मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

मुंबईत जन्मलेले झुबिन मेहता (जन्म : १९३६) (यानंतर मात्र आपण त्यांचा उल्लेख ‘झुबिन’ असा करणार आहोत.) हे पारशी समाजासाठी ‘आपरो झुबिन’ आहेत. मेहेली मेहता (१९०८-२००२) हे जुन्या जमान्यातील एक प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि एकमेव कंडक्टर हे झुबिनचे वडील. ‘मेहेली मेहता म्युझिक फाऊंडेशन’ ही पाश्चात्त्य संगीताचा प्रसार करणारी संस्था त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९९५ मध्ये स्थापन केली गेली. तर.. पाश्चात्त्य जगातील- विशेषकरून अमेरिकेतील झुबिनचे बरेच चाहते त्याला प्रेमाने ‘झुबी बेबी’ (Zubie baby) म्हणत आले आहेत. बहुसंख्य सुसंस्कृत भारतीयांनी त्याचं नाव जरी ऐकलेलं असलं तरी जागतिक कीर्तीचा हा (ऑर्केस्ट्रा) कंडक्टर नेमका कशासाठी इतका प्रसिद्ध आहे याची काहीच कल्पना त्यांना नसते. आणि पाश्चात्त्य अभिजात संगीताबद्दल भारतीयांच्या मनात एकंदरीतच एक प्रकारचं औदासीन्य आणि बऱ्याच वेळा एक प्रकारची तुच्छता असते हे लक्षात घेऊनही ही गोष्ट जरा आश्चर्यकारक वाटते. कारण झुबिन हा जागतिक कीर्तीचा कंडक्टर तर आहेच, पण अनेक मानसन्मानांनी विभूषित असा ‘ग्लोबल भारतीय’ही आहे. (तो ‘पद्मविभूषण’ असून, सांस्कृतिक सुसंवादासाठी देण्यात येणाऱ्या ‘टागोर अ‍ॅवार्ड फॉर कल्चरल हार्मनी’ या सन्मानाचाही तो मानकरी आहे.)

Apple watch 7 for save policy researcher sneha life heart rate notification feature alert over 250 beats per minute
‘स्नेहा बरं झालं तू ॲपल वॉचचं ऐकलंस…’, स्मार्टवॉचच्या ‘या’ फीचरमुळे वाचला भारतीय महिलेचा जीव; टिम कूकनेही घेतली दखल
D gukesh
‘टोरंटोत भारतीय भूकंप’; कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशचे कास्पारोवकडून कौतुक; विजयाचे श्रेय आनंदलाही
D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Gopi Thotakura First Indian space tourist
गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

एक ‘ऑर्केस्ट्रा कंडक्टर’ म्हणून झुबिनचं पाश्चात्त्य अभिजात संगीताच्या जगात नेमकं काय स्थान आहे हे समजून घेण्यासाठी या संगीताची नीटशी जाण असणं आवश्यक आहे. आणि बहुतांश वाचकांना या विषयाची तोंडओळखदेखील नसल्यामुळे हा लेख प्रामुख्याने झुबिनच्या भारताशी असलेल्या भावनिक बंधांवर भर देणारा आहे.

झुबिनविषयी भारतीय अज्ञानाची दोन उदाहरणं.. एक गमतीशीर आणि दुसरं धक्कादायक! पण या दोन्ही उदाहरणांचा उगम एकच : झुबिन नक्की कोण आहे, तो नक्की काय करतो, याबद्दलचं अज्ञान! त्यातलं पहिलं उदाहरण २०१३ साली शालिमार बागेत (श्रीनगर) झालेल्या त्याच्या कार्यक्रमाबद्दल आहे. एक स्थानिक बडं प्रस्थ होतं. ते त्यावेळचे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना भेटायला गेले होते. कारण होतं- कार्यक्रमासाठी फ्री पासेस मिळवणं. त्यांनी विचारलं, ‘झुबिन कुठली गाणी गाणार आहे?’ साधारण भारतीय नाव असावं असं वाटणारा हा माणूस एखादा दलेर मेहेंदी किंवा बाबा सेहगल असावा असा त्यांचा समज झाला असावा. आणि आता धक्कादायक दुसरं उदाहरण.. १६ मार्च २००९ च्या अंकात ‘इंडिया टुडे’ या मासिकाने झुबिनचं वर्णन ‘रचनाकार’ असं केलं होतं. (‘फिफ्टी पॉवर पीपल’मध्ये झुबिनचा क्रमांक होता १२ वा!) भारताच्या या ‘टाइम मॅगझिन’मधील ही एक अक्षम्य चूक होती. झुबिन हा ‘रचनाकार’ नसून ‘कंडक्टर’ आहे, हे माहिती असायला तुम्ही ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे संगीत समीक्षक असायची काही गरज नाही.

झुबिन हा नक्की कशा प्रकारचा संगीतकार आहे? प्रथम तो कशा प्रकारचा संगीतकार नाही, हे आधी सांगतो. तो व्यावसायिक गायक नाही आणि कधीच नव्हता. तो पियानो, व्हायोलिन (आणि डबलबेस) ही वाद्यं बऱ्यापैकी वाजवतो. पण या वाद्यांद्वारे कॉन्सर्ट पेश करण्याइतकं नैपुण्य त्याच्याकडे नाही. आणि तो ‘ऑर्केस्ट्रा कंडक्टर’ असल्यामुळे त्याला त्याची गरजदेखील नाही. कुलाब्याच्या शाळेत शिकत असल्यापासून मोठेपणी आपण एक जगप्रसिद्ध कंडक्टर व्हावं हेच त्याचं स्वप्न होतं. त्यासाठीच तो वयाच्या १८ व्या वर्षी व्हिएन्नाला संगीत शिक्षणार्थ गेला. आणि कंडक्टर म्हणूनच अर्धशतकापेक्षा जास्त काळ त्याने पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचं जग दीपवून टाकलं आहे.

‘कंडक्टर’ हा प्राणी नेमकं करतो तरी काय? या लेखाच्या मर्यादेत या प्रश्नाचं पूर्णपणे समाधानकारक उत्तर देणं कठीण आहे, तरीही मी प्रयत्न करतो. सर्वसाधारणपणे ऑर्केस्ट्रा हा सिम्फनी, कंचटरे, ऑपेरा आणि बॅले हे संगीतप्रकार सादर करतो. आणि या प्रकारांत जो सांगीतिक आविष्कार होतो त्याची लय (tempo), ध्वनिमान (Dynamics) आणि स्वरसमूह (phrasing) झुबिन नियंत्रित करतो. आणि हे तो बहुतेक वेळा (नेहमी नाही!) हातातल्या बारीक छडीने- ज्याला ‘बेटन’ (baton) म्हणतात- सूचित करतो. रचनाकाराने लिहिलेल्या (पाश्चात्त्य संगीतात याला ‘स्कोअर’ (score) म्हणतात.) एखाद्या संगीतरचनेतील विचार आणि भावनांचं वहन जेव्हा कंडक्टर ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून प्रभावी रीतीने करतो, आणि हे विचार आणि भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात जेव्हा तो यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या कौशल्याचं कलेत रूपांतर होतं.

संगीतजगतात झुबिन एक अद्वितीय कंडक्टर म्हणून का गणला जातो? या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात असं : (१) आतापर्यंत पाश्चिमात्य संगीतविश्वात झुबिन हा एकमेव भारतीय कंडक्टर झाला आहे. (२) न्यूयॉर्क फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा (NYP) (स्थापना १८४२), बर्लिन फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा (स्थापना १८८२) आणि व्हिएन्ना फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा (१८४२) या जगातील सर्वात जुन्या आणि ख्यातकीर्त संस्था समजल्या जातात. झुबिन हा NYPच्या इतिहासातला सर्वात तरुण कंडक्टर होता. त्याने या ऑर्केस्ट्राची सूत्रे सांभाळली तेव्हा तो फक्त ४२ वर्षांचा होता. NYPच्या १७२ वर्षांच्या इतिहासात संगीत दिग्दर्शक म्हणून झुबिनची १९७८ ते १९९१ ही सलग कारकीर्द सर्वात दीर्घकालीन समजली जाते. (३) बर्लिन आणि व्हिएन्ना फिलहार्मोनिकचा झुबिन संगीत दिग्दर्शक जरी होऊ शकला नाही तरी तो त्यांचा गेली ५० वर्षे जवळजवळ प्रत्येक सीझनमध्ये ‘गेस्ट कंडक्टर’ राहिला आहे. (४) इस्राएल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राशी (IPO) झुबिनचे संबंध जितके प्रदीर्घ, तितकेच गहिरे राहिले आहेत. १९६९ साली तो IPOचा संगीत सल्लागार म्हणून नेमला गेला. १९७७ मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून आणि १९८१ मध्ये ऑर्केस्ट्राचा ‘म्युझिक डायरेक्टर फॉर लाइफ’ म्हणून त्याची नियुक्ती झाली. ऑक्टोबर २०१९ साली तो या संस्थेतून निवृत्त झाला. (५) झुबिन वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी ‘टाइम’ मॅगेझिनच्या मुखपृष्ठावर झळकणारा सर्वात तरुण कंडक्टर होता.

झुबिन कितपत भारतीय आहे?

जितके इतर सर्व NRI भारतीय असतात, तितकाच. पण हा प्रश्न झुबिनच्या बाबतीच लोक का विचारतात? लक्ष्मी मित्तल, इंद्रा नूयी, सत्या नाडेला, सुंदर पिचाई किंवा अमर्त्य सेन यांच्याबद्दल का नाही विचारत? मला वाटतं, याची मुख्यत्वेकरून दोन कारणं असावीत. एक म्हणजे जवळजवळ ६५ वर्षांपासून त्याचं वास्तव्य भारताच्या बाहेर आहे. आणि हा कालावधी वर उल्लेखिलेल्या ख्यातनाम व्यक्तींनी भारताबाहेर घालवलेल्या काळापेक्षा खूपच प्रदीर्घ आहे. आणि दुसरं म्हणजे पाश्चात्त्य अभिजात संगीत हे पाश्चात्त्य संस्कृतीचं अतिशय दृश्य आणि प्रभावी प्रतीक आहे. आणि मुंबईत झुबिन लहानाचा मोठा होत होता तेव्हापासून पाश्चात्त्य संगीताशी त्याचे भावनिक आणि आध्यात्मिक बंध जुळलेले आहेत. पण प्रत्यक्षातील दोन गोष्टी झुबिनचं भारतीयत्व ठळकपणे अधोरेखित करतात. एक म्हणजे त्याने आपल्या भारतीय पासपोर्टचा कधीच त्याग केलेला नाही. आपल्या जन्मभूमीशी असलेलं नातं तो अभिमानाने सांगत आलेला आहे. टी. व्ही.वरील मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना तो आपल्या बम्बैय्या हिंदीत म्हणाला होता, ‘‘फिर भी दिल है हिंदुस्थानी!’’ आणि दुसरं म्हणजे- १९६७ साली त्याने लॉस एंजेलिस फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा मुंबईत आणला, तेव्हापासून ते अगदी आता आतापर्यंत तो ज्या, ज्या प्रख्यात ऑर्केस्ट्राशी निगडित आहे त्यापैकी काहींचे कार्यक्रम त्याने भारतात घडवून आणले आहेत. (२०१६ साली झुबिनने आपला ८० वा वाढदिवस त्याच्या जवळच्या मित्रांसोबत (सिप्ला कंपनीचे मालक युसूफ हमीद, रतन टाटा आणि नस्ली वाडिया हे त्यातले काही) मुंबईत साजरा केला होता. हा सोहळा शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात तेव्हा बराच गाजला होता.)

थोडक्यात.. वर्षांगणिक झुबिनचा भारताकडे असलेला ओढा कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला दिसून येतो. झुबिनच्या भारताबद्दलच्या हळवेपणाचं जे उदाहरण मी आता देणार आहे ते खूप जुनं असलं तरी अतिशय बोलकं आहे. ते स्वर्गीय राज कपूरच्या संदर्भातलं आहे. १९८८ साली मॉस्कोमध्ये झुबिनची कॉन्सर्ट सुरू व्हायच्या अगोदर राज कपूरचं निधन झाल्याची बातमी त्याला कळली. झुबिनने ही दु:खद बातमी श्रोत्यांना सांगितली आणि उत्स्फूर्तपणे त्याने ती कॉन्सर्ट ‘रशियाचा जीवलग भारतीय सुपरस्टार राज कपूर’च्या स्मृतींस अर्पण केली. (तरुण वाचकांसाठी : राज कपूरच्या ब्लॉकबस्टर ‘आवारा’ चित्रपटातलं ‘आवारा हूं..’ हे गाणं रशियात इतकं लोकप्रिय झालं होतं की एका लोकप्रिय रशियन गाण्याचं ते हिंदी रूपांतर आहे असा अनेक रशियन लोकांचा समज होता.)

जेव्हा पंडित रविशंकर आणि झुबिन कलानिर्मितीसाठी एकत्र येतात..

जगातल्या अतिशय पुरातन, समृद्ध, परिष्कृत (Sophisticated), पण लक्षणीयरीत्या भिन्न असणाऱ्या अशा दोन संगीत संस्कृतींची झुबिन आणि पंडित रविशंकर ही दोन प्रतीकं आहेत. पण तरीही हे दोघं घनिष्ट मित्र होते. १९८१ साली पंडितजींच्या ‘कंचटरे फॉर सितार अ‍ॅण्ड ऑर्केस्ट्रा’ या संगीतरचनेच्या निमित्तानं हे दोघं एकत्र आले. या कंचटरेत राग ललित, राग बैरागी, राग यमन कल्याण आणि राग मियां की मल्हार हे असून, झुबिन आणि पंडितजींनी ते लंडन फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राद्वारे सादर केले आहेत. या कार्यक्रमांची एलपी रेकॉर्ड खूपच गाजली होती.

नवीनच सुरू झालेला आणि अतिशय मानाचा असा ‘टागोर अ‍ॅवार्ड फॉर कल्चरल हार्मनी’ या दोघांनाही मिळाला आहे. रागांचे (मेलडी) उपासक पंडित रविशंकर यांना २०१२ मध्ये आणि सिम्फनी (हार्मनी)चा पेशकार झुबिनला २०१३ साली या सन्मानासाठी केलेल्या या निवडीने गुरुदेव टागोर यांना निश्चितच आनंद झाला असता.

जाता जाता.. अनेक भारतीयांप्रमाणे झुबिनलादेखील क्रिकेट आणि मिरच्या (ज्यांचा उल्लेख तो ‘हॉट चिली’ म्हणून करतो.) यांचं वेड आहे. याची दोन उदाहरणं : पहिलं त्याच्या क्रिकेटवेडाविषयी आणि दुसरं मिरच्यांच्या आवडीबद्दल! ३० मार्च २०११ रोजी एन. सी. पी. ए.मध्ये त्याची कॉन्सर्ट होती (ऑर्केस्ट्रा होता इटलीचा The maggio Musicale Fiorentino) आणि त्याच वेळी आय. सी. सी. वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना मोहालीत सुरू होता आणि तो भारत-पाकिस्तानदरम्यान होता. आणि झुबिनची कॉन्सर्ट सुरू असतानादेखील आपल्याला ताजा स्कोर कळेल अशी व्यवस्था त्याने करून घेतली होती. (त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.) आता त्याच्या मिरच्यांच्या आवडीबद्दल.. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या ऑगस्ट २०१४ मधील एका मुलाखतीत झुबिनने सांगितलं होतं की, पॅरिसमधील एका ‘kMichelin starred रेस्तरांमध्ये जेवत असताना त्याने बाहेरून आणलेल्या मिरच्या वाढलेल्या पदार्थात घातल्या म्हणून त्याला रेस्तरांमधून जवळजवळ हाकलून देण्याची वेळ आली होती.

शब्दांकन : आनंद थत्ते