scorecardresearch

‘रानारानात गेली बाई शीळ..’

कविवर्य ना. घ. देशपांडे यांनी ‘शीळ’ ही विख्यात कविता १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात लिहिली.

‘रानारानात गेली बाई शीळ..’

मराठी भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे कर्तेधर्ते, त्या गाण्यांची वैशिष्टय़े, त्यांवरील पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव, आकाशवाणीचा त्यांच्या प्रसारातील मोलाचा वाटा अशा दिलचस्प गोष्टींबद्दलचे रसीले सदर.. 

कविवर्य ना. घ. देशपांडे यांनी ‘शीळ’ ही विख्यात कविता १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात लिहिली. कविवर्य मूळचे खामगावपासून चाळीस मैलांवरच्या मेहेकर गावचे. या कवितेला चाल लावली आणि गायले- गोविंद नारायण जोशी- म्हणजे गायक जी. एन. जोशी. त्यावेळी ना. घं.नी कविता लिहायला आरंभ केला होता आणि जोशी शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गाऊ लागले होते. गायक-संगीतकार जी. एन. जोशींना या कवितेने अक्षरश: झपाटून टाकले. ज्या क्षणी ही कविता त्यांनी पाहिली, वाचली त्याच क्षणी त्यांना चाल सुचली. गायक जोशीबुवांच्या कंठातून एक अप्रतिम चाल जन्माला आली. जणू ना. घं.च्या शब्दांत जोशींनी स्वरांचा प्राण फुंकला. कविता पाहताक्षणी चाल सुचणे ही खरी गीतजन्माची नैसर्गिक प्रक्रिया आहे. चाल लागल्यावर गायक जी. एन. जोशी त्यांच्या  खाजगी कार्यक्रमांत ‘शीळ’ ही कविता चालीत गाऊ लागले. हळूहळू या स्वररचनेने रसिकमनांची पकड घ्यायला सुरुवात केली.

अशात गायक जोशींना रेडिओ स्टेशनचे आमंत्रण आले नसते तरच नवल! निमकर, अमेंबल, ढोले, खोटे, रामनाथकर यांच्या खाजगी रेडिओ स्टेशनकडून आमंत्रण आले आणि १ जानेवारी १९३१  रोजी गायक जी. एन. जोशी यांच्या आयुष्यातला रेडिओचा पहिला कार्यक्रम सादर झाला. आणि ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे गीत हजारो रसिकांपर्यंत पोहोचले व त्यांच्या मनात जाऊन बसले. जोपर्यंत ‘राजहंस माझा निजला’ हे गीत मला सुरेश चांदवणकर, ज्ञानेश पेंढारकर यांच्याकडून मिळाले नव्हते तोवर ‘शीळ’ हे गीत म्हणजेच पहिली ध्वनिमुद्रिका असा माझा समज झाला होता. १९३२  साली ‘शीळ’ ध्वनिमुद्रिका म्हणून प्रकाशित झाली आणि पहिली रेकॉर्डब्रेक खपाची ध्वनिमुद्रिका हा मान तिला मिळाला.

गावोगावी हॉटेलांतून ही ‘शीळ’ घुमायची. त्याकाळी घरात रेडिओ असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. त्यामुळे सामान्य रसिकांकरता हॉटेलात तबकडी ऐकायला जाणे नित्याचे झाले. समोरासमोर असलेल्या हॉटेलांमध्ये ही रेकॉर्ड कोण अधिक तारस्वराने लावतो याची स्पर्धाच लागत असे. महाराष्ट्र नावाच्या वेळूच्या बनात ही शीळ घुमत राहिली व भावगीताच्या प्रांतातील उदयकालात चैतन्य निर्माण झाले. या गीतामुळे कवी ना. घ. देशपांडे हे नाव सर्वदूर पोहोचले. हे गीत ऐकून काही श्रोते प्रश्नही करू लागले. त्यावेळी सात्त्विक काव्य सर्वानी एकत्र बसून ऐकण्याचा आणि लहानांना कविता व तिचा उद्देश समजावून सांगण्याचा शिरस्ता होता. तशात ही कविता प्रेयसीच्या मुखातून आलेली आहे..

‘राया तुला रे काळयेळ नाही

राया तुला रे ताळमेळ नाही’

या शब्दांतील धिटाई व तो काळ याचा विचार करता मनात प्रश्न निर्माण होतात. पण-

‘रानि राया जसा फुलावाणी

रानि फुलेन मी फुलराणी

बाई, सुवास रानि भरतील।’

या सुंदर शब्दांमुळे तरुण मंडळींच्या तोंडी हे गीत घोळू लागले. पण मोठय़ा आवाजात की दबलेल्या सुरात, ही साशंकता बरेच काही सांगून जाते.

सुगम, साधी शब्दरचना, कल्पनेचे सौंदर्य, अर्थवाही चाल यातून तेव्हा भावगीतांचा जमाना सुरू झाला होता. मनातली भावना मनातल्या शब्दांत गुणगुणता येते, हे त्यामागचे खरे कारण असावे. त्यावेळी शास्त्रीय संगीताचे असलेले वर्चस्व आणि नाटय़पदांची लोकप्रियता यामुळे सहज-सोप्या चालींतील भावगीतांकडे लोक आकर्षित होणे तसे कठीण होते. पण ‘शीळ’ या  ध्वनिमुद्रिकेमुळे ते आपसूक घडले. या गीतातील ग्रामीण वातावरणाकडे नागरी मन आकर्षिले गेले. आपल्या मनातल्या भावना थेट पोहोचवण्याचा उत्तम मार्ग यातून रसिकांना सापडला. भावगीताच्या पुढील प्रवासासाठी ही शुभसूचक चिन्हे होती.

शास्त्रीय संगीताचा हा प्रभाव या गीताच्या स्वरयोजनेतही दिसतोच. ‘पिलू’ या रागात हे गीत स्वरबद्ध झाले आहे.

‘फिरू गळ्यांत घालून गळा

मग घुमव मोहन शिळा

रानी कोकीळ सूर धरतील

रानारानात गेली बाई शीळ’

या अंतऱ्यामध्ये ‘गळा’ या शब्दानंतर आलेल्या ताना, मुरक्या ऐकताना गाताना उत्तम दमसास हवा हे प्रकर्षांने जाणवते. काही सेकंदांची खूप मोठी तानेची जागा निर्माण करून या गाण्याचे सौंदर्य खचितच वाढवले गेले आहे. पुन्हा अंतऱ्याच्या पहिल्या ओळीकडे येणारा स्वरसमूह तर लाजवाब! शेवट करताना ‘शीळ’ या शब्दात पेरलेली कोमल निषाद, शुद्ध धैवत व कोमल धैवत या स्वरांची मिंडेची जागा अप्रतिम आहे. त्यासाठी गीत ऐकणे व हार्मोनियम घेऊन ते म्हणणे हेच खरे आहे.

त्यावेळचे एच. एम. व्ही.चे अधिकारी रमाकांत रूपजी यांना गायक-संगीतकार जी. एन. जोशींनी सांगितले की, मी अजून विद्यार्थी आहे. आताच रेकॉर्ड कशाला काढता? पण कंपनीचा आग्रह होता. जोशीबुवांच्या मनात हे गीत लोकांना आवडेल की नाही, आपण रेकॉर्डिग करायची घाई तर करत नाही ना, अशी शंका होती. पण गीत रेकॉर्ड झाले अन् घराघरांत पोहोचले. गीतातील शब्दांचा धीटपणा, त्यातल्या भावना हे सारेच स्वीकारले गेले. गीतातील अस्सल ग्रामीण वातावरण सर्वानी आपलेसे केले. जी. एन. जोशी यांचा खडा, शास्त्रीय संगीताचा प्रभाव असलेला आणि थोडासा नखरेल आवाज श्रोत्यांनी  स्वीकारला.

ठाण्याचे ध्वनिमुद्रिका संग्राहक गोविंद साठे यांच्यामुळे मी या आद्य भावगीत गायकाला पाहिले हे माझे भाग्य होय. पण त्यावेळी  जोशी काही बोलू-चालू शकण्याच्या स्थितीत नव्हते. पण ‘शीळ’ या गाजलेल्या गीताच्या संगीतकार-गायकाची आणि माझी भेट झाली, हा माझ्यासाठी आनंदाचा भाग होता. माटुंगा येथे जोशींची कन्या व जावई श्री. ताटके यांच्या घरी आमची ही भेट झाली. त्यायोगे सुगम गायनातील एका महान व्यक्तीला नमस्कार करण्याची संधी मिळाली.

गायक-संगीतकार जी. एन. जोशी यांनी पुढे अनेक संगीतरचना केल्या. त्यांच्या ‘शांत सागरी कशास’, ‘फार नको वाकू’, ‘उघड दार प्रियकरास’, ‘प्रेम कोणीही करेना’, ‘रमला कुठे ग कान्हा’, ‘नदीकिनारी.. नदीकिनारी’, ‘चकाके कोर चंद्राची’, ‘चल रानात सजणा’ या रचनांनी रसिकांना वेड लावले. यापैकी ‘रमला कुठे गं कान्हा’ हे गीत गायिका लीला लिमये यांच्यासह, तर ‘चकाके कोर चंद्राची’ हे गीत गांधारी हनगल यांच्यासह ते स्वत: गायले. गांधारी हनगल म्हणजेच गंगूबाई हनगल. जोशीबुवांची युगुलगीतेसुद्धा गाजली. त्यांनी गायलेले ‘डोळे हे जुल्मी गडे’ (त्यांच्या वेगळ्या चालीतले) हे गीतसुद्धा रसिकांची दाद मिळवणारे ठरले.

‘शीळ’ या गीताने रसिकप्रेमाचे रेकॉर्ड ब्रेक केले. अनेक समीक्षकांनी ‘शीळ’वर आस्वादपर लिहिले. हे गीत ना. घ. देशपांडे यांच्या काव्याच्या समग्र आकलनाला मर्यादा घालते व अभ्यासकाला त्याच दिशेने जायला भाग पाडते असे म्हटले गेले. कुणाला ते काव्य थोडे उनाड वाटले. त्यातील खुलेपणा व धुंदी मनात आवडली तरी जनांत अवघडल्यासारखे वाटू शकते.. अशा विविध प्रतिक्रिया आल्या तरी ‘लोकप्रिय भावगीत’ म्हणून या गीताने सर्वाना मोहित केले. आजही मनामनांत हे गीत गुणगुणले जाते. हे सर्व अनुभवण्यासाठी ‘शीळ’ ही रेकॉर्ड ऐकायलाच हवी. जरी ही पहिलीवहिली रेकॉर्ड नसली तरी भावगीतांच्या नव्वदीमध्ये या गीताचे मोलाचे योगदान आहे. इथूनच महाराष्ट्रदेशी भावगीत रुजले, फुलले आणि चांगलेच बहरले. संगीतप्रेमींसाठी ही अवीट गोडीची गोष्ट होती व आहे.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा ( Swarbhaoyatra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या