ख लिल गिब्रान (यांचा उच्चार बहुधा ‘जिब्रान’ असा केला जातो.) हे गेल्या शतकातले कवी, तत्त्वज्ञ, चित्रकार. त्यांचे एक चरित्र (श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले) १९७६ मध्ये प्रकाशित झाले. प्रस्तुतचा अनुवाद त्याही पूर्वी- म्हणजे ३५ वर्षे आधी प्रसिद्ध झाला होता. मात्र, हा अनुवाद हा काही एकमेव नव्हे. ‘दी मॅड मॅन’ (१९१८) आणि ‘वाँडरर’ (१९३२) या दोन पुस्तकांचे अनुवाद काका कालेलकर यांनी केले होते. ‘सँड अँड फोम’ याचाही अनुवाद काका कालेलकर यांनी केला होता. मात्र, बहुधा वाचकांना ऐकून तरी परिचित असेल असा गिब्रान यांचा मराठीतला अवतार १९४९ साली ‘रूपेरी वाळू’ या नावाने अवतरला. तो अनंत काणेकरांच्या रूपककथांचा संग्रह होता आणि बरेच समीक्षक त्याला गिब्रानच्या कथा समजले होते.

आता असा हा गिब्रान नक्की कोण होता आणि त्याचे वाङ्मयीन कार्य काय, याचा थोडा अंदाज यावा म्हणून त्याचे चरित्र प्रस्तुत पुस्तकाच्या सुरुवातीस दिले आहे. त्याचा महत्त्वाचा भाग असा- खलिल गिब्रान- (१८८३-१९३१). जन्म- सीरिया. १८९५ ते १८९७ या काळात आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे वास्तव्य. १८९७ ते १९०३ मध्ये सीरियात पुन्हा वास्तव्य. बैरुटच्या अल् हिकमत पाठशाळेत अध्ययन. १९०३ ते १९०८ अमेरिका. १९०८ ते १९१२ पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास. १९१२ ते १९३१ न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य. १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ. एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.

Loksatta editorial Prime Minister Narendra Modi criticizes Congress on inheritance tax Sam Pitroda
अग्रलेख: वारसा आरसा!
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

अशा बहुचर्चित लेखकाचे ‘ळँी ढ१स्र्ँी३’ हे मूळ पुस्तक सर्वात महत्त्वाचे आहे असे प्रस्तावनाकार आचार्य भागवत म्हणतात. त्याच्या लेखनासंबंधी ‘दर्शन परिचय’ या प्रस्तावनेत ते म्हणतात- ‘खलिल गिब्रानच्या जीवनदर्शनात मानवजीवनातील सर्व प्रमुख प्रश्नांचा ऊहापोह आला आहे. मानवी जीवन हा विश्वजीवनाचा अथवा परमेश्वरी जीवनाचा एक अंश आहे. मानवाच्या हृदयात उसळणाऱ्या आशा-आकांक्षा या परमेश्वराच्या प्रेरणा आहेत आणि हा दृश्य प्रपंच अदृश्य अंतरात्म्याची लीला आहे, ही खलिलची जीवनविषयक प्रधान कल्पना आहे. ‘यदयं सर्व आत्मा’ याप्रमाणेच खलिलचे जीवनदर्शन अद्वैतरूपच आहे.’

२६ छोटय़ा प्रवचनांतून गिब्रानने प्रेम, लग्न, बालके, दान, श्रम, विक्री-खरेदी, दु:ख, मैत्री, कायदे, न्यायदान, विवेक आणि वासना अशा विविध विषयांवर- जे आपल्याला आयुष्यात नेहमीच सामोरे येतात आणि त्यांची उत्तरे हे तत्त्ववेत्ते, संत आणि महात्मे आपल्या लिखाणातून देत असतात यांवर आधारित आहेत. ही प्रवचने संवादरूपात आहेत. म्हणजे कुणीतरी एक प्रश्न विचारायचा आणि त्यावर गिब्रान उत्तरादाखल आपले निष्कर्ष सांगतो, असा हा घाट आहे. काही प्रवचने अथवा भाष्ये अगदी छोटी आहेत, तर काही थोडी मोठी. पण कुठेही वाचताना कंटाळा येणार नाही अशी आहेत.

‘अल् मुस्तफा हे त्याचे नाव होते. प्रभुकृपेने तो पावन झाला होता आणि प्रभूला तो अत्यंत प्रिय होता. आपल्या अंध:कारमय जीवनाची उषा तोच उजळीत असे..’ या सुरुवातीच्या वाक्यामधून ख्रिस्ती धर्मसंकल्पनेचे- ईश्वराचा संदेश घेऊन आलेला येशू व जीवनदर्शनशी साम्य अधोरेखित होते. मात्र, हे केवळ एका धर्माचे (ख्रिस्ती/ मुस्लीम) तत्त्वज्ञान नाही. आणि हे तत्त्वज्ञान रूक्ष गद्याद्वारे न सांगता काव्यमय शब्दांत सांगितल्याने वाचक पुढे पुढे वाचायला प्रवृत्त होतो. ‘प्रेम’ या संकल्पनेबाबत तो म्हणतो- ‘प्रेम स्वत:शिवाय अन्य काही देत नाही आणि दुसऱ्याकडून स्वत:शिवाय अन्य काही घेत नाही. पण प्रेमाचा आस्वाद घेत असताही तुम्हाला अभिलाषा आवरता येत नसतील तर तुमच्या अभिलाषा अशा असोत- वितळून जावे आणि रजनीला आपले मधुर गान गाणारा असा एखादा झुळझुळणारा निर्झर व्हावे.’ लग्नाबाबत तो म्हणतो- ‘तुम्ही परस्परांचे प्याले भरून द्या. पण एकाच प्याल्यातून दोघेही प्राशन करू नका.’ बालकांसंबंधी तो असाच इशारा देतो- ‘तुम्ही त्यांना आपले प्रेम द्या. पण आपले विचार मात्र देऊ नका. कारण त्यांना आपले स्वत:चे विचार आहेत.’ (आजच्या मानसशास्त्राच्या हे किती जवळचे आहे. फक्त ते ९० वर्षांपूर्वीचे आहे.)

दान देणाऱ्याला देण्याचा अभिमान किंवा सतत जाणीव असू नये, हे सांगतानाच तो असंही सांगतो- ‘आणि तुम्ही स्वीकार करणारे लोकहो- आणि तुम्ही सर्वच स्वीकार करणारे आहात- कृतज्ञतेचा भार मानून तुम्ही स्वत:वर आणि दात्यावर ओझ्याचे जू लादू नका.’ असं वाटल्यावर तो आपल्याला थबकायला भाग पाडतो.

हर्ष आणि शोक यावरील त्याचे भाष्य आपल्याला जे. कृष्णमूर्तीची आठवण करून देते- ‘ज्या प्याल्यात तुम्ही आपला द्राक्षमधु भरिता, तोच प्याला कुंभाराच्या भट्टीत भाजून निघालेला नव्हता काय? आणि तुमचे चित्त प्रसन्न करणारी बासरी म्हणजे तुम्ही सुऱ्यांनी कोरून काढलेला वेळूचा तुकडाच नव्हे काय?’ त्याचे घरावरील भाष्य फारच उद्बोधक आहे. ‘(घरात) त्यात हृदयाला काष्ठ- पाषाणांतून निर्माण केलेल्या वस्तूंपासून पवित्र गिरीशिखरांपर्यंत पोहोचविणारे सौंदर्य साठविले आहे काय? अथवा त्यात केवळ सुख आणि सुखाची लालसाच आहे, की जी तुमच्या घरात लबाडीने अतिथी म्हणून प्रवेश करते आणि नंतर यजमान बनते आणि त्यानंतर स्वामी होऊन बसते?’

‘तुमची वस्त्रे तुमचे पुष्कळसे सौंदर्य लपवून ठेवतात. तथापि तुमची कुरुपता मात्र ती लपवून ठेवीत नाही.’

संपूर्ण पुस्तकातून असे विचारकण इतक्या सोप्या भाषेत उलगडतात, की आपल्याला थांबून साऱ्याच प्रश्नांचा पुनर्विचार करणे भाग पडते. परिशिष्टात पाच उत्तरे आहेत. त्यातील चार काका कालेलकरांचे प्रश्न आहेत. पैकी ‘मी वेडा कसा झालो?’ यामध्ये ‘टं िटंल्ल’ या गिब्रानच्या पहिल्या पुस्तकाचे सूत्र आहे.

एकंदरीत जड भाषा आणि रूक्षता टाळून तत्त्वज्ञान सांगणारं पुस्तक म्हणून हे जरूर वाचावं असं पुस्तक आहे.

 

‘जीवन-दर्शन’ (खलिल गिब्रान यांच्या

‘ळँी ढ१स्र्ँी३’ नामक विख्यात ग्रंथाचा अनुवाद)

अनुवादक- रघुनाथ गणेश जोशी, वाङ्मयविशारद,

संपादन- आचार्य शं. द. जावडेकर आणि

आचार्य स. ज. भागवत

प्रकाशक- सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, प्रकाशन-डिसेंबर १९४१. मूल्य- २ रु. ल्ल

vazemukund@yahoo.com