विनोबाजींच्या हस्ते आनंदवनाचं उद्घाटन  झाल्यानंतर बाबा आमटेंच्या सहा कुष्ठरोगी सोबत्यांचा मुक्काम बांधून झालेल्या पहिल्या झोपडीत हलला. तोपर्यंत ही मंडळी वरोऱ्याला आमच्या मित्रवस्तीतील घरातच मुक्कामी होती. मग आमच्यासाठी पुढची झोपडी बांधण्याचं काम हाती घेतलं गेलं. ती बांधून पूर्ण होईपर्यंत बाबा आणि इंदू मला आणि प्रकाशला सोबत घेऊन वरोऱ्यातल्या आमच्या घरापासून पायपीट करत रोज आनंदवनात येत असत. हळूहळू दुसरी झोपडी उभी राहिली व आम्ही सारे आनंदवनात मुक्कामाला गेलो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांबूचं तरट, गावरान गोल कौलं आणि गवताच्या साहाय्याने उभ्या झालेल्या आमच्या या झोपडय़ा यथातथाच होत्या. निसर्गलहरींपासून त्यांचं आणि पर्यायाने आमचं संरक्षण म्हणजे जिकिरीचंच काम होतं. पावसाळ्यात तर पुरती भंबेरी उडत असे. छतांतून पाणी गळायचं. जोराने वारा-वादळ आलं की छप्पर उडून जायचं. शिवाय वाघ, बिबटे, रानडुकरं, कोल्हे, लांडगे, अजगर, साप, विंचू, इंगळ्या, घोरपडी वगैरेंची सोबत होतीच. राखणीसाठी बाबांनी चार गावठी कुत्री पाळली होती. ती एक-एक करत वाघाच्या भक्ष्यस्थानी पडली. वाघाने एका कुत्र्याला तर चक्क इंदूच्या खाटेखालून उचललं होतं! (आमचं सहजीवन त्याला मान्य होतं, म्हणून कदाचित त्याने आम्हा कुणावर हल्ला केला नसणार!) वाघ पाण्यासाठी घराजवळ येऊ  नये म्हणून इंदू रोज संध्याकाळी विहिरीजवळ एका मोठय़ा लोखंडी घमेल्यात पाणी भरून ठेवत असे. इंदू म्हणायची, ‘‘आनंदवन म्हणजे साप, विंचू, इंगळ्या यांचे आगारच. ते आमच्यासाठी रोजचेच पाहुणे! खरं तर इथे पाहुणे आम्हीच होतो, कारण ते इथले आद्य रहिवासी होते आणि आम्ही त्यांच्या हक्काच्या राहत्या जागेवर आक्रमण केलं होतं. झोपडीत एकदा मी टोपली उचलली तर आत भलामोठ्ठा नाग. मला तो दैत्यासारखा भासला! पण कदाचित त्याला माझ्यात त्याच्यापेक्षा मोठय़ा दैत्याचा भास झाला म्हणून की काय तो सरपटत निघूनही गेला.’’

मराठीतील सर्व संचिताचे कवडसे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle days of baba amte
First published on: 23-04-2017 at 01:10 IST