रघुनंदन गोखले

तिकडे रशिया-युक्रेन युद्धाने जगावर वेगवेगळय़ा प्रमाणात परिणाम झाले. तेलापासून खाद्यतेलापर्यंत आणि उद्योग-शेतीच्या कच्च्यामालापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत किंमतवाढ झाली. पण याच घटनेचा भारतीय बुद्धिबळपटूंना काय फायदा झाला असेल, तर २०२२ चं ऑलिम्पियाड मॉस्कोऐवजी भारतात चेन्नईजवळ घेण्यात आले. यात बुद्धिबळ जगताचे डोळे दीपवणारे असे प्रदर्शन भारतीय खेळाडूंनी केले आणि नवे तारे समोर आले.

रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि जगात गोंधळ उडाला. युरोपियन देशांनी रशियन आक्रमणाचा धिक्कार म्हणून त्यांच्या खेळाडूंवर बंदी घातली. मग अनेकांच्या लक्षात आलं की, आपण राजकारण आणि खेळ यांची सरमिसळ करतो आहोत आणि मग त्यांनी या खेळाडूंना जागतिक संघटनेच्या झेंडय़ाखाली खेळू द्यायचा बूट काढला. बुद्धिबळात तर खरोखरचे राजकारणी उच्च पदावर आहेत. साक्षात जागतिक संघटनेचे अध्यक्ष अर्कादि डॉरकोविच हे माजी रशियन उपपंतप्रधान आहेत आणि त्यांनी मॉस्कोमध्ये २०२२ चं ऑलिम्पियाड घेण्याचा घाट घातला होता. त्यावर बंदी नक्की येणार हे जाणून त्यांनी भारताकडे मदतीची याचना केली आणि अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनं ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद आणि ग्रँडमास्टर श्रीनाथ यांना पुढे करून तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना साकडं घातलं. २०१२ मध्ये जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी आनंद-कार्लसन सामना आयोजित करून जगभर प्रसिद्धी मिळवली होती. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १०० कोटी रुपये तात्काळ मंजूर केले.

पूर्वतयारी

चेन्नई कितीही मोठी नगरी असली तरी सुमारे ३००० जणांची तारांकित हॉटेलमध्ये सोय करण्यास असमर्थ होती. मग कोणाच्या तरी सुपीक डोक्यात भन्नाट कल्पना आली की, महाबलीपूरम हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. ते चेन्नईपासून फक्त ४० कि.मी दूर आहे आणि तेथे असंख्य हॉटेल्स आहेत. महाबलीपूरम येथे ज्या लोकांची सोय होणार नाही त्यांना चेन्नईला राहायला देऊन त्यांना रोज वाहनं देण्याची कल्पना पुढे आली. राहण्याची व्यवस्था तर झाली, पण दोन हजार लोक एकत्र खेळणार कसे?

महाबलीपूरममध्ये फोर पॉइंट्स शेरेटॉन नावाचं एक हॉटेल आहे. त्यांचा एक हॉल २००० चौरस मीटरचा होता. त्यांच्याकडे जागाही भरपूर होती. त्यांनी तेथेच ५ कोटी रुपये खर्च करून ४००० चौरस मीटरचा दुसरा हॉल बांधण्याची तयारी दर्शवली आणि खेळायची सोय झाली. उद्घाटन समारंभ आणि बक्षीस समारंभ चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील नेहरू स्टेडियममध्ये घेण्याचं ठरलं. कारण नेहरू स्टेडियमची क्षमता होती ८००० प्रेक्षकांची. खेळाडूंना त्यांच्या हॉटेलपर्यंत घेऊन जाण्यासाठी १२५ बसेस, १०० मोठय़ा मोटारी आणि खाशा पाहुण्यांसाठी ६ लक्झरी गाडय़ा होत्या. युद्ध पातळीवर काम करून चेन्नई- महाबलीपूरम रस्ता रुंद करण्यात आला आणि त्यातली एक लेन तर फक्त बुद्धिबळपटूंच्या वाहनांसाठी राखीव ठेवली. ४००० तमिळनाडू पोलीस २५ जुलै ते १० ऑगस्ट निव्वळ बुद्धिबळ स्पर्धेसाठी राखीव ठेवण्यात आले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते त्या दिवशी तर २२००० पोलीस सुरक्षा पुरवत होते.

करोना जर मोकाट सुटला तर हाहाकार उडेल म्हणून विमानतळावर कडक चाचण्या घेण्यात येत होत्या. वैद्यकीय अधिकारी वेगवेगळय़ा प्रकारे वैद्यकीय सुरक्षेत लक्ष घालत होते. डास वाढले तर मलेरिया उद्भवेल म्हणून १०० कर्मचारी वारंवार जंतुनाशकांची फवारणी करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भाषणांनी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानं पंतप्रधानांच्या हाती मशाल दिली. पंतप्रधानांनी ती गुकेश आणि प्रज्ञानंद या युवकांच्या हाती सोपवली आणि ४४व्या ऑलिम्पियाडचं रणिशग फुंकलं गेलं. खुल्या गटात १८८ तर महिला गटात १६० संघ होते.

भारतीय संघ

यजमान म्हणून भारताला दोन संघ खेळवता येत होते आणि जर संघांची संख्या विषम झाली तर आणखी एक संघ खेळवायची परवानगी असते. त्यानुसार तीन खुल्या गटात आणि तीन महिला गटात असे सहा संघ भारतातर्फे खेळवण्यात आले. ‘अ’ संघात हरिकृष्ण, विदित गुजराथी, अर्जुन इरिगेसी, नारायणन आणि शशिकिरण यांचा समावेश होता, तर ‘ब’ संघात गुकेश, निहाल सरीन, प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी या युवकांबरोबर २०१४च्या कांस्य पदक विजेत्या संघातील आधिबानचा समावेश होता.

भारताचा अव्वल खेळाडू विश्वनाथन आनंद यानं न खेळता भारताचा खास मार्गदर्शक होणं पसंत केलं. महिला गटातील ‘अ’ संघात कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका, तानिया सचदेव, रमेशबाबू वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांचा समावेश होता. त्यांना पहिलं मानांकन देण्यात आलं होतं! ‘ब’ संघाची जबाबदारी वंतिका अग्रवाल, पद्मिनी राऊत, सौम्या स्वामीनाथन, मेरी अॅन गोम्स आणि दिव्या देशमुख यांच्यावर होती. भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांना नियुक्त करण्यात आलं होतं.

जरी भारताला खुल्या आणि महिला गटात तिसरा संघ उतरवण्याची परवानगी मिळाली होती, तरी या संघाची जमवाजमव ऐनवेळी करण्यात आली होती आणि त्या बिचाऱ्यांना तयारीला पुरेसा वेळ मिळाला नव्हता. या उलट पहिल्या दोन संघांना काही महिने खास प्रशिक्षण देण्यात येत होतं. साहजिकच तुलनेनं तिसऱ्या संघांकडून चमकदार कामगिरी झाली नाही.

स्पर्धेची सुरुवात

हजारो खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी वर्ग, पत्रकार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेचं उद्घाटन झाल्याचं अधिकृतरीत्या जाहीर केलं. यजमान म्हणून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन होतेच. जागतिक संघटनेचे अध्यक्ष अर्कादि डॉरकोविच हेसुद्धा जातीनं हजर होते. पाकिस्ताननं आयत्यावेळी आपल्या संघाला परत बोलावून घेऊन स्पर्धेला अपशकून करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्यांची दखलसुद्धा घेतली नाही. चिनी संघांची अनुपस्थिती जाणवली, पण राजकारणाला अधिक महत्त्व देणाऱ्या चीनची ही कृती सगळीकडे अनुल्लेखानं मारली गेली. २८ जुलैला स्पर्धेला सुरुवात झाली.

भारतीय संघांनी सुरुवातीलाच पहिले तीन सामने जिंकून जोरदार सुरुवात केली. विशेष म्हणजे भारताच्या ‘ब’ संघाचा आघाडीचा खेळाडू दोमाराजू गुकेश यानं तर विजयाचा धडाका लावला. पहिल्या मानांकनाच्या बलाढय़ अमेरिकन संघाविरुद्ध ३-१ असा अनपेक्षित विजय नोंदवून ‘ब’ संघानं आठव्या फेरीत खळबळ उडवून दिली होती. या विजयात गुकेशच्या फॅबिआनो कारुआना विरुद्धच्या सरशीएवढाच नागपूरच्या रौनक साधवानीने डोमिंगेझ पेरेझचा केलेला पराभव महत्त्वाचा होता. त्याच फेरीत आघाडीवर असलेल्या भारताच्या ‘अ’ संघाला आर्मेनियाच्या संघानं नमवून त्यांचं पदकाचं स्वप्न डळमळीत केलं.

अखेरच्या फेरीला सुरुवात झाली त्या वेळी उझबेकिस्तान आणि आर्मेनिया हे संघ १७ गुणांसह आघाडीवर होते तर भारताचे ‘अ’ आणि ‘ब’ संघ १६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. अखेरच्या फेरीत जिंकून उझबेकिस्तान आणि आर्मेनिया यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकं काबीज केली, पण पहिल्या दोन मानांकनाच्या संघातील लढत बरोबरीत सुटल्यानं दोघेही अमेरिका आणि भारत ‘अ’ संघ पदकांच्या शर्यतीतून बाद झाले. भारत ‘ब’ संघाच्या निहाल सरीन आणि रौनक साधवानी या युवकांनी अनुक्रमे ब्लुबाम आणि निसीपीआनू या अनुभवी ग्रॅण्डमास्टर्सचा पाडाव केला आणि जर्मन संघाला ३-१ अशा फरकानं धूळ चारून कांस्य पदक मिळवले.

महिला गटात अग्रमानांकित भारत ‘अ’ संघ अमेरिकन अनुभवी संघाशी अनपेक्षितरीत्या पराभूत झाला आणि त्यांचं सुवर्णस्वप्न भंगलं. आतापर्यंत एकही डाव ना हरणाऱ्या तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांना त्यांचा पहिला वहिला पराभव अंतिम फेरीत सहन करावा लागला आणि भारतीय ‘अ’ महिला संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला.

देशातील खेळाडूंची पदकलूट

ऑलिम्पियाडमध्ये सांघिक पदकांप्रमाणे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पदकं देण्यात येतात. ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येक संघाला चार खेळाडू आणि एक राखीव असे पाच खेळाडू खेळवता येतात. पहिल्या पटावरील खेळाडू हा पहिल्या पटावर खेळतो, पण त्यानं विश्रांती घेतल्यास दुसऱ्या पटावरील खेळाडू पहिल्या, तिसऱ्या पटावरील खेळाडू दुसऱ्या असे वरवर सरकत जातात. थोडक्यात, तुम्हाला आपला पट सोडला तर फक्त वरच्या पटावर खेळण्याची परवानगी असते.

भारतीय संघांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना आणखी एक बक्षीस मिळालं- नोना गॅप्रिंदाषविली चषक. कोणत्याही देशांच्या पुरुष आणि महिला संघांच्या एकूण कामगिरीचा विचार करून हे बक्षीस दिलं जातं. भारताच्या ‘अ’ संघांनी खुल्या आणि महिला गटात अनुक्रमे चौथा आणि तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे त्यांना हा माजी महिला जगज्जेतीच्या नावाचा सन्मानाचा चषक देण्यात आला.

भारतीय संघांना प्रशिक्षक म्हणून नारायणन श्रीनाथ (अ संघ), अभिजित कुंटे (महिला अ), आर. बी. रमेश (ब) अशा अनेक ग्रॅण्डमास्टर्सचं योगदान लाभलं. वैयक्तिक पदकांमध्ये गुकेश, निहाल सरीन (दोघे सुवर्ण), अर्जुन इरिगेसी (रौप्य) आणि प्रज्ञानंद आणि त्याची बहीण वैशाली, तानिया सचदेव आणि दिव्या देशमुख (सर्व कांस्य) असं भरघोस यश भारताला मिळालं. गंमत म्हणजे पहिल्या पटावरचं कांस्य पदक मॅग्नस कार्लसनला मिळालं.

आशियाई संघटनेकडून गौरव

आशियाई बुद्धिबळ संघटनेची वार्षिक बक्षिसं दुबईमध्ये दर वर्षी दिली जातात. ऑलिम्पियाडच्या आयोजनानंतर आणि भारतीयांच्या तडफदार खेळामुळे आशियाई संघटनेनं भारतीयांचा गौरव नाही केला तरच नवल! तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना मॅन ऑफ द इयर, भारतीय बुद्धिबळ संघटनेला फेडरेशन ऑफ द इयर अशा सन्मानानं गौरवलं गेलं, तर रमेश आणि अभिजित यांची अनुक्रमे पुरुष आणि महिला संघांचे २०२२ सालचे उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवड झाली. परंतु सर्वात महत्त्वाचा २०२२ चा प्लेअर ऑफ द इयर हा मोठा मान दोमाराजू गुकेश या १७ वर्षीय युवकाला मिळाला. त्याचा ऑलिम्पियाडमधील झंझावात न विसरण्याजोगा होता.

भारत सरकारनं तब्बल नऊ वर्षांच्या दुष्काळानंतर अर्जुन पुरस्कारासाठी गेल्या तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे प्रज्ञानंद आणि भक्ती कुलकर्णी यांची निवड केली. विश्वनाथन आनंदनं सर्व प्रकारचं यश आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत पाहिलं आहे. त्याची निवड जागतिक संघटनेनं उपाध्यक्ष म्हणून करून त्याचा आणि भारताचा गौरव केला.

एकूण २०२२ साली चेन्नई येथील ४४ वं ऑलिम्पियाड म्हणजे भारताच्या प्रतिभेचं प्रदर्शन ठरलं आणि खचितच ते सर्व बुद्धिबळ जगताचे डोळे दीपवणारं होत!
gokhale.chess@gmail.com

Story img Loader