भारत-बांगलादेश राजकीय-सांस्कृतिक बंधांचा आलेख

बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचा भारतात आणि त्यातही प्रामुख्याने पश्चिम बंगाल व ईशान्य भारतावर परिणाम होत असतो.

भारत-बांगलादेश राजकीय-सांस्कृतिक बंधांचा आलेख
‘विप्लवी बांगला, सोनार बांगला’

जतिन देसाई

भारताच्या पूर्वेला असलेल्या बांगलादेशाशी आपले अत्यंत जवळचे आणि भावनिक संबंध आहेत. बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात भारताने  महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणूनच पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लंडन मार्गे ढाक्याला जाताना बंगबंधू शेख मुजिबुर रेहमान काही तास दिल्लीला थांबले होते. आता बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला ५१ वर्षे झाली आहेत, तर गेल्या वर्षी मुजिबुर रेहमान यांची जन्मशताब्दी होती. शेख मुजिबुर रेहमान यांच्या कन्या आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे धोरण सर्वसमावेशक आहे. उभय देशांमध्ये नद्यांच्या पाण्याच्या वाटपासारखे काही मतभेदाचे मुद्देही आहेत. चीनचा प्रभावदेखील बांगलादेशात वाढत आहे. चीनने मोठय़ा प्रमाणात बांगलादेशात गुंतवणूकही केली आहे. पुढच्या वर्षी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका आहेत. २००९ पासून पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्याची शक्यता अधिक आहे.

बांगलादेशात घडणाऱ्या घटनांचा भारतात आणि त्यातही प्रामुख्याने पश्चिम बंगाल व ईशान्य भारतावर परिणाम होत असतो. तसेच भारतातल्या घटनांचा बांगलादेशावरही प्रभाव पडत असतो. पूर्वेकडील राष्ट्रांबद्दलच्या धोरणात भारतासाठी बांगलादेश अतिशय महत्त्वाचा आहे. ही वस्तुस्थिती असल्याने भारतीयांनी बांगलादेश व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी लिहिलेलं ‘विप्लवी बांगला, सोनार बांगला’ हे पुस्तक यादृष्टीने महत्त्वाचं आहे. अतिशय सरळ, सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात लेखकाच्या आठवणी, प्रवासवर्णन, काही महत्त्वाच्या लोकांच्या मुलाखती व निरीक्षणे आहेत. हे पुस्तक दोन भागांतले आहे. १९७१ साली साप्ताहिक ‘साधना’मध्ये हेमंत गोखले यांनी लिहिलेले दहा लेख पुस्तकाच्या ‘विप्लवी बांगला’ या पहिल्या भागात आहेत. २०२० साली पाहिलेल्या आणि प्रगतिपथावरच्या बांगलादेशवरचे लेख ‘सोनार बांगला’ या दुसऱ्या भागात आहे. दोन्ही भाग मिळून वीस लेखांचा या पुस्तकात समावेश आहे.

या दोन भागांतल्या लेखांच्या काळात पन्नास वर्षांचं अंतर आहे. १९७१ मध्ये विद्यार्थी असताना गोखले यांनी पश्चिम बंगालात जाऊन तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांमध्ये काही आठवडे काम केलं होतं. तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी पहिले दहा लेख लिहिले होते. त्यानंतर २०२० साली त्यांना बांगलादेशमधल्या एका विद्यापीठातून कायद्याच्या विद्यार्थ्यांकरता व्याख्यान देण्यासाठी निमंत्रण आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी बांगलादेशचा हा दुसरा प्रवास केला. त्यांनी तेव्हा पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि विकासाच्या दिशेने प्रवास करत असलेल्या बांगलादेशावर  दहा लेख लिहिले. या दोन्ही भागांतले त्यांचे अनुभव, वर्णन, निरीक्षणं महत्त्वाची आहेत. या पुस्तकातून बंगाली मानसिकता व संस्कृती आपल्यासमोर उभी राहते.

व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांची बांगलादेशातील तरुण मुलामुलींशी भेट झाली आणि त्यांच्याशी संवादही झाला. बंगबंधूंचे मित्र आणि बांगलादेशचे पहिले कायदा मंत्री डॉ. कमाल हुसेन यांच्याशी त्यांची भेट झाली. बांगलादेशाच्या घटना परिषदेचेही ते अध्यक्ष होते. बांगलादेशची पहिली राज्यघटना संपूर्णपणे धर्मनिरपेक्ष होती. बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांसारखी मूल्ये होती. डॉ. कमाल यांच्या पत्नी डॉ. हमीदा या आजही मानवाधिकार आणि महिलांच्या प्रश्नावर तिथे सक्रिय आहेत.

बांगलादेशचा कुठेही उल्लेख झाल्यास आपल्याला इतर काही गोष्टींसोबत नौखालीही आठवते. लेखकाने म्हटलं आहे, ‘‘बांगलादेशला जायचे ठरले तेव्हाच नौखालीलाही जायचे हे मी ठरवले होतेच.’’ नौखालीचं भारताच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४६ मध्ये नौखाली परिसरात धार्मिक दंगली झाल्या. हिंदू या परिसरात अल्पसंख्याक होते. मोठय़ा प्रमाणावरील िहसाचार, कत्तल, जाळपोळ, लूट यामुळे हिंदू सुरक्षित जागी स्थलांतर करायला लागले होते. अशा परिस्थितीत ‘वन मॅन आर्मी’ महात्मा गांधी नोव्हेंबरच्या सुरुवातीला तिथे पोहोचले आणि जवळपास चार महिने तिथे राहिले. या काळात ४७ गावांमध्ये फिरून लोकांची ते समजूत घालत होते. गांधींच्या प्रार्थनासभेला मोठय़ा संख्येने दोन्ही समाजांतील लोक येत असत. गांधीजींच्या सलोख्याच्या या अथक प्रयत्नांना यश येऊ लागलं. नंतर गांधी कलकत्त्याला परत गेले. गोखलेंनी ‘गांधीजींच्या नौखालीत’ शीर्षकाच्या लेखात म्हटलं आहे.. ‘‘नबकुमारजींनी (नौखाली आश्रमाचं काम ते पाहतात.) नंतर सांगितले की, १९९२ मध्ये भारतामध्ये बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा बांगलादेशात काही ठिकाणी दंगे झाले, परंतु विशेष म्हणजे गांधीजी ज्या ४७ गावांमध्ये गेले होते तिथे िहसेची एकही घटना घडली नाही.’’

सर्वोदयी नेते विनोबा भावे १९६२ मध्ये पूर्व पाकिस्तानात गेले होते आणि त्यांना ११० एकर ३७ बिघे जमीन भूदानात मिळाली होती, याची बहुसंख्य भारतीयांना माहिती नाही. भूदानात मिळालेल्या जमिनी त्यांनी भूमिहीनांमध्ये वाटून टाकल्या. विनोबा भावे पूर्व पाकिस्तानात १६ दिवस होते. ‘पूर्व पाकिस्तानात विनोबाजी!’ नावाच्या लेखात गोखलेंनी म्हटलं आहे- ‘‘विनोबांना पूर्व पाकिस्तानात प्रवेश देण्यावरून पाकिस्तानच्या वर्तमानपत्रांतून टीका करण्यात आली. तेव्हाचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महम्मद अली यांनी विनोबांना दिलेल्या प्रवेशाचे समर्थन केले. आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून हा प्रवेश दिला आहे असे त्यांनी म्हटले. केवळ भारतानेच नव्हे, तर जगातल्या अनेक देशांनी या कृतीची प्रशंसा केली.’’

‘रवींद्रनाथ टागोर आणि सुचित्रा सेन यांची बांगलादेशातील निवासस्थाने, भारत आणि बांगलादेश यांना जोडणारे बाऊल लालन शहा फकीर, बांगलादेश आणि सर्वधर्मसमभाव : एक संमिश्र चित्र, बांगलादेशातील हिंदू कायद्यात सुधारणांची आवश्यकता’ आदी लेखांतून बांगलादेशाबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. लेखकाने हे पुस्तक रवींद्रनाथ टागोर आणि शेख मुजिबुर रेहमान यांच्या स्मृतीस अर्पण केलं आहे. बांगलादेश समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे.                                                                        

‘विप्लवी बांगला, सोनार बांगला’-

हेमंत गोखले, साधना प्रकाशन,

पृष्ठ- १४८, किंमत- १५० रु.

jatindesai123@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शाहूमहाराज राज्यारोहण सोहळाकाव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी