आतल्या तापाचं काय करायचं कळत नाही. रात्री झोप येत नाही. तळमळायचाही कंटाळा येतो. डास येऊ नयेत म्हणून दार-खिडक्या लावल्यामुळे व अंगभर पांघरुण घेतल्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. श्वासोच्छ्वासासाठी पांघरुण दूर सारावं तर डास दिसतो. खरं नाही, भास नाही, स्वप्नही नाही, असले चमत्कारिक खेळ सुरू होतात. फार मागे विसरून गेलेलं काय, काय पुन्हा आठवायला लागतं. कोण कुठली माणसं आपल्या झोपेत घुसतात. बिन-महत्त्वाचे एपिसोड सुरू होतात.
गेल्या काही दिवसांपासून मी आजारी आहे. हा आजार थोडा वेगळा आहे. आतून शरीर तापत जातं, पण बाहेर मात्र चटका बसत नाही. मी तोंडात थर्मामीटर धरून बसतो, पण पारा चढत नाही. सतत- आतल्या आत ताप चढतो, उतरतो. ताप उतरताच, ‘आता मी खडखडीत बरा झालो आहे, मला आता खूपच फ्रेश वाटतंय’- असं मनाला बजावत घराबाहेर पडणार तोच दडून बसलेले व्हायरस आतून शरीर तापवायला घेतात. खूप दुबळं वाटायला लागतं.
लहान-मोठे, खरे-खोटे सगळे डॉक्टर झाले. पण उपाय सापडत नाही. एका  डॉक्टरने तर गोळ्यांसोबत अंगाराही दिला, पण व्हायरस कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. आजाराचं कारण काही कळत नाही.
मला मनाचाच संशय आहे. अलीकडे मन ताब्यात राहत नाही. मन, मनाला- येईल तसं भटकत, भरकटत राहतं. आपल्याला जुमानत नाही. आपल्या आज्ञा पाळत नाही. मनाचा काही तरी प्रॉब्लेम झाला आहे.
पूर्वी म्हणे असं नव्हतं. मन, मालकाच्या आज्ञा निमूट पाळत असे. योगीमंडळी तर मनाकडून वाटेल ते करवून घेत. ते खिळ्याच्या बिछान्यावर झोपण्यापूर्वी मनाला समजावत- ‘मी लुसलुशीत गादीवर झोपलोय, मला गुदगुल्या होताहेत,’ अशी मनाला ऑर्डर देत. त्यामुळे खिळ्यांवर पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागे. त्यांना जगाच्या कल्याणाची स्वप्नंही पडत.
पूर्वी मीदेखील मनाला फसवायचे खेळ खेळत असे. ऐन उन्हाळ्यात, वरून सूर्य भाजून काढत असतानाही ‘बाहेर बर्फ पडतो आहे. हिमवर्षांव सुरू झाला आहे,’ अशी मनाला ऑर्डर देताच वरून शरीराला घाम फुटत असतानाही आतून थंडी वाजून  हुडहुडल्यासारखं होई. दोन-चार मैल उन्हात चाललो तरी काही वाटत नसे. परवा मनावर विश्वास टाकून पुन्हा हा खेळ खेळायला गेलो आणि गोत्यात आलो. ‘मनाने दगा दिला’ ती गोष्ट अशी-
रीतसर पावसाळा संपलेला असतानाही अचानक घाबरवणारा पाऊस सुरू झाला. ऐन रस्त्यातच पावसाने गाठलं. पहिल्या पावसातच सगळ्यांच्या छत्र्या हरवल्यामुळे कुणाकडेच छत्री नव्हती. धावाधाव सुरू झाली. मला घाई होती. पाऊस थांबण्याची शक्यता नव्हती. काय करावं असा विचार करत असतानाच मला मनाच्या खेळाची आठवण झाली. मी मनाला ‘बाहेर ऊन पडलंय’ अशी ताकीद देऊन भर पावसात चालू लागलो. काही तरी गोंधळ झाला. मनाला ढगांच्या गडगडाटात ऐकू गेलं नसेल किंवा मुद्दाम वाकडय़ात शिरून त्रास द्यायचा म्हणून असेल, मनाने जुमानलं नाही. वरून पाऊस झोडपत होता, पण आत ऊन पडल्यासारखं वाटत नव्हतं. आतही पाऊसच कोसळत होता. मनाने घात केला. मी आजारी पडलो. गादीवर झोपलो तरी खिळे टोचू लागले. झोप उडाली. उद्या या आजारात गेलोच तर बोलण्यासारख्या चार बऱ्या आठवणी मागे सोडाव्यात- म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करू लागलो. अचानकच्या चांगल्या वागण्याने लोक घाबरले. पडल्या, पडल्या चिंतन करून काही जीवनाविषयी बोललो तर ताप डोक्यात गेला म्हणून बरळतो आहे, असं वाटून लोक काळजी करू लागले. माझे विचार ऐकून ‘डेंग्यू झाला’ म्हणू लागले.
मुंबईत डेंग्यूच्या डासांनी दहशत निर्माण केली आहे. कुठे काही टोचलं तरी डेंग्यूचा डास चावला असं वाटून माणसं घाबरू लागली आहेत. काल-परवापर्यंत डेंग्यूचे डास समंजसपणे वागत होते. ते फक्त गरीब सर्वसामान्यांच्या अंगावर चालून जात. ‘जग सुंदर आहे,’ असं मनाला समजावत जगणाऱ्या सर्वसामान्यांना चावत. ते फक्त सर्वसामान्यांना चावत असल्यामुळे त्यांना कुणी फार गांभीर्यानं घेतलं नव्हतं. शासन, महानगरपालिकाही इतर महत्त्वाच्या कामांत गुंतल्यामुळे फालतू डासांमागे धावायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. डासांचं व्यवस्थित चाललं होतं. पण सतत माणसांत वावरल्यामुळे व माणसांच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे डासांच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली. समाज त्रास देणाऱ्यांचा सन्मान करतो. सर्व सुखसुविधा पुरवतो. त्रास देणारे सुखासमाधानाने जगतात, ही गोष्ट लक्षात येताच डास शेफारले. डासांचं डेअरिंग वाढलं. ते चाळ, झोपडय़ा सोडून बंगल्यात घुसू लागले. श्रीमंतांच्या अंगावर जाऊ लागले. आदराने ज्यांच्या पायावर डोकं ठेवायचं, अशा थोरा-मोठय़ांचे मुके घेऊ लागले.
थोरामोठय़ांना त्रास होतो म्हणताच सर्व यंत्रणा खळबळून जागी झाली. थेट वरून आदेश सुटले. डासांच्या नायनाटाची मोहीम हाती घेण्यात आली.
आमच्या घरासमोरच कचऱ्याचे अनेक लहानमोठे पर्वत उगवले आहेत. घाणीच्या पर्वतरांगांनी मुंबईला घेरले आहे. या पर्वतरांगांच्या मधूनच नाले झुळूझुळू वाहतात. लहानमोठी मुलं समोर खेळत असतात. काही मुलं घाणीचे पर्वत सरकवण्याचा खेळ खेळतात. चढून वर जातात, झेंडा रोवतात आणि जिंकल्यासारखे किंचाळतात. जिंकलेली मुलं खाली रांगणाऱ्या मुलांना घाणीचे डोंगर चढायला शिकवतात. मुलांना शाळेपेक्षा हे डोंगर जास्त आवडतात. इथं जगण्याचं जास्त चांगलं शिक्षण मिळतं, असं म्हणतात.
काही मुलं डबक्यांच्या किनाऱ्यांवर खेळतात. समोरच गॅरेज आहे. डबक्यात पेट्रोल सांडून इंद्रधनुष्य उमटतं. काही मुलं इंद्रधनुष्याला काठय़ांनी भोसकून रंग वेगळे करण्याचा खेळ खेळतात. सगळीकडे दिवसभर बालजल्लोष सुरू असतो. असो!
आता अचानक काही दिवसांपासून तोंडावर फडकं बांधलेली, हातात मशीनगनसारखं शस्र घेतलेली माणसं वस्त्या-वस्त्यांतून धूर काढत फिरताना दिसू लागली आहेत. श्रीमंतांच्या वस्त्या धुराआड दिसेनाशा झाल्या आहेत. सर्वत्र धूर दिसू लागला आहे.
धूरवाला दिसताच मुलं गलका करत धूरवाल्यामागे धावत सुटतात. मुलांना धुराच्या ढगात रोमँटिक झाल्यासारखं वाटतं. काही मुलं विषारी ढगात खूप प्रेमळ होत ‘स्लो मोशन’ने उडय़ा मारत एकमेकांना मिठय़ा मारतात, कवटाळतात हे बघितलं की, उचंबळून येतं. गलबलायला होतं. असो!
गोळ्या, धूर, अंगारे कसलाच उपाय चालत नाही. आतल्या आत ताप चढतो, उतरतो हे चालूच आहे. काय करावं, कळत नाही. मी सावधगिरीचा उपाय म्हणून चांगलं वागणं चालू ठेवलंय. सतत चांगलं वागण्याच्या टेन्शनमुळे तोल सुटतो आणि मी वाईट वागतो. हे असं का होतं, तेही कळत नाही.
परवा मी थकून स्वत:च्या दारापाशी उभा राहिलो, तेव्हा आतल्या आत व्हायरस डोकं वर काढू पाहत होते. पृथ्वीचा स्वत:भोवती फिरायचा वेग वाढल्यासारखा वाटत होता. समोरच्या शेजाऱ्यांना अचानक खूप आनंद झाल्यामुळे ते सुमारे १०० डेसिबल्सचा गोंधळ घालत होते. बाहेर प्रेमळ वागावं, असं वातावरण नसलं तरी प्रेमळच वागायचं असं ठरवून, मनाला प्रेम फवारायच्या सूचना देऊन मी घराची बेल दाबली. दरवाजा उघडला नाही. ऐकू गेलं नसेल असं वाटून पुन्हा प्रेमाने दोन-चारदा बेल वाजवली, पण दरवाजा हलला नाही. शेवटी दाराच्या कमरेत लाथ घातली. पटकन दरवाजा उघडला, पण लाथ घालण्यावरून वाद सुरू झाला. प्रेमात सोसावे लागते. सोसण्यानेच प्रेम वाढते, हे लक्षात घेऊन मी प्रेम फवारत गप्प बसून राहिलो.
खऱ्या प्रेमात म्हणे, कुजबुजावं लागतं. मीही कुजबुजायच्या तयारीत होतो. पण समोरच्या शेजाऱ्यांना आनंदाचे अ‍ॅटॅक्स येत असल्यामुळे आवाज वाढत चालला होता. कुजबुजणं शक्य नसल्यामुळं प्रेमाचं बोलण्यासाठी मला आवाज चढवावा लागला. चढय़ा आवाजाला शोभतील असे हातवारे करावे लागले. माझ्या प्रेम करण्याला भांडण समजून घरात राडा झाला. प्रेम अंगाशी आलं.
काही सुखी कुटुंबात तर म्हणे नवरा-बायको आयुष्यभर न बोलता निमूट बसून राहतात. भांडण न करण्यालाच ते प्रेम करणं समजतात. शेवटपर्यंत सुखासमाधानाने जगतात. असो!
शेजारी खूपच आवाज वाढला होता. शेजाऱ्यांनी उत्साहाच्या भरात इमारत पाडायला घेतली की काय, असं वाटून धस्स झालं. पण त्यांना विचारणं शेजारधर्माला धरून होणार नाही, म्हणून गप्प राहिलो. ‘मला प्रेम वाटते आहे’ असं मी सतत किंचाळत राहिलो, पण घरात कुणी विश्वास ठेवला नाही. शेवटी खूप बरं वागण्याचा मला त्रास होऊ लागला. प्रकृती ढासळते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मनही बंड करून उठलं. मग मी चांगल्या आरोग्यासाठी थोडा वाईट वागलो. खूप वाईट वागल्यावर सगळ्यांनाच शांत झाल्यासारखं वाटलं. घरात आनंदीआनंद झाला. प्रेमही वाटू लागलं.
आतल्या तापाचं काय करायचं, कळत नाही. रात्री झोप येत नाही. तळमळायचाही कंटाळा येतो. डास येऊ नयेत, म्हणून दार-खिडक्या लावल्यामुळे व अंगभर पांघरुण घेतल्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. श्वासोच्छ्वासासाठी पांघरुण दूर सारावं तर डास दिसतो. खरं नाही, भास नाही, स्वप्नही नाही, असले चमत्कारिक खेळ सुरू होतात. फार मागे विसरून गेलेलं काय, काय पुन्हा आठवायला लागतं. कोण कुठली माणसं आपल्या झोपेत घुसतात. बिन-महत्त्वाचे एपिसोड सुरू होतात.
सुमारे ४० वर्षांपूर्वी गोव्याहून कोकणापर्यंत केलेला प्रवास आठवायला लागतो. कंडक्टर स्वच्छ दिसायला लागतो. किरकोळ कंडक्टरच्या डोक्यावर केस नसतात, पण कानांवर मात्र केसांचे झुपके असतात. कंडक्टरच्या मळलेल्या शर्टाच्या कॉलरमागे, लाल काळ्या उभ्या-आडव्या पट्टय़ांच्या रुमालाची घडी असते. कंडक्टर उर्मट असतो. पूर्वी उर्मट माणसालाच कंडक्टर म्हणून घेत. तर त्या कंडक्टरने माझा सर्वासमोर सणसणीत अपमान केला, हे आठवून आता झोप उडते. तेव्हा मी गप्प बसलो, त्याचं वाईट वाटतं. सणसणीत डायलॉग मारून त्याचं थोबाड फोडायला हवं होतं, असं वाटत राहतं. मी चांगला डायलॉग सुचवत बसतो. रात्र सरते, डायलॉग सुचत नाही. शेवटी एक वाक्य सुचतं- मी कंडक्टरला बोलवून घेतो. सर्वासमक्ष कंडक्टरच्या तोंडावर वाक्य फेकतो. पुरुष खो-खो व स्त्रिया फिदी-फिदी हसू लागतात. तो पांढराफटक पडतो. बेल वाजवून बस कडेला घेतो आणि ड्रायव्हरच्या कुशीत शिरून रडायला लागतो. ड्रायव्हर त्याच्या कानावरच्या केसातून हात फिरवत राहतो. कंडक्टरला हुंदके आवरत नाहीत.
आता एवढं झाल्यावर निवांत झोप येईल, असं वाटत असतानाच अपमानाचा दुसरा एपिसोड सुरू होतो.
आमच्या शाळेत मोरे नावाचे एक मास्तर होते. ते दिसायला बरे नव्हते. चांगले कपडे घालून ते रुबाबदार दिसू पाहत. चांगले कपडे चढवले की, ते बेंगरूळ दिसत. वर्गात बऱ्या दिसणाऱ्या मुलांना ते झोडपत. त्यांचा सतत अपमान करत. अनेक मुलं घाबरून वाईट दिसण्याचा प्रयत्न करत. ‘आपल्याला अनेक मुली प्रेमपत्र पाठवतात,’ असं मोरे म्हणत. एकदा भर वर्गात त्यांनी दोन गुलाबी प्रेमपत्रं दाखवली. काही महत्त्वाचा मजकूर वाचूनही दाखवला. त्यात मोरेंच्या अलौलिक सौंदर्याचं वर्णन केलेलं होतं. ‘ते अक्षर मोरेंच्या अक्षरासारखं वाटतंय,’ असं म्हणताच त्यांनी मला भर वर्गात तुडवला होता. शिवाय मी कुठेही दिसलो की, ते मला न चुकता लाथा घालत. त्यामुळे मी प्रेमपत्राचा धसकाच घेतला. आयुष्यात प्रेमाच्या दोन ओळी कधी मला धड लिहिता आल्या नाहीत.
हे मनात आलं आणि पुन्हा झोप उडाली. डायलॉग मारून मोरेमास्तर ऐकेल अशी शक्यता नसल्यामुळे, मी रात्री मोरेचे हातपाय तोडण्याची योजना आखत बसलो. त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा, रस्ते, सवयी सर्व लक्षात घेऊन मोरे सहा महिने तरी लंगडत वर्गात आला पाहिजे, असा जबरदस्त प्लान तयार केला व यशस्वीपणे पार पाडला. मोरेला हॉस्पिटलात अ‍ॅडमिट केल्यावरच जरा हलकं वाटलं.
आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अशा अनेक फालतू गोष्टी करण्यात रात्र सरली. भूतकाळ दुरुस्त करता करता सकाळ झाली.
हे लिहितानाही तापाचं चढणं-उतरणं सुरूच आहे. त्यामुळे थोडा भरकटलो. पण चांगलं वागण्याचं, प्रेमाचं मी मनापासून बोलत होतो. आता काहींना ते बरळणं वाटू शकेल, त्याला इलाज नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satayar fatayar what to do of fever
First published on: 05-11-2012 at 09:29 IST