रघुनंदन गोखले
मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे माजी प्रशिक्षक/व्यवस्थापक अॅलेक्स फग्र्युसन यांनी मध्ये एक विधान केलं होतं आणि ते खूप गाजलंही. मँचेस्टर युनायटेड क्लबच्या इतिहासातील सर्वात नावाजलेले आणि यशस्वी प्रशिक्षक असल्यामुळे मी त्यांच्या मताला महत्त्व देतो. फग्र्युसन म्हणाले होते, ‘‘आता माझ्याकडे जर कोणी नवा फुटबॉल खेळाडू आला तर मी त्याला फुटबॉलमध्ये यश मिळण्यासाठी एकीकडे जलदगती बुद्धिबळाची प्रॅक्टिस कर असे सांगेन. कारण बुद्धिबळामुळे त्याला मैदानात क्षणार्धात निर्णय घेण्याची सवय लागेल.’’ बुद्धिबळ खेळ हा मानसिक विकासासाठी मदत करतोच, पण व्यक्तिगत विकासासाठी ते एक उत्तम साधन आहे..
सगळय़ांची महत्त्वाकांक्षा काही जगज्जेता किंवा ग्रँडमास्टर बनण्याची नसते. खूप जणांना वेळ घालवण्यासाठी किंवा मन:शांतीसाठीसुद्धा बुद्धिबळ खेळावंसं वाटतं किंवा काही जणांना बुद्धिबळाचा उपयोग आपल्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी करायचा असतो. पण ज्या पालकांना आपल्या मुलांना बुद्धिबळात पुढं न्यावंसं वाटतं त्यासाठी काय काय करावं? मी राज्य स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी पद्धतशीर मार्ग दाखवतो, त्या नंतर तुमच्या मुलांचे तज्ज्ञ प्रशिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतीलच!
१. सुरुवातीचं ज्ञान खूप महत्त्वाचं असतं. बुद्धिबळाचा पट लावण्यापासून तर मोहरी योग्य जागी लावणं हेसुद्धा मुलांना कळलं पाहिजे. नंतर मोहरी कशी चालतात, त्यांच्या खास चाली कोणत्या (उदा.- राजा किल्ल्यात नेणं, घोडय़ाच्या उडय़ा, आ पासा- EN PASSANT- फ्रेंच उच्चार) यांच्याशी मुलांना ओळख होणं गरजेचं असतं. जर तुमच्या जवळपास कोणी प्रशिक्षक नसेल तरी निराश होऊ नका. www. chesskid.com तुमच्या मदतीला आहे. मुलांना गंमत वाटेल अशा कार्टूनमार्फत त्यांना सगळय़ाची ओळख करून दिली जाते.
२. आता तुम्ही तयार आहात संपूर्ण डाव खेळायला. पुन्हा तुमच्या जवळपास बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नसेल तर chesskid आहेच. तिथं तुम्ही संगणकाविरुद्ध खेळू शकता. घाबरू नका, हे संगणक तुमच्या पातळीवर येऊन खेळतात. (आणि तुम्हाला उत्तेजन मिळावं म्हणून कधी कधी हरतातही!) तुम्हाला प्रत्येक डाव जिंकला की रेटिंग मिळतं. ते काही जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून नाही तर chesskid कडून असतं. तुम्ही हळूहळू प्रगती करत गेलात की तुम्ही अशा स्थितीत येऊन पोचता की आता तुम्हाला chesskid मदत करू शकत नाही. आता तुम्हाला चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे.
३. जगभर चांगल्या प्रशिक्षकांची कमतरता नाही. तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला ऑनलाइन हवं की प्रत्यक्ष प्रशिक्षण! आता तुम्ही इतके चांगले खेळू लागला आहात की तुम्हाला वरच्या इयत्तेत गेलं पाहिजे. म्हणजे chesskid ला रामराम ठोकून त्याचा मोठा भाऊ chess.com याच्याशी मैत्री केली पाहिजे. नुकतीच सुपर ग्रँडमास्टर अनिश गिरीने कार्यकारी अध्यक्ष म्हणून chess.com ची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आपल्याला आणखी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही! दुसरी एक website आहे- lichess.org. पूर्णपणे मोफत असलेली ही साइटसुद्धा बुद्धिबळ खेळणं, शिकणं यासाठी उपयुक्त आहे.
४. तुम्ही वरील साइट्सवर मनसोक्त खेळा, पण एक गोष्ट विसरू नका- तुमचे सगळे नाहीत तरी बरेचसे डाव तुम्ही तुमच्यापेक्षा चांगल्या आणि अनुभवी प्रशिक्षक/ मित्राकडून विश्लेषण करून घेतले पाहिजेत. बुद्धिबळ इतका मोठा खेळ आहे की तुम्ही रोज नवी चूक केलीत तरी एक जन्म कमी पडेल. त्यापेक्षा कमीत कमी त्याच त्याच चुका तरी आपण टाळल्या तरी खूप झालं. आणि लक्षात ठेवा – तुम्हाला चुका दाखवण्यासाठी मार्गदर्शक हवा. कारण आपल्याकडे एक म्हण आहे – दुसऱ्याच्या डोळय़ातील कुसळ (लाकडाचा सूक्ष्म तुकडा) दिसतं, पण स्वत:च्या डोळय़ातील मुसळ (साधारण ५ फूट लांब लाकडाचा तुकडा ) दिसत नाही.
५. आता वेळ झाली आहे स्पर्धा खेळायची. बाहेर जाऊन स्पर्धा खेळण्याची सवय तुम्हाला घरी बसून करता येते. तुमचा मित्र/ प्रशिक्षक मदतीला घ्या. स्वत: पटावर बसून खेळा. तुमचा मित्र संगणकाकडे बघून तुम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या चाली सांगेल आणि तुमची चाल प्रतिस्पर्ध्याला कळवेल. इथे तुम्हाला पटावर बसून खेळायची सवयही लागेल. कित्येक वेळा घरी बसून असे डाव खेळले तर मुलांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसून येतो. बाहेर खेळणाऱ्या मुलांचे आवाज, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम यामुळे ती विचलित होतात. त्यासाठी त्यांना काही तरी आमिष दाखवा की, पाच डावांतले किमान चार डाव जिंकलात तर त्याच्या आवडीची भेटवस्तू मिळेल. आणि पाचपैकी पाच जिंकला तर तो मागेल ते! मात्र तीन किंवा त्याहून कमी जिंकला तर त्याला काही तरी आवडीची गोष्ट सोडावी लागेल. ही गोष्ट लहान मुली/ मुले यांच्यासाठी आहे, पण जर तुम्ही वयानं मोठे असाल तर स्वत:ला काही तरी बक्षीस घ्या किंवा दोन दिवस तुमचे आवडीचे पदार्थ खायचे नाहीत (किंवा उपास!) असं बंधन स्वत:वर घाला.
६. आता तुम्हाला बाहेर जाऊन खेळायला हरकत नाही. तुम्ही उत्तम खेळायला लागलात तरच रेटिंग स्पर्धा खेळा, कारण सुरुवातीला तुम्हाला कमी रेटिंग मिळालं तर तुम्ही ते वाढवणार कधी? ११०० रेटिंगच्या खेळाडूला २२०० रेटिंग करण्यासाठी जास्त प्रमाणात स्पर्धा खेळाव्या लागतात. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पाल्याला थोडे दिवस रेटिंग स्पर्धापासून दूर ठेवा, म्हणजे त्याला एकदम १५००-१६०० रेटिंग मिळेल. अर्थात हल्ली राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही आणि त्यामुळे तुमच्याकडे थांबायची तयारी असेल तरच माझा वर दिलेला सल्ला स्वीकारा. नाहीतर जवळपासच्या स्पर्धा खेळत राहा.
७. तुमच्या पाल्यानं थोडीफार बक्षिसं मिळवण्यास सुरुवात केली असेल तरी हुरळून जाऊ नका. माझ्या गेल्या ४० वर्षांच्या प्रशिक्षकाच्या अनुभवातून मला हे जाणवलं आहे की, पालक मुलांकडून एकदम खूप अपेक्षा ठेवतात आणि त्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. हीच योग्य वेळ आहे व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध मेहनत करण्याची. एकापाठोपाठ एक स्पर्धा खेळून पाल्यावर दडपण येतं. मानसशास्त्रानुसार, आपण अपमान लक्षात ठेवतो, पण कौतुक लगेच विसरतो. मी अनेक वेळा पाहिलंय की पाल्य एखादा डाव हरला तर आईवडील आणि प्रशिक्षक नाराज होतात. काही तर बोलत नाहीत, जेवत नाहीत. अशा वेळी त्या लहानग्याला किती अपराध्यासारखं वाटत असेल? शेवटी हा एक खेळ आहे. कितीही तयारी केली तरी खेळाडूंवर दडपण येतं आणि त्यामुळेही चुका होतात. मोठमोठे ग्रँडमास्टर हास्यास्पद चुका करतात. वाचकांना मी क्रिकेटमधील एक उदाहरण देतो. सचिन तेंडुलकर घ्या! प्रत्येक चेंडू कसा खेळावा याचं संपूर्ण ज्ञान त्याला होतं. तरीही त्याची विकेट कशी जात असे? कारण हा एक खेळ आहे. इथे चुका होणारच. जो कमीत कमी चुका करेल तो जिंकेल.
मी वाचकांना आता बुद्धिबळाच्या ठरावीक स्तरापर्यंत आणून सोडलं आहे. नियमित मेहनत आणि सुयोग्य नियोजनानेच तुम्हाला चांगले निकाल मिळतील. आता इथे ‘चांगले’ हा शब्द सापेक्ष आहे. तुम्हाला चांगला निकाल वाटतो तो खरोखर चांगला असेलच असे नाही. अनेकदा पाल्याला कमी गुण मिळाले की तुम्ही पाल्याच्या कामगिरीवर निराश होता, पण हे अनेकदा पालकांच्या अज्ञानामुळे होतं. समजा, तुमचा पाल्य राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा खेळायला गेला आणि तिथे त्याला (तुमच्या मते) कमी गुण मिळाले की तुम्ही नाराज होता. परंतु इतक्या कमी अनुभवात त्यानं जे मिळवलं आहे त्याचं कौतुक करा.
दुसरं म्हणजे तुलना! ‘‘आम्ही बघ तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतो आणि तू हरतोस कसा? तुझा मित्र बघ कसा जिंकतो आहे.’’ अशा प्रकारच्या संवादामुळे मुलाच्या मनात त्या प्रतिस्पर्ध्याविषयी असूया आणि स्वत:साठी न्यूनगंड तयार होतो. आणि सर्वात वाईट म्हणजे पाल्याच्या मनात आपल्या स्वत:च्या आईवडिलांविषयी राग बसतो. त्याला त्या वयात हारजीत एवढंच कळत असतं आणि त्याला आपण का जिंकत नाही हेच कळत नाही.
अशा वेळी येतो प्रशिक्षक! त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. स्वत: मानसिक संतुलन न ढासळता पालक आणि पाल्य यांना सांभाळून घेणं महत्त्वाचं असतं. पालकही सर्व दोष प्रशिक्षकावर टाकून मोकळे होतात. अशा वेळी प्रशिक्षकानं पाल्याच्या प्रगतीविषयी स्पष्ट कल्पना देणं महत्त्वाचं असतं. पालक धरसोड वृत्तीचे असतील तर ते सारखे प्रशिक्षक बदलत असतात. त्यापेक्षा पालकांनी प्रशिक्षकाला स्पष्ट कल्पना द्यावी की आम्ही पाल्याला सहा महिने तुमच्याकडे पाठवू. त्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ. त्यामुळे प्रशिक्षकही सहा महिने मनापासून शिकवतो.
जे पालक सुटीमध्ये युरोप दौरा करतात त्यांना माझी एक सूचना आहे. आपल्या पाल्याला एखादी तरी छोटीशी स्पर्धा तिकडे खेळू द्या. नव्या (आणि चांगल्या) वातावरणात त्यालाही उत्साह वाटेल आणि तुम्हालाही छान आनंद मिळेल. बघा जमलं तर!
पुण्याचे माजी रणजी खेळाडू आणि क्रीडा वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. राजीव शारंगपाणी यांनी एकदा एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांच्याकडे एक पालक आले होते, ते त्यांना म्हणाले, ‘‘डॉक्टर, माझा मुलगा आणि शेजारचा मुलगा एकाच ठिकाणी टेनिस प्रशिक्षणाला जातात, एकत्र सराव करतात आणि तरीही माझा मुलगा मागे पडतो. कारण काय?’’ डॉ शारंगपाणी म्हणाले, ‘‘तुम्हीच त्याचं उत्तर दिलं आहे. तो त्यांचा मुलगा आहे आणि हा तुमचा.’’ शारंगपाणींच्या मते, प्रत्येकाचे शारीरिक गुणधर्म वेगवेगळे असतात. हाच नियम आपण बुद्धिबळाला (मानसिक गुणधर्मासाठी) पण लावू या!
पालकांनो, निराश होऊ नका. बुद्धिबळ खेळणाऱ्या पाल्याकडून फार अपेक्षा ठेवू नका. जर तो चांगला असेल तर जी संधी मिळेल तिचा फायदा घेईल; आणि बुद्धिबळात जगज्जेता झाला नाही तरी बुद्धिबळामुळे इतर क्षेत्रांत चमकेलच तो! खेळायला सुरुवात केल्यावर दोन वर्षांत आशियाई स्पर्धा जिंकणं अपवादात्मक असतं आणि तो गुकेश असतो! पोल्गर भगिनींनी शाळा सोडून फक्त बुद्धिबळ केलं किंवा भीमसेन जोशी घरातून पळून जाऊन ते मोठे गायक झाले, हे अपवाद असतात. आपण विश्वनाथन आनंदचा आदर्श ठेवू या. त्यानं बी.कॉमच्या अंतिम परीक्षेसाठी आशियाई स्पर्धेवर पाणी सोडलं होतं, पण जगज्जेतेपद त्याला हुलकावणी देऊ शकलं नाही.
gokhale.chess@gmail.com