समाजाचा जो वैचारिक स्तर आहे, समाजातली जी आदर्श तत्त्वे आहेत, त्यात कलेच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणणे ही एक कलाकार म्हणून आमची जबाबदारी आहे, असे मी मानतो. एक जबाबदार नागरिक आणि मतदार झाल्यापासून मी कोणत्याही एका पक्षाला कधीही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे त्याच जबाबदारीच्या जाणिवेतून निवडणुकांचा विचार करताना कोणत्याही पक्षापेक्षा देशातील सामाजिक-राजकीय मुद्दे काय आहेत हे पाहिले पाहिजे, असे मला वाटते. लोकशाहीत आपल्याला नेहमीच कोणीतरी तारणहार हवा असतो. त्या तारणहाराच्या शोधातच आपण मोठमोठे नेते आणि पक्षांचा विचार करत बसतो. पण, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, हे मोठमोठे नेते आपल्या मतदारसंघाची काळजी घेत नाहीत, आपल्या समस्या हाताळत नाहीत, तर आपल्या मतदारसंघातून निवडून आलेला लोकप्रतिनिधीच आपल्या विभागात सुधारणा घडवून आणणार असतो. त्यामुळे मतदान करताना आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोण आहेत? आधी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी काय कामे केली आहेत, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. निवडणुकांच्या निमित्ताने हे लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी आपल्याकडे मत मागण्यासाठी येतात तेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. लोकशाहीने आपल्याला मतदार म्हणून तो अधिकार दिलेला आहे. तो आपण बजावलाच पाहिजे. योग्य तो उमेदवार शोधून त्यालाच आपण आपले मत दिले पाहिजे. मी कोणाला मत देणार, हा प्रश्न जेव्हा मला विचारला जातो तेव्हा जो योग्य उमेदवार आहे त्यालाच माझे मत असेल, असे माझे उत्तर असते. यासाठी आपली राज्यघटना मी आदर्श मानतो. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये धर्मनिरपेक्षता, समानता, सामाजिक न्याय यांचा उल्लेख आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे जास्तीत जास्त निकष जो उमेदवार पूर्ण करेल, त्यालाच मी माझे मत देईन.