भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या तोफा आणि त्यातून निर्माण झालेल्या मोदी लाटेचा काँग्रेस-राष्ट्रवादीने धसका घेतला आहे तर मनसेमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या आत्मविश्वासाने मनसे सामोरे गेली होती त्याच्या उलट परिस्थिती यावेळी मनसे लढत असलेल्या बहुतेक लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत लाखांनी मते मनसेने मिळवली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार विजयी झाले होते. महापालिकांच्या निवडणुकीतही मुंबई, नाशिक, कल्याण-डोबिवलीमध्ये मनसेचे मनगरसेवक मोठय़ा सख्येने निवडून आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्यावेळी उत्तर मुंबई व ईशान्य मुंबईतील आमदारांनीच लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नकारघंटा वाजविल्यापासून मनसेत एक अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी मोजक्याच जागा लढविण्याचा निर्णय घेताना मनसेचे खासदार पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देतील, अशी घोषणा राज यांनी केल्यामुळे राज यांच्या चलाख खेळीचे काही काळ कौतुक झाले.
प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीच्या लढाईतील जाहीर सभांमध्ये राज जरी मोदींना पाठिंबा जाहीर करत असले तरी मोदींच्या नावाने मते मिळवायची कशी हा प्रश्न उमेदवारांपुढे निर्माण झाल्याचे मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकमध्ये दिसून येते. मोदींनाच जर मत द्यायचे तर सेना-भाजपच्या उमेदवारांना देऊ अशी भूमिका लोकांकडून व्यक्त होत असल्याचे मनसेचेच पदाधिकारी खाजगीत मान्य करत असल्यामुळे मनसेच्या प्रचारातही अजूनपर्यंत जोर दिसत नाही.
त्यातच मोदींचा महाराष्ट्रातील झंझावाती प्रचार, लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद याला तोंड कसे द्यायचे हा प्रश्न मनसेच्या उमेदवार व कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या हातून हिसकावून घेतलेल्या दादरच्या बालेकिल्ल्यामध्येही शिवसेनेचे उमेदवार राहूल शेवाळे यांच्याविरोधात प्रचार करताना लोकांना मोदींनाच मत द्यायचे असल्याचे दिसून येत असल्यामुळे नेमके करायचे काय, हा प्रश्न मनसेच्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे.