मंदार अनंत भारदे 

नववर्षांच्या निमित्ताने आरंभशूरांची शपथाळलेली स्थिती आठवडय़ा-दोन आठवडय़ांची मजल कशीबशी गाठते. सारे काही पणाला लावून जेव्हा माणूस शपथ पूर्ण करायची ठरवतो, तेव्हा एकतर समोरच्याला अंकित लाचार करून सोडतो किंवा स्वत:चा जिंकण्याचा अहंकार तरी पूर्ण करतो. भावनेच्या आवेगात कुठली तरी जिवापेक्षा मोठी शपथ घेतली आणि नाही झेपले म्हणून अर्ध्यातच सोडून दिली, हेच खऱ्या अर्थी मानवीय कसे, हे सांगणारे काही मासले..

फडणवीसांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांना फोन केला. नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, ‘‘आपण राज्य उत्पादन शुल्कमंत्री हे मंत्रीपद आता रद्द करायला पाहिजे.’’ आता नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच ‘‘हे काय नवीन?’’ असे चमकून मुख्यमंत्र्यांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘नाही, मला कल्पना आहे की यामुळे तुमच्या पक्षाचा एक कॅबिनेट मंत्री कमी होतो म्हणून. पण काळजी करू नका, आपण त्याऐवजी दोन कॅबिनेट पदे तुमच्या पक्षाला देऊ.’’

फडणवीस दिलदार झाले की कुठेतरी बॉम्ब फुटतो याची कल्पना असल्याने मुख्यमंत्र्यांनी आवाजातली काळजी लपवत विचारले, ‘‘अहो पण काय झाले अचानक? वरून काही फोन वगैरे आला काय? तुमच्या वरचे थर्टी फस्र्टलाही अविरत घाबरवणारे फोन करण्यातून सुट्टी घेत नाहीत का हो?’’

‘‘तुमच्या वर आता कोणी राहिले नाही म्हणून तुम्ही लगेच आमच्या वरच्यांची काळजी करायचे कारण नाही आणि माझ्या आताच्या फोनचा हा विषयपण नाही. मला गुप्तचर विभागाचा एक रिपोर्ट मध्यरात्री प्राप्त झालाय. काल रात्री राज्यातल्या विविध बारमध्ये साध्या वेशातले आपले गुप्तचर गेले होते. त्यांनी एक अत्यंत धक्कादायक माहिती आणली आहे. काल वेगवेगळय़ा वेळी आणि वेगवेगळय़ा अवस्थांमधल्या आपल्या १०० पैकी ९९ नागरिकांनी आपापल्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून ‘‘भावा, आजचा हा शेवटचा. आता उद्यापासून परत बाटलीला हात नाही लावायचा.’’ अशी शपथ घेतलीय!

‘‘अहो, पण मग आपला तो कोण सुजाण नागरिक होता ज्याने शपथ घेतली नाही?’’

‘‘नाही, त्या एकाचे स्थळ -काळ : तारखेचे भान सुटले होते, त्यामुळे तुला नाही का उद्यापासून ‘‘दारू ‘झोकून’ यायचे बंद करायचे?’’ असे विचारल्यावर त्याने मी उद्यापासून ‘‘‘झोकून’ देऊन देश ताब्यात घ्यायची शपथ घेतो,’’ असे सांगितले. तर ते असो. राज्यातले लोक जर दारू पिणे बंदच करणार असतील, तर राज्याला उत्पादन शुल्क कशाचे मिळेल? आणि राज्याला जर उत्पादन शुल्क मिळणार नसेल, तर राज्याला उत्पादन शुल्क खाते तरी का हवे आणि त्या खात्याला मंत्री तरी कशाला हवा?’’

‘‘हे बघा फडणवीसजी, महाराष्ट्र राज्य झाल्यावर आतापर्यंत साठ / बासष्ट तरी थर्टी फस्र्ट झाले असतील. अहो, तुमच्याच काळात पाच थर्टी फस्र्ट झाले. लोकांनी दरवर्षी झडझडून शपथा प्रत्येक थर्टी फस्र्टला घेतल्या. झाला का कधी राज्याचा महसूल कमी? हे बघा, नागरिकांच्या शपथ घेण्याला राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायचे काहीच कारण नाही. गेली कित्येक वर्षे आपले नागरिक ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ अशी प्रतिज्ञा घेतात. झाले का सारे लगेच एकमेकांचे बांधव? पडले का सारे देशाच्या प्रेमात? शपथ घेणे आणि आपण ती कधी ना कधी नक्की पाळू शकू या कल्पनेत रमून जाणे हा आपला राष्ट्रीय विरंगुळा आहे.  या असल्या नागरिकांच्या शपथांनी जर आपण विचलित व्हायला लागलो तर आपण राज्य करूच शकणार नाही. आपण एकमेकांच्या बरोबर असायची शपथ घेतलीये ती मात्र आपण नक्की पाळूयात, हॅपी न्यू इयर देवेन्द्रजी!’’..

माझा एक मित्र वर्षांच्या शेवटी माझ्याकडे आला. ‘‘आपण ठरवून टाकलेय, उगा फालतू लोकांचे तोंड पाहायचेच नाही आता नव्या वर्षांत! आपण गरज आहे म्हणून लोकांकडून उधार घेतो आणि हरामखोर पैसे मागून जिणे हराम करून टाकतात! थर्टी फस्र्टच्या आधी प्रत्येकाच्या तोंडावर पैसे फेकून मारणार आणि नव्या वर्षांत परत अजिबात असल्या भंगार लोकांकडून पैसे घ्यायचे नाही, अशी माझी शपथ आहे. दे जरा एक लाख रुपये. दोन महिन्यात परत करतो.’’

‘‘अरे पण तू उधार घ्यायचे नाही असे ठरवले आहेस ना? मग माझ्याकडे तरी का मागतो आहेस?’’

‘‘भंगार लोकांकडून घ्यायचे नाही असे मी ठरवले आहे, तू काय भंगार आहे का? तू तो यार है अपना. मागच्या वेळेला केले होते त्याच अकाऊंटला संध्याकाळपर्यंत RTGS कर, उगाच उशीर करू नकोस. तू उशीर करशील आणि भंगार लोकांना उगाच मला तोंड द्यावे लागेल. बघ आता मी कशी जिरवतो एकेकाची ते,’’ असे म्हणून तो निघून गेला.

त्याच्या या असल्या शपथांची किंमत मी गेली अनेक वर्षे मोजतो आहे.

आज, उद्या अगदी या आठवडय़ाच्या शेवटापर्यंत न चुकता आजूबाजूच्या मोकळय़ा मैदानावर जा, लवकर जाल तितके बरे! कारण जसजसे दिवस जातील तसतसा हा बहर ओसरत जाईल. उरात धडकी भरावी अशा पद्धतीने ‘शपथाळलेले’ लोक चारी बाजूला फिरताहेत. दसऱ्याला सोनाराकडे किंवा दिवाळीला कपडय़ाच्या दुकानात असते तशी गर्दी खेळाचे साहित्य आणि कपडे विकत मिळतात त्या दुकानात आहे. आपापले त्रिकोणी देह घेऊन अनेक जण आणि जणी आज मैदानावर फेरी मारताहेत. त्यातल्या कोणाही एकाला निरीक्षणासाठी पकडा. त्याने नवे महागडे चालायचे बूट आणि मोजे, नवे टी शर्ट, ट्रेक सूट, थोडे अधिक पैसे असतील तर व्यायामाचे घडय़ाळ आणले आहे. शेवटी आरोग्य महत्त्वाचे, ते नसेल तर बाकी कशालाच काही अर्थ नाही, याबद्दल त्याची अतोनात आणि निरातिशय खात्री नुकतीच झालीये. त्याला स्वत:बद्दल आतून आता आपले आयुष्य बदलणार आणि निरामय आयुष्य हाताच्या टप्प्यावर आले आहे असे वाटते आहे. त्याच्या आजूबाजूला वेगाने चालू पाहणारे त्याच्यासारखेच नवथर शपथाळू त्याला क्षणभंगूर दिखावू वाटताहेत आणि त्याची शपथ मात्र त्याला अगदी कणखर वाटते आहे. वडे, समोसे असले क्षणिक मोह त्याचे कधीचेच गळून पडलेत, कधी एकदा मस्त प्रोटीन पावडर ताकात घालून पितो असे त्याला झालेय. रस्त्याकडेच्या वाफाळलेल्या चहाने आणि त्यात टाकलेल्या आल्याच्या वासाने त्याचा चालण्याचा तोल जरा ढळला, पण तो मोह त्याने टाळला आहे; आणि शेवटी ‘आवळय़ाचे सरबत खरे’ असे म्हणून त्याने रस्त्याच्या कडेला बरणी घेऊन बसलेल्या एकाकडे आवळा सरबत मागून चारशे सतरा मीटरच्या आपल्या चालण्याची यात्रा सुफळ संपूर्ण केली आहे.

आज, उद्या जर सकाळी खरोखरच तुम्ही मैदानावर असाल आणि हे सगळे अनुभवत असाल तर एक शक्यता अशीही आहे की, त्यातला शपथ घेतलेला तो तुम्हीच असू शकाल. नियमित जिमला जाण्याची शपथ घेतलेल्या लोकांना नियमित मैदानावर चालायला जाण्याची शपथ घेतलेल्या लोकांनी जास्त सन्मान द्यायला हवा.  

त्यांची शपथ तुमच्यापेक्षा जास्त कणखर आहे म्हणून नाही, तर तुमच्या पेक्षा जास्त पैसे त्यांनी खर्च केले आहेत म्हणून.

साधारण ८-१० डिसेंबरपासून त्याने चांगली जिम शोधायला सुरुवात केली. जिममध्ये गेल्यावर तिथल्या चारही भिंतींवरच्या आरशात विविध कोनातून स्वत:ला पाहिल्यावर आपल्याला जिमची किती प्रगाढ  गरज आहे हे त्याच्या लक्षात आले. आपण आधी महिनाभर जिम लावू असे ठरवून तो आला होता. पण तिथल्या सुडौल कन्येने त्याला सांगितले की, आमच्या जिमसाठी आता फक्त संपूर्ण एक वर्षांची वर्गणी भरणाऱ्यांचे सभासदस्यत्व शिल्लक आहे. त्याने त्याची आरोग्यपूर्ण जगण्याची शपथ आठवली आहे आणि स्वत:च्या मनाला समजावले आहे की, जर आपण एकदा वर्षांची वर्गणी भरली तर आपोआपच आपण पैसे वाया जाऊ नये म्हणून वर्षभर व्यायाम करू; आणि त्या तिरमिरीत त्याने वार्षिक सभासदत्व घेतले आहे.

मग त्याला सांगण्यात आलेय की नुसत्या जिमने काय होणार? ट्रेनर तर पाहिजेच, खरा खेळ ट्रेनरचाच आहे आणि आज जर त्याने वर्षभरासाठी ट्रेनर घेतला तर लगेचच एक शिस्तबद्ध व्यायामाचे सत्र सुरू होऊ शकेल. तसे जर त्याने केले तर त्याला एक जिमची बॅगपण फुकट मिळेल. त्याच सपाटय़ात त्याने ट्रेनरचे पैसे भरले आणि तिथल्या सुडौल सुंदरीने दिलेली बॅग गळय़ात अडकवून चारही बाजूच्या आरशात स्वत:ला सिकंदरासारखे बघत तो बाहेर आला आहे. त्यानेही बूट घेतले आहेत, जिमचे कपडे घेतले आहेत, प्रोटीनच्या पावडरचे अगदी बेढब दिसणारे डबे घरी आणले आहेत. अवाकाडो, पम्कीन अशा शब्दांचे अर्थ त्याने गूगलही केले आहेत आणि त्यांचे सरबत किंवा ज्यूसही आणले आहे.

वर्षांच्या शेवटी एकदा शेवटची बेदम पार्टी केली की मग नंतर त्याने निरामय आरोग्याला वाहून घेतले आहे. पोहोण्याच्या तलावाची वर्गणी भरणारे, घरच्याघरी योगासन शिकवणारी  पुस्तके विकत आणणारे किंवा योगासनांचा आपल्याला कंटाळा येतो झुम्बाच खरा, असे म्हणून त्याच्या क्लासला नाव घालणारे सगळे  शपथवीरांच्या  याच जमातीत येतात.  

भयंकर शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची शपथ घेणारी एक वेगळी जमात आहे. सगळय़ात जास्त प्लािनगचे किंवा कॅलेंडरचे अ‍ॅप याच काळात लोकांच्या मोबाइलवर डाऊनलोड होतात. आता घडय़ाळाच्या काटय़ावर आयुष्य जगायचे, बस झाले उगाच वेळ वाया घालवणे, आता सगळे प्लॅिनग करूनच उर्वरित आयुष्य जगायचे या शपथेत अडकलेल्या लोकांची ही जमात आहे. इतर लोक कसे काय आयुष्यातला इतका महत्त्वाचा वेळ उगाच वाया घालवतात? याबद्दल त्यांनी नव्यानेच सर्वत्र येताजाता गप्पांमध्ये आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

दिवाळीचा संकल्प हुकल्यावर दहावी, बारावी, कॉलेज किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी आत्ता बस झाले, एक तारखेपासून अगदी जीव तोडून अभ्यास करायचा अशी शपथ घेतली आहे. त्यातल्या प्रेमात पडलेल्यांनी आता परीक्षा होईपर्यंत भेटायचे नाही असे ठरवले आहे. अनेक नोकरी करणाऱ्यांनी या वर्षी नोकरीला लाथ मारायची आणि स्वत:चा काहीतरी व्यवसाय सुरू करायचे ठरवले आहे. ही नोकरीला ‘लाथ’ मारायची काय ‘किक’ मराठी माणसाला बसते तेच कळत नाही. चला, आता व्यवसाय करूयात आणि नोकरी सोडूयात अशा सात्त्विक भावनेत कोणीही नसतो. त्याला आधी नोकरीला लाथ मारायची असते! मला तर व्यवसाय करून खूप पैसे मिळवू यापेक्षा आता नोकरीला लाथ मारायला मिळेल हीच किक आपल्या मराठी माणसांना जास्त बसत असावी असे वाटते. 

आता अजिबात स्वत:ची कुचंबणा होऊ द्यायची नाही, काहीही झाले तरी आता तरी लोकांना स्पष्ट ऐकवून द्यायला शिकायचेच हा पण काही जणांनी केलाय. काहींना किमान दीड तास ध्यान करायचेय, कोणाला एखादे वाद्य शिकायचे आहे. आता स्वत:साठी थोडा वेळ द्यायचाच, अशी शपथ तर जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या माणसाने घेतली आहे.

शपथांचीपण फॅशन येते. गेल्या काही वर्षांपासून ‘डायट’ हा नवा ट्रेंड शपथेच्या यादीत आलाय. हर शख्स या  ‘बाबतीत’ परेशान सा है. आपल्या खाण्यात काहीतरी गंभीर चुकतेय असे ‘पैसे खाणारे’ सोडून सगळय़ांनाच वाटतेय. त्यामुळे प्रत्येकाचे काहीतरी वेगळे खाण्याचे प्लॅन आहेत. ‘सुग्रास’ या मराठी शब्दातल्या ‘ग्रास’ला लोकांनी काहीच्या काही गंभीरपणे घेऊन काहीही गवत, पालापाचोळा जेवणात खायला सुरुवात केलीय. ज्वारी, बाजरीला बासमतीची किंमत आलीय. कोणत्या तरी अडगळीत पडलेला ऋषीच्या नावाने कोणीतरी काहीतरी अन्न सांगतात आणि लोक ते खायची निमूट शपथ घेतात. मला एकाने गूळ घातलेली भयाण कॉफी दिली आणि आता मी हीच कॉफी पिऊन आरोग्य कमावत सुटलोय असे सांगितले. त्याच्या सुटलेल्या देहाला ‘मी मरून जाईन, पण ही असली कॉफी परत पिणार नाही,’ हे मी ठणकावून सांगितले.

वर्षांरंभीच्या शपथांचा हा गदारोळ जेमतेम जानेवारीच्या एखाद दुसरा आठवडा संपेपर्यंत ओसरून जाईल आणि लोकांची आयुष्ये शपथमुक्त होऊन परत वाहायला किंवा वाहवत जायला लागतील. आरोग्याच्या शपथा घेतलेले लोकपण शेवटी ‘मित्राला नाही म्हणता आले नाही,’ असे कारण देऊन या बंधनातून आपले पाय सोडवून घेतील. माझे आवडते दिवंगत कवी आनंद जोर्वेकर आपल्या एका गंभीर कवितेत एका वेगळय़ा संदर्भात म्हणतात-

‘वळून पाहू नकोस मागे शब्दांचाही रंग उडतो,

हलहलके शपथांवरती निमित्तांचा गंज चढतो’

कोणता तरी राजा अश्वमेधाचा यज्ञ करतो आणि घोडा जिथवर पळत जाईल तिथवर आपले राज्य आणि घोडा अडवला तर युद्ध अशी प्रतिज्ञा करतो. सारे काही पणाला लावून जेव्हा माणूस शपथ पूर्ण करायची ठरवतो, तेव्हा एकतर समोरच्याला अंकित लाचार करून सोडतो किंवा स्वत:चा जिंकण्याचा अहंकार तरी पूर्ण करतो. भावनेच्या आवेगात कुठली तरी जिवापेक्षा मोठी शपथ घेतली आणि नाही झेपले म्हणून अर्ध्यातच सोडून दिली हे मला मानवीय वाटते.

माणसे अशीच असतात. शपथेच्या मागे ते आयुष्याचा बळी देत नाहीत, ते हलकेहलके निमित्त शोधतात आणि शपथेच्या जंजाळातून आपले पाय मोकळे करतात. त्याच्या आजूबाजूचेही सारे असेच, सगळय़ांनीच शपथांवर निमित्तांचे अघ्र्य सोडलेले. सगळेच एकमेकांना सांभाळून घेतात. शपथेच्या धारदार तलवारीवरून चालणारे लोक हे बहुतांश वेळेला जगाला वेठीला धरूनच आपली शपथ सुफळ संपूर्ण करतात. कोणत्या तरी राजाच्या अहंकारासाठी मग राजा नाही धावत, कोणता तरी पर्याय नसलेला निष्पाप घोडा कोणी तरी अडवायची वाट बघत उगा उर फुटेपर्यंत धावत सुटतो.

या असल्या कुरूप शपथा सुफळ संपूर्ण न होण्यातच जगाचे भले आहे.

येणाऱ्या नवीन वर्षांत अघोरी शपथांच्या जंजाळातून आपले पाऊल सुटून शुभंकर ध्यासाच्या पथावर पडो. आणि रोज सकाळी आपल्या गुबगुबीत बिछान्यातून उशिरा जाग आल्यावर आपण भीष्म प्रतिज्ञेच्या भानगडीत पडलो असतो तर भीष्मासारखे काटय़ाच्या बिछान्यावर झोपावे लागले असते, नाही पडलो म्हणून हे सुख वाटय़ाला आले! ही अपार कृतज्ञता आपल्या सुटलेल्या शपथांबद्दल मनात दाटून येवो या शुभेच्छा!

 mandarbharde@gmail.com