१६व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरु झालेली नेतृत्वावर टीका करण्याची मोहीम अद्यापही थांबलेली नाही. ज्येष्ठ काँग्रेस नेते अब्दुल रेहमान अंतुले यांनी या पराभवास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी पराभवास ‘पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे मौन’ कारणीभूत ठरल्याचा आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची जी स्थिती झाली आहे त्याला काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी व राहुल गांधी हे जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा २०६ वरून एकदम ४४ झाल्या. काँग्रेसच्या या दारूण पराभवास कोण जबाबदार आहे असे विचारले असता पक्षश्रेष्ठींमुळे हा दिवस आम्हाला बघावा लागला, अशा शब्दांत पंचाऐंशी वर्षांच्या या बुजूर्ग नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली.
‘काँग्रेस आयची स्थापना श्रीमती इंदिरा गांधी यांनी २ जनपथ या निवासस्थानी केली होती. एकेकाळी ४८४ जागा मिळवणाऱ्या या पक्षास आता तर लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचे पदही मिळण्यासारखी स्थिती नाही. महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या आहेत, या राज्यात गेली पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, जर पक्षश्रेष्ठींनाच काळजी वाटत नसेल तर कोण काय म्हणणार’, असे इंदिरा गांधी यांचे एकेकाळचे निकटवर्ती असलेल्या अंतुले यांनी सांगितले.
पक्षाचे पुनरूज्जीवन कसे करता येईल याबाबत आपल्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व राज्यात काँग्रेस भुईसपाट झाली असून, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये थोडी धुगधुगी उरली आहे. १९७८ मध्ये काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमध्ये जान आणली, त्या कठीण काळात त्यांनी आकाशपाताळ एक करून दोन वर्षांत सत्ता आणावी, अशी प्रेरणा आपल्यासह सर्व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली होती, आताही अशाच जोशाची गरज असल्याचे अंतुले म्हणाले.