रघुनंदन गोखले

पूर्वीचे दिवस आता इतिहासजमा झाले, एखादा आनंद येऊन सर्वाना हरवून जायचा. त्यामुळे या निराशेतही आपल्याला हा आशेचा किरण आहे की, भारताची बुद्धिबळात सर्वंकष प्रगती होते आहे. आणि त्यामुळेच स्पर्धेत आयत्या वेळी आलेल्या दिव्या देशमुखनं जगज्जेतीला मागे टाकून ‘टाटा स्टील इंडिया’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

‘टाटा स्टील इंडिया’ ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते, याचं कारण तिथे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाची रक्कम. भारतात बुद्धिबळ स्पर्धेसाठी जवळपास ७० लाख रुपयांची बक्षिसं देणाऱ्या या ‘बुद्धिबळ जांबोरी’मध्ये परदेशातून मोठमोठे खेळाडू येण्यासाठी उत्सुक नसले तरच नवल! वर सर्वाना विमान खर्च अधिक पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असते ती वेगळीच. या वर्षी सगळय़ांची नजर होती ती प्रज्ञानंदवर. त्यानं जलदगती आणि विद्युतगती या दोन्ही स्पर्धामध्ये तिसरा क्रमांक मिळवूनही संमिश्र यश मिळवलं असं मी मानतो. कारण लोकांची अपेक्षा मॅग्नस कार्लसनच्या अनुपस्थितीत प्रज्ञानंदनं पहिलंच यावं अशी होती. पण विचार करा, प्रज्ञानंदला विश्रांतीसाठी वेळ मिळालेला नव्हता. तो तयारी कधी करणार होता? या पार्श्वभूमीवर कोणीही कल्पना केलेली नसताना आशियाई विजेत्या दिव्या देशमुखनं कमाल केली.

 जगज्जेतीला नमवताना..

आतापर्यंत गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन, निहाल या मुलांनी मिळवलेली बुद्धिबळप्रेमींच्या कौतुकाची जागा पटकावण्याचा पराक्रम नागपूरच्या आशियाई विजेत्या दिव्या देशमुखनं केला आणि भारताच्या कन्यकाही बुद्धीच्या क्षेत्रात जराही कमी नाहीत याची जाणीव सर्व जगाला करून दिली. दिव्यानं हा महापराक्रम महिला जगज्जेत्या चीनच्या जू वेन्जू हिच्या साक्षीनं आणि तिलाच मागं टाकून केला.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी: पदकांची चेन्नई एक्स्प्रेस..

खरं तर दिव्याचं नाव या स्पर्धेत नव्हतंच. आयत्या वेळी प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आयोजकांनी १७ वर्षांच्या दिव्याला बोलावलं. स्पर्धेत सर्वात लहान असलेल्या दिव्याचं रेटिंगही सर्वात कमी होतं. तिच्या प्रतिस्पर्धी म्हणून कोण कोण होत्या याची थोडक्यात ओळख करून घेऊ या.

आव्हानांचा डोंगर..

जू वेन्जू गेली अनेक वर्षे महिलांची जगज्जेती आहे. नुकताच तिनं तिच्या देशाच्या ली टिंगजी हिचा पराभव करून चौथ्या वेळा जगज्जेतेपद मिळवलं आहे. युक्रेनची अन्ना उशेनीना ही माजी जगज्जेती आहे. जॉर्जियाच्या निनो बाटशीयाश्विली हिला तिच्या चेन्नई ऑलिम्पियाडमधील वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्या पराक्रमामुळे बोलावण्यात आलं असावं. अनुभवी इरिना क्रश (अमेरिका) आणि भारतात येऊन २०१९ साली लागोपाठ १८ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील जगज्जेतेपद जिंकणाऱ्या रशियन पोलिना शुवालोवाला बोलावून आयोजकांनी छान ताळमेळ साधला होता.

भारताकडून कोनेरू हंपी, द्रोणावली हारिका असताना कोणी अन्य भारतीय मुलगी त्यांच्या पुढे जाईल अशी कल्पनाही करणं अशक्य वाटेल, इतकं वर्चस्व या दोन मुलींनी गेलं एक तप गाजवलं आहे. त्यांच्या जोडीला गेल्या वर्षीच्या महिला जागतिक जलदगती स्पर्धेची कांस्य पदक विजेती साविताश्री आणि सातत्यानं वरच्या दर्जाचा खेळ करणारी वंतिका अग्रवाल या किशोरवयीन खेळाडू होत्या. अर्थात दिव्याचा पराक्रमही कमी नव्हता. या वर्षीच ती आशियाई विजेतेपद जिंकून आली होती आणि गेल्या वर्षी ती राष्ट्रीय महिला विजेतीही होतीच! तरीही एवढय़ा उच्च दर्जाची स्पर्धा खेळण्याची तिची पहिलीच वेळ होती.

सुरुवातीपासूनच धडाका..

प्रत्येक खेळाडूला संपूर्ण डाव खेळण्यासाठी २५ मिनिटे देण्यात येत होती आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद घडय़ाळात आपोआप जमा होतात. ज्या वेळी राऊंड रॉबिन स्पर्धेचं नंबर काढलं गेलं त्या वेळी १० जणींमध्ये दिव्याचा क्रमांक आला दहावा. आता ही शेवटची मानांकित खेळाडू शेवटच्या क्रमांकावर येण्याचा हा अपशकुन तर नव्हे, अशी शंकेची पाल सर्वाच्या मनात चुकचुकून गेली; पण दिव्यानं त्या १० क्रमांकाला फुटबॉलमधील १० वा क्रमांक ठरवला आणि सर्वोत्कृष्ट खेळ केला. पहिलीच लढत होती हरिका विरुद्ध दिव्या अशी. भारताच्या जुन्या आणि नव्या पिढीच्या या द्वंद्वात तरुणाईचा विजय झाला. एक प्यादं गमावल्यानंतरही हरिकाला बरोबरीची संधी होती; पण गोंधळून गेलेल्या हरिकानं चूक करून डाव गमावला. पहिल्या दिवशीअखेर दिव्या आणि वंतिका आघाडीवर गेल्या; पण त्यातही दिव्यानं जु वेन्जूविरुद्ध थंड डोक्यानं केलेली बरोबरी सगळय़ांच्या कौतुकास पात्र ठरली.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी: सांघिक यश.. इतिहास आणि वर्तमान..

दुसऱ्या दिवशी तर दिव्यानं कमालच केली. इरिना, सविताश्री आणि दिवसाच्या अखेरच्या फेरीत आपली प्रतिस्पर्धी वंतिकाला हरवून तिनं वेन्जूवर मोठी आघाडी मिळवली. अखेरच्या दिवशी माजी महिला जगज्जेत्या उशेनिनाशी बरोबरी करून दिव्यानं सावध सुरुवात केली; पण वेन्जू तिच्या मागेच होती. अननुभवी दिव्यानं सातवा डाव तरुण पॉलिनाशी गमावला आणि अचानक तिच्या लक्षात आलं असणार की, जगज्जेत्या वेन्जूनं तिला गाठलं आहे. अखेरच्या फेरीत तिची प्रतिस्पर्धी होती भारताची सर्वोत्तम खेळाडू कोनेरू हंपी. अर्जुन, खेलरत्न आणि पद्मश्री यांनी सन्मानित हंपी तिच्या भक्कम खेळासाठी प्रसिद्ध आहे. त्यात दिव्याला काळय़ा सोंगटय़ांनी खेळावं लागणार होतं. क्वीन्स इंडियन बचावानं खेळणाऱ्या दिव्यानं अखेर हंपीला एका सापळय़ात अडकवलं आणि डाव जिंकला. तिकडे वेन्जू-उशेनिना या आजी-माजी जगज्जेत्यामधील लढत बरोबरीत सुटली आणि दिव्यानं नुसतं १०,००० डॉलरचं (रुपये ८ लाख ) इनाम जिंकलं नाही, तर पुढील वर्षीच्या नेदरलँड्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या टाटा स्टील स्पर्धेत खेळण्यासही ती पात्र ठरली आहे.

हंपीचं पुनरागमन..

त्यानंतर झालेल्या विद्युतगती स्पर्धेत मात्र जगज्जेत्या जू वेन्जूनं कसून खेळ केला; पण तिला भारतीयांनी सहजासहजी विजेतेपद मिळवू दिलं नाही. हंपी आणि हरिका यांनी तर तिला एकेकदा हरवलं आणि एक एक डाव बरोबरीत सोडवला. दिव्यानंही एका डावात बरोबरी केली; परंतु स्पर्धेतील अखेरचे तीन डाव जिंकून वेन्जूनं हंपीला अर्ध्या गुणानं मागे टाकलंच, पण दोन्ही स्पर्धामध्ये वेन्जूच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये घट झालीच! विजेत्या वेन्जूच्या पाठी हंपी, हरिका आणि दिव्या यांनी क्रमांक पटकावले. सविताश्रींनं जागतिक जलदगती स्पर्धेत गेल्या वर्षी कांस्य पदक मिळवलं होतं आणि म्हणून तिच्याकडून आशा होत्या; पण तिला फारशी चमक दाखवता आली नाही.

लग्रेव्हचा झपाटा आणि ग्रीसचुकचं वर्चस्व

२०२१ सालच्या विद्युतगती स्पर्धेचा जागतिक विजेता फ्रान्सचा ग्रँडमास्टर मॅक्सिम वाचिर लग्रेव्ह आतापर्यंत अनेक विद्युतगती स्पर्धा जिंकला आहे; पण त्यानं ‘टाटा स्टील इंडिया’चं जलदगती अजिंक्यपद मिळवून सर्वाना चकित केलं. नाही म्हणायला त्यानं एकदा स्पेनच्या कॉर्सिका मास्टर्समध्ये अंतिम फेरीत जलदगती खेळाचा तज्ज्ञ विश्वनाथन आनंदला हरवून २०१६ साली विजेतेपद मिळवलं होतं. ‘टाटा स्टील इंडिया’चे जलदगती अजिंक्यपद त्यानं ज्या रीतीनं जिंकलं त्यावरून मॅक्सिम यापुढे जागतिक जलदगती अजिंक्यपद सामन्यातही वर्चस्व गाजवेल असं वाटतं. तीन वेळा विद्युतगती स्पर्धाचा जगज्जेता राहिलेला रशियन ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रीसचुकनं अखेरच्या दिवशी प्रज्ञानंदला हरवून जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत राखली. भारतीय खेळाडूंनी गेल्या वर्षी फार सुंदर खेळ करून परदेशी खेळाडूंना नामोहरम केलं होतं. अर्जुन इरिगेसी यानं तर विद्युतगतीचं अजिंक्यपद आणि जलदगतीचं उपविजेतेपद मिळवलं होतं. निहाल सरीननं जलदगती अजिंक्यपद खिशात टाकलं होतं आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोन्ही स्पर्धामध्ये विद्युतगती खेळाचा शहेनशहा समजला जाणारा हिकारू नाकामुरा खेळत होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी या वर्षी निराशा केली, असं म्हटलं पाहिजे.

भारताचा क्रमांक एकचा नवा खेळाडू गुकेश आपली अधूनमधून चमक दाखवत असला तरीही अजून त्याला विद्युतगती आणि जलदगतीचं कसब पुरेसं आत्मसात करता आलेलं नाही हेच खरं; पण त्याचं हरिकृष्ण आणि प्रज्ञानंदवरचे विजय त्याच्या प्रतिभेचे साक्षी होते. नाशिकच्या विदित गुजराथीनं जलदगती स्पर्धेत छान खेळ केला आणि एकदा तर त्यानं आघाडी मिळवली होती; पण नुकतंच जर्मनीत जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या विदितला सातत्य राखता आलं नाही आणि तो पिछाडीवर पडला. तरीही रसिकांना लक्षात राहील तो त्याचा मॅग्नसला विश्वचषकात हादरवणाऱ्या व्हिन्सेंट कायमरविरुद्धचा चमकदार विजय!

भारतीयांची चमक..

प्रज्ञानंदनं अपेक्षांच्या ओझ्याखाली मिळवलेली बक्षिसं ही कितीही सुखद असली तरी भारतीय बुद्धिबळपटूंना आता एका नव्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे- ती म्हणजे चाहत्यांचा गराडा! आतापर्यंत सिनेनट आणि फार तर क्रिकेट खेळाडू यांच्यामागे असलेलं प्रसिद्धीचं वलय या खेळाडूंना भेडसावू लागलं आहे. कोलकातामधील ‘टाटा स्टील इंडिया’दरम्यान प्रज्ञानंदच्या मागे सेल्फी आणि सह्यंसाठी लागलेली चाहते मंडळी आता गुकेश, अर्जुन, विदित यांनाही ओळखू लागली आहेत. गेली अनेक वर्षे विश्वनाथन आनंद हा बुद्धिबळाचा एकमेव चेहरा होता. सध्या त्याच्या जोडीनं प्रज्ञानंद आणि मंडळी आहेत.

हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : भारतीय बुद्धिप्रज्ञेचे दर्शन..

या वर्षी दिव्या वगळता एकाही भारतीय खेळाडूला अजिंक्यपद मिळवता आलं नाही असं ज्या वेळी आपण म्हणतो, त्याच वेळी एक लक्षात घेतलं पाहिजे की आता भारतीयांमध्ये आपापसात भरपूर स्पर्धा आहे. कोणीही कधीही कोणालाही हरवू शकतो. त्यामुळे प्रज्ञानंदच्या तिसऱ्या बक्षिसामागं त्याचे गुकेशविरुद्ध झालेले पराभवही कारणीभूत आहेत. पूर्वीचे दिवस आता इतिहासजमा झाले की एखादा आनंद येऊन सर्वाना हरवून जायचा. त्यामुळे या निराशेतही आपल्याला हा आशेचा किरण आहे की, भारताची बुद्धिबळात सर्वंकष प्रगती होते आहे आणि त्यामुळेच स्पर्धेत आयत्या वेळी आलेली दिव्या जगज्जेतीला मागे टाकून आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

सध्या तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा धुरळा खाली बसला आहे. पुढचे काही दिवस आपल्या तरुण वाघांना त्यांच्या जखमा साफ करायला आणि पुढच्या मोसमाची तयारी करण्यासाठी मिळणार आहेत. या वेळेचा ते कसा सदुपयोग करतात हे पुढल्या स्पर्धामध्ये लक्षात येईलच. gokhale.chess@gmail.com

Story img Loader