्या शास्त्रकसोटीच्या मुद्दय़ावर ओपनहायमर हे कोणी दुय्यम होते असे अजिबातच नाही. पण मूलभूत शास्त्राची गु तत्त्वे शोधणारे, ती उलगडून दाखवणारे आणि त्याच्या आधारे या विज्ञानाची उपयोजिता दाखवून देणारे यांत मूलभूत फरक असतो. ‘आयआयटी’त विद्यार्थ्यांना प्रमेयांद्वारे काही मूलभूत सिद्धांत शिकविणारे प्राध्यापक हे त्यांच्याकडून शिकून बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या वा अशी कंपनी काढणाऱ्यापेक्षा नेहमीच मोठे असतात. तसे ते मोठे मानले जायला हवेत. ओपनहायमर हे अमेरिकी अणुबाँबचे जनक असतील. आहेतच. पण विज्ञानाचे नोबेल त्यांना काही कधी मिळाले नाही. या प्रकल्पावर काम करणाऱ्या तब्बल ३१ जणांना नोबेल पारितोषिकाने गौरवले गेले. पण त्यात ओपनहायमर नाहीत.

या पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुद्धास तोंडही फुटलेले नव्हते तेव्हा- १९३८ साली, जर्मन वैज्ञानिकांस अणु विघटनात यश आल्याची बातमी आली. हे कळल्यावर मूळचे जर्मन असलेल्या आईन्स्टाईन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांस पत्र लिहून याबाबत काळजी व्यक्त केली. सम-वैज्ञानिक लिओ स्झिलार्ड हे यासाठी आईन्स्टाईन यांच्या मागे होते. त्यांनी महायुद्धाच्या कित्येक वर्षे आधी १९३३ साली याबाबत संशोधन केले होते आणि नंतर त्याचे पेटंटही त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रयोगातील साथीदार म्हणजे एन्रिको फर्मी. तेव्हा ‘‘हिटलरच्या नाझी जर्मनीच्या हाती अणुबाँब आला तर काय होईल,’’ अशा आईन्स्टाईन यांनी घातलेल्या भीतीतून अमेरिकेचा अणुबाँब निर्मितीचा मॅनहॅटन प्रकल्प सुरू झाला. पण तरीही अमेरिकेने आईन्स्टाईन यांस त्यापासून दूर ठेवले. का? त्यांच्यावरचा अविश्वास हे कारण. आपली मातृभूमी सोडून आधी स्वित्झर्लंड आणि नंतर अमेरिकेचे रहिवासी झालेल्या आईन्स्टाईन यांच्यावर सुरुवातीला अमेरिकेचा विश्वास नव्हता. ओपनहायमर यांच्याबाबतही हेच होते. आईन्स्टाईन तरी जर्मनीचे. पण ओपनहायमर अमेरिकेचेच. पण तरीही त्यांनाही अविश्वासाचा सामना करावा लागला. या दोहोंत एक साम्य आहे.

व्यवस्थेला आव्हान देण्याची दोहोंची उपजत वृत्ती. दोघांतही एक प्रकारचे डावेपण दिसते. ओपनहायमर महाविद्यालयीन काळातील मैत्रिणीच्या निमित्ताने डाव्या विचारांच्या, चळवळीच्या सान्निध्यात आला. विचारातील डावेपण तारुण्यसुलभ असते. त्यामुळे या काळात ओपनहायमर डावीकडे झुकले असतील तर त्यात आश्चर्य नाही. पण तितकाही डावेपणा अमेरिकेस त्या वेळी पचायला जड गेला. डावीकडे झुकणे आणि थेट क्रूरकर्मा स्टालिनवादी असणे यात फार मोठा फरक आहे. तो लक्षात यायला अमेरिकी सत्ताधीशांस बराच काळ जावा लागला. अणुबाँब बनवता येणे ही एक बाब आणि तो बनवता येतो म्हणून लाखोंच्या संहाराची पर्वा न करणे ही दुसरी. उत्तुंग प्रतिभेच्या व्यक्ती मानवी सीमांत जखडून ठेवता येत नाहीत. त्यामुळे ओपनहायमर हे अमेरिकेस हवे त्या राष्ट्रवादी भावनेत स्वत:स जखडून घेत नव्हते. बाँबच्या वापरामुळे हजारो जीव हकनाक जातील याची जाणीव त्यांना होती. म्हणून त्याच्या वापराबाबत ते साशंक होते. पण या त्यांच्या साशंकतेचा अर्थ अमेरिकी सत्ताधीशांनी त्यांचे डावेप्रेम असा काढला. ज्याचे स्वत:चे काहीही जात नसते, जे स्वत: कायम सुरक्षित असतात असा वर्ग ‘व्यापक हिता’च्या नावाखाली हिंसेचे कायमच समर्थन करत आलेला आहे. या वर्गास एखाद्याचे प्राण घेणे जितके सोपे वाटते तितके विचारी व्यक्तींसाठी ते सहज नसते. एखाद्या दिवशी आपण चालवत असलेल्या रेल्वेखाली एखाद्याचा जीव गेला तर रात्र रात्र कशी झोप लागत नाही, हे रेल्वेचा मोटरमनही सांगेल. असे असताना हजारो, लाखो जणांचे प्राण आपल्या अस्त्रामुळे जाणार आहेत, हे सत्य पचवणे सोपे नाही. आणि ते केवळ ओपनहायमर यांनाच जड गेले असे नाही. तर खुद्द आईन्स्टाईन यांनाही ही बाब आयुष्यभर छळत राहिली. ‘‘जर्मनी अणुबाँब बनवेल ही भीती खोटी आहे, आपल्याला वाटते तितकी जर्मनीची याबाबत प्रगती नाही, हे आधीच लक्षात आले असते तर मी रूझवेल्ट यांना पत्र लिहिले नसते,’’ अशी कबुली आईन्स्टाईन यांनी नंतर ‘न्यूजवीक’ या साप्ताहिकाच्या मुलाखतीत दिली. आपल्या पत्रामुळे अमेरिकेने बाँब बनवला ही खंत त्यांना आयुष्यभर राहिली.

पण त्या वेळच्या अमेरिकेचा उन्माद असा की, केवळ या साशंकतेमुळे त्या देशाने आधी आईन्स्टाईन आणि नंतर ओपनहायमर यांच्या निष्ठांवर संशय घेतला. या दोघांनाही ‘सिक्युरिटी क्लीअरन्स’ नाकारला गेला होता. महायुद्धातील विजयाच्या उन्मादात त्या वेळी या दोघांच्या डावेपणातले मोठेपण कोणास लक्षात आले नाही. व्यवस्थेचा भाग असूनही अयोग्य कार्यात व्यवस्थेच्या सुरात सूर न मिसळता स्वत:चे मत मांडण्याची हिंमत आईन्स्टाईन यांच्याप्रमाणे ओपनहायमर यांनीही ती दाखवली. हे त्यांचे डावेपण.

‘‘वैज्ञानिकांनी राजकारणापासून दूर राहायला हवे’’ अशा बावळट विचारधारेचा पगडा असणाऱ्यांनी हे सत्य लक्षात घ्यायला हवे. विज्ञानाचा संबंध मानवी आहे आणि जे जे मानवी ते ते राजकारणापासून अस्पर्श राहू शकत नाही. तसे ते राहात असेल वा ठेवले जात असेल तर त्यात पुरेसे विज्ञान नसून राजकारणच अधिक आहे, हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आपण दाखवायला हवा. या संदर्भात दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचा दाखला देणे समयोचित ठरावे. अर्थविषयक दैनिकात असताना आणि ऊर्जाविषयांचा पाठपुरावा करत असताना कलाम यांचा त्या वेळी अनेकदा संपर्क आला. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वसतिगृहात मी, ‘टाइम्स’चा श्रीनिवास लक्ष्मण आदींनी कलाम यांच्याशी अनेकदा निवांत गप्पा मारलेल्या आहेत. ‘िवग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाची स्वाक्षरांकित प्रत त्यांनी ज्यांना स्वहस्ते दिली त्यातील मी एक. पुस्तक हाती पडल्यावर मी ते तातडीने वाचून संपवले. पण फारसे काही हाती लागले नाही, म्हणून तसे निराशच वाटले. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आलेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दबाव, अणुचाचण्या, त्याआधीचे त्या विषयावर सुरू असलेले प्रयोग, तंत्रज्ञान नाकारले गेल्याने त्याचा देशांतर्गत विकास करताना समोर आलेली आव्हाने, त्यामागील राजकारण आदी कशाचाच उल्लेख त्यात नाही. अशा विषयांवरील जागतिक पुस्तकांच्या तुलनेत यातून तसे काहीच हाती लागत नाही. सर्व काही छान छान नि गोड गोड. नंतर माझे हे मत मी कलाम यांच्या कानावर घातले. कलाम यांच्या चेहऱ्यावर त्यांचे ते विख्यात हसू तितके उमटले. बाकी काही ते बोलले नाहीत.

या पार्श्वभूमीवर व्यवस्थेविरोधात, नंतर निवासी देशाविरोधात भूमिका घेणारे आईन्स्टाईन, स्वत:च्या राष्ट्रप्रमुखास आवडणार नाही असे मत सुनावणारे ओपनहायमर मोठे, महान ठरतात. नोलानसारख्या चित्रपटनिर्मात्यास त्यांचा संघर्ष आकृष्ट करतो तो त्यामुळे. ओपनहायमर चित्रपटात तो काही अंशाने आपल्यासमोर येतो. जे चितारले आहे ते उत्तमच आहे.

.. पण वास्तव त्यापेक्षाही मोठे आहे. म्हणून ‘गांधी’ प्रमाणे ‘ओपनहायमर’ हा फक्त चित्रपट नाही, त्याची महत्ता त्याहून अधिक. तसेच ‘गांधी’ पुन्हा होण्यासाठी आणि ओपनहायमर, आईन्स्टाईन तयार व्हावेत यासाठी वातावरण निर्माण करण्याची इच्छा या चित्रपटाच्या कौतुकापेक्षाही महत्त्वाची!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber