इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांना वीजचोरीसाठी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊनही भाजपने त्यांचे समर्थन करीत त्यांना खटल्यात गोवणे हा राजकीय सूडबुध्दीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. वीजचोरी झाली, तो यंत्रमाग व्यवसाय हाळवणकर यांचे बंधू चालवीत असून सर्व जबाबदारी त्यांची आहे. आमदार हाळवणकर निर्दोष असल्याचे उच्च न्यायालयात स्पष्ट होईल, असा दावा करीत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी स्पष्ट केले आहे.
वीजचोरीचा खटला २००८ रोजी दाखल झाला असून त्यावेळी हळवणकर आमदार नव्हते. यंत्रमाग व्यवसायात हाळवणकर यांची गुंतवणूक असली तरी ते त्यामध्ये सक्रिय नाहीत. ते ‘नामधारी (स्लीपिंग पार्टनर)’ आहेत. सर्व व्यवहारांची जबाबदारी बंधूंचा असल्याचा नोंदणीकृत करारनामा असल्याचे भाजपने म्हटले आहे. हाळवणकर यांचे २००९ च्या निवडणुकीत आव्हान असेल, असा अंदाज आल्याने तत्कालीन आमदार व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी वीज वितरण कंपनीला हाताशी धरून खटला भरायला लावला. त्यांनीच हा विषय विधानसभेत उपस्थित करून तत्कालीन उर्जामंत्री सुनील तटकरे यांच्याकडून कारवाईचे आश्वासनही मिळविले. त्यानंतर सहा महिन्यांनी खटल्यात आरोपी म्हणून सुरेश हाळवणकर यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. त्यावेळी ते आमदार नव्हते, असे भाजपचे म्हणणे आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावली असली तरी उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी शिक्षेला साठ दिवस स्थगिती दिली आहे. दरम्यान, हाळवणकर यांनी अपीलाची तयारी सुरू केली आहे.