महिला सबलीकरणाच्या प्रक्रियेची मागणी जोर पकडत असताना, तसेच लोकसभेच्या सभापतिपदावरून आणि विरोधी पक्षनेतेपदावरून महिला खासदार पायउतार होत असतानाच सोळाव्या लोकसभेत महिला खासदारांनी बाजी मारली आहे. यंदा लोकसभेत ६१ महिलांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भारतीय लोकसभेच्या इतिहासातील महिला खासदारांची ही सर्वोच्च संख्या आहे.
सोळाव्या लोकसभेचे निकाल लागून आठवडा झाल्यानंतर या लोकसभेतील खासदारांची विविध वैशिष्टय़े पुढे येऊ लागली आहेत. याच दृष्टीने केल्या गेलेल्या एका अभ्यासात महिला खासदारांबाबत निरीक्षणे नोंदविण्यात आली. २००९ साली झालेल्या १५ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ५८ महिला खासदार निवडून आल्या होत्या. आणि एकूण खासदारांपैकी ७९ टक्के खासदार हे पदवीधर होते. यंदाच्या निवडणुकीत महिला खासदारांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली असून यंदा ६१ महिला निवडून आल्या आहेत. मात्र पदवीधर खासदारांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा ७५ टक्के खासदार पदवीधर आहेत.
१५ व्या लोकसभेत शालान्त परीक्षादेखील उत्तीर्ण होऊ न शकलेल्या खासदारांची संख्या एकूण खासदारांच्या तीन टक्के होती. यंदा ती संख्या वाढून तब्बल १३ टक्के झाली आहे. या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांपैकी ७१ जणांनी अद्याप वयाची चाळिशीही पार केलेली नाही.