‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून स्वत:च्या शोधापर्यंत येऊन ठेपते. मात्र, ‘स्व’चा पत्ता सापडला की कलेचं प्रयोजनच नाहीसं होतं. प्रत्येक सच्च्या कलावंताला या द्वंद्वाला सामोरं जावंच लागतं. या तगमगीतूनच त्याच्या कलेचे निर्मितीक्षण मुखर होतात. लास्लो क्रास्नाहोरकाइ याच द्वंद्वाच्या सरहद्दीवरून लिहिणारा कलावंत आहे.
भारतीय परंपरेनुसार लेखकांच्या वाङ्मयीन प्रवृत्तींचं वर्गीकरण दोन प्रकारांमध्ये करणं शक्य आहे. एक व्यास प्रवृत्ती आणि दुसरी वाल्मीकी प्रवृत्ती. यातली व्यास प्रवृत्ती रौद्र आणि विक्राळ, अस्ताव्यस्त आणि प्रचंड. तर वाल्मीकी प्रवृत्ती सौम्य, नेटकेपणाचं प्रतिनिधित्व करणारी. व्यवस्था आणि नेमस्तपणावर विश्वास असलेली. व्यास प्रवृत्ती एक्स्प्रेशनिस्ट, तर वाल्मीकी प्रवृत्ती इम्प्रेशनिस्ट. या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक काळात प्रत्येक देशात आढळतात. दोन्ही प्रवृत्ती आपापल्या पद्धतीनं प्रत्येक युगातल्या लेखकांमध्ये व्यक्त होत असतात. कधी दोन्ही प्रवृत्तींचं संयुग तयार झालेलं दिसतं, तर कधी एकाच लेखकात एक प्रवृत्ती दुसरीवर वर्चस्व गाजवताना दिसते. एकोणिसाव्या शतकातल्या श्रेष्ठ रशियन लेखकांचं उदाहरण घ्या. दस्तयेवस्की व्यास प्रवृत्तीचं, तर तोल्सतोय हे वाल्मीकी प्रवृत्तीचं उदाहरण. गोगोलमध्ये दोन्ही प्रवृत्तींचं संयुग दिसतं. लांब कशाला जा; अगदी आपल्या ज्ञानेश्वर-तुकारामाचंच वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व पुराव्यासाठी घेता येईल. ज्ञानेश्वरांच्या राजस प्रतिमा, ओवी छंदाची निवड आणि विषय ख्यालगायनासारखा खुलवत नेण्याची पद्धत वाल्मीकी प्रवृत्तीशी जवळची; तर तुकारामाचा रांगडा रोखठोकपणा, थेट बोलण्याची सवय आणि शब्दांमधली तीक्ष्णता ही व्यास प्रवृत्तीशी नातं असलेली. थोडं अलीकडे आलं तर वि. का. राजवाडय़ांचं उग्र वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्यासांचा वारसा सांगणारं, तर केतकरांची ऋजुता वाल्मीकींच्या कुळातली. थोडं पुढे येऊन हिंदी साहित्यात डोकावलं तर निराला, मुक्तिबोध, अमृतलाल नागर, शमशेर बहादूर सिंह असे व्यास प्रवृत्तीचे अनेक लेखक दाखवता येतील. धर्मवीर भारती, हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत अशी वाल्मीकी प्रवृत्तीही अनेक लेखकांमध्ये आढळेल.
एकविसाव्या शतकापासून या दोन ध्रुवांमधलं संतुलन कमी व्हायला सुरुवात झालेली दिसते. आज कोणत्याही भाषेत लिहिणाऱ्या लेखकांची उदाहरणं घेतली तरी निखळ व्यास प्रवृत्तीचा लेखक सापडणं कठीण. बहुतेक लेखकांमध्ये दोन्ही प्रवृत्तींचं कमी-अधिक मिश्रण दिसतं. त्यातही वाल्मीकी प्रवृत्ती अधिक. कारण या प्रवृत्ती केवळ लेखनापुरत्या सीमित नाहीत. त्यांचा संबंध लेखकाच्या जीवनप्रकृतीशी आहे. त्या लेखकाच्या जगण्यातून प्रकटलेल्या आहेत. आजचं युग भौतिकवादी. भांडवलशाहीनं ताब्यात घेतलेलं. ठोस चंगळवाद आणि व्यवहारी हिशेबाच्या चाकांवर चालणारं. नेमस्त, नेटकेपणावर विश्वास असलेलं. जगण्याच्या प्रवाहात बुडायचं नसेल तर लेखकाला या परिघात स्वत:ला बसवावंच लागतं. फक्कड कलंदरपणा परवडणारा नसतो. त्याचे दोन धोके असतात. एक तर लेखक विक्षिप्त ठरवून वाळीत टाकला जातो, किंवा त्याच्याभोवती दंतकथांचं धुकं निर्माण होऊन लेखक त्यात गुरफटून जातो. हे दोन्ही धोके टाळून स्वत:च्या शर्तीवर जगत लिहिणारा लेखक विरळाच.
या परिस्थितीत लास्लो क्रास्नोहोरकाइ (Laszlo Krasznohorkai) या हंगेरियन लेखकाचं असणं आणि लिहिणं आश्वासक आहे. साहित्याचं आणि लेखकाचं क्रयवस्तूत रूपांतर होण्याच्या काळात लिहिण्याच्या सर्व जोखमी पत्करून लिहिणारा हा लेखक आहे. तो गरज नसेल तेव्हा लेखक म्हणून व्यासपीठावर बसत नाही. वर्तमानपत्रांतून फुटकळ लेख लिहून आपली ऊर्जा वाया घालवीत नाही. भारंभार मुलाखती देऊन स्वत:चं महत्त्व वाढवीत नाही. बुदापेश्तपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटय़ा गावातल्या जुन्या घरात राहून तो शांतपणे लिहितो. वेळोवेळी चीन आणि जपानला जातो. तिथल्या झेन साधूंच्या मठात पाच-सहा महिने मुक्काम करतो. परतल्यावर अधिक काळ एकटा राहणंच पसंत करतो. त्याचं जगणं आणि लिहिणं यांत ढवळाढवळ करायला बाहय़ जगाला परवानगी नाही. त्याला वाटेल तेव्हा तो स्वत:च लेखकीय कोशाची दारं किलकिली करतो, बाहय़ जगाशी संवाद साधतो आणि आपल्या आतल्या जगात परत जातो.
त्याचं हे आतलं जग कसं असेल, याची कल्पना त्याच्या लेखनावरून येते. त्याच्या पाच कादंबऱ्यांपकी ‘सेंटनटँगो’ ‘मेलँकली ऑव्ह रेझिस्टन्स’ आणि ‘वॉर अ‍ॅण्ड वॉर’  या तीनच कादंबऱ्या आजवर इंग्रजीत अनुवादित झालेल्या आहेत. त्यापकी ‘सेंटनटँगो’ (Santantango) ही त्याची पहिली कादंबरी. ती प्रसिद्ध झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मात्र, तिचा इंग्रजी अनुवाद यावर्षी ऑगस्टमध्ये बाहेर आला. अनुवादाला एवढा वेळ लागण्याचं कारण क्रास्नाहोरकाइची शैली. त्याची वाक्यं लांबलचक, अर्थाचे अनेक स्तर सामावणारी आणि वाचकाला श्वास घ्यायलाही उसंत न देणारी असतात. अनेकदा वाक्यांचे परिच्छेद बनतात आणि ते दोन-तीन पानं व्यापतात. त्यांची स्वत:ची अशी खास लय असते. ती अनुवादात उतरणं अशक्यप्राय. अनुवादक जॉर्ज शेíतस स्वत: कवी. त्यानं प्रत्येक वाक्याचे अनेक खर्डे करत १५ वर्षांच्या मेहनतीनं हा अनुवाद पुरा केला. त्यानं मूळ हंगेरियन भाषेची लय आणि पोत भाषांतरात कायम ठेवल्याचं दोन्ही भाषा जाणणाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, फक्त इंग्रजी जाणणारा वाचकही या अनुवादाची वाचनीयता सहज मान्य करेल.
या कादंबरीवर बेला तार या प्रतिभावंत दिग्दर्शकानं बनवलेला साडेसात तासांचा कृष्णधवल सिनेमा यापूर्वीच जगभरातल्या रसिकांकडून वाखाणला गेला आहे. बेला तार आणि क्रास्नाहोरकाइ यांनी ‘डॅम्नेशन’,‘वर्कमाइस्टर हार्मनीज्’, ‘मॅन फ्रॉम लंडन’ आणि ‘तुरिन हॉर्स’ या सिनेमांसाठी एकत्र काम केलेलं आहे. त्यातला ‘वर्कमाइस्टर हार्मनीज्’ क्रास्नाहोरकाइच्या ‘मेलँकली ऑव्ह रेझिस्टन्स’ या कादंबरीवर आधारित आहे.
‘सेंटनटँगो’ या कादंबरीची रचना टँगो या नृत्यप्रकाराशी जुळणारी आहे. टँगोमध्ये नर्तक जसा विशिष्ट अवकाशात लयबद्धरीत्या मागे-पुढे जात राहतो, तशी कादंबरी काळ या मितीमध्ये मागे-पुढे जात राहते. कादंबरीचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात एक ते सहा असा प्रकरणांचा क्रम आहे, तर दुसऱ्या भागात सहा ते एक अशा उलटय़ा क्रमानं दिलेली प्रकरणं आहेत. सहावं प्रकरण हा दोन्ही भागांना जोडणारा दुवा. पहिल्या भागाच्या अखेर असलेल्या सहाव्या प्रकरणातली घटना दुसऱ्या भागाच्या प्रारंभी असलेल्या सहाव्या भागात वेगळ्या पात्राच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगितली जाते. हा भाग असा काळात मागे जात पहिल्या भागातल्या प्रसंगांना वेगळ्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगतो.
कादंबरीतला अवकाश कम्युनिस्ट राजवटीतल्या एका हंगेरियन गावाचा आहे. गावातला प्रत्येक जण भरपूर पसे मिळवून गाव सोडून जाण्याचं स्वप्न पाहतो आहे. गावात सर्वत्र दारिद्रय़, विघटन आणि ओसाडीच्या खुणा आहेत. त्या गडद करण्यासाठी सतत पसरलेलं मळभ आणि पावसाची कायम सुरूअसलेली रिपरिप. या खिन्न वातावरणात पात्रं दान्तेच्या पग्रेटरीप्रमाणे स्वर्ग आणि नरक यांच्यामधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’मध्ये असल्यासारखी भासतात. गाव जणू अंतकाळच्या पृथ्वीचं प्रतीक बनतं. लांब लांब वाक्यांनी विणलेलं निवेदन कुणाच्यातरी मेंदूत आकार घेत असावं असा भास होतो. एका मुलाखतीत क्रास्नाहोरकाइनं या लांब वाक्यांबद्दल म्हटलं आहे की, ‘आपण विचार करताना त्यात पूर्णविराम असत नाही. त्यामुळे लिहितानाही तो देण्याची गरज नाही. पूर्णविराम द्यायचा अधिकार केवळ परमेश्वराचा आहे.’
या संपूर्ण कादंबरीत समाजापासून वेगळं असल्याचा, उपरेपणाचा भाव प्रमुख आहे. आपण कुठेही असलो तरी ‘तिथले’ नसतो, ही अस्वस्थ करणारी जाणीव क्रास्नाहोरकाइच्या सर्वच लेखनात आढळते. ‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. कधीही न संपणारा. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून स्वत:च्या शोधापर्यंत येऊन ठेपते. मात्र, ‘स्व’चा पत्ता सापडला की कलेचं प्रयोजनच नाहीसं होतं. प्रत्येक सच्च्या कलावंताला या द्वंद्वाला सामोरं जावंच लागतं. त्यातून सुटका नसते. या तगमगीतूनच त्याच्या कलेचे निर्मितीक्षण मुखर होतात. क्रास्नाहोरकाइ याच द्वंद्वाच्या सरहद्दीवरून लिहिणारा कलावंत आहे.
क्रास्नाहोरकाइ जपानमध्ये बौद्ध मठात मुक्कामाला असताना तिथला प्रमुख भिक्खू त्याला म्हणाला, ‘तू लिहिणं बंद कर. शब्दांनी काहीही साध्य होत नाही.’ क्रास्नाहोरकाइ कित्येक महिने या सल्ल्याचा गांभीर्यानं विचार करत राहिला. त्याला तो सल्ला मनापासून पटला होता. तो अमलात आणणं मात्र त्याला अजूनही जमलेलं नाही, हे आपलं सुदैव.