आपल्याकडे पहिलं सांगायचे कुणाचाबी वेल मांडवावर जात असनं तं आपुन तेव खाली वढू नी. कारण तव्हाबी आताच्यासारखा काही काही लोकायला नाद व्हता घड-मोड करायचा. कोन्हाचं बरं चाललं तं इचकुन द्यायचा.. पण आता तशा लोकायची संख्या गावात-समाजात लई राहिली नाही. आता तुम्हाला कोडं पडंन असे लोक गावात न्हाई, समाजात न्हाई. ते गेले कुठं? तर ते गेले प्रशासनात, सरकारात, व्यापारात. पण तिथं जाऊनबी ते आपली वृत्ती, संस्कृती इसरले नाही बरं का.. उलट त्याह्य़च्या शहानपणात भरच पडली. कोन्हाचाबी येल मांडवावर चालल्याला वढला की पाप लागतं. मंग त्याह्य़नं ठरीलं येलच जर नाही उगु देला तं वढायचं पापच लागत नाही. म्हणून ते गेल्या कईक वर्सापसून शेतमालाची कोंडी करून ठूली. लाखो लेकी-बाळीच्या लग्नाचं ‘बी’च बापाच्या मनात रुजू द्यायचं नाही. अन् त्याच्यात साथीला आला पाऊस. दुस्काळानं काळजातला ओलावा डोळ्याकडं नेला. मंग सांगा कशाला उगंन येल?
बरं त्या बापाला जात नाही. गावात लग्न आसू, का मंगलपरीनय आसू, नाही तर जश्नेशादी.. सगळेच सारखीच करतेत चढावढीनं.. एकजात.. खरंच आमच्यात लग्नाकार्यात, सुख-दु:खात, देण्या-घेण्यात, उठण्या-बसण्यात जात येत नाही. भवाळ्या ताणून बघू नका. आमच्या इथं जात-पात आता फक्त मतदानापुरतीच पाळली जाती. पण बाकी सगळ्यायची लेबलं सारखीच.. आहो खरंच एकमेकाची बराबरी चढावढीनं करेतत.. तशी आपल्या देशालाच दुसऱ्याची बराबरी करायची लई सवय.. दुसऱ्याची नक्कल करण्यात आपुन पटाईत. मंग ती परदेसी सिनेमाची आसू नाही तं रहानीमानाची.. तशीच गावाला धूमधडाक्यात चढावढीवर लग्न करायची सवय लागली व्हती. तसं गावात एकानं दुसऱ्याची बराबरी करायला काही आकाश-पाताळ एक करायची गरज नाही. सगळ्यायचीच लेवल सारखी आसल्यानं.. लईत लई व्याजानं काढायचे नाही तर एक्कर अर्धा एक्कर इक्रीला काढायचं.. बराबरी मंजी काय तं वरल्या आळीतल्यायनं गावाला चूलबंद आवतनं द्यायला दोन पोते नुकती गाळली, तर खाल्ल्या आळीतल्यायला बी गावाची चूलबंद करायला तितकीच लागती- शिल्लक गाळली तं उगं उकंडय़ाची भरती. तिकडच्यासारखं नाही चार हजार कोटीचा समुद्राकाठी बंगला सगळ्यायलाच नाही बांधता येत. म्हणून निदान गावात तरी सगळे एक्याच लेवलचे मानसं राहतेत. सगळे एकजात. त्याच्यामुळं आमच्यात ठरवून बी दंगल पेटत नाही.
सगळे आमचेच आम्ही झाल्यामुळं ना कधी एकमेकाच्या विरोधात मोर्चा निघालाय ना संप.. ना कधी कोन्ही बंदचा इशारा देलाय. लोकशाहीमधी गिफ्ट मिळालेलं कोणतंच हत्यार न वापरल्यानं ते गंजून गेलंच. पण आम्ही हारलोत बी. आमची गत त्या रणांगणातल्या आर्जुनासारखी झाली. आपल्याच मानसाच्या इरोधात कुठं उचलायचं आसतं का हत्यार? म्हणून आम्ही गप्प. सत्ताधाऱ्यांच्या अन् दोघायच्या बी गटात आपलेच मानसं. घोटाळ्यात बुडालेले अधिकारी-पदाधिकारी सगळेच आपले ना. आता सारेच भारतीय माझे बांधव म्हणल्यावर सवालच नाही. कोणाच्या विरोधात हत्यार उचलावं? सरकारच्या? ज्याच्यात आपलेच बसलेत. समाजाच्या? जो आपल्यापासूनच बनलाय. काय करावं हे सांगणारा कृष्ण यायची कशाला वाट पाहात बसायचं? वाईट गोष्टीच्या पोटीच चांगल्याचाबी जन्म होतू.. अवघड वाटच जास्त उंचीवर घेऊन जाती..
या आस्मानी अन् सुलतानीपुढं बाप हतबल झालाय. ‘लेकी’ हो, तेव आता तुमचं काहीपण ऐकून घ्यायला बसलाय. आता सही टायमिंग हाई बापाच्या मदतीनं रणांगणात रथाच्या चाकात (चक्रात) गुंतलेल्या हुंडारूपी कर्णाला नष्ट करून स्त्रीदास्याला तिलांजली देण्याचा.. उद्या तुमच्या बापाच्या खिशात आवसानं आलं तं ही रूढ आजून विकृत होईन. हीच संधी हाई, लग्न ही फक्त स्त्रीची/तिच्या बापाचीच फक्त गरज नाही.. हे वरडून सांगा.. तेबी जाहीर कसं, तर असं – ऐका हो ऐका.. एखाद्या बापाला आपल्या लेकीचं लग्न जोकलं नाही म्हणून.. आयुष्यभर ती कुमारीच राहिली असी एखादी म्हतारी केस दाखवा अन् इनाम मिळवा. तसंच त्याच गावात बिन लग्नाचा एक बी पुरुष नाही तर महापुरुष नसल्याचं निल सर्टिफिकीट दाखवा, अन् भरघोष बक्षीस मिळवा हो.. अन् पुन्हा तंबी देऊन सांगा आता पहिल्यासारखं उपवर झाल्याल्या पोऱ्हीयच्या माय-बापानं रात रात जागून मह्य़ा पोऱ्हीयचं कसं होईन अशी चिंता करीत बसन्याचा काळ आता शेवटच्या आकाळ्या द्यायलाय याचं भान ठॉ.. मागणी अन् पुरवठय़ातल्या फरकानं तयार झाल्याला खड्डा आता हुंडय़ानं भरून काढायचं इसरा. त्याच्यासाठी पोऱ्हीच पाहिजीत म्हणा. अन् हो.. ही बी जाणीव करून द्या ते बघा पोऱ्ही (सुना) मिळविण्यासाठी पोऱ्हायचे बाप आता उघड जरी नाही तरी अंधारातून उपवर पोऱ्ही सोधीत फिरायलेत. तव्हा त्याह्य़ला उघडं पाडून हुंडय़ासारख्या बुरसट रूढीला नागडं करायची येळ आलेली हाई. अन् हे बी ठासून सांगा की जगातल्या समस्त पोऱ्ही एकवटल्यात- हुंडय़ाचा मांडलेला बाजार उधळून लावन्यासाठी. त्यानंच बापाच्या गळ्याचा आवळलेला फास तुटन..
हे बी सांगायचं लग्न ही फक्त आमची, आमच्या बापाची गरज नाही.. तर काळ अन् पुरुषांची बी गरज हाई.. याचा साक्षात्कार लवकरच घडविणार हाईत अन् हे सगळं कबूल करण्यासाठी लोकशाहीत गिफ्ट मिळाल्यालं हत्यार ‘संप’, ‘बंद ’, ‘चक्का जाम’ याचा वापर करणार.. आहो दुस्काळात फसलेल्या बापाच्यानं औंदा कन्यादान होनार नाही. यंदा आम्ही वस्तूच्या पंगतीतून भाईर पडणार.. आमचं ‘दान’ करायची रीत मोडायची हीच ती संधी. असं समजून कामाला लागा की बाप तुमचं लग्न त्याच्या मुक्तीसाठी करायचा. तुम्हाला कैदेत टाकून तेव मुक्त व्हायचा. तुमचं लग्न करून तेव यज्ञाचं पुण्य मिळवीत आलाय.. तुमच्या स्वातंत्र्याची आहुती देऊन पण यंदा त्याचे हात निसर्गानं अन् व्यवस्थेनं बांधलेत, पण हे तुमच्या पथ्यावर पडणार हाई. ह्य़ा दुस्काळानं अन् सरकारी धोरणानं यंदा त्याच्याच्यानं हा लग्नरूपी यज्ञ होणं अशक्यच. अन् पुन्हा हेबी सांगतो ह्य़ा यज्ञातून मिळणाऱ्या आहुतीचा भकं खायची सवय लागलेला समाजरूपी राक्षीस भुकेपोटी अकांडतांडव करणार.. आकाश-पाताळ एक करणार. कारण खायची सवय लागली.. हा भुका राक्षीस यज्ञातली तुमची आहुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या रचणार. त्यात हुंडय़ाला उधार ऱ्हातो म्हणणार; अर्धे नगदी, अर्धे उद्या म्हणणार; फक्त सोनंच घाला म्हणणार; लग्न यंदा करून पैसं पुढं द्या म्हणणार. लग्न साधं करू, गेटकीन, वनडे करा, खर्च वाचवा, तेच निम्मे पैसे आम्हाला द्या. घाईला येणार. काकुळतीला येणार. नाक घासणार. तुम्हाला गळ घालणार.. पण बापाला सांगायचं पुढचे काही दिवस याह्य़ला अजिबात भीक घालायचं नाही.. त्याच्या काळजावर दगड द्यायचा. नाही नाही तुम्ही काळजी करू नका, त्याच्या काळजाला काही होत नाही.. एऱ्ही तरी तेव तुमच्या रूपानं त्याच्या काळजाचा तुकडा तेव निष्ठुरांच्या हातात देतुच ना? आता भावनेचा ‘भक’ द्या. आताची आवस्था क्रांतीचं लक्षण दिसतंय.. टोक गाठल्याबगर क्रांती होत नसती. ते टोक आता तुमच्या पायाखाली ह्य़े. तुम्ही टोकावर उभ्या हाईत. ठरवा. कडेलोट करून घ्यायचा का क्रांती हे तुम्ही ठरवा. समाजमनात सुरू केलेला एक शुल्लक संस्कार.. समाजाचा कणाच मोडीन असं कव्हा वाटलंच नसनं.. ग्रामीन अर्थव्यवस्थेचे पाय कापून व्यवस्थेनं पांगळ केलं अन् लग्नासारख्या हुंडय़ासारख्या रूढीनं तिचा कणा मोडून लाचार केलं.. दिल्या घरी बळंच सुखी राहून बापाची मान ताठ करण्यापरीस, जन्मल्या घरीच सुखी राहीन म्हणून पाठ मंजी कणा ताठ कर.. हे सगळे ताळ्यावर येवूस्तर.. मंग येल मांडवावरच काय गगनात जायला बी कोन्ही रोकनार नाही.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivar
First published on: 09-12-2012 at 12:05 IST