scorecardresearch

Premium

मुलांना अपयश का येते?

‘मुलांना जे यायलाच हवे, असे शिक्षक – पालकांना वाटते त्यापेक्षा जे मुलांना हवे, ते शिकता येण्याची जागा म्हणजे शाळा- असे व्हायला हवे,’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ जॉन होल्ट यांनी या पुस्तकात केले आहे.

मुलांना अपयश का येते?

‘मुलांना जे यायलाच हवे, असे शिक्षक – पालकांना वाटते त्यापेक्षा जे मुलांना हवे, ते शिकता येण्याची जागा म्हणजे शाळा- असे व्हायला हवे,’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ जॉन होल्ट यांनी या पुस्तकात केले आहे.
मुलांना अपयश का येते? वर्गात प्रत्यक्षात काय घडते? अपयशी होणारी मुले काय करत असतात? त्यांच्या डोक्यात काय चालले असते? त्यांच्यातील क्षमतांचा ते अधिक वापर का करत नाहीत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने केलेल्या संशोधनाचा या पुस्तकात ढोबळमानाने आढावा घेण्यात आला आहे. या संबंधित टिपणांची मुलांच्या युक्त्या, भीती, अपयश, खरे शिक्षण आणि शाळा अपयशी कशा होतात या अनुषंगाने मांडणी केली आहे.
शाळेतील अभ्यास नीरस आणि कंटाळवाणा असल्याने बुद्धी, कौशल्य आणि क्षमतांचा कमीतकमी वापर करावा लागतो, म्हणून ती कंटाळतात, असे निरीक्षण लेखकाने यात नोंदवले आहे. वडीलधाऱ्यांना खूश करण्यासाठी मुले जी बचावात्मक आणि हीन तंत्रे उपयोगात आणतात, त्याने त्यांच्या विचारशक्तीवर कसा परिणाम होतो, हेही त्यांनी सांगितले आहे. वर्गात जी विचारक्षम मुले असतात ती इतरांना खूष करण्यासाठी अभ्यास करत नाहीत, तर स्वत:च्या आनंदासाठी, त्यांना आवडते म्हणून अभ्यास करतात. सर्वच वर्गात सक्षम मुले थोडीच असतात. अयशस्वी होणाऱ्या बहुसंख्य मुलांचे काय, हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शाळेतील शिक्षकांनी जर त्यांच्या परंपरागत जबाबदारीचा – वरिष्ठ, पोलीस आणि न्यायाधीश या भूमिकांचा त्याग केला तरच ते विद्यार्थ्यांना समजून घेऊ शकतील आणि मुलांना ते कशी मदत करू शकतील, असे सांगत मुलांचे अनुभव, त्यांच्या कल्पना, त्यांना स्वारस्य असणारे विषय शिक्षकांनी समजून घेतले तर वर्ग त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त करण्याचे मार्ग शिक्षक म्हणून सुचू लागतात, असा अनुभव त्यांनी सांगितला आहे.  
मुलं एकमेकांना मदत करता करता एकमेकांकडून शिकू – शिकवू पाहतात. त्यासाठी शिक्षकांनी मुलांना अवकाश आणि वेळ द्यायला हवा, असा होल्ट यांचा आग्रह आहे. बहुतेक शाळांची भावना असते की शिस्त केवळ भीती, धमकी, शिक्षा यांच्याद्वारे करता येते. मात्र, सहकाराने शिस्त राखली जाते, असा सिद्धान्त लेखकाने पुस्तकात सोदाहरण स्पष्ट केला आहे.  
लेखकाने त्यांच्या विद्यार्थ्यांचे, शिकण्या-शिकवण्याचे, मुलांच्या अध्ययनातील अडथळ्यांचे अनेक अनुभव या पुस्तकात नमूद केले आहेत. बुद्धय़ांकाद्वारे शिकण्याचा वेग मोजला जात नाही, हे सांगताना त्यांनी पुष्टीसाठी व्हाइटहेडचे मत दिले आहे. ते म्हणजे बुद्धिमत्तेचे महत्त्वाचे गमक म्हणजे चांगले प्रश्न विचारणे आणि कोणते प्रश्न विचारण्याची खरोखरच गरज आहे हे ओळखता येणे. यात मोठय़ा व कठीण समस्या सोडवता येण्याच्या क्षमतेचेही मूल्यमान केले जात नाही आणि करता येणारही नाही, असे लेखकाला वाटते.
एकाचवेळी अनेक प्रकारची माहिती एकत्रितपणे वापरता येण्याची क्षमता ही व्यापक बुद्धिमत्तेची उच्च निदर्शक असून मुलांना आपला मेंदू कमीतकमी वापरण्यास उद्युक्त केल्याने त्याची क्षमता कमी कमी होत जाईल, हे त्यांचे विधान लक्षात घेण्याजोगे आहे. एक छोटेसे जग मुलांच्या आवाक्यात आणून दिले की मुलं त्यांच्याकडे अगोदर असलेली बुद्धिमत्ता वापरून खऱ्या गोष्टी करू शकतात आणि त्या बरोबर होत्या की नाही हे ते स्वत:च पडताळू शकतात, असे निरीक्षण लेखकाने मांडले आहे.
मुलांना जे काय हवे ते शिकण्याची योग्य व सर्वोत्तम जागा म्हणजे हे जग व मोठय़ा माणसांचे नेहमीचे आयुष्य. स्वत:च्या पद्धतीने जग थोडेसे चांगले व उजळ बनविण्यासाठी सर्व मुलांना मदत करणे ही शिक्षकांनी आपली जबाबदारी मानून ती आनंदाने पार पाडायला हवी, हे या पुस्तकात अधोरेखित करण्यात आले आहे. अध्यापनावर आणि मुलांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि पालकाने संग्रही ठेवावे, असेच हे पुस्तक आहे.
‘मुलं नापास का होतात?’ – जॉन होल्ट, अनुवाद – सुजाता गोडबोले, मनोविकास प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – २१३,
मूल्य – २०० रुपये.
suchita.deshpande
@expressindia.com

Infosys Narayana Murthy Consumer Brand
Narayan Murthy: ”लोकांना वाटते त्यांच्याकडे विशिष्ट फोन अन् घड्याळ असेल तर…,” नारायण मूर्तींनी यशस्वी ब्रँडसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स
RPF Recruitment 2024
RPF अंतर्गत लवकरच २००० पदांची मेगाभरती! १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा कुठे आणि कसा करायचा अर्ज
navi mumbai municipal corporation maratha reservation survey work marathi news
नवी मुंबई : महापालिका शिक्षकांवर सर्वेक्षण कामांचा भार!
Teachers Wardha boycott Maratha survey
वर्धा : मराठा सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार; म्हणतात, “आमचे काम नव्हे,” प्रशासन पेचात…

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व दखल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why do children fail

First published on: 09-03-2014 at 07:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×