अत्यंत दुर्मीळ भारतीय हस्तलिखिते आणि ग्रंथांनी समृद्ध असलेले तंजावर ग्रंथालय व त्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या श्वार्ट्झविषयी..
१५०० साली दुआर्त बाबरेज हा पोर्तुगीज प्रवासी भारतात आला. कोचीन येथील पोर्तुगीज वखारीत त्याने १६ वष्रे काम केले. या १६ वर्षांच्या वास्तव्यात मल्याळी भाषेचा अभ्यास करून तेथील लोकांशी तो मल्याळीमध्येच संभाषण करीत असे. एका भारतीय भाषेचा अभ्यास करणारा तो पहिलाच युरोपियन! सोळाव्या शतकात भारतात आलेल्या जेसुइट मिशनऱ्यांना ‘फारसी’ भाषा अवगत असल्यामुळे मोगल दरबारात त्यांना महत्त्वाचे स्थान होते. भारतात येणाऱ्या युरोपियन मिशनऱ्यांना ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या मुख्य कार्यात प्रचारासाठी आणि लोकांमध्ये जाऊन मिसळण्यासाठी स्थानिक भाषा अवगत होणे आवश्यक आहे, हे त्यामुळे ख्रिस्ती धर्मसंसदेच्या लक्षात आले. या कारणामुळे मिशनऱ्यांनी भारतीय भाषा शिकण्याचे आणि ख्रिस्ती धर्मग्रंथांचे स्थानिक भाषांत भाषांतर करण्याचे आदेश धर्मसंसदेने दिले. १६ व्या आणि १७ व्या शतकात भारतात आलेल्या फ्रान्सिस्कन, डोमिनियम, जेसुइट, डॅनिश मिशनऱ्यांनी भारतीय भाषांचा आणि लिपींचा अभ्यास केला. फादर स्टिफन्सन, फादर जुआंब द पेद्रोज वगरेंनी युरोपियन भाषांमधील ख्रिस्ती धर्मग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून पुस्तके लिहिली व छापून प्रसिद्ध केली होती. परंतु श्वार्ट्झ या डॅनिश मिशनऱ्याने मात्र मद्रास प्रांतात राहून केलेली कामगिरी फारच वेगळी आहे. त्याने भारतात येऊन मराठी, तमीळ आणि संस्कृत भाषा आणि त्यांमधील साहित्य, वाड्.मय यांच्या समृद्धीसाठी, संवर्धनासाठी जे प्रयत्न केले ते सारे स्तिमित करणारे आहेत. श्वार्ट्झच्या प्रेरणेनेच तांजोर म्हणजेच तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय उभे राहिले आहे. मराठी, तमीळ आणि संस्कृत पुस्तकांचे मुद्रण करण्याची त्यांची कामगिरीही स्पृहणीय आहे. सध्याच्या तमिळनाडूतील नागपट्टीणम् जिल्ह्य़ातील ट्रांकोबार ऊर्फ तरंगमबाडी येथे डेन्मार्कचा राजा चौथा फ्रेडरिक याची वसाहत होती. व्यापार आणि धर्मप्रसार हे हेतू समोर ठेवून फ्रेडरिकने तंजावरच्या राजाकडून तरंगमबाडी हा छोटा परगाणा विकत घेऊन १७०४ साली तिथे डॅनिश मिशन सुरू केले. त्यानंतर तरंगमबाडीचे ट्रांकोबार झाले!
१७५० साली जन्माने जर्मन असलेल्या ख्रिश्चन फ्रेडरिक श्वार्ट्झ याची नियुक्ती प्रमुख मिशनरी म्हणून या मिशनमध्ये झाली. १७५० साली ट्रांकोबार येथे दाखल झालेला श्वार्ट्झ त्याच्या कार्यात एवढा रमला की, तो नंतर त्याच्या मायदेशात परत गेलाच नाही. त्याच्या ४८ वर्षांच्या वास्तव्यात तो अधिकतर ट्रांकोबार आणि शेजारच्या तंजावरातच राहिला. प्रथम त्याला पोर्तुगीज, जर्मन, डॅनिश भाषा येत होत्या. लोकांमध्ये मिळून-मिसळून वागण्याच्या श्वार्ट्झच्या स्वभावामुळे त्याने अल्पावधीतच तमीळ भाषेत संभाषण, लिहिणे यावर प्रभुत्व मिळविले. त्यापाठोपाठ मल्याळम, तेलगू व िहदी भाषाही त्याने आत्मसात केल्या. स्थानिक भाषांत संभाषण करून धर्मप्रचार करण्यामुळे त्याचे काम अधिक परिणामकारक होऊ लागले. श्वार्ट्झ १७६९ साली प्रथम तंजावरात आला तेव्हा भोसले घराण्यातील तुळसाजी हा राजा गादीवर होता. श्वार्ट्झने राजाशी तमीळमध्ये केलेल्या अस्खलित संभाषणामुळे तो प्रभावित झाला व पुढे त्या दोघांची घट्ट मत्री झाली. तुळसाजीकडे जाणे-येणे वाढल्यावर श्वार्ट्झ थोडय़ा काळातच मराठी भाषाही व्यवस्थित बोलू लागला. देवनागरी, तमीळ, मोडी, मल्याळम् या लिपींचा अभ्यास केल्यावर त्याने संस्कृतचा अभ्यास करून िहदूंचे धर्मग्रंथ, हस्तलिखिते यांचे अध्ययन सुरू केले. श्वार्ट्झच्या भारतीय भाषा आणि हस्तलिखितांच्या अभ्यासाच्या व्यासंगामुळे त्याचे मुख्य कार्य- ख्रिस्ती धर्मप्रसार याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. १६७५ साली भोसले घराण्याच्या मराठा राज्यकर्त्यांनी तंजावर घेतले. त्यापूर्वी तेथे इ.स. १५३५ ते १६७५ या काळात नायक या घराण्याचे राज्य होते. या नायकांनी स्वत:च्या कुटुंबीयांसाठी १५६० साली एक छोटेखानी ग्रंथसंग्रहालय व वाचनालय तयार केले होते. या वाचनालयास त्यांनी ‘रॉयल पॅलेस लायब्ररी’ किंवा ‘सरस्वती महाल लायब्ररी’ असे नाव दिले होते.
१७७३ साली अर्काटचा नवाब महंमदअली याने ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास रेसिडेन्सीच्या साहाय्याने तंजावरवर हल्ला करून तुळसाजीला पराभूत करून त्याला कैद केले. तुळसाजीला पदच्युत करून तंजावरचे राज्य महंमदअलीने स्वत:च्या राज्यात सामील करून घेतले. त्यावर तुळसाजीचा मित्र आणि शुभचिंतक श्वार्ट्झ याने ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन येथील कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे याबाबत दाद मागितली. १७७६ साली श्वार्ट्झच्या प्रयत्नांना यश मिळून तुळसाजीला तंजावरचा राज्य प्रदेश परत मिळाला. त्यानंतर श्वार्ट्झचे वास्तव्य अधिकतर तंजावरमध्येच असे. मिशनचे काम करून तो तंजावरमध्ये मराठी भाषा, देवनागरी मोडी लिपीच्या अभ्यासात गढून गेला. याच काळात नायक राजांच्या ग्रंथसंग्रहातील धूळ खात पडलेली पुस्तके श्वार्ट्झने बाहेर काढून त्यांचे वाचन आणि पाहणी केली. त्यामध्ये तालपत्रम् म्हणजे ताडाच्या पानावरील हस्तलिखिते पाहून श्वार्ट्झला अशी दुर्मीळ हस्तलिखिते आणि ग्रंथ गोळा करून त्यांचे व्यवस्थित जतन करण्याची कल्पना सुचली. तुळसाजीचा पुत्र सरफोजी यालाही श्वार्ट्झचा लळा लागला होता. श्वार्ट्झ त्यालाही विविध भाषा शिकवीत असे आणि जुन्या हस्तलिखितांबद्दल सरफोजीलाही औत्सुक्य निर्माण झाले होते. पुढे १७८७ साली तुळसाजीच्या मृत्यूनंतर तुळसाजीचा सावत्र भाऊ अमरसिंग याने गादीचा खरा वारस सरफोजीला पदच्युत करून कैद केले आणि स्वत:स तंजावरचा राजा म्हणून घोषित केले.
या घटनेची माहिती श्वार्ट्झने मद्रास येथील कंपनी सरकारला देऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कंपनीने पेट्री यास तंजावर येथे कमिशनर म्हणून नेमून त्याने श्वार्ट्झच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवावा, अशी व्यवस्था केली आणि सरफोजीला मुक्त करून अमरसिंगास हद्दपार केले. श्वार्ट्झने सरफोजीस तंजावरचा राजा म्हणून घोषित करून स्वत: त्याचे पालकत्व स्वीकारले. सरफोजीला श्वार्ट्झने शिक्षण घेण्यासाठी मद्रास येथे पाठविले.
सरफोजी मद्रासमध्ये असताना श्वार्ट्झ हा एक पालक या नात्याने त्याला नियमित भेटत असे. या काळात श्वार्ट्झने सरफोजीला इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्ये संभाषण करण्यात तयार केलेच; परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहित्य, वाड्.मय यांविषयी आवड निर्माण करून दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते, विविध वस्तू जमा करण्याचा छंद लावला. शिक्षण पूर्ण झाल्यावर सरफोजी तंजावरात परत आला. सरफोजी द्वितीय या नावाने तंजावरचा राजा म्हणून राज्याच्या प्रशासनात लक्ष घालण्यास सुरुवात केली. श्वार्ट्झ या कामात त्याला मार्गदर्शन करीत होताच; परंतु पुढे कंपनी सरकारला ब्रिटिश साम्राज्यविस्ताराची हाव सुटली व या ना त्या कारणाने त्यांनी भारतीय राज्यांवर कंपनी सरकारात विलीन होण्यासाठी दबाव टाकण्याचे धोरण अवलंबिले. लॉर्ड वेलस्लीने सरफोजीचे मन वळवून त्याच्याकडून तंजावरचे प्रशासन काढून घेतले व तिथे आपला कमिशनर नेमला. सरफोजीला आता नामधारी राजा म्हणून मोठी रक्कम पेन्शन म्हणून नियमित मिळू लागली. त्यापुढील काळात सरफोजीने आयुष्यभर विद्याव्यासंग, दुर्मीळ हस्तलिखिते, ग्रंथ, ताम्रलेख, शिलालेख, राजकीय दस्तावेज यांचा संग्रह करणे, युरोपियन ग्रंथांचे मराठी, संस्कृत, तमीळमध्ये भाषांतर करणे यात काळ व्यतीत केला. श्वार्ट्झच्या मार्गदर्शनाखाली सरफोजीने एक सुयोजित, भव्य असे ग्रंथालय उभे केले. श्वार्ट्झने या ग्रंथालयाला जोडून छापखाना सुरू करण्याची अभिनव कल्पना सरफोजीस देऊन छापखान्याची यंत्रसामग्री व इतर साहित्य मिळविण्याची व्यवस्था केली. हे करीत असतानाच १७९८ साली पायाच्या दुखण्याने श्वार्ट्झचा मृत्यू झाला. सलग ४८ वष्रे तंजावरमध्ये राहून मराठी, संस्कृत व तमीळ या भाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी त्याने आयुष्याचा महत्त्वाचा काळ व्यतीत केला. त्याच्या प्रेरणेने उभा राहिलेला ‘नवविद्याकलानिधी’ हा छापखाना १८०५ साली सुरू झाला. या छापखान्यात पहिले मुद्रण झाले ते संस्कृत-मराठी पंचांगाचे. महाराष्ट्रापासून दूरवर असलेल्या तंजावरमध्ये दोन शतकांपूर्वी मराठी वाड्.मयाची निर्मिती आणि छपाई सुरू झाली, हे सर्व स्तिमित करणारे आहे! सरफोजी आणि नंतर त्याच्या मुलाने या ग्रंथालयाचा विस्तार एवढय़ा मोठय़ा प्रमाणात केला, की आता ते मध्ययुगीन काळात स्थापन झालेले आशिया खंडातील सर्वात मोठे व जुने ग्रंथालय मानले जाते. हे ग्रंथालय विभिन्न भाषा, विषय यांच्या पुस्तकांनी आणि हस्तलिखिते यांनी संपन्न होण्यासाठी सरफोजीने अत्यंत परिश्रमपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी त्याने अनेक विद्वान, पंडितांना नोकरीस ठेवून संपूर्ण भारतभरातून दुर्मीळ हस्तलिखिते, पुस्तके गोळा करण्यासाठी, विकत घेण्यासाठी, नकला तयार करण्यासाठी पाठविले. या ग्रंथसंग्रहाला जोडून सरफोजीने एक छोटेखानी वस्तुसंग्रहालय स्थापन केले. त्यामध्ये तांजोर शैलीची मराठा शासकांची तलचित्रे, कॅनव्हासवरील चित्रे, काचेवरील आणि काष्ठचित्रे, प्राचीन मूर्ती आहेत.
येथील विविध भाषा आणि विषयांमधील अफाट ग्रंथसंपदा आणि असंख्य हस्तलिखिते पाहून माणूस चक्रावून जातो. या ग्रंथालयात मराठी, तमीळ, तेलगू, संस्कृत, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, इटालियन भाषांमधील ६५००० हून अधिक पुस्तके आहेत. एकूण ४६७०० हस्तलिखितांपकी ३९३०० संस्कृतात, ३५०० तमीळमध्ये, ३१०० मराठीमध्ये आणि ८०० तेलगू भाषेत आहेत. तंजावरच्या प्रशासकीय कामासाठी मराठी भाषा वापरली जाई. परंतु ती मोडीत लिहिण्याची प्रथा होती. राज्याच्या प्रशासकीय नोंदी असलेली मोडी लिपीतील एकूण ८५० गाठोडी या संग्रहात ठेवलेली आहेत. साहित्य, व्याकरणशास्त्र, संगीत, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, नकाशे, धार्मिक अशा विविध विषयांवरील वाड्.मय देवनागरी, ग्रंथा, नंदीनागरी, तेलगू, तमीळ आणि रोमन अशा विविध लिपींमध्ये लिहिलेले आहे. यामधील हस्तलिखितांच्या लिखाणाचा काळ गेल्या ४०० वर्षांमधील आहे. अत्यंत दुर्मीळ असलेल्या भारतीय हस्तलिखिते आणि ग्रंथांमध्ये १४६८ साली लिहिलेले भगवद्गीतेचे सर्वात लहान हस्तलिखित, मध्यमयुगीन काळातील अंबर हौसेनी या मुस्लीम कवीने लिहिलेले भगवद्गीतेवरील मराठी विवेचन, १७ व्या व १८ व्या शतकांमधील दाक्षिणात्य मराठी लोकांची रामदासी आणि दत्तात्रय मठ संप्रदायाच्या संतवाड्.मयाची हस्तलिखिते मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण इत्यादींचा अंतर्भाव आहे. धन्वंतरी या विभागात १८ ग्रंथ औषधनिर्मितीविषयी आणि १८ व्या शतकात वैद्यांनी केलेल्या नोंदी आणि रोग्यांच्या केस स्टडीज् आहेत. सरफोजी हा स्वत: संगीतातील जाणकार होता. संगीतशास्त्र या विषयाची हस्तलिखिते आणि स्वत: तयार केलेल्या रचनांची १५० पुस्तके या संग्रहात आहेत. नकाशांच्या संग्रहात ३८ नकाशे असून, हे सर्व १८ व्या शतकात तयार केलेले आहेत. जगातील मध्ययुगीन काळातील सागरी मार्ग त्यात दाखविले आहेत. १८ व्या शतकातील जगातील सर्व देशांच्या सरहद्दी दर्शविलेल्या आहेत व भारताला मोगल साम्राज्य किंवा िहदुस्थान, ऑस्ट्रेलियास न्यू हॉलंड तर जपानला निप्पॉन म्हटले आहे. संस्कृत साहित्यामध्ये व्याकरणशास्त्रावरील ‘भांडारभाषा’, राजा कृष्णदेवरायाने लिहिलेले नाटक ‘जंबावती परिणय’ हे दुर्मीळ ग्रंथ आहेत. मंदिर स्थापत्यशास्त्र आणि गृह स्थापत्य या विषयांवरील ‘विश्वकर्मीय वास्तुशास्त्र’ हे विशेष दुर्मीळ पुस्तकही या ग्रंथसंग्रहात आहे. परदेशी दुर्मीळ साहित्यापकी १७८४ साली प्रकाशित झालेली सॅम्युएल जॉन्सनची डिक्शनरी, १७९१ साली हॉलंडमध्ये छापलेले चित्रमय बायबल येथे आहे.
इंदिरा गांधी केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री असताना १९६५ साली त्यांनी या अवाढव्य दुर्मीळ साहित्याचे मायक्रोफिल्मिंग करून घेतले. गेल्या पाच शतकांपासून तंजावर हे दक्षिण भारतातले साहित्य, कला आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. याचे श्रेय अर्थातच या ग्रंथसंग्रहालाच द्यायला हवे. सध्या या ग्रंथसंग्रहातील सर्व ग्रंथ व हस्तलिखिते ऑनलाइन वाचण्याची सोय असून, काही ग्रंथ तेथल्या वाचनालयात बसून वाचण्याची व्यवस्था आहे. सरफोजीनंतर त्यांचा मुलगा शिवाजी द्वितीय याने ‘सरस्वती महाल लायब्ररी’ची व्यवस्था पाहिली. पुढे मद्रास सरकारने १९१८ साली डॉ. रंगनाथन यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नेमून ते ग्रंथालय सार्वजनिक केले. आता हे ग्रंथालय तमिळनाडू सरकारच्या देखरेखीखाली असून, त्याचे नामकरण ‘थंजावूर महाराजा सरफोजी सरस्वती महाल लायब्ररी’ असे झाले आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanjavur book writer reverend swartz
First published on: 29-03-2015 at 01:53 IST