नरेंद्र मोदी त्यातही गुजराती माणूस पंतप्रधान होणार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या ११ अशोक रस्त्यावरील मुख्यालयात लगबग वाढली आहे. कुठे भाजप प्रवक्ते, वृत्तवाहिन्यांवर जाणाऱ्या नेत्यांची बैठक, तर कुठे मोठ्ठा एलसीडी स्क्रिन उभारण्याची तयारी! मुख्यालयास लागून असलेल्या अरुण जेटली यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रसारमाध्यमांसाठी उभारण्यात येणारा वातानुकूलीत मंडप. दिवसभर भाजप मुख्यालय असे गजबजलेले होते. त्यात भर पडली ती ‘मोदी’चूर लाडवांची. भाजपच्या व्यापारी प्रकोष्ठने थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३०० किलो मोतीचूर लाडवांची ऑर्डर दिली आहे. गुरुवारी भाजप मुख्यालयातच डझनभर बल्लवाचार्य गुरूवारी दिवसभर लाडू वळत होते.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार या अपेक्षेनेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजप मुख्यालयात एरव्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे एरव्ही कधीही न दिसणारे वाहन उभे आहे. जागोजागी फुलांच्या कुंडय़ा ठेवून सुशोभीकरण केले जात आहे. अशोका रस्त्यावरील निकाल घोषणेसाठी वीजेच्या प्रत्येक खांबावर दोन ध्वनिप्रक्षेपक लावण्यात आले आहेत. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलीस जागोजागी तैनात करण्यात आले आहेत.
निकालानंतर दिवसभर चर्चेचा रतीब घालण्यासाठी वृत्तवाहिन्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याने भाजपनेच पन्नास छोटे स्टॉल असलेला भव्य मंडप उभारला आहे. येथे भाजप नेते माध्यमांशी संवाद साधतील. दिल्ली प्रदेश भाजप मोदी विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी करणार आहे.