चंद्रकांत कुलकर्णी chandukul@gmail.com

करोनाकहरातून बाहेर पडत येत्या २२ ऑक्टोबरला पुन्हा एकदा नाटकं नव्या उमेदीने सुरू होणार आहेत. करोनाकाळाने सर्वाचीच कठोर परीक्षा पाहिली असली तरी रंगभूमीचा या संकटाने जणू अंत पाहिला. अर्थात आजवर रंगभूमीने इतकी भीषण संकटे झेलली आहेत की यातूनही ती फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेईल.. निर्विवाद! त्याबद्दलचं चिंतन..

करोनाकाळाचं मळभ दूर सारून येत्या काही दिवसांत नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू होणार आहेत. पण नाटक नुसतंच सुरू होणार नाहीए, तर पुन्हा शून्यातून उसळी घेणार आहे. मागच्या वेळी टाळेबंदी उठल्यानंतर नाटकाने भरारी घेण्याचा प्रयत्न केला खरा; पण अल्पावधीतच दुसऱ्या लाटेने त्याला खीळ बसली. पुन्हा वेदनांचे सत्र सुरू झाले. आता मोठय़ा अंतरायानंतर नाटकं पुन्हा सुरू होणार असल्याने जेवढी उत्सुकता मनात आहे, त्याहून कैकपट भीतीही आहे. कारण एकदा नाटकाचे प्रयोग सुरू करून लाखोंचा फटका निर्मात्यांनी सोसलेला आहे. त्यामुळे गतअनुभवांची उजळणी करूनच हा प्रवास सुरू होणार आहे.. पुनश्च शून्यातून!

गेल्या वर्षी मार्चअखेरीस पुन्हा एकदा करोनाकाळ सुरू झाला. टाळेबंदी जाहीर झाली आणि नाटकंही बंद पडली. त्यामुळे आपण अग्रक्रमावरून थेट खालच्या क्रमावर पोहोचलो. सगळं काही ठप्प झालं. साहित्य असो, संगीत असो, व्यापार वा तंत्रज्ञान असो- एकूणात सगळ्याच हालचाली बंद झाल्या. सर्वच क्षेत्रांतील देवाणघेवाण थांबल्याने अर्थचक्रही ठप्प झाले. करोनाच्या सुरुवातीला कुणालाच कसली कल्पना नव्हती. हा आजार फार तर चार-सहा महिने मुक्काम करेल असाच ढोबळ अंदाज बांधला जात होता. पण तो प्रदीर्घ काळ सुरूच राहिला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लादले गेलेले निर्बंध कधी हटणार याची उत्कंठा सगळ्यांनाच होती. तसं झालंही; पण काही काळातच पुन्हा आपण निर्बंधांत अडकलो. त्यादरम्यान प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झाली. अनेक बदल झाले. अनेकांचे पोटापाण्यासाठी कमावण्याचे मार्ग बदलले. नाटय़क्षेत्रही याच प्रक्रियेतून जात होते. व्यावसायिक नाटक करणारी अनेक मंडळी अशी आहेत- ज्यांचा चरितार्थ केवळ नाटय़- व्यवसायावरच अवलंबून होता. नाटक बंद झाल्याने त्यांच्यापुढे अंधारच पसरला. मदत करण्यासाठी अनेक संघटना, काही लोक पुढे आलेही; परंतु हा काळ मोठा असल्याने शेवटी प्रत्येक कलाकाराला, रंगकर्मीला अर्थार्जनाचे वेगळे पर्याय शोधावे लागले. कुणी फळे विकली, कुणी मासे, तर कुणी पडेल ते काम करून हा काळ सोसला. त्या करुण कहाण्या आपल्या कायमच सोबत राहणार आहेत. कारण आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्वच बाजूने आपण सर्वच जण त्रासलेलो असल्याने एक संभ्रमावस्था निर्माण झाली. प्रत्येक जण कोंडलेल्या अवस्थेत असल्याने प्रचंड घुसमट करणारा हा काळ होता.  

करोनाकाळाने झालेली आर्थिक अवनती आपण मान्य केलीच आहे; पण त्याचसोबत राज्यभर होणाऱ्या नाटय़स्पर्धा, महाविद्यालयीन एकांकिका, प्रायोगिक नाटकांचे प्रयोग, नाटय़- चळवळीही थंडावल्याने ‘नाटक’ म्हणून या कलेचा होणारा विकासच थांबला.. हे नुकसान न भरून येणारे आहे.

एकीकडे निर्बंध कायम होते, पण ते समाजोपयोगी असल्याने आपण त्याला विरोधही करू शकत नव्हतो. त्यामुळे या जागतिक संकटात आपण मार्ग बदलून पुढे जाणे हा एकमेव पर्याय समोर होता. मग मिळेल त्या माध्यमातून लोक व्यक्त होऊ लागले. कुणी फेसबुकवर अभिवाचन केले, तर कुणी झूम मीटिंग घेऊन मुलाखती, व्याख्यानमाला आयोजित केल्या. मी स्वत:, हृषिकेश जोशी, सुनील बर्वे, प्रदीप वैद्य, अभिजीत झुंजारराव आणि अन्य अनेक  कलाकार व संस्थांनी नाटक ऑनलाइन माध्यमातून करण्याचा उत्तम ‘प्रयोग’ केला. पण जिवंत असलेली नाटय़कला आणि ऑनलाइन सादर होणारी कला यांच्या रसास्वादातच फरक असल्याने अनेक मर्यादा आल्या. करोनाकाळात ऑनलाइन शाळा सुरू झाल्या, पण त्यात प्रत्यक्ष शिक्षण कधीच बाजूला पडले. तसेच नाटकाचेही झाले. प्रयोग घडत होते, पण प्रेक्षक आणि रंगकर्मीचा नाटकातून होणारा सुसंवाद मात्र बंद झाला. काही कलाकारांनी नाटक ओटीटीवर आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न स्तुत्य असला तरी त्यामागचा उद्देश, हेतू जाणून घ्यायला हवा. एखादे नाटक ओटीटीवरच जन्माला येत असेल तर आपण चुकीचा पायंडा पाडत आहोत. पूर्वीही नाटकांचे चित्रीकरण व्हायचे, आताही होते आहे. पण त्याचा वापर पुढच्या पिढीला शिकण्यासाठी, अनुभूतीसाठी, दस्तावेजीकरण म्हणून करायला हवा. रंगभूमीवर येऊन गेलेल्या कलाकृती या माध्यमातून नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत, मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचवायला हव्यात. परंतु नव्या नाटकांसाठी नाटय़गृहाशिवाय दुसरा पर्याय स्वीकारणे मला तरी योग्य वाटत नाही.

..एका टप्प्यावर नाटक पुन्हा सुरू झाले. त्यामुळे नाटय़क्षेत्रात आशावादी वातावरण तयार झालेले असतानाच अवघ्या काही महिन्यांत पुन्हा नाटकावर पडदा पडला. पुन्हा मागचे दिवस आले.

आणि आता पुन्हा एकदा नाटक सुरू होतंय. त्यामुळे नाटक सुरू करताना प्रत्येक जण आधीच्या अनुभवांची उजळणी करणार, हे नक्कीच. आता लेखक, दिग्दर्शक, कलाकार, रंगमंच कामगार सगळेच आधी नाटकाची आर्थिक गणिते पडताळून पाहणार आहेत. कारण सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. राज्य सरकारने सवलती दिल्या तरी नाटकाचे नेपथ्य, कपडे, तालमी यावर लाखोंचा खर्च होणार आहे.. जो गेल्या वेळी पूर्णत: पाण्यात गेला. विशेष म्हणजे कलाकारांना एकत्र आणणे, नाटकाचे नियोजन करणे हेही निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी कसोटीचे असणार आहे. मधल्या काळात अनेक कलाकार नाटकापासून दूर जाऊन विविध माध्यमांत व्यग्र झाले आहेत. त्यांना एकत्र करून ही मोट पुन्हा बांधावी लागणार आहे.

नाटक सुरळीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रेक्षक उपस्थिती! सध्या राज्य सरकारने ५० टक्के आसनक्षमतेसह नाटकांना परवानगी दिली असली तरी काही दिवसांत किंवा महिन्याभरात १०० टक्के उपस्थितीला परवानगी द्यायला हवी, अशी विनंती मी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून सरकारला करू इच्छितो. कारण ५० टक्के क्षमतेसह नाटक सुरू ठेवणे निर्मात्यांना आर्थिकदृष्टय़ा जड जाणार आहे. ५० टक्कय़ांमध्ये जेव्हा प्रयोग हाऊसफुल्ल होतो तेव्हा नाटय़गृह केवळ ५० टक्केच भरलेले असते. त्यामुळे नाटकाचे आर्थिक गणित साधणे अवघडच आहे.

यात नाटय़गृहांचाही विचार व्हायला हवा. गेल्या दीड वर्षांत नाटय़गृहांममध्ये झालेली मोडतोड सुधारण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. राज्यातील अनेक नाटय़गृहांची दुरुस्ती पूर्ण झालेली नसल्याने सुरुवातीचे काही महिने नाटय़गृह मिळणेदेखील कठीण होणार आहे. जी नाटय़गृहे संस्था किंवा खासगी मालकीची आहेत, अशांना शासनाने मदत करायला हवी. त्यांचे वीजबिल, कर यांत सवलत देण्याचा सरकारने विचार करावा. असा मदतीचा हात निर्मात्यांनाही हवा आहे. जाहिरात एजन्सी, वृत्तपत्रं यांनीही जाहिरातींचे दर कमी करायला हवेत. कारण आता आर्थिक ताण सहन करून कुणीही नाटक करणार नाही. आपण अभिव्यक्तीचे सादरीकरण करतो आहोत याचा आनंद एकीकडे असला, तरीही आर्थिक बाजूही सतत खुणावत असते. असे सारे असले तरीही नाटकाची तिसरी घंटा कधी वाजेल, प्रेक्षकांनी नाटय़गृह कधी भरेल याकडे आम्हा सर्वाचे डोळे लागले आहेत.

मायबाप रसिकांकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण त्यांचा उदंड प्रतिसाद हाच नाटकाला तारणार आहे. गेल्या अठरा महिन्यांत कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकांचीही मानसिक अवस्था बदलली आहे. आपल्याला नाटकाची आठवण येते हे खरे असले तरी आपल्या अग्रक्रमांतून नाटक बाजूला पडले आहे.

निर्बंध शिथिलीकरणानंतर सर्वप्रथम मालिका सुरू झाल्या. तेव्हा मालिका न पाहणारा वर्गही मालिका पाहू लागला. कौटुंबिक मालिका आवडत नसतील तर रिअ‍ॅलिटी शो ते पाहत होते. मुलांकडे लॅपटॉप, स्मार्ट फोन आल्याने आशय पाहण्याचे पर्याय बदलले. यू-टय़ूबवरचा लोकांचा वेळ वाढला. ओटीटीला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्यामुळे घरबसल्या मिळणारे हे मनोरंजन काहीसे बाजूला ठेवून घराबाहेर पडून नाटकाला येण्याची सकारात्मकता प्रेक्षकांनी दाखवली पाहिजे.

प्रत्यक्ष नाटक पाहून मनावर होणारा परिणाम, जगण्याचे उलगडत जाणारे तत्त्वज्ञान, स्वसंवाद, वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान हा अनुभव  माणूस म्हणून आपल्याला संपन्न करणारा आहे. त्यामुळे ती सकारात्मकता केवळ आमच्यासाठी नाही, तर प्रेक्षकांसाठीही महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे हा प्रतिसाद आम्हाला सहानुभूती म्हणून नको, तर  तुमच्याही मनातील नैराश्य, चिंता दूर करण्यासाठी असायला हवा. आज लाखो लोक एकाच वेळी बघू शकतील अशी माध्यमे उपलब्ध असताना केवळ सात-आठशे प्रेक्षकांसाठी समोर उभं राहून एखादी कला सादर केली जात असेल तर त्याचे महत्त्व आणि गरज आपण लक्षात घ्यायला हवी. प्रेक्षकांना जर नाटकाला यावंसं वाटलं तरच नाटक करण्यात मजा आहे. करोनाकाळात नाटकाची जशी झीज झाली आहे तशीच झीज प्रेक्षकांच्या मनाचीही झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने वंगण घालून, ते दुरुस्त करून आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे.

वृत्तपत्रे, माध्यमे, वाहिन्या यांनीही लोकांना नाटकाकडे आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सकारात्मक वातावरण निर्माण करून प्रेक्षकांना प्रोत्साहन द्यायला हवे. तशात आता सणासुदीचे दिवस सुरू होतील आणि पुन्हा नाटक मागे पडेल. आपल्याकडे सणवार, परीक्षा, पाऊस- काहीही झाले तरी नाटकाचा अग्रक्रम जातो. त्यामुळे सगळ्या स्तरांतून नाटकाला हातभार लागायला हवा. त्याकडे एक सांस्कृतिक चळवळ म्हणून बघण्याची वेळ आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षक नाटकाला येणार असल्याने ‘विरहातून प्रेम उमलते’ अशी ती अवस्था असायला हवी आणि ते प्रेम वाढत जायला हवे.

करोनाभीतीचा बागुलबुवा आता कमी करायला हवा. सतत मनाभोवती भीती निर्माण करून चालणार नाही. सरकारनेही प्रोत्साहनपर धोरण राबवायला हवे. खिडकीची बारीकशी फट उघडून ‘बाहेर किती रम्य दृश्य आहे ते पहा..’ असं म्हणून कसं चालेल? त्यामुळे पुरेशी मुभा आता मिळायला हवी.

या नव्या पर्वाची सुरुवात करताना कलाकार म्हणून आमच्याही मनात उत्कंठा आहे. जेव्हा चेहऱ्यावर रंग लावून पहिला प्रयोग करण्याचा दिवस उगवेल तेव्हा भीतीचा गोळा आमच्याही पोटात असेल. कारण मधे पडलेले अंतर हे भीतीदायकच होते. टाळेबंदीआधी रंगभूमीवर चालू असलेल्या नाटय़कृती पुन्हा नव्याने उभ्या करणे म्हणजे नव्या नाटकांसारखेच हे ‘पुनरुज्जीवन’ असणार आहे. तशात आता नव्या कलाकृतींचा विचार करणे, त्या रंगभूमीवर आणणे हे तर अधिकच आव्हानात्मक असेल.

सांस्कृतिकदृष्टय़ा समाजाची जडणघडण करून त्यावर नव्याने नाटकाचे संस्कार करणे गरजेचे झाले आहे.. जे ‘नाटक’ गेली कित्येक वर्षे अविरतपणे करत आलेले आहे. या संस्कारांसाठी नाटकाचा पडदा पुन्हा एकदा उघडून ते पूर्ववत व्हायला हवे. उत्तम आरोग्यासाठी दोन लसमात्रा अनिवार्य आणि अत्यावश्यक आहेतच; त्याचबरोबर माणसांच्या मनांना उभारी येण्यासाठी आता नाटकाचा बूस्टर डोसही अत्यंत गरजेचा आहे.