मुंबई म्हणजे एक जिवंत अस्तित्व. मुंबई म्हणजे अरबी समुद्राचा किनारा. समुद्रातल्या होडय़ा अन् बोटी. रुळांवरून धावणाऱ्या रेल्वेगाडय़ा. आकाशात झेपावणारी अजस्र विमानं. मोठे रस्ते. भरलेले फुटपाथ. रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या मोटारी. उंचच उंच इमारती. दुकानं. थिएटर्स. सतत चाललेली बांधकामं.. आणि मुंबई म्हणजे इथं येणारी लाखो माणसं! माझ्या जवळपास सात दशकांच्या मुंबईतील वास्तव्यात भेटलेल्या माणसांचा आणि त्यासोबतच मुंबईत घडत गेलेल्या बदलांचा मी शोध घेतोय सध्या. माणसांच्या प्रचंड गर्दीत हरवून गेलेला माणूस इथं दिसतो आणि गर्दीत राहूनही आपलं असं स्वतंत्र अस्तित्व राखणारा माणूसही इथं दिसतो. आमच्या हॉटेलच्या व्यवसायानं मला ही माणसांची मुंबई अक्षरश: उभी-आडवी दाखवली. इतकी वेगवेगळी माणसं भेटली की बस्स! या विविध प्रकारच्या माणसांच्या भेटींनी आणि त्यांच्या तऱ्हांनी माझं आयुष्य तऱ्हेवाईक होण्यापेक्षा समृद्ध झालं असंच म्हणायला हवं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा वैशिष्टय़पूर्ण माणसांपैकी एक वादळी जीवन म्हणजे सरदार.. सरदार चंदूलाल शहा. रणजित स्टुडिओ आणि रणजित फिल्म कंपनीचे सर्वेसर्वा. त्यांना कोणी ‘सरदारकी’ बहाल केली नव्हती, तर रसिक आणि सिनेमा क्षेत्रातल्या सहकाऱ्यांनी त्यांना ‘सरदार’ मानले होते. ते मला गमतीनं म्हणत, ‘‘कुलवंतजी, आप तो जनम से सरदार हो, लेकीन मैंने सरदारकी हासील की है लोगों के प्यार से।’’

आज तुम्हाला वेगवेगळे निर्माते चित्रपट निर्माण करताना दिसतात, पण प्रारंभीच्या काळात तसं नव्हतं. तो कंपन्यांचा काळ होता. कंपनीवाले सेठ असत. त्यांच्या पदरी दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, संगीतकार, कॅमेरामन आणि चित्रपटासाठी आवश्यक माणसं कायमस्वरूपी कामाला असत. तो मोठा बारदाना सांभाळायचा म्हणजे एखादं संस्थान सांभाळण्यासारखं होतं. हे नवे संस्थानिक आपलं संस्थान बखुबीनं सांभाळायचे. चंदुलाल शहा हे अशा  संस्थानांतील एक संस्थानिक. हा उंचापुरा, पांढऱ्याशुभ्र केसांचा माणूस म्हणजे चित्रपटसृष्टीतला भीमच म्हणायला हवा. आमचं ‘प्रीतम’ सुरू झालं आणि लगेचच चंदुलालजींच्या रणजित स्टुडिओतली माणसं आमच्याकडे यायला लागली. आमच्यापासून जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर रणजित स्टुडिओ. पंजाबी खाण्याच्या चवीमुळे तशा चवीची माणसं आमच्याकडे येऊ  लागली. तो आमच्या ‘प्रीतम’चा सुरुवातीचा काळ होता. माझी बिजी (आई) स्वत: खाद्यपदार्थाचे नमुने देत असे. मसाले कसे तयार करायचे ते सांगत असे. (हा एक रोचक इतिहास आहे. तो ओघात नंतर सांगेन कधीतरी.) ती आमच्या आचाऱ्यांना नेहमी सांगे, ‘मसाल्यांबरोबर थोडंसं मनही घाला जेवणामध्ये, म्हणजे अन्न अधिक रुचकर होतं आणि खाणारा प्रसन्न होतो.’ आमच्याकडे आम्ही फूड ‘सव्‍‌र्ह’ नाही करत, हम थाली में खाना परोसते हैं! बस्स. त्यामुळे आमच्याकडे लोक यायला लागले. चंदुलालजी हे चित्रपटसृष्टीतील महान निर्माता, दिग्दर्शक, लेखक आहेत हे आम्हाला आधीपासून ठाऊक होतं. ते १९२४ पासूनच चित्रपट उद्योगात होते. (माझा जन्म १९३२ चा) त्यांनी आमच्याकडे येणं म्हणजे अख्ख्या चित्रपट उद्योगानं आमच्याकडे येणं. ते माझ्यापेक्षा जवळपास पंचवीस वर्षांनी मोठे. खरं तर त्यांची दोस्ती माझ्या पापाजींशी व्हायला हवी होती; पण दोस्ती झाली माझ्याशी. हे माझं भाग्यच!

चंदुलालजी मनात आलं की ‘प्रीतम’मध्ये यायचे. कधी कधी लागोपाठ रोज यायचे, तर कधी कधी महिनोन् महिने ते आमच्याकडे फिरकायचे नाहीत. त्यांचा स्वभाव फारसा गप्पिष्ट नव्हता. पण का कोण जाणे, ते आमच्याकडे आले की माझ्याशी खूप बोलायचे. त्यांच्या घडत्या काळाच्या आठवणी सांगायचे. त्यांचा जन्म जामनगरचा होता. त्यांचे पिता हे जामनगरच्या महाराजा रणजितसिंगांच्या विश्वासातले. खजिन्याच्या चाव्याच त्यांच्याकडे असायच्या. पण एक दिवस महाराजांची खप्पामर्जी झाल्यावर चंदुलालजींचे पिताश्री- जेसिंगभाई यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना मुंबईत पाठवलं. चंदुलालजींना कापसाच्या वखारीत नोकरी लागली आणि तिथून आपल्या कष्टानं आणि धैर्यानं चंदुलालजींनी शेअर बाजाराच्या मार्गाने चित्रपट दुनियेचा लोकनियुक्त सरदार होण्यापर्यंतची मजल मारली.

चंदुलालजींनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाची एक मजेशीर आठवण मला सांगितलेली आठवते. तो जमाना देवादिकांचे, चमत्कार- मंत्रांचे मूकपट चालण्याचा होता. सणासुदीचे दिवस येत होते. त्यामुळे पौराणिक चित्रपट चालणारच- या हिशेबानं त्यांना इम्पिरिअल थिएटरसाठी एक पौराणिक मूकपट करायचा होता. करार वगैरे झाले आणि चंदुलालजींनी एका सामाजिक विषयावर मूकपट करायचं ठरवलं. त्याचं चित्रिकरणही सुरू झालं. इम्पिरिअलच्या मॅनेजरला हे कळलं. चंदुलालजींच्या भाषेत तो उखडला. पण त्याच्याकडे लक्ष न देता चंदुलालजींनी काम सुरू ठेवलं आणि अक्षरश: एका महिन्यात मूकपट पूर्ण करून सणासुदीच्या दिवसांत प्रदर्शित केला. तो दहा आठवडे चालला. त्यांना जनमानसाची नाडी गवसली. त्यानंतर जवळपास चार दशकं त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. पण खऱ्या अर्थाने त्यांचं नाव झालं ते ‘गुणसुंदरी’ या चित्रपटामुळे.

त्या चित्रपटाची कूळकथा त्यांनी एकदा मला ऐकवली होती. तो चित्रपट खरं म्हणजे कोणीतरी दुसरे दिग्दर्शक करणार होते. पण ते खूप आजारी पडले. त्यांनी चंदुलालजींना बोलावलं आणि तो चित्रपट करायला सांगितला. चंदुलालजींनी त्यांना आत्मविश्वास द्यायचा प्रयत्न केला, पण अखेरीस त्यांच्या प्रकृतीची स्थिती पाहून चंदुलालजींनी ते मान्य केलं. तो चित्रपट करताना दोन अटी होत्या : पहिली म्हणजे तो चित्रपट २१ दिवसांत पूर्ण करायचा होता. आणि दुसरी अट होती- चित्रपटाची नायिका मिस गोहर मामाजीवाला ही असावी. चंदुलालजींना आव्हानं स्वीकारायला आवडायची. पहिली अट लगेचच मान्य झाली आणि मिस गोहर हा तर त्यांचा ‘वीक पॉइंट’ होता. त्यामुळे ती अट त्यांच्या पथ्यावरच पडली!

चंदुलालजींनी व्यवस्थित आखणी करून ‘गुणसुंदरी’ पूर्ण केला. हा चित्रपट त्यांच्याच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरला. मिस गोहरच्या ते प्रेमात होते. पुढे मिस गोहर चंदुलालजींच्या जीवनाचा अभिन्न भाग बनल्या होत्या. ती एक अजरामर प्रेमकहाणी बनली. चित्रपटाच्या तकलादू दुनियेत अनेक प्रेमकहाण्या घडतात व मोडतात; पण एकमेकांशी केवळ आणाभाका करून टिकलेली ही अद्भुत कहाणी होती. ऑपेरा हाऊसजवळ ‘ड्रीमलँड’ नावाची चंदुलालजींच्या मालकीची एक इमारत होती. त्या इमारतीतील एका भव्य सदनिकेत त्या राहत असत. (लग्न न करता अखेपर्यंत हे दोघं एकत्र कसे राहिले, याबद्दल राज कपूर माझ्याजवळ कधी कधी आश्चर्य व्यक्त करत असत.)

गोहरबाई कधी कधी ‘प्रीतम’मध्ये येत असत. त्या फार कमी बोलत. चंदुलालजींच्या पत्नीनं- केशरबाईंनी त्यांचं अस्तित्व आणि चंदुलालजींच्या जीवनातलं स्थान मान्य केलं होतं. फिल्मी पाटर्य़ाना गोहरबाई चंदुलालजींसोबत जात, तर घरगुती कार्यक्रमांत केशरबाईंची सोबत असे. हे वाचायला जरा विचित्र वाटेल; पण तसं होतं खरं. रणजित स्टुडिओचं बरंचसं काम गोहरबाई बघायच्या. चंदुलालजी दररोज अकराच्या सुमारास स्टुडिओत येत. तिथं एक छोटीशी इमारत होती. तिथं गोहरबरोबर ते चित्रपटविषयक चर्चा करत. दुपारी कधी ड्रीमलँडमधून, तर कधी आमच्याकडून जेवण मागवत. काही वेळा मी त्यांना जेवण घेऊन जायचो. चंदुलालजी खूश व्हायचे. दिलदार माणूस!

ते भन्नाट होते. त्यांचं ‘प्रीतम’मध्ये येणं सुरू झालं. एक आठवण त्यांनीच मला सांगितलेली : ते पुण्याला रेसला गेले होते. जुगार खेळणं आणि रेस खेळणं हे त्यांचे मोठे शौक! त्यांचे रेसचे घोडे होते. त्या रात्री ते पुण्यात रमी खेळत होते. त्यांच्या मॅनेजरचा फोन आला- कॉटन मार्केट कोसळलंय आणि त्यांना मोठा फटका बसलाय. चंदुलालजी म्हणाले, ‘‘ठीक आहे. मी सोमवारी आल्यावर बघू.’’ त्यांच्याबरोबर पत्ते खेळणाऱ्या एका महाराजांनी विचारलं, ‘‘कितीचा फटका बसला?’’ चंदुलालजी शांतपणे म्हणाले, ‘‘सव्वा कोटींचा.’’ त्या काळात एवढा प्रचंड मोठा फटका बसूनही ते शांत होते, हे पाहून सारे थक्क झाले.

यावर चंदुलालजी मला म्हणाले, ‘‘ती परिस्थिती मी बदलू शकत होतो का? तर नाही. मग उगाच गलितगात्र होण्यात काय अर्थ? जे जसं आहे, ते तसं स्वीकारलं पाहिजे.’’

चंदुलालजी कधी गप्पांत रंगले की रणजित स्टुडिओची जन्मकथा सांगत : ‘‘ज्या रणजितसिंगांनी त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता, त्यांच्याचकडून चंदुलालजींनी नव्या स्टुडिओसाठी पंचवीस हजारांचं भांडवल उभं केलं. त्याची परतफेड म्हणून आपल्या कंपनीचं नाव त्यांनी ‘रणजित’ ठेवलं.’’

त्यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना असत. आपलं दृश्य अधिक रोमांचकारी व्हावं, परिणामकारक ठरावं म्हणून पुतळ्यांच्या ठिकाणी नग्न स्त्रिया उभ्या करण्याची कल्पना त्यांना सुचली होती! मला आठवतं त्याप्रमाणे भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी चंदुलालजींनी अख्ख्या सिनेसृष्टीला गोळा करून मुंबईला आझाद मैदानावर प्रचंड मोठा कार्यक्रम केला होता. तिथं मोठं प्रदर्शन भरवलं होतं. कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची उपस्थिती होती. त्यावेळी ‘संगम’सारख्या कितीतरी चित्रपटांचे भव्य सेट्स त्यांनी निर्मात्यांना उभे करायला लावले होते. पहिल्या कॅमेऱ्यापासून विविध वस्तू प्रदर्शनात मांडल्या होत्या. असलं काही फक्त त्यांच्याच डोक्यात येऊ  शकतं! खराखुरा पहिला ‘शोमन’ होते ते!

करण दिवाण हा अभिनेता त्या प्रदर्शनाचा सचिव होता. प्रदर्शन ४२ दिवस चालणार होतं. चंदुलालजी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, तुम्ही इथं रेस्टॉरंट टाका.’’ माझ्यातला व्यावहारिक हॉटेलिअर जागा झाला. मी नम्रपणे म्हणालो, ‘‘सरदारसाहेब, ४०-४२ दिवसांसाठी हॉटेल टाकणं कसं शक्य होईल? परवडेल का ते मला?’’ ते फटकन् म्हणाले, ‘‘तुला थोडेच पैसे घालायचे आहेत? मी तुला सारं उभं करून देणार. तू फक्त रेस्टॉरंट चालव.’’ मी तयार झालो. त्यांनी त्यांच्या कला- दिग्दर्शकाला बोलावलं. त्याला दहा हजार चौ. फुटांचं एक रेस्टॉरंट तयार करायला सांगितलं. त्यात एक फ्लोटिंग डान्सिंग फ्लोअर करायला सांगितला. सर्व प्रकारच्या सोयी द्यायला सांगितल्या. प्रदर्शन सुरू झालं.

त्या काळात ‘प्रीतम’ दुपारी दोन-अडीच वाजता बंद होत असे. मी अडीच वाजता माझ्या कन्व्हर्टिबल शेवरोलेटने आझाद मैदानावर जात असे. पापाजी साडेसहाच्या सुमारास येत असत. प्रदर्शन संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू होत असे. पहिले काही दिवस लोक रेस्टॉरंटकडे फिरकेनात. कारण ते थोडंसं एका बाजूला होतं. त्याचा भव्यपणाही लोकांना बिचकवत होता. चार-पाच दिवसांनी मी चंदुलालजींकडे गेलो. त्यांना म्हणालो, ‘‘लोक रेस्टॉरंटकडे फिरकत नाहीत. तुम्ही एक कराल का? राज कपूर, नर्गिस, वैजयंतीमाला, दिलीपकुमार, देव आनंद, मीनाकुमारी, राजकुमार यांना एकदा आपल्या रेस्टॉरंटकडे चक्कर मारायला सांगा. मग लोक यायला लागतील.’’

आणि तसंच झालं. पहिले राजजी आणि वैजयंतीमाला रेस्टॉरंटमध्ये आले. त्या दोघांना बघायला अशी काही गर्दी लोटली, की सुरक्षाव्यवस्था कोलमडली. त्या दोघांनी कोकाकोला घेतला. मग लोकही कोकाकोलाच पिऊ  लागले. चार आण्यांचा कोकाकोला. चंदुलालजींना मी म्हणालो, ‘‘फक्त चार आण्यांची विक्री कशी चालेल?’’ ते मला म्हणाले, ‘‘एक रुपयाला कोक विका.’’ मी कोकाकोला एक रुपयाला विकू लागलो. आम्ही तिथं लाइव्ह बँड ठेवलेला. लोक येऊ  लागले. मग हळूहळू खर्चाचं गाडं थोडंसं रुळावर आलं. मात्र, त्यातही चंदुलालजींना तोटाच होत होता. पण क्षुद्र नफ्यातोटय़ाच्या गणितांचा विचार करणारा तो माणूसच नव्हता.

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सर्वाना सोबत घेऊन जायला आवडत असे. उत्तम नेत्याचं ते लक्षण आहे. जन्मानं नसले तरी कर्मानं चंदुलालजी चित्रपटसृष्टीचे ‘सरदार’ होते!

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

मराठीतील सर्व ये है मुंबई मेरी जान! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part
First published on: 18-02-2018 at 01:05 IST